नात्यांची पाऊलवाट ४९

दोन एकट्या पालकांची प्रेमकथा
भाग ४९: प्रेमाची पहाट

कामिनी रात्री बेकरीचे काम आटोपून घरी परतली, तेव्हा तिचे मन एकाच वेळी आनंदाने आणि काळजीने भरून आले होते. बेकरीत अनयाने कौशिकचा आणि तिचा हात एकत्र आणला होता, तिने त्यांच्या लग्नाला दिलेली संमती कामिनीसाठी खूप मोठा दिलासा होती. पण तिच्या मनात अजूनही एका लहानग्या जिवाची काळजी होती, तिचा मुलगा, शार्दूल, अनयाच्या मनात जे आले ते शार्दुलच्या देखील मनात आले तर?

घरात शांतता होती. कामिनीने हातपाय धुतले आणि ती शार्दूलच्या खोलीत गेली. शार्दूल पलंगावर बसून चित्र काढत होता. कामिनी त्याच्या शेजारी बसली आणि तिने अत्यंत प्रेमाने त्याला आपल्या जवळ घेतले. तिने त्याच्या डोक्यावरून हळुवार हात फिरवला.

"शार्दूल... बाळा, अभ्यास झाला का रे?" कामिनीने मऊ आवाजात विचारले.

"हो आई, झाला अभ्यास. तू खूप आनंदात दिसतेस आज," शार्दूलने वही बाजूला ठेवली आणि आईच्या चेहऱ्याकडे पाहिले.

कामिनीने एक उभा श्वास घेतला. तिला काय बोलावे ते सुचत नव्हते, पण आज हे बोलणे गरजेचे होते.

"शार्दूल... मला तुला एक विचारायचे होते बाळा. मी एक विचार करत होते..."

"कौशिक काकांबद्दल ना आई?" शार्दूलने अतिशय सहजतेने विचारले.

कामिनी जागीच दचकली. तिने आश्चर्याने मुलाकडे पाहिले.

"तुला... तुला कसे कळले?"

शार्दूलच्या चेहऱ्यावर एका प्रौढ मुलासारखा समंजसपणा आला. तो कामिनीचा हात स्वतःच्या छोट्या हातात घेत म्हणाला,

"आई, मी आता लहान नाहीये. मला सगळे समजते. कौशिक काकांनी आपली आणि तुझी नेहमी किती काळजी घेतलीये. जेव्हा जेव्हा आपण अडचणीत होतो, तेव्हा ते आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. ते खूप चांगले आहेत आई."

कामिनीचे डोळे भरून आले.

"तुला... तुला वाईट नाही ना वाटणार शार्दूल? जर मी..."

"मुळीच नाही आई." शार्दूलने तिच्या चेहऱ्यावरील चिंता क्षणात मिटवत म्हटले.

"तू त्यांच्याशी लग्न केलेस तर मला खूप आनंद होईल. त्यांनी मला नेहमी स्वतःच्या मुलासारखे प्रेम दिलंय. मला... मला त्यांना 'बाबा' म्हणायला खूप आवडेल आई."

शार्दूलचे ते प्रेमाचे शब्द ऐकून कामिनीच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळले. तिने मुलाला घट्ट मिठी मारली. ज्या भीतीची सावली तिच्या मनावर साचली होती, ती तिच्या स्वतःच्या मुलाच्या समंजसपणामुळे पूर्णपणे पार पळून गेली होती.

दुसऱ्या दिवशी सकाळची पहाट अत्यंत प्रसन्नता घेऊन आली. कालपर्यंत घरात साचलेले चिंतेचे ढग पार विरून गेले होते. कौशिकने सकाळीच कामिनीला फोन करून सर्वांना बाहेर फिरायला नेण्याचा बेत आखला होता.

सकाळी अकराच्या सुमारास कौशिकची गाडी कामिनीच्या घराखाली उभी राहिली. गाडीत अनया आधीच बसली होती. कामिनी आणि शार्दूल खाली आले. अनयाने गाडीची खिडकी खाली करून हाक मारली, "शार्दूलदादा! आई... लवकर या ना."

अनयाच्या मुखातून कामिनीसाठी 'आई' हा शब्द ऐकून कौशिकच्या चेहऱ्यावर एक अप्रतिम हास्य उमटले. कामिनीचाही आनंद गगनात मावेनासा झाला होता. चौघेही गाडीत बसले आणि त्यांची गाडी राणी बागेच्या (जिजामाता उद्यान) दिशेने निघाली.

बागेत पोहोचल्यावर तिथले वातावरण खूपच आल्हाददायक होते. हिरवीगार झाडे, विविध प्राणी आणि पक्षी पाहून अनया आणि शार्दूल प्रचंड खुश झाले. दोघेही एकमेकांचा हात धरून पुढे धावत होते, तर कौशिक आणि कामिनी त्यांच्या मागे शांतपणे चालत होते.

कामिनीने आज फिकट गुलाबी रंगाची साडी नेसली होती. उन्हाच्या मंद किरणांमध्ये ती अत्यंत सुंदर दिसत होती. कौशिक अधूनमधून तिच्याकडे चोरून पाहत होता.

"कामिनीजी..." कौशिक हळूच म्हणाला.

"हं? काय झाले कौशिकजी?" कामिनीने त्याच्याकडे पाहिले.

"आज तुम्ही खूप खूश दिसताय," कौशिक मंद हसला.

"हो... मुलांचा आनंद पाहून माझे मन भरून आलंय. मला वाटले नव्हते की जे काही घडले त्या नंतर आपल्या आयुष्यात असा दिवस इतक्या लवकर येईल," कामिनी भावुक होऊन म्हणाली.

दुपारी मुले एका मोठ्या झाडाखाली खेळण्यात दंग झाली. कौशिकने ती संधी साधली. त्याने कामिनीचा हात धरला आणि तिला बागेतील एका शांत, रंगीबेरंगी फुलांनी सजलेल्या कोपऱ्यात घेऊन गेला.

"कौशिकजी... तिथे मुले एकटी आहेत," कामिनी लाजून म्हणाली.

"त्यांच्याकडे माझे लक्ष आहे," कौशिक तिच्यासमोर उभा राहिला. त्याच्या डोळ्यांत खूप प्रेम दिसत होते.

अचानक, कौशिकने कामिनीचा हात आपल्या हातात घेतला आणि कसलाही संकोच न बाळगता, तो कामिनीसमोर आपल्या एका पायावर गुढग्यावर बसला.

कामिनी जागीच हादरली, तिचे हात तोंडावर गेले.

"कौशिकजी! हे काय करताय? कोणीतरी बघेल ना..."

"पाहू दे कामिनीजी," कौशिकने खिशातून एक छोटी वेलवेटची डबी काढली आणि ती उघडली. आत एक अत्यंत नाजूक आणि सुंदर हिऱ्याची अंगठी चमकत होती, सोन्याच्या कोंदणात एक लहानसा सूर्यप्रकाश परावर्तित करणारा हिरा त्यात अलगद बसवला होता.

"ज्या दिवशी तुम्ही माझ्या आयुष्यात आलात, त्या दिवशी माझ्या ओसाड आयुष्याला अर्थ मिळाला. अनयाला आई आणि मला एक सच्चा जोडीदार मिळाला. तुम्ही माझे आयुष्य पूर्ण केलेत कामिनीजी... माझ्याशी लग्न कराल का?"

कौशिकने पुन्हा एकदा कामिनीला मागणी घातली होती, पण या वेळी तो लग्नाच्या मागणीसाठी तयारीत आला होता. कामिनीसाठी एक भेट जी तिला शेवटपर्यंत साथ देणार होती.

कामिनीच्या डोळ्यांतून आनंदाश्रू घसरले. तिने ओठ आवळून धरले. तिच्या आयुष्यात महेशने दिलेल्या दुःखाच्या जखमा आज कौशिकच्या प्रेमाने पूर्णपणे भरून निघत होत्या.

कामिनीने हसून मान हलवली.

"हो..." ती लाजून म्हणाली, "पण आधी तुम्ही उभे राहा आणि ही अंगठी... ही अंगठी तुम्हीच माझ्या बोटांत घाला."

कौशिकच्या चेहऱ्यावर एक अद्भुत आनंद पसरला. तो उभा राहिला आणि त्याने अत्यंत नाजूकपणे ती अंगठी कामिनीच्या बोटात सरकवली. कामिनीने कौशिकच्या हातावर आपला हात ठेवला. त्या शांत बागेत, फुलांच्या साक्षीने दोन जीवांचे रेशीमबंध अधिक घट्ट विणले गेले होते.

त्यानंतर चौघेही बागेत खूप फिरले,  चौघांनी मिळून आईस्क्रीम खाल्ले आणि मुलांनी प्रचंड मस्ती केली. अगदी एका सुखी, परिपूर्ण कुटुंबासारखे ते सगळे दिसत होते.

पण या सगळ्या आनंदाच्या मागे एक सावली फिरत होती. खुशी दुरून, गॉगल लावून त्यांच्यावर सतत लक्ष ठेवून होती. कामिनीच्या बोटातील ती चमकणारी अंगठी पाहून खुशीच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तिचे दात रागाने करकरले.

"कामिनी... तू समजतेस की तू जिंकलीस? नाही! तुझा हा आनंद मी काही तासांतच भस्मसात करेन," खुशी मनातल्या मनात फुसफुसली.

संध्याकाळी पाच वाजत आले होते. मुले एका बाकावर बसून ज्यूस पित होती.  काही वेळातच बागेची वेळ संपल्याची आणि बाग बंद होण्याची शिटी वाजली. शिटीचा आवाज ऐकताच चौघेही एकत्र आले आणि हसत-खेळत बागेच्या बाहेर पडले. ते सगळे गाडीत बसले आणि घरी जायला निघाले.

खुशीने त्याच वेळी एकीकडे फोन लावला, " ते राणीच्या बागेतून निघाले आहेत. लवकरात लवकर आपल्या जागेवर पोहोचा." तिने कोणाला तरी इशारा दिला होता. तिच्या डोक्यात काय होते याची कल्पना कोणालाच नव्हती.

गाडीत मुलांचा किलबिलाट सुरू होता, तर कौशिक आणि कामिनीच्या नजरा आरशातून एकमेकांना भेटत होत्या. एका तासाच्या प्रवासानंतर गाडी कामिनीच्या इमारतीखाली पोहोचली.

कौशिकने गाडी थांबवली.

"चला, आपण उद्या सकाळी शाळेत भेटूया," तो प्रेमाने म्हणाला.

"हो... काळजी घ्या आणि अनुला वेळेवर झोपवा," कामिनीने प्रेमाने सांगितले. अनयाने कामिनीला मिठी मारली.

शार्दूल आणि कामिनी गाडीतून खाली उतरले. कामिनीने आपली बॅग खांद्याला अडकवली. शार्दुलने बाहेरून कौशिकला बाय-बाय केले.

कौशिकने गाडी वळवली आणि तो स्वतःच्या घराच्या दिशेने निघाला. रस्त्यावर आता अंधार पडत चालला होता.

कौशिक अत्यंत शांतपणे आणि प्रेमाच्या विचारांत हरवून गाडी चालवत होता. पण त्याला किंवा कामिनीला कसलीही कल्पना नव्हती की थोड्याच अंतरावर, एका अंधाऱ्या रस्त्याच्या कोपऱ्यात एक भयंकर मोठा, काळा ट्रक हेडलाईट्स बंद करून उभा होता. त्या ट्रकमधला चालक मोबाईलवर कोणाची तरी वाट पाहत होता, कौशिकची गाडी समोर येताच त्याने आपल्या ट्रकला सुरू केले, तो ट्रक थेट कौशिकच्या गाडीच्या दिशेने वेग घेण्याच्या तयारीत आला होता.

क्रमशः

भालचंद्र नरेंद्र देव 

सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे इरा फेसबुक पेज वर येतील, त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा.

ता क: ही कथा पुस्तक काल्पनिक आहे. यातील नावे, पात्रे, स्थळे आणि घटना या लेखकाच्या कल्पनेचा अविष्कार आहेत किंवा काल्पनिक पद्धतीने ती योजली आहेत. कोणाही जिवंत वा मृत व्यक्तीशी, घटना प्रसंगाशी किंवा ठिकाणांशी त्यांचे साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

सर्व हक्क राखीव आहेत, लेखकाच्या स्पष्ट लेखी परवानगीशिवाय या प्रकाशनाचा कोणताही भाग कोणत्याही स्वरूपात किंवा कोणत्याही प्रकारे पुनरुत्पादित किंवा कॉपी केला जाऊ शकत नाही किंवा कोणत्याही डिस्क, टेप, मीडिया किंवा इतर माहिती स्टोरेज डिव्हाइसवर हस्तांतरित किंवा पुनरुत्पादित केला जाऊ शकत नाही. पुस्तक परीक्षणातील संक्षिप्त अवतरण वगळता.

copyright: ©®

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →