Login

नात्यांची स्वादिष्ट रेसिपी १

Family Story
नात्यांची स्वादिष्ट रेसिपी

भाग १


“सई, चहा झाला नाही का अजून?”
हॉलमधून रोहनच्या आत्याबाईंचा आवाज आला.

“हो, घेऊन येते.” सईने घाईघाईने गॅस बंद केला.
हातात चहाचा ट्रे सावरत ती हॉलमध्ये आली.

रोहन पेपर वाचत बसला होता. माधवीताई (सासूबाई) देवाजवळ दिवा लावत होत्या. सईने कप समोर ठेवले. रोहनने एक घोट घेतला आणि कप खाली ठेवला.

“सई, साखर किती घातली आहेस? हा चहा आहे की सरबत?” रोहन.

आत्याबाईंनीही घोट घेतला.
“काल फिका होता, आज गोड, मधलं काही नाही का?” दोघेही हसत बोलले पण सईच्या मनात मात्र ते बाणासारखे घुसले.

तिने जबरदस्ती हसू आणले.
“उद्या नीट करेल.” ती म्हणाली.

“उद्या… उद्या…म्हणत लग्नाला सहा महिने झालेत,” आत्याबाई म्हणाल्या.

ते शब्द साधे होते, पण सईच्या मनात वादळ उठले.

त्या रात्री, सगळे झोपले होते. स्वयंपाकघर मात्र जागे होते. सई एकटीच ओट्याला टेकून बसली होती, समोर पोळपाट, पिठाची परात, भांडी, मसाल्याचे डबेआणि डोळ्यांत अश्रू.
तिला माहेर आठवत होते.

आई कधी कधी तिला स्वयंपाकघरात काही काही कामे सांगायची, पण शिक्षण सुरू होते, त्यातच थकवा यायचा म्हणून मग जास्ती कामं व्हायची नाहीत. पण शिक्षणात मात्र ती नेहमी अव्वल होती.

तिला तिच्या आईबाबांची आठवण येऊ लागली. तिचा हुंदका बाहेर पडणार इतक्यात मागून हलक्या पावलांचा आवाज आला.

“झोपली नाहीस अजून?”
सईने मागे वळून पाहिले. माधवीताई होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखेच ममत्व होते.

सईने पटकन डोळे पुसले.
“काही नाही आई…”

“ ‘काही नाही’ हे उत्तर बायकांचं सर्वात मोठं खोटं असतं.” माधवीताईंनी तिच्या जवळ येत विचारले.

ते ऐकून सईचा बांध फुटला. ती त्यांच्या मिठीत शिरली.

“आई, मी खरंच प्रयत्न करते. पण काहीच नीट जमत नाही, सगळ्यांना निराश करतेय. कधी वाटतं मी या घरासाठी योग्यच नाही…”

माधवीताईंनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला. काही क्षण त्यांनी तिला रडू दिले, कारण काही अश्रूंना शब्दांची गरज नसते.

दुसऱ्या दिवशी पहाटे सई उठली, तर स्वयंपाकघरात मंद दिवा लागलेला होता. माधवीताई आधीच तिथे होत्या.

“ये, आज तुला खास रेसिपी शिकवते.”

सई छान हसली.
“काय बनवायचं?”

“घर.”

सई गोंधळली.
“घर?”

“हो… घर.”
माधवीताईंनी परात पुढे केली.

“पीठ टाक.”

सईने टाकले.

“आता मीठ.”

तिने टाकले.

“आता अजून मीठ, अजून… अजून…”

सईने हात थांबवला.
“आई, इतकं मीठ घातलं तर सगळं खराब होईल.”

“का?”

*****

क्रमश:


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →