नात्यांची पाऊलवाट ४७

दोन एकट्या पालकांची प्रेमकथा
भाग ४७: सूडाची ठिणगी

रात्रीचे दोन वाजले होते. मुसळधार पावसाच्या धारेचा आवाज खिडक्यांवर आदळत होता. कौशिकच्या डोळ्यांना डोळा नव्हता. अनया त्याच्या शेजारी शांत झोपली होती, पण तिचे शरीर भयंकर तापले होते. पावसातील भिजण्यामुळे आणि मानसिक ताणामुळे तिला ताप भरला होता. कौशिक तिच्या कपाळावर वारंवार थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवत होता.

अचानक अनया हातपाय मारू लागली. तिचा चेहरा घामाने ओलाचिंब झाला. स्वप्नात तिची घालमेल सुरू झाली होती.

"नाही... खुशीताई! मी... मी नाही सांगणार कोणाला..." अनया ग्लानीतच थरथरत्या आवाजात पुटपुटली.

"पण... पण बाबांना सांग ना, मला हॉस्टेलला पाठवू नका... मला बाबांजवळ राहायचंय... खुशीताई, प्लीज."

कौशिकच्या हातातली पाण्याची पट्टी खाली गळाली. त्याचे डोळे आश्चर्याने आणि धक्क्याने मोठे झाले. 'खुशीताई? हॉस्टेल? अनया हे काय बोलतेय?' कौशिकच्या डोक्यात चक्र फिरू लागले. संकर्षणने संध्याकाळी लावलेला संशयाचा अंदाज त्याच्या डोळ्यांसमोर जसाच्या तसा उभा राहिला. 'म्हणजे... संकर्षण जे म्हणत होता तेच खरे होते का? खुशीने माझ्या लहान पोरीच्या डोक्यात काहीतरी भयंकर भरवलंय?' कौशिकचे मन सुन्न झाले. तो रात्रभर अनयाच्या शेजारी बसून तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला.

दुसऱ्या दिवशी सकाळी आठच्या सुमारास दरवाजाची घंटी वाजली. कौशिकने दार उघडले, समोर संकर्षण उभा होता. त्याच्या हातात अनयासाठी काही फळे होती.

"कौशिक, अनु कशी आहे आता?" संकर्षणने आत येत विचारले.

कौशिकने संकर्षणाचा हात धरला आणि त्याला थेट हॉलमध्ये घेऊन आला. कौशिकचा चेहरा कमालीचा गंभीर आणि रात्रभराच्या जागरणाने थकलेला दिसत होता.

"संकर्षण... तू काल जे म्हणाला होतास ना, तेच खरे आहे. काल रात्री अनु ग्लानीत असताना खुशीचे नाव घेऊन ओरडत होती. ती म्हणत होती की 'खुशीताई मी कोणाला सांगणार नाही, बाबांना मला हॉस्टेलला पाठवायला नको सांगू ना.' संकर्षण... हे सगळे काय चाललंय?"

संकर्षणाच्या चेहऱ्यावर कसलेही आश्चर्य दिसले नाही. त्याच्या वकिली नजरेने हा सगळा खेळ आधीच ओळखला होता.

"मी तुला कालच सांगितले होते कौशिक. खुशी माझी बहीण असली तरी जितकी साधी दिसते, तितकी ती नाहीये. तिच्या मनात कदाचित काहीतरी वेगळाच स्वार्थ आहे आणि त्यासाठी ती अनयाचा वापर करत होती."

"पण संकर्षण, अनु माझ्याशी काहीच बोलत नाहीये. ती भीतीने थरथरतेय," कौशिक हताशपणे म्हणाला.

"तू शांत राहा," संकर्षण त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला.

"तू तिच्यावर ओरडशील म्हणून ती घाबरतेय. मला तिच्याशी एकट्यात बोलू दे."

संकर्षण अनयाच्या खोलीत गेला. अनया आता जागी झाली होती, पण शांतपणे पलंगावर बसून होती. संकर्षणने चेहऱ्यावर अत्यंत प्रेमळ हसू आणले. त्याने खिशातून तिच्या आवडीची कॅडबरी आणि केक काढला.

"अनु बाळा... हे बघ तुझ्या संकर्षण काकांनी तुझ्यासाठी काय आणलंय," संकर्षण तिच्या शेजारी बसत अतिशय हळूवार आवाजात म्हणाला.

अनयाने त्या खाऊकडे पाहिले आणि मग संकर्षणकडे. संकर्षणाचा तो प्रेमळ आणि आश्वासक स्पर्श पाहून अनयाचा सगळा धीर सुटला.

संकर्षणने तिला प्रेमाने जवळ घेतले आणि डोक्यावरून हात फिरवला.

"अनु, तू खूप शूर मुलगी आहेस ना? मला सांग बाळा, तुला कोणाची भीती वाटतेय? तुझ्या या काकांशी तू काहीही बोलू शकतेस. मी बाबांना किंवा कोणालाच तुझ्यावर रागावू देणार नाही."

संकर्षणाच्या त्या शब्दांनी अनयाच्या निष्पाप मनात साचलेला भीतीचा बांध पार फुटला. ती संकर्षणाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडू लागली.

"काका... खुशीताईने मला सांगितले होते." अनया हुंदके देत बोलू लागली.

"खुशीताई म्हणाली की सावत्र आई खूप वाईट असते. कामिनी मावशी घरात आली की मग ती पण माझी सावत्र आई बनेल आणि मला खूप त्रास देईल, मला खायला देणार नाही... आणि मला खूप दूरच्या हॉस्टेलमध्ये पाठवून देईल."

बाहेर उभा असलेला कौशिक हे शब्द ऐकून हादरला. त्याचा स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता.

"आणि अनु... काल डबा का फेकलास तू?" संकर्षणने अत्यंत प्रेमाने विचारले.

"खुशीताईनेच सांगितले होते काका... की कामिनी मावशीचा डबा कचऱ्यात फेकून दे, नाहीतर बाबा तुझ्यावर प्रेम करणार नाहीत," अनया हुंदके देत पुढे म्हणाली,

"आणि काल पावसाच्या वेळीसुद्धा खुशीताईनेच मला म्हटले की तू बॅग घेऊन बाहेर लपून राहा. म्हणजे बाबा कामिनी मावशीला त्यांच्या मनातून हाकलून देतील. मला खरंच काही माहिती नव्हते काका... मला वाटले खुशीताई माझ्या भल्यासाठी सांगतेय."

अन्नाचा तो अपमान, अनयाचे घर सोडून जाणे, कामिनीबद्दलचा तिरस्कार... या सगळ्यामागे खुशीचाच विषारी हात होता.
हे सर्व ऐकताच हॉलमध्ये उभ्या असलेल्या कौशिकच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्याच क्षणी त्याच्या डोक्यात संतापाचा प्रचंड भडका उडाला. त्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. तो रागाने लालबुंद झाला. ज्या खुशीला त्याने स्वतःच्या धाकट्या बहिणीसारखे मानले, जिच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला, तिनेच त्याच्या निष्पाप लेकीच्या आयुष्याशी आणि कौशिकच्या सुखाशी असा नीच खेळ खेळला होता.

"कौशिक, स्वतःवर ताबा ठेव." संकर्षण बाहेर येत म्हणाला.

पण कौशिकचे हात रागाने थराथरा कापत होते. त्याने तात्काळ आपला मोबाईल काढला आणि खुशीला कॉल लावला.

"हॅलो, सर?" तिकडून खुशीचा नेहमीचा गोड आवाज आला.

"खुशी... आत्ताच्या आत्ता माझ्या घरी ये." कौशिकचा आवाज इतका भयानक आणि कडक होता की तिकडून खुशी जागीच दचकली.

"सर... काय झाले? अनु ठीक आहे ना?"

"मी काय सांगतोय ते ऐकू येत नाहीये का? लगेच माझ्या घरी ये." कौशिकने फोन कट केला.

दहाच मिनिटांत खुशी धावत कौशिकच्या घरी पोहोचली. तिच्या चेहऱ्यावर अजूनही चिंतेचा खोटा आव होता. पण दारात पाऊल ठेवताच, तिला कौशिकचा तो लालबुंद झालेला संतापलेला चेहरा आणि बाजूला संकर्षण दादा उभा असलेला दिसला.

"सर... काय झाले? तुम्ही एवढे रागात..." खुशीने बोलायचा प्रयत्न केला.

"गप्प बस!" कौशिक ढगासारखा कडाडला. त्याचा तो रुद्र अवतार पाहून खुशी दोन पावले मागे सरकली.

कौशिक तिच्या अगदी जवळ आला. त्याच्या मुठी गच्च आवळल्या गेल्या होत्या. जर खुशी ही संकर्षणची बहीण नसती आणि एक स्त्री नसती, तर आज कौशिकने पुढचा मागचा विचार न करता तिच्या कानाखाली जाळ काढला असता. पण त्याने स्वतःच्या रागावर भयंकर ताबा ठेवला.

"तुझी ही हिंमत?" कौशिकचा आवाज संतापाने कापत होता.

"माझ्या चिमुकल्या मुलीच्या डोक्यात सावत्र आईचे विष कालवायची तुझी हिंमत कशी झाली खुशी? तिला डबा फेकायला लावलास? तिला भरपावसात घराबाहेर घालवलेस? एका लहान मुलाच्या जिवाशी खेळताना तुला जरासुद्धा लाज नाही वाटली?"

खुशीचा चेहरा क्षणात पांढराफटक पडला. तिचे पितळ उघडे पडले होते.

"सर... मी... मी काय केले? अनु खोटे बोलतेय..."

"तोंड बंद ठेव तुझे!" कौशिकने तिच्यावर पुन्हा हात उगारला.

"अनु लहान आहे, पण ती खोटे बोलत नाहीये. तू तिच्या निष्पाप मनाचा वापर करून कामिनीजींना माझ्या आयुष्यातून बाजूला काढायचा प्रयत्न करत होतीस ना? मला वाटले होते तू एक समंजस मुलगी आहेस, पण तू तर एक विषारी नागीण निघालीस."

खुशीने संकर्षणकडे मदतीच्या नजरेने पाहिले, पण संकर्षणने तोंड दुसरीकडे वळवले. त्याच्याही डोळ्यांत खुशीबद्दल प्रचंड संताप आणि तिरस्कार होता.

"कौशिक..." खुशी रडू लागली, "माझे तुमच्यावर प्रेम आहे सर. मी हे सगळे तुमच्यासाठी..."

"थांब! एक शब्दही पुढे बोलू नकोस." कौशिकने दाराकडे बोट दाखवले.

"तुझे हे तथाकथित प्रेम म्हणजे एक विकृती आहे. आजपासून, या क्षणापासून तुझा आणि माझा काहीही संबंध उरलेला नाही. माझ्या केसमधून मी तुला आत्ताच्या आत्ता काढून टाकतोय, आणि यापुढे जर तू माझ्या घराच्या किंवा माझ्या अनयाच्या आसपास जरी दिसलीस, तर गाठ माझ्याशी आहे. निघून जा इथून."

"सर... प्लिज ऐका ना..." खुशी ढसाढसा रडू लागली, पण कौशिकने तिचा हात धरून तिला घराबाहेर ढकलले आणि तोंडावर जोरात दार लावून घेतले.

दाराबाहेर उभी असलेली खुशी रडत रडत जिन्यावरून खाली उतरली. तिच्या डोळ्यांतील अश्रूंचे रूपांतर आता भयंकर रागात आणि सूडभावनेत झाले होते. तिचे हात रागाने गच्च आवळले गेले.

इमारतीच्या बाहेर पडताच, खुशीने मागे वळून कौशिकच्या बंद घराकडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावरचा दयाळूपणा पार नष्ट झाला होता आणि तिथे एका क्रूर स्त्रीचा आव्हानात्मक चेहरा दिसत होता.

"कामिनी..." खुशी दात ओठ खात, संतापाने फुसफुसली,

"आज तुझ्यामुळे कौशिकने मला घराबाहेर काढले ना? आज तुझ्यामुळे माझा हा अपमान झाला ना? तू समजत असशील की तुझा विजय झालाय, पण हा खेळ इथे संपलेला नाही. मी या अपमानाचा बदला नक्की घेईन... असा बदला घेईन की तू आणि तुझा तो मुलगा रस्त्यावर याल, आणि लक्षात ठेव कामिनी, एक दिवस मी याच कौशिकच्या घरात त्याची बायको बनून, या घराची मालकीण बनून परत येईन, हे माझे वचन आहे."

क्रमशः

भालचंद नरेंद्र देव ©®

सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे इरा फेसबुक पेज वर येतील, त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा

ता क: ही कथा पुस्तक काल्पनिक आहे. यातील नावे, पात्रे, स्थळे आणि घटना या लेखकाच्या कल्पनेचा अविष्कार आहेत किंवा काल्पनिक पद्धतीने ती योजली आहेत. कोणाही जिवंत वा मृत व्यक्तीशी, घटना प्रसंगाशी किंवा ठिकाणांशी त्यांचे साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

सर्व हक्क राखीव आहेत, लेखकाच्या स्पष्ट लेखी परवानगीशिवाय या प्रकाशनाचा कोणताही भाग कोणत्याही स्वरूपात किंवा कोणत्याही प्रकारे पुनरुत्पादित किंवा कॉपी केला जाऊ शकत नाही किंवा कोणत्याही डिस्क, टेप, मीडिया किंवा इतर माहिती स्टोरेज डिव्हाइसवर हस्तांतरित किंवा पुनरुत्पादित केला जाऊ शकत नाही. पुस्तक परीक्षणातील संक्षिप्त अवतरण वगळता.

copyright: ©®


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →