Login

नवरा बिचारा...

Comedy
मे महिन्यात लग्नाला बायकोला घेऊन जाणे म्हणजे प्रेमाची परीक्षा नाही तर तो सरळ मानसिक, शारीरिक आणि आर्थिक तिन्ही प्रकारचा कॉम्बो टेस्ट असतो, हे मला त्या दिवशी समजले.

मी अभिजित..
सकाळपासून तयार होतो. पांढरा लिनेनचा शर्ट, गॉगल, परफ्यूम, अगदी हिरोसारखा. पण माझी पत्नी, मृणाल, तिचे तयार होणे म्हणजे वेगळाच प्रोजेक्ट.

“आणखी किती वेळ?” मी बाहेरून विचारले.

आतून आवाज आला, “पाच मिनिटं.”

लग्न झालेल्या पुरुषांना माहिती आहे,
बायकोचं पाच मिनिटं आणि सरकारचं लवकरच, दोघांवरही वेळेचं गणित लावायचं नसतं. असो…

मी शांत बसलो.
पंधरा मिनिटांनी पुन्हा विचारलं, “झालं का?”
“हो… अल्मोस्ट.”
अल्मोस्ट हा शब्द विवाहित पुरुषांसाठी धोक्याचा सिग्नल असतो. असो…

आणखी वीस मिनिटांनी दार उघडलं आणि मी दोन सेकंद खरंच काही बोललो नाही.
लाल साडी, हलके दागिने, मोकळे केस….

माझ्या मनात आपोपच आलं, “अभिजित, आज लग्न दुसऱ्याचं असलं… तरी नजर सगळ्यांची तुझ्या बायकोवर जाणार.”

मी फक्त इतकंच म्हणालो, “भारी दिसतेयस.”

ती आरशात स्वतःकडे बघत म्हणाली,
“माहितीय.”

तेव्हा समजलं,
मेकअप आता झाला होता, अटीट्युड निसर्गदत्त होता. असो..


मे महिन्याचं ऊन डोक्यावर होतं. गाडीत बसल्यावर पाच मिनिटांत मॅडमची पहिली कमेंट,
“AC वाढवा.”

दोन मिनिटांनी .
“इतका वाढवू नका, केस उडतायत.”

तीन मिनिटांनी,
“जरा विंडो उघडा, घुसमटतंय.”

मी शांत.
लग्न झालेल्या पुरुषांना ड्रायव्हिंग आणि मौनव्रत दोन्ही एकत्र शिकावं लागतं. असो…

मंडपात पोहोचलो.
पहिली दहा मिनिटं मृणाल अगदी राणीसारखी फिरत होती.
“हा फोटो काढा…”
“इथे काढा…”
“अरे नाही, हा अँगल खराब आहे…”
मी मोबाईल धरून तिच्या मागे.
त्या दिवशी मला समजलं, दुसऱ्यांच्या लग्नात नवरा हा पती नसतो. तो पर्सनल फोटोग्राफर विथ इमोशनल अटैचमेंट असतो. असो…

अर्धा तास गेला आणि मग सूर्यदेवांनी आपलं काम सुरू केलं.
मृणालचा चेहरा हळूहळू बदलायला लागला.

पहिले,
“गरम आहे…”
मग,
“खूप गरम आहे…”
मग,
“लोकं लग्न डिसेंबरमध्ये का करत नाहीत?”
आणि शेवटी,
“तुमच्या नातेवाईकांना सावलीचा कन्सेप्ट माहित नाही का?”
मी हसू दाबत होतो.
पण खरी कमाल तेव्हा झाली,
तीने पर्स मधून कॉम्पॅक्ट काढले, आरशात बघितले
आणि दोन सेकंद पूर्ण शांतत..

मी विचारले,
“काय झालं?”

ती हळू आवाजात म्हणाली,
“माझा मेकअप, स्प्रेड होतोय..”
मी जवळ जाऊन बघितलं आणि खरंच, काजळ खाली, फाउंडेशन वर आणि कपाळावर घामाचे थेंब.

ते बघून माझ्या आतला नवरा म्हणत होता,
हसू नकोस, हसू नकोस, आज जिवंत घरी जायचं आहे.
मी कसंबसं चेहरा स्ट्रेट ठेवला.

ती संशयाने म्हणाली,
“तुम्ही हसताय?”
“नाही गं.”
“खोटं बोलू नका.”
“मी फक्त, तुझ्याकडे बघतोय.”
ती डोळे बारीक करून म्हणाली,
“का?”
मी म्हणालो,
“कारण आत्ताच तू Instagram वरून उतरून, परत माझ्या घरातली बायको दिसायला लागली आहेस.”

दोन सेकंद शांतता…
मला वाटलं, गेलो.
मी तिच्या हातात थंड लिंबूपाणी दिलं.

तिने फक्त घोट घेतला आणि माझ्याकडे बारीक डोळे करून बघत म्हणाली,
“म्हणजे मी आत्ता खराब दिसतेय?”

बस्स…
विवाहित पुरुषांच्या आयुष्यात काही प्रश्न असे असतात…
ज्याचं उत्तर चुकलं तर पुढचे तीन दिवस नुसता इतिहास नाही तर भूगोल सुद्धा बदलतो. असो..

मी दोन सेकंद विचार केला आणि शांतपणे तिच्या हातातून ग्लास घेतला एक घोट घेतला आणि म्हणालो,
“खराब? अजिबात नाही…”
“मग?”
मी हसत म्हणालो, “आधी तू इतरांना सुंदर दिसत होतीस…”
ती अजून संशयाने बघू लागली.
“आणि आत्ता?”
मी तिच्या डोक्यावरून विस्कटलेली एक बट बाजूला करत म्हणालो, “आत्ता फक्त माझी दिसतेयस.”

दोन सेकंद ती काही बोलली नाही.
तिसऱ्या सेकंदाला फक्त ओठांवरचं हसू लपवू लागली.
चौथ्या सेकंदाला माझ्या हातावर चिमटा काढला आणि पाचव्या सेकंदाला म्हणाली,
“चला जेवायला जाऊया.”

मी सुटकेचा निश्वास टाकला.
तेवढ्यात बाजूला उभा असलेला माझा मित्र हसत म्हणाला,
“काय रे, इतक्या उन्हातही रोमान्स?”

मी त्याच्याकडे बघून म्हणालो,
“रोमॅन्स नाही रे…”

मी हसत वाक्य पूर्ण केलं,
“...हा सर्व्हाइकल स्कील आहे.”

पुढे जेवणाची रांग…
लोकांची गर्दी पाहून वाटत होतं अर्धं शहर इथेच आलंय.
ती वैतागून म्हणाली, “लोक घरी जेवत नाहीत का?”

मी म्हणालो, “फुकटचं जेवण आणि भारतीय माणूस, हे नातं खूप इमोशनल आहे.”

ती हसू नये म्हणून ओठ चावत होती. मी आईस्क्रीम स्टॉलवरून परत आलो. तिच्या हातात कप दिला तिने पहिला चमचा घेतला आणि चेहरा शांत झाला. ती हसली.

आणि पहिल्यांदाच त्या दिवशी मृणाल इतकी हसली की तिचा मटकलेला मेकअप, विस्कटलेले केस, घामाने चमकणारा चेहरा, सगळंच पुन्हा एकदा प्रेमात पाडून गेलं.

आणि मित्रांनो…
त्या दिवशी मला समजलं,
उन्हाळ्यातलं लग्न टिकतं की नाही माहित नाही, पण उन्हात वितळलेली बायको सांभाळली…
तर संसार नक्की टिकतो. असो…


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →