नात्यांची पाऊलवाट ४६

दोन एकट्या पालकांची प्रेमकथा

भाग ४६: खोटा आव

भरपावसात ओलीचिंब झालेली कामिनी जेव्हा अनयाला कडेवर घेऊन इमारतीचे जिने चढून वर आली, तेव्हा ती स्वतः थकव्याने आणि थंडीने पूर्णपणे कापत होती. तिचे केस डोक्याला चिकटले होते, अंगावरच्या साडीतून पाण्याचे थेंब टपटप गळत होते आणि पायातील चप्पल केव्हाच कुठे तरी वाहून गेली होती. पण तिच्या हातांची पकड अनयावर तितकीच घट्ट होती.

घराचा दरवाजा उघडाच होता. आत कौशिक आणि संकर्षण नुकतेच घरात येऊन येरझाऱ्या घालत होते. कामिनीला दारात उभे पाहिले आणि तिच्या कडेवर सुखरूप बसलेली अनया दिसली, तसा कौशिकच्या जिवात जीव आला.

"अनु!" कौशिकच्या मुखातून आर्त हाक बाहेर पडली. तो आणि संकर्षण दोघेही दाराच्या दिशेने धावले.

पण कौशिकने पुढे होऊन अनयाला जवळ घेण्याआधीच, बाजूला उभी असलेली खुशी चपळाईने पुढे सरसावली. तिने कामिनीच्या कडेवरून अनयाला जवळजवळ हिसकावूनच स्वतःच्या कडेवर घेतले.

"माझी अनु! अरे देवा... तू कुठे गेली होतीस बाळा? तुला काही झाले असते तर मी काय केले असते." खुशीने दारातच मोठा आक्रोश करायला सुरुवात केली. तिने अनयाचे थंड झालेले ओले गाल, कपाळ यांचे पटापट मुके घ्यायला सुरुवात केली. तिच्या डोळ्यांतून खोटे अश्रू वाहू लागले.

"बघ किती भिजलीस तू! किती थंड पडलीस! सर... बघा ना, अनुची काय अवस्था झालीये."

खुशीचा हा सगळा ड्रामा कामिनीचे श्रेय पूर्णपणे झाकून टाकण्यासाठी चालू होता. कामिनी मात्र तिथेच भिंतीला टेकून उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर कुठलाही राग नव्हता, फक्त अनया सुखरूप घरी पोहोचल्याचे एक समाधान होते.

सगळेजण कामिनीची ती दयनीय अवस्था पाहत होते आणि कौशिकचे लक्ष कामिनीकडे गेले. नेमकी हीच संधी साधून, खुशीने अनयाचे तोंड स्वतःच्या खांद्यापाशी घेतले. अनयाचे अश्रू पुसण्याच्या बहाण्याने खुशीने आपले तोंड अनयाच्या अगदी कानाजवळ नेले.

तिचा मघाचा तो मऊ आवाज क्षणात नाहीसा झाला होता. अत्यंत मंद, करड्या आणि भीतीदायक स्वरात खुशी अनयाच्या कानात फुसफुसली,

"अनु... तू गप्प राहायचे, तुला घराबाहेर जाण्यासाठी मी सांगितले होते, हे जर तू तुझ्या बाबांना किंवा कोणालाही सांगितलेस... तर तुझे बाबा तुला खूप मारतील आणि कायमचे लांबच्या हॉस्टेलमध्ये पाठवून देतील. समजतंय ना? तोंडातून एक शब्दही बाहेर काढायचा नाही, नाहीतर मीच सांगीन तुझ्या बाबांना कि हिला दूर हॉस्टेलमध्ये नेऊन टाका."

ती धमकी ऐकताच, आधीच घाबरलेल्या चिमुकल्या अनयाचे डोळे भीतीने मोठे झाले. तिने थरथरत मुकाट्याने आपली मान हलवली. खुशीने तिला खाली उतरवले आणि तात्काळ टेबलवर बसवले.

कामिनी स्वतः डोक्यापासून पायापर्यंत ओलीचिंब भिजलेली होती. थंडीने तिचे दात वाजत होते. पण स्वतःचा विचार एका क्षणासाठीही तिच्या मनात आला नाही. ती तशीच तडकाफडकी स्वयंपाकघरात गेली. तिने अनयासाठी कोमट पाणी काढले आणि शेगडीवर तिच्या आवडत्या मकाई-सूपचे पातेले ठेवून दिले.

कामिनी टॉवेल घेऊन टेबलाजवळ आली. तिने अत्यंत मऊ हातांनी अनयाचे ओले केस पुसले, तिचे ओले कपडे बदलून तिला उबदार कपडे घातले आणि तिला शाल पांघरली. अनया शांतपणे मान खाली घालून बसली होती.

कामिनीने शेगडीवरून गरम सूपची वाटी आणली आणि ती अनयाजवळ बसली.

"बाळा... हे थोडेसे गरम सूप पी बरे. तुला लगेच बरे वाटेल," कामिनी अतिशय गोड आणि आईच्या प्रेमाने म्हणाली.

तिने चमच्याने सूप फुंकर मारून थंड केले आणि अनयाच्या ओठांजवळ नेले. अनयाने कामिनीच्या डोळ्यांत पाहिले. तिथे राग, तिरस्कार किंवा त्रासाचा एकही ठिपका नव्हता; तिथे होती फक्त आणि फक्त निस्वार्थ काळजी.

अनयाने हळूच तोंड उघडले आणि सूपचा घोट घेतला. कामिनी शार्दुलला जसे भरवते तसेच तिलादेखील प्रेमाने भरवत होती.

सूपचा प्रत्येक घोट घेताना अनयाच्या चिमुकल्या मनात प्रचंड खळबळ उडत होती. तिचे डोळे पाण्याने भरून आले.

'कामिनी मावशी किती छान आहे... मी एवढे वाईट वागले, तिचा डबा फेकून दिला, तरी ती मला पावसात शोधायला आली. मला कडेवर उचलून आणले, आणि खुशीताई? खुशीताई तर माझ्याशी खोटे बोलत होती... मला घाबरवत होती.'

अनयाला आतून भयंकर टोचणी लागली होती, पण खुशीने दिलेल्या त्या धमकीमुळे ती बोलू शकत नव्हती. तिने शांतपणे कामिनीच्या गळ्यात हात टाकले आणि डोके तिच्या छातीवर टेकवले. कामिनीनेही हरवलेले रत्न सापडल्यासारखे तिला घट्ट जवळ धरले.

दरम्यान, दारात जेव्हा खुशी अनयाला कामिनीच्या कडेवरून ओढून घेत होती आणि तिच्या कानात काहीतरी फुसफुसत होती, तेव्हा संकर्षणाची तीक्ष्ण वकिली नजर तिच्या एका एका हालचालीवर रोखलेली होती. संकर्षणने खुशीच्या चेहऱ्यावरचा तो दुटप्पीपणा स्पष्ट टिपला होता.

कौशिक जेव्हा अनयासाठी औषध आणायला बाजूला झाला, तेव्हा संकर्षणने त्याला हळूच हॉलच्या कोपऱ्यात खेचले.

"कौशिक, जरा शांतपणे ऐक," संकर्षण अत्यंत गंभीर आवाजात म्हणाला.

"काय झाले संकर्षण?" कौशिकने काळजीने विचारले.

"अनया स्वतःहून या मुसळधार पावसात बॅग भरून घराबाहेर पडूच शकत नाही." संकर्षणने सरळ मुद्दा मांडला.

"तिला कोणीतरी भडकावलंय, तिच्या मनात भयंकर भीती भरवलीये आणि मला... मला खुशीच्या हालचालींवर पूर्ण संशय आहे."

कौशिक जागीच दचकला.

"संकर्षण! हे तू काय बोलतोयस? खुशी? अरे तू तर तिचा भाऊ आहेस ना? ती तर अनयाची किती काळजी घेतेय बघ ना..."

"तेच तर नाटक आहे कौशिक." संकर्षण कडक स्वरात म्हणाला.

"ती जे काही करतीये ते फक्त दाखवण्यासाठी आहे. जेव्हा कामिनी अनयाला घेऊन आली, तेव्हा खुशीने दारात तिच्या कानात काहीतरी फुसफुसून धमकी दिलीये, हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. तिच्या या अति-सहानुभूतीमागे नक्कीच काहीतरी खूप काळेबेरे आहे. तू तिला ओळखायला चूक करतोयस."

पण कौशिकला संकर्षणाचे हे बोलणे पटले नाही. तो मान हलवत म्हणाला,

"नाही संकर्षण... खुशी असे नाही करणार. ती अनयाचे वाईट का करेल? तिने तिला नेहमीच मदत केलीये. तुझ्या वकिली नजरेला प्रत्येक गोष्टीत संशय दिसत असेल, पण मला वाटत नाही खुशी असे काही करेल. कदाचित अनया स्वतःच घाबरून गेली असेल."

संकर्षणने एक दीर्घ श्वास घेतला. त्याला माहित होते की पुराव्यांशिवाय कौशिक खुशीवर संशय घेणार नाही. 'ठीक आहे, मलाच या खुशीताईचा बुरखा फाडावा लागेल,' संकर्षनाने मनात पक्के ठरवले.

रात्रीचे नऊ वाजून गेले होते. अनया आता पूर्णपणे शांत झाली होती आणि कामिनीच्या मांडीवर डोके ठेवून तिला झापड लागली होती.

पाऊस आता थोडा ओसरला होता. कामिनीला शार्दुलसाठी घरी जाणे गरजेचे होते. संकर्षण आणि खुशी बेकरीच्या दिशेनेच गाडीने परतणार होते, त्यामुळे कामिनीने त्यांच्यासोबत निघायचे ठरवले.

कौशिक कामिनीला सोडण्यासाठी मुख्य दारापर्यंत आला. कामिनीने अनयाला हळूच गादीवर झोपवले होते.

दारात उभे असताना, कौशिकने कामिनीकडे पाहिले. त्याच्या डोळ्यांत अश्रू तरळत होते आणि चेहऱ्यावर कृतज्ञता होती. त्याने कसलाही संकोच न बाळगता कामिनीचे ओले, थंड पडलेले हात आपल्या दोन्ही हातांत घट्ट धरले.

"कामिनीजी..." कौशिकचा आवाज दाटून आला होता. "आज तुम्ही माझ्या मुलीचा जीव वाचवलात... मी तुमचे उपकार या जन्मात फेडू शकत नाही. तुम्ही आज हे सिद्ध केलेत की आई होण्यासाठी पोटची जन्मदातीच असावी लागत नाही, तर काळजात तेवढे प्रेम असावे लागते."

कामिनीच्या थकलेल्या चेहऱ्यावर एक हळुवार, मंद हास्य उमटले. तिने आपला हात हळूच कौशिकच्या हातावर दाबला.

"उपकार कसले कौशिकजी?" कामिनी शांतपणे म्हणाली.

"अनु मला माझ्या शार्दुल सारखीच आहे ना? तिच्यासाठी मी काहीही करेन. पण आता एकच करा... तिच्या मनात कशाची भीती आहे हे शोधून काढा. अनयाच्या मनातील ही भीती दूर करणं हीच आता आपली सर्वांत मोठी प्राथमिकता असायला हवी."

कौशिकने होकारात मान हलवली, त्याला देखील अनयाची काळजी सतावत होती. पुन्हा तिने एखादा वेगळा प्रयत्न केला तर मग आपण काय करायचे अशी त्याच्याही मनात भीती होती   

कामिनी, संकर्षण आणि खुशी पायऱ्या उतरून खाली गेले. गाडीत बसताना संकर्षणची नजर अजूनही खुशीवरच होती, तर खुशी मनातल्या मनात विचार करत होती की सुदैवाने ती आज वाचली. पण कामिनीच्या त्या मातृत्वाने अनयाच्या मनात खुशीने उभे केलेले भीतीचे साम्राज्य पार हादरवून टाकले होते.

क्रमशः

भालचंद्र नरेंद्र देव 

सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे इरा फेसबुक पेज वर येतील, त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा.

ता क: ही कथा पुस्तक काल्पनिक आहे. यातील नावे, पात्रे, स्थळे आणि घटना या लेखकाच्या कल्पनेचा अविष्कार आहेत किंवा काल्पनिक पद्धतीने ती योजली आहेत. कोणाही जिवंत वा मृत व्यक्तीशी, घटना प्रसंगाशी किंवा ठिकाणांशी त्यांचे साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

सर्व हक्क राखीव आहेत, लेखकाच्या स्पष्ट लेखी परवानगीशिवाय या प्रकाशनाचा कोणताही भाग कोणत्याही स्वरूपात किंवा कोणत्याही प्रकारे पुनरुत्पादित किंवा कॉपी केला जाऊ शकत नाही किंवा कोणत्याही डिस्क, टेप, मीडिया किंवा इतर माहिती स्टोरेज डिव्हाइसवर हस्तांतरित किंवा पुनरुत्पादित केला जाऊ शकत नाही. पुस्तक परीक्षणातील संक्षिप्त अवतरण वगळता.

copyright: ©®


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →