भाग ४५: मातृत्वाचा पान्हा
कौशिकच्या घरातील शांतता अचानक एका भयंकर वादळात बदलली होती. दुपारी चारच्या सुमारास जेव्हा कौशिक अनयाला नाश्ता देण्यासाठी तिच्या खोलीकडे गेला, तेव्हा तिच्या खोलीचे दार उघडेच होते. आत पलंगावर तिची आवडती बाहुली देखील नव्हती, शाळेची पुस्तके बाहेर पडली होती, पण शाळेची बॅग मात्र नव्हती. कौशिकने बाथरूममध्ये देखील पहिले पण अनया तिथे देखील दिसत नव्हती.
कौशिकने संपूर्ण घर पालथे घातले, पण अनया कुठेच नव्हती. तेवढ्यात त्याची नजर कपड्यांच्या कपाटाकडे गेली, तिच्या कपाटातील तिचे आवडते कपडे आणि काही आवडती खेळणी गायब होती, जी ती घरात असताना एक मिनिट सुद्धा डोळ्यासमोरून जाऊ द्यायची नाही.
कौशिकच्या पायाखालची जमीनच सरकली. छातीत धडधड वाढली आणि हाताला कंप सुटला. त्याने घाबरलेल्या हाताने मोबाईल काढला आणि सर्वात आधी कामिनीला फोन लावला.
"कामिनीजी!" कौशिकचा आवाज भीतीने कापत होता,
"अनया... अनया शार्दुलला भेटायला आलीये का तुमच्याकडे?"
बेकरीत काउंटरवर बसलेल्या कामिनीचे मन एका क्षणात शंकाकुशंकांनी घेरले गेले.
"नाही कौशिकजी! शार्दूल तर इथेच आहे ? काय झाले?"
"कामिनीजी, ती घरात नाहीय. तिची बॅगही गायब आहे... ती... ती कुठे निघून गेलीये मला काहीच समजत नाहीये." कौशिकचा फोनवरील शब्द ऐकून कामिनीच्या हातातून हिशोबाची वही गळून पडली.
कामिनीने एका क्षणाचाही विचार केला नाही. तिने बेकरीचे अर्धे शटर खाली ओढले आणि ती थेट कौशिकच्या घराच्या दिशेने धावली. परिसरात एकच गोंधळ उडाला. कामिनी आणि कौशिक दोघेही सैरावैरा रस्त्यावर धावू लागले, आजूबाजूच्या दुकानांमध्ये, बागेत अनयाचे फोटो घेऊन लोकांना विचारू लागले, तिचे नाव घेऊन जोरात हाका मारू लागले.
या सगळ्या धावपळीत खुशीची अवस्था भयंकर वाईट झाली होती. आतून तिचे काळीज थराथरा कापत होते. तिने अनयाला फक्त इमारतीखाली किंवा जवळच्या बागेत लपून बसण्यास सांगितले होते, जेणेकरून कौशिक घाबरेल. पण अनया चक्क परिसर सोडून निघून गेली होती. 'जर त्या पोरीला काही झाले, तर पोलिस केस होईल...' या विचाराने खुशीच्या कपाळावर घाम साचला होता. तिचे हातपाय थंड पडले होते, त देखील इतरांबरोबर आता अनयाला शोधत होती.
काही वेळ असाच गेला. अनया सापडत नाही म्हणून तिघे जण पुन्हा बेकरीत आले होते आणि अशातच तिचा वकील भाऊ संकर्षण देशपांडे काही कागदपत्रांच्या कामासाठी बेकरीत आला. बेकरी अर्धी बंद, आणि बाहेर लोकांचा गोंधळ पाहून तो तात्काळ आत शिरला. तिथे कौशिक पोलिसांना फोन करत होता आणि खुशी एका कोपऱ्यात थरथरत उभी होती.
संकर्षणने एका मिनिटात सगळा प्रकार जाणून घेतला. परिस्थिती अत्यंत गंभीर होती. पण या सगळ्या गोंधळात संकर्षणची तीक्ष्ण वकिली नजर कोपऱ्यात उभ्या असलेल्या खुशीवर खिळली.
खुशीचे डोळे फिरत होते, ती सारखी हाताची बोटे एकमेकांत घालून दुमडत होती, तिच्या चेहऱ्यावर अनया गमावल्याचे दुःख नसून, उघड पडण्याच्या भीतीचा स्पष्ट भाव दिसत होता. संकर्षणने आयुष्यात शेकडो गुन्हेगार पाहिले होते; त्याला खुशीचा हा संशयास्पद वावर टिपायला एक क्षणही लागला नाही, त्यात तो तिचा सख्खा भाऊ देखील होता त्यामुळे तिच्या मनात नक्की काय चालू आहे याबद्दल त्याला जास्त माहित होते.
'अनया स्वतःहून इतक्या टोकाचे पाऊल उचलूच शकत नाही. या मुलीनेच नक्की त्या लहान जिवाच्या डोक्यात काहीतरी विष कालवले आहे.' संकर्षणच्या मनात खुशीबद्दलची शंका आता पक्क्या खात्रीत बदलली होती. तो खुशीजवळ गेला आणि अत्यंत कमी आवाजात तिला म्हणाला,
"खुशी... अनु कुठे जाऊ शकते, तुला काही अंदाज आहे का? की तुला आधीपासूनच माहितीये?"
संकर्षणचा तो रोखलेला आणि भेदक नजरेचा प्रश्न ऐकून खुशी जागीच दचकली.
"नाही... मला... मला काय माहिती असणार संकर्षण दादा? मी देखील तिलाच कधीपासून शोधत आहे. " ती तोतरे बोलू लागली. संकर्षणने तिचे हे गडबडणे मनात पक्के टिपले.
इकडे बाहेर पावसाचा जोर प्रचंड वाढला होता. आकाशात विजा कडकत होत्या आणि पाण्याचा पूर रस्त्यांवर वाहू लागला होता. कौशिक पोलिसांना अनयाचा फोटो पाठवून तक्रार नोंदवण्यात व्यस्त होता. पण कामिनी थांबायला तयार नव्हती. तिचे मातृत्वाचे काळीज तिला घरात बसू देत नव्हते.
कामिनीने डोक्यावर छत्रीसुद्धा घेतली नाही. ती त्या मुसळधार पावसात, पाण्यातून पाय तुडवत भरपावसात पुन्हा एकदा रस्तोरस्ती अनयाचा शोध घेऊ लागली.
"अनु... अनु कुठे आहेस बाळा?" तिचा आवाज पावसाच्या गडगडाटात विरून जात होता.
ती अनया जाऊ शकेल अशा प्रत्येक जागी गेली, जवळची खेळण्याची दुकाने, तिची आवडती आईस्क्रीम पार्लर्स, शाळा..., पार्क पण कुठेच अनयाचा पत्ता नव्हता. कामिनी पूर्णपणे ओलीचिंब झाली होती, डोळ्यांतून वाहणारे अश्रू आणि आकाशातून पडणारा पाऊस एकत्र झाले होते.
दुसरीकडे, अंधेरीच्या त्या अनोळखी, गजबजलेल्या रस्त्यावर एका जुन्या, मोडकळीस आलेल्या इमारतीच्या शेडखाली अनया एकटीच उभी होती. पावसाच्या पाण्याच्या थेंबांनी ती चिंब भिजली होती. थंडीने तिचे ओठ निळे पडले होते आणि शरीर थरथरत होते.
रडून रडून अनयाचा घसा कोरडा पडला होता. तिला भयंकर भूक लागली होती. पोटात भुकेचा डोंब उसळला होता आणि घशातून आवाजही उमटत नव्हता. सभोवताली अनोळखी लोक, गाड्यांचे भयंकर हॉर्न आणि पाऊस... तिला तिच्या बाबांची प्रचंड आठवण येत होती.
'बाबा कुठे आहात तुम्ही? मला घेऊन जा ना... मला खूप भूक लागलीये,' अनया मनातल्या मनात हुंदके देत होती.
या क्षणी तिच्या चिमुकल्या मनाला स्वतःच्या चुकीची तीव्र जाणीव होत होती. 'मी खुशीताईचे ऐकायला नको होते... मी उगाच घरातून पळून आले. कामिनी मावशी अजून तरी वाईट वाटत नाहीये, खुशीताईनेच मला खोटेच सांगितले...' अनयाला कामिनी मावशीने बनवलेल्या त्या गरम पुऱ्या आणि भाजीची आठवण आली, जी तिने काल कचऱ्यात फेकून दिली होती. पश्चात्तापाचे अश्रू तिच्या गालावरून घसरत होते.
कामिनी शोधत शोधत पुढे जात होती. अचानक तिची नजर रस्त्याच्या कडेला असलेल्या त्या जुन्या इमारतीच्या अंधाऱ्या कोपऱ्याकडे गेली. तिथे एक छोटीशी मुलगी, गुलाबी बॅग पाठीवर घेऊन, दोन्ही हातांत एक बाहुली घेऊन थरथरत बसली होती. पावसामुळे ती कोण आहे हे नक्की दिसत नव्हते इतक्यात कामिनीच्या मागून गाडीचा भोंगा वाजला आणि तिचे लक्ष विचलित झाले.
पण दोन मिनिटातच ती पुन्हा तिथे वळली आणि जवळ जाऊ लागली. ती अनयाच होती तिला लगेच कळले.
"अनु!" कामिनीच्या मुखातून एकच आरोळी बाहेर पडली.
कामिनी पाण्याच्या प्रवाहाची पर्वा न करता धावत तिथे पोहोचली. अनयाने डोळे वर करून पाहिले. समोर ओलीचिंब झालेली, घाबरलेली पण डोळ्यांत प्रेम असलेली कामिनी मावशी तिच्या समोर धावत धावत येत होती.
"अनु... माझी सोन्या!" कामिनी खाली बसली आणि तिने तात्काळ अनयाला आपल्या छातीशी आवळले.
अनयाच्या चिमुकल्या हातांनी सुरुवातीला कामिनीला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला, तिच्या मनात खुशीच्या शब्दांची हलकीशी सावली अजूनही होती.
"सोड मला... मला नकोय तू सावत्र आई...तू मला होस्टेलला पाठवणार माझ्या बाबांना माझ्यापासून दूर करणार " ती क्षीण आवाजात पुटपुटली.
पण कामिनीने तिचे काहीही ऐकले नाही.
"काहीही बोलू नकोस बाळा, तुला कोणीही सावत्र आई आणणार नाही कोणीच नाही..., तुझे बाबा फक्त तुझे आहेत त्यांना तुझ्यापासून कोणीही दूर नेऊ शकत नाही." कामिनीने तिला अधिक घट्ट कवटाळले. कामिनीचे ते उबदार अश्रू अनयाच्या गालावर पडले. त्या स्पर्शात, त्या हुंदक्यात अनयाला फक्त आणि फक्त तिच्यावर प्रेम करणारी तिची कामिनी मावशी दिसत होती.
कामिनीने एका क्षणाचाही उशीर न करता, एवढ्या तुफान पावसात त्या चिमुकल्या अनयाला दोन्ही हातांत कडेवर उचलून घेतले. अनयाचे ओले केस कामिनीच्या खांद्यावर टेकले होते.
"तुला काहीही होणार नाही अनु... मी आहे ना तुझ्यासोबत," कामिनी भरपावसात, स्वतःचे भान विसरून, अनयाला कडेवर घेऊन घराच्या दिशेने पावले टाकू लागली.
अनयाने हळूच आपले छोटे हात कामिनीच्या मानेभोवती घट्ट आवळले आणि तिने आपले डोके कामिनीच्या उबदार गळ्यापाशी लपवले. खुशीने विणलेले द्वेषाचे जाळे त्या भरपावसात कामिनीच्या खऱ्याखुऱ्या मातृत्वाच्या स्पर्शाने पार वाहून गेले होते.
क्रमशः
भालचंद्र नरेंद्र देव
सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे इरा फेसबुक पेज वर येतील, त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा.
ता क: ही कथा पुस्तक काल्पनिक आहे. यातील नावे, पात्रे, स्थळे आणि घटना या लेखकाच्या कल्पनेचा अविष्कार आहेत किंवा काल्पनिक पद्धतीने ती योजली आहेत. कोणाही जिवंत वा मृत व्यक्तीशी, घटना प्रसंगाशी किंवा ठिकाणांशी त्यांचे साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
सर्व हक्क राखीव आहेत, लेखकाच्या स्पष्ट लेखी परवानगीशिवाय या प्रकाशनाचा कोणताही भाग कोणत्याही स्वरूपात किंवा कोणत्याही प्रकारे पुनरुत्पादित किंवा कॉपी केला जाऊ शकत नाही किंवा कोणत्याही डिस्क, टेप, मीडिया किंवा इतर माहिती स्टोरेज डिव्हाइसवर हस्तांतरित किंवा पुनरुत्पादित केला जाऊ शकत नाही. पुस्तक परीक्षणातील संक्षिप्त अवतरण वगळता.
