Login

नात्यांची स्वादिष्ट रेसिपी २

Family Story
भाग २

“आता अजून मीठ, अजून… अजून…”

सईने हात थांबवला.
“आई, इतकं मीठ घातलं तर सगळं खराब होईल.”

“का?”

“कारण प्रमाण बिघडेल.”

माधवीताईंनी तिच्याकडे बघितले.
“फक्त प्रेम असेल, पण आदर नसेल, तर नातं टिकेल?”

सई शांत होती.

“फक्त आदर, पण मोकळेपणा नसेल?”

ती पुन्हा शांत होती.

“फक्त अधिकार, पण आपुलकी नसेल?”

सईच्या डोळ्यात समजुतीचा प्रकाश चमकला.

माधवीताई पुढे बोलू लागल्या, “ऐक सई, नात्यांची रेसिपी लिहून कुठे मिळत नाही. ती रोज बनवावी लागते. कधी जास्त मीठ पडतं, म्हणजे शब्द कडू होतात. कधी साखर जास्त पडते, म्हणजे खोटं कौतुक वाढतं. कधी तिखट वाढतं, म्हणजे अहंकार बोलू लागतो. कधी तेल कमी पडतं, म्हणजे संवाद अडकतो. पण…” त्या थांबल्या.

“पण चांगली सुगरण ती नाही, जी कधी चुकत नाही.
चांगली सुगरण ती, जी चूक झाल्यावर पदार्थ वाचवते.”

सई एकटक बघत ऐकत होती.

माधवीताईंनी तिच्या हातावर हात ठेवला.
“आणि चांगली सून ती नाही, जिला सगळं येतं…
चांगली सून ती, जिला शिकायची तयारी असते.
चांगली सासू ती नाही, जी चुका पकडते…
चांगली सासू ती, जी हात धरून शिकवते.”

हे ऐकताच सईच्या डोळ्यांतून अश्रू गालावर ओघळले.

माधवीताई अचानक शांत झाल्या.
काही क्षणांनी त्यांनी हळू आवाजात सांगितले,
“माहितेय, मी जेव्हा या घरात आले होते ना,
पहिल्या दिवशी मी भाजीत मीठ घालायलाच विसरले होते.”

सई आश्चर्याने बघू लागली.
“मग?”

माधवीताई हसल्या पण डोळ्यांत जुनी वेदना होती.

“माझ्या सासूबाईंनी सगळ्यांसमोर माझी खूप खिल्ली उडवली होती. त्या रात्री मी पण अशीच रडले होते आणि त्या दिवशी मी मनाशी ठरवलं होतं जर कधी मी सासू झाले तर सूनेला चुका दाखवणार नाही, तिचा हात धरून शिकवणार.”


“आणि हे बघ, तुला जे येतेय, तू जे शिकली आहेस, तुला जे आवडते, ते तू करायला हवे. तुला नोकरी करायची होती ना?” माधवीताई.

“हो, पण ते रोहनला आवडते म्हणून…”

“त्याला तू कधी, कुठे आवडली?”

“मी जॉब करत होते, तिथे..”

“हो ना.. तू जशी आहेस तशीच छान आहेस, असे दुसऱ्याच्या आवडी बघून बदलायचे नाही. हा पण गरज पडली तेव्हा काही सोडावं लागतं तर काही धरावं लागतं, एवढेच. आम्ही आहोतच.. सोबत..कायम..” त्या हसत म्हणाल्या.

सईला आता स्वतःचे अश्रू आवरत नव्हते.
ती पटकन त्यांच्या गळ्यात पडली.
“आई…”

***

त्या दिवशी संध्याकाळी सईने पुन्हा जेवण बनवले.
हात थरथरत होते, पण मन शांत होते.

सगळे जेवायला बसले. रोहनने पहिला घास घेतला. क्षणभर काहीच बोलला नाही. सईचा जीव टांगणीला लागला होता. मग तो हसला.

“वा!”

सासरेबुवांनीही घास घेतला.
“छान.”

“हं, बरं झालं म्हणायचं..” आत्याबाई.

रोहन म्हणाला, “आज चव वेगळी आहे.”

माधवीताई हसल्या.
“जेवण तेच आहे, फक्त आज त्यात भीती नाही, आपलेपणा मिसळलाय.”

रोहनने सईकडे पाहिले. त्याच्या नजरेत टीका नव्हती, अभिमान होता.


त्या रात्री…
सई पुन्हा स्वयंपाकघरात उभी होती. समोर मसाल्याचे डबे होते. पण आज तिला प्रत्येक डब्यात वेगळे अर्थ दिसत होते,

मीठ — प्रामाणिकपणा
साखर — गोडवा
तिखट — स्पष्टपणा
तेल — संवाद
पाणी — संयम
आणि फोडणी —
वेळेवर दिलेली माफी….

ते सगळे बघत ती खुदकन गालात हसली.

समाप्त.

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →