Login

नात्यांची पाऊलवाट ६

दोन एकट्या पालकांची प्रेमकथा

भाग ६: मध्यरात्रीची हाक

रात्रीचे पावणेदोन वाजले होते. संपूर्ण शहर शांततेच्या चादरीखाली गाढ झोपले होते. कामिनीच्या सोसायटीतल्या सगळ्या खिडक्यांचे दिवे विझले होते. पण कामिनीच्या घरात मात्र एक वेगळेच वादळ घोंगावत होते. अचानक मध्यरात्री दहा वर्षांच्या शार्दूलला अतिशय तीव्र ताप भरला. तो अंथरुणावर पडून असह्य वेदनेने विव्हळत होता. त्याचा श्वास जोरात चालला होता आणि त्याचे अंग निखाऱ्यासारखे तापले होते.

कामिनीने त्याच्या कपाळाला हात लावला आणि ती जागीच दचकली.

"बाळा... शार्दूल, काय होतंय रे माझ्या सोन्या?" तिने काळजीने विचारले. पण तापामुळे शार्दूलला नीट बोलताही येत नव्हते, तो फक्त कण्हत होता.

कामिनी प्रचंड घाबरून गेली. घरात असलेले तापाचे साधे औषध तिने त्याला दिले होते, पण तासभर झाला तरी ताप एक अंशही कमी झाला नव्हता, उलट तो वाढतच चालला होता. तिला एकटीला काय करावे काहीच सुचेना. ती धावतच घराबाहेर पडली. या इमारतीत तिची ओळख असलेल्या एका मैत्रिणीच्या आणि शेजाऱ्यांच्या दारापाशी ती गेली. तिने एका दारावर जोराजोरात थाप मारली.

कौन्सिलर असलेल्या शेजारच्या जोशी काकू बाहेर आल्या. कामिनीने डोळ्यात पाणी आणून हात जोडले, "काकू, प्लीज मदत करा ना. शार्दूलला खूप ताप आहे. अंग भाजून निघतंय त्याचे. मला त्याला हॉस्पिटलला नेण्यासाठी गाडी हवीये किंवा तुम्ही सोबत आलात तरी..."

जोशी काकूंनी घड्याळाकडे पाहिले आणि तोंड वाकवले, "अहो कामिनीजी, आता रात्रीचे दोन वाजतायत. सकाळी आम्हांला खूप लवकर उठून देवदर्शनाला निघायचे आहे हो. आता या वेळेला आम्ही बाहेर पडलो, तर आमची झोप पूर्ण होणार नाही. तुम्ही एक काम करा, मिठाच्या पाण्याच्या घड्या घाला त्याच्या कपाळावर, ताप लगेच कमी होईल." असे म्हणून त्यांनी कामिनीच्या तोंडावर थेट दार बंद केले.

कामिनी हताश होऊन दुसऱ्या एका शेजाऱ्याकडे गेली, ज्यांच्याकडे स्वतःची गाडी होती. तिने गयावया केली. पण आतून उत्तर आले, "अहो, आम्हाला काही वेळातच आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जायचे आहे, पाहुणे येत आहेत. आम्ही आता गाडी काढू शकत नाही."

त्या मध्यरात्री एका अगतिक, असहाय्य आईला मदत करायला कोणीही पुढे आले नाही. जगाच्या या स्वार्थी आणि निष्ठुर रूपाने कामिनीच्या मनाचा थरकाप उडाला. ती प्रचंड मानसिक तणावात आली. तिचे हातपाय थरथरू लागले. डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. शहरात असे मध्यरात्रीच्या वेळी कोणाला फोन करावा, कोणाकडे हक्काने मदत मागावी? तिचे आई-वडील खूप दूर होते. अचानक तिच्या डोळ्यांसमोर एक प्रतिमा उभी राहिली. कौशिक!

तिने विचार केला, 'मी त्यांना या वेळेला फोन कसा करू? ते काय विचार करतील?' पण समोर शार्दूलची अवस्था पाहून तिचा मातृभाव जागा झाला. स्वाभिमान आणि संकोच बाजूला ठेवून तिने थरथरत्या हाताने कौशिकचा नंबर डायल केला.

फोनची रिंग वाजत होती. दुसऱ्या बाजूला, कौशिक गाढ झोपेत होता. फोनच्या आवाजाने त्याला जाग आली. या वेळेला कामिनीचा आलेला कॉल पाहून त्याने फोन उचलला, "हॅलो?"

"कौशिकजी... प्लीज... प्लीज मला मदत करा." दुसऱ्या बाजूने कामिनीचा रडण्याचा आणि प्रचंड घाबरलेला आवाज आला.

कौशिक पलंगावरून ताडकन उठून बसला, त्याचा सगळा आळस एका क्षणात पळून गेला. "कामिनीजी? काय झाले? तुम्ही रडताय का?"

"शार्दूल... शार्दूलला खूप ताप आलाय. तो खूप कण्हतोय. शेजाऱ्यांपैकी कोणीच मदत करत नाहीये. मला काय करू काही समजत नाहीये..." ती हुंदके देत बोलत होती.

"कामिनीजी, तुम्ही अजिबात घाबरू नका. धीर धरा. मी पुढच्या पंधरा मिनिटांत तुमच्या घराबाहेर पोहोचतोय. तुम्ही फक्त शार्दूलला सांभाळा," कौशिकने अत्यंत खंबीर आवाजात सांगितले.

कौशिकने कोणतीही तमा बाळगली नाही. एवढ्या रात्री आठ वर्षांच्या अनयाला घरात एकटे सोडणे शक्य नव्हते, म्हणून त्याने तिला उठवले.

"अनू, उठ बाळा. शार्दूलची तब्येत खूप खराब आहे, आपल्याला त्याच्या घरी जावे लागेल." अनयानेही आपल्या मित्राचे नाव ऐकताच घाईघाईने आवरले. कौशिकने गाडीची चावी घेतली आणि तो वादळासारखा गाडी चालवत १५ मिनिटांच्या आत कामिनीच्या इमारतीखाली हजर झाला.

तो धावतच कामिनीच्या घरात गेला. कामिनी शार्दूलच्या कपाळावर मिठाच्या पाण्याच्या घड्या घालत बसली होती, तिची अवस्था पाहून कौशिकच्या काळजात कळ आली. कौशिकने पुढे होऊन थेट शार्दूलला आपल्या मजबूत हातांत उचलून घेतले. "कामिनीजी, चला लवकर," कौशिक म्हणाला.

कौशिकने शार्दूलला गाडीच्या मागच्या सीटवर झोपवले, अनया त्याच्या शेजारी बसून त्याचा हात धरून रडत होती. कौशिकने गाडी थेट त्यांच्या ओळखीच्या फॅमिली डॉक्टरांच्या घराच्या दिशेने पळवली. सुदैवाने डॉक्टरांनी दरवाजा उघडला आणि शार्दूलला तपासले.

शार्दूलची नाडी आणि डोळे तपासून डॉक्टरांचा चेहरा गंभीर झाला.

"कौशिक, हा साधा ताप नाहीये. ताप खूप वाढलाय. जर हा ताप डोक्यात गेला, तर मुलाचे काहीतरी बरे-वाईट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मेंदूज्वराचा धोका असू शकतो. याला आत्ताच्या आत्ता शहरातील मोठ्या मल्टिस्पेशालिटी दवाखान्यात दाखल करावे लागेल," डॉक्टरांनी तातडीने सांगितले.

'बरे-वाईट' हा शब्द ऐकताच कामिनीच्या पायाखालची जमीन सरकली. ती कोसळणारच होती, पण कौशिकने तिचा हात धरून तिला सावरले.

"डॉक्टर, तुम्ही काळजी करू नका. मी याला आत्ताच नानावटी हॉस्पिटलमध्ये नेतो," कौशिक एखाद्या कुटुंब प्रमुखाच्या आवाजात म्हणाला.

त्याने क्षणाचाही विलंब न लावता गाडी नानावटी हॉस्पिटलच्या दिशेने दामटली. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच शार्दूलला इमर्जन्सी वॉर्डमध्ये नेण्यात आले. तिथल्या रिसेप्शनवर फॉर्म भरणे आणि पैशांची जुळवाजुळव करणे सुरू होते. तिथल्या कर्मचाऱ्याने सांगितले, "आधी वीस हजार रुपये डिपॉझिट भरावे लागेल, तरच पुढील उपचार सुरू होतील."

कामिनीने आपली पर्स उघडली, पण घाईगडबडीत ती तिचे एटीएम कार्ड आणि चेकबुक घरीच विसरली होती. तिच्याकडे फक्त दोन-तीन हजार रुपये होते. ती पुन्हा रडू लागली, "मी काय करू? माझे कार्ड घरी राहिले."

"कामिनीजी, शांत व्हा," कौशिक म्हणाला. त्याने खिशातून स्वतःचे क्रेडिट कार्ड काढले आणि कामिनीला एक शब्दही न विचारता थेट काउंटरवर जाऊन संपूर्ण रक्कम भरून टाकली आणि पावती तिच्या हातात दिली.

"शार्दुलचे उपचार आधी महत्त्वाचे आहेत, पैशांचे नंतर बघू," त्याने तिला आश्वस्त केले.

रात्रभर शार्दूलवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. बाहेर कॉरिडॉरमधील बाकावर कामिनी डोक्याला हात लावून बसली होती. अनया बाजूच्या खुर्चीवर झोपून गेली होती. कौशिक रात्रभर कामिनीसोबत तिथेच थांबला. तो सतत डॉक्टरांशी बोलत होता, नर्सकडून अपडेट्स घेत होता.

पहाटेचे चार वाजले होते. कौशिक बाहेर गेला आणि कॅन्टीनमधून दोन कप गरम चहा घेऊन आला. त्याने एक कप कामिनीच्या समोर धरला. "कामिनीजी, घ्या... थोडा चहा प्या. रात्रीपासून तुम्ही काहीच घेतलेले नाही. स्वतःला सांभाळा, तरच तुम्ही शार्दूलला सांभाळू शकाल."

कामिनीने चहाचा कप हातात घेतला. गरम चहाचा घोट घेताना तिच्या डोळ्यातून पुन्हा एकदा पाणी आले. गेल्या चार वर्षांत, घटस्फोट झाल्यापासून ती प्रत्येक संकटाशी एकटीच लढत होती. आजारपण असो, कोर्टाची पायरी असो की बेकरीचे नुकसान असो, तिला पाठींबा देणारे, "मी आहे ना, काळजी नको करू" असे सांगणारे कोणीच नव्हते. पण आज, अशा मध्यरात्री, एक पूर्णपणे नात्यात ना गोत्यात असलेला हा माणूस फक्त मित्रत्वाची हाक म्हणून माणुसकीची ढाल बनून तिच्या पाठीशी इतका खंबीरपणे उभा होता. तिने न मागता त्याने स्वतःचे पैसे खर्च केले होते, स्वतःची झोप मोडून तो रात्रभर तिच्यासाठी जागत होता. कौशिकच्या या पाठींब्यामुळे कामिनीच्या मनातील तो कोरडा एकटेपणा कुठेतरी विरघळला आणि तिच्या मनात त्याच्याबद्दल कृतज्ञता दाटून आली.

सकाळी साडेसात वाजता डॉक्टर वॉर्डमधून बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर हसू होते. "काळजी करण्याचे कारण नाही. डॉक्टरांच्या वेळीच झालेल्या योग्य शुश्रुषेमुळे आणि औषधोपचारामुळे शार्दूलचा ताप आता पूर्णपणे उतरला आहे. तो आता धोक्याबाहेर आहे. आम्ही त्याला उद्या डिस्चार्ज देऊ."

डॉक्टरांचे हे शब्द ऐकताच कामिनीचा जीव खऱ्या अर्थाने भांड्यात पडला. तिने देवाचे आणि मनातून कौशिकचे आभार मानले.

कौशिकने लगेच आपल्या ऑफिसमध्ये फोन करून एक पूर्ण दिवसाची रजा घेतली.

"सर, तुम्ही ऑफिसला गेलात तरी ठीक आहे, आमच्यामुळे तुमची रजा वाया जायला नको. आता शार्दूल ठीक आहे. तुम्ही खूप मदत केलीत," कामिनी मनापासून म्हणाली.

"अहो, अशा परिस्थितीत मी तुम्हाला इथे एकटे सोडून ऑफिसला कसा जाऊ? अनया पण आहे सोबत. आम्ही दोघेही इथेच आहोत. काही लागले तर सांगा," कौशिकने हसून सांगितले. तो संपूर्ण दिवस हॉस्पिटलमध्ये थांबला, त्याने शार्दूलसाठी फळे, औषधे आणून दिली. अनयाने वॉर्डमध्ये जाऊन शार्दूलशी गप्पा मारल्या, ज्यामुळे शार्दूलही लवकर बरा झाला.

दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टरांनी शार्दूलला डिस्चार्ज दिला. कौशिकने आपली गाडी काढली आणि तो कामिनी आणि शार्दूलला घेऊन त्यांच्या घरापर्यंत सोडायला आला. इमारतीच्या खाली गाडी थांबली.

शार्दूल गाडीतून उतरला, "थँक्यू कौशिक अंकल! बाय अनया!" तो हळूहळू इमारतीकडे गेला.

कामिनी गाडीतून उतरली. ती गाडीच्या दरवाजापाशी उभी राहिली. तिच्या डोळ्यांच्या खालची वर्तुळे दोन दिवसाच्या थकव्यामुळे काळी झाली होती.तिने कौशिककडे पाहिले. एका संकटाच्या रात्री या माणसाने तिच्यासाठी जे केले होते, ते शब्दात मांडणे अशक्य होते.

तिने आपले दोन्ही हात जोडले, तिच्या गळ्यात सुप्त हुंदका दाटून आला होता. ती अतिशय आर्त आणि मनापासून म्हणाली,

"कौशिकजी... जर काल तुम्ही आला नसता, तर आज माझा शार्दूल... मी तुमचे हे उपकार जन्मात कधीच विसरू शकणार नाही. मनापासून... खूप खूप थँक्यू."

कौशिकने गाडीतूनच तिच्याकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीचेच ते अत्यंत सभ्य आश्वासक हसू होते.

"कामिनीजी, उपकार कसले? शार्दूल, अनयाचा मित्र नाही का? आणि मित्रांच्या फक्त सुखात नाही, तर अशा कठीण प्रसंगात देखील एकमेकांच्या पाठीशी उभे राहायचे असते. तुम्ही स्वतः देखील काळजी घ्या आणि शार्दूलला देखील आराम करू द्या."

कौशिकने गाडी पुढे काढली. कामिनी तिथेच उभी राहून त्या जाणाऱ्या गाडीकडे पाहत राहिली. तिच्या आयुष्यातील त्या काळोख्या, भीतीदायक रात्रीनंतर उगवलेली ही सकाळ तिच्या मनात कौशिकबद्दलच्या एका अत्यंत वेगळ्या, पवित्र आणि खंबीर विश्वासाची नवी पहाट घेऊन आली होती. 

क्रमशः 

भालचंद्र नरेंद्र देव

सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे इरा फेसबुक पेज वर येतील, त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा.

ता क: ही कथा पुस्तक काल्पनिक आहे. यातील नावे, पात्रे, स्थळे आणि घटना या लेखकाच्या कल्पनेचा अविष्कार आहेत किंवा काल्पनिक पद्धतीने ती योजली आहेत. कोणाही जिवंत वा मृत व्यक्तीशी, घटना प्रसंगाशी किंवा ठिकाणांशी त्यांचे साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

सर्व हक्क राखीव आहेत, लेखकाच्या स्पष्ट लेखी परवानगीशिवाय या प्रकाशनाचा कोणताही भाग कोणत्याही स्वरूपात किंवा कोणत्याही प्रकारे पुनरुत्पादित किंवा कॉपी केला जाऊ शकत नाही किंवा कोणत्याही डिस्क, टेप, मीडिया किंवा इतर माहिती स्टोरेज डिव्हाइसवर हस्तांतरित किंवा पुनरुत्पादित केला जाऊ शकत नाही. पुस्तक परीक्षणातील संक्षिप्त अवतरण वगळता.

copyright: ©®


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →