नात्यांची पाऊलवाट ४४

दोन एकट्या पालकांची प्रेमकथा
भाग ४४: हरवलेली पावले

काल शाळेच्या गेटवर अनयाने कामिनीने बनवलेला डबा कचऱ्याच्या डब्यात फेकून दिल्याची घटना कौशिकच्या मनावर एका भयंकर जखमेसारखी कोरली गेली होती. काल रात्रीपासून कौशिकच्या घरात कमालीची शांतता पसरली होती, पण ती शांतता एखाद्या मोठ्या वादळापूर्वीची होती. अनयाचा राग शांत होण्याऐवजी अधिकच उग्र झाला होता. ती स्वतःच्या खोलीतच बसून होती. कौशिकने तिला जवळ घेण्याचा, प्रेमाने समजवायचा खूप प्रयत्न केला, पण अनया आता कामिनीचे नावदेखील ऐकायला तयार नव्हती. कामिनीची सावलीही तिला घरात नको होती.

दुसरीकडे सकाळी बेकरी उघडायची वेळ झाली, पण कामिनीचा पाय पुढे पडत नव्हता. तिचे डोळे सुजलेले होते. शेवटी ती अत्यंत जड अंतःकरणाने कौशिकच्या घराकडे आली. कौशिक सोफ्यावर बसून विचारमग्न होता. कामिनीला पाहताच तो उठून उभा राहिला.

"कामिनीजी..." कौशिकने तिच्याकडे पाहिले. त्याचा आवाज पार खचलेला होता.

कामिनीने काही क्षण कौशिकच्या डोळ्यात पाहिले आणि मग मान खाली घातली. तिच्या डोळ्यातून पुन्हा एकदा अश्रूंची धार लागली.

"कौशिकजी... मी काल रात्रभर विचार केला," ती अगदी हलक्या आणि भावुक आवाजात म्हणाली,

"आपण खूप मोठी चूक करत होतो."

"कशी चूक कामिनीजी?" कौशिकने काळजीने विचारले.

"आपल्या सुखाचा विचार करताना आपण त्या चिमुकल्या अनयाचा अजिबात विचार केला नाही," कामिनी ओठ थरथरत म्हणाली.

"माझ्यामुळे... केवळ माझ्या या घरात येण्यामुळे एका निष्पाप जीवाचे बालपण, तिची मानसिक शांतता पूर्णपणे उध्वस्त होतेय. ती मुलगी मला पाहताच घाबरतेय, चिडतेय. मला सांगा कौशिकजी, ज्या लग्नाचा पायाच एका लहान मुलाच्या आसवांवर रचला गेला तर, ते लग्न कधीतरी सुखाचे ठरू शकेल का?"

"पण कामिनीजी, यात तुमची काय चूक?" कौशिक तिच्याजवळ आला.

"तुम्ही तर तिच्यावर पोटच्या लेकीसारखे प्रेम करायला तयार आहात."

"माझे प्रेम तिच्यापर्यंत पोहोचत नाहीये कौशिकजी," कामिनीने रडत रडत हात जोडले.

"म्हणूनच मी तुम्हाला विनंती करते... जोपर्यंत अनया स्वतःहून, अगदी मनापासून मला स्वीकारत नाही, मला या घरात जागा देत नाही, तोपर्यंत आपण आपल्या लग्नाचा विषय पूर्णपणे बंद ठेवूया. अगदी कायमचा."

कौशिकच्या छातीत सणकन वेदना झाली. तो कामिनीचे ते ओले डोळे आणि तिचा निश्चय पाहत राहिला. त्याला माहित होते की कामिनी चुकीचे बोलत नव्हती. मुलाच्या संमतीशिवाय घेतलेला हा निर्णय अनयाच्या आयुष्यावर कायमचा वाईट परिणाम करू शकत होता.

कौशिकने एक दीर्घ आणि हताश श्वास सोडला.

"ठीक आहे कामिनीजी... जर तुमचा हाच निर्णय असेल, तर मी त्याला मान देतो. आपण अनयाला वेळ देऊया. जोपर्यंत ती तयार होत नाही, तोपर्यंत लग्नाचा विषय निघणार नाही."

कौशिक आणि कामिनी यांच्यातील हा संवाद बाहेर उभ्या असलेल्या खुशीने स्पष्ट ऐकला होता. तिचा प्लॅन यशस्वी होत होता. लग्न जवळजवळ मोडण्याच्या मार्गावर आले होते. तिच्या चेहऱ्यावर एक दुष्ट हसू उमटले. पण खुशीची भूक एवढ्यावरच भागणारी नव्हती. 'फक्त लग्न थांबवून चालणार नाही, कामिनीला कौशिक सरांच्या आयुष्यातून कायमची हकालपट्टी करायला हवी,' हे खुशीच्या विकृत डोक्यात पक्के झाले होते.

दुपारची वेळ होती. कौशिक ऑफिसच्या महत्त्वाच्या कामासाठी खाली गेला होता. अनया तिच्या खोलीत एकटीच पलंगावर बसून होती.

हीच संधी साधून खुशी हळूच अनयाच्या खोलीत शिरली. तिने दार अधांतरी लावून घेतले आणि अत्यंत गोड, काळजीवाहू आव आणत अनयाजवळ जाऊन बसली.

"माझी गोड अनु..." खुशीने तिच्या डोक्यावरून हात फिरवला.

अनयाने तिच्याकडे पाहिले, तिच्या डोळ्यात अजूनही भीती होती.

"खुशी दीदी... बाबा अजूनही कामिनी मावशीशीच लग्न करणार आहेत का?" अनया निरागसपणे खुशीला विचारू लागली, खुशीने तिच्यावर अशी जादू केली होती की ती जे म्हणते ते खरे आहे असे तिला वाटू लागले होते.

खुशीच्या चेहऱ्यावर अचानक खोटे दुःख पसरले. ती अनयाचा हात स्वतःच्या हातात धरत म्हणाली,

"अनु... मला तुला एक खूप वाईट गोष्ट सांगायची आहे. मला तुझी खूप काळजी वाटतेय म्हणून मी हे सांगतेय, पण तू कोणाला माझे नाव सांगू नकोस बरे."

"काय दीदी?, मी कोणालाच नाही सांगणार. गॉड प्रॉमिस." अनयाने भाबडेपणाने विचारले.

"अगं, तुझे बाबा आणि कामिनी मावशी वर-वर लग्न थांबवल्याचे नाटक करत आहेत." खुशीने अनयाच्या कानात विष कालवायला सुरुवात केली.

"मी स्वतः ऐकलंय, कामिनी मावशी तुझ्या बाबांना सांगत होती की ही अनु खूप त्रास देतेय, ही मला अजिबात आवडत नाही. त्यामुळे कामिनी मावशी तुला खूप दूरच्या एका भयंकर हॉस्टेलमध्ये पाठवायची तयारी करतेय. तिथे तुला कोणालाही भेटू देणार नाहीत."

अनयाचे छोटेसे हृदय भीतीने धडधडू लागले.

"नाही दीदी! मला हॉस्टेलमध्ये नाही जायचे! मला बाबांजवळ राहायचंय."

"मग तुला एकच गोष्ट करावी लागेल अनु," खुशीने तिच्या डोळ्यात डोळे घालून कडक आवाजात सांगितले.

"जर तुला इथेच राहायचे असेल आणि हॉस्टेलला जायचे नसेल, तर तुला घर सोडून निघून जाण्याचे नाटक करावे लागेल. तू घरातून गायब झालीस ना, की तुझे बाबा भयंकर घाबरतील. मग त्यांना कळेल की कामिनी मावशीमुळेच तू निघून गेलीस आणि मग तुझे बाबा त्या कामिनी मावशीला त्यांच्या मनातून कायमचे हाकलून देतील, कधी कधी त्यांना या घरात घेणार नाहीत."

चिमुकल्या अनयाची निष्पाप बुद्धी खुशीच्या या भयंकर चालीला अजिबात ओळखू शकली नाही. तिला वाटले की खुशी दीदी आपल्या भल्यासाठीच सांगते आहे.

"खरंच दीदी?" अनयाने विचारले.

"हो अनु! तू फक्त काही वेळ घराच्या बाहेर, जवळच कुठेतरी लपून राहा. बाकी सगळे मी सांभाळून घेईन, फक्त हे आपले सिक्रेट कोणाला सांगायचे नाही बरे का?" खुशीने तिच्या पाठीवर थाप मारली आणि ती खोलीबाहेर निघून गेली.

दुपारी साडेतीनच्या सुमारास, जेव्हा कौशिक ऑफिसच्या कामात  व्यस्त होता, तेव्हा अनयाने खुशीच्या सांगण्यावरून पाठीवर आपली छोटी दप्तराची बॅग घेतली. तिने आत काही खेळणी आणि एक दोन कपडे ठेवले होते. ती गुपचूप घराचा दरवाजा उघडून बाहेर पडली.

तिने मनात ठरवले होते की ती आपल्या इमारतीखाली असलेल्या मोठ्या बागेच्या मागे, झाडांच्या लाकडी बाकावर लपून बसेल. बाबा शोधायला आले की मग खुशी दीदीच्या सांगण्यानुसार बाहेर पडेल.

पण नशीबात काही वेगळेच शिजत होते. अनया जशी इमारतीच्या मुख्य रस्त्यावर आली, तसा आकाशात काळ्याकुट्ट ढगांचा गडगडाट झाला आणि एकाएकी मुसळधार पाऊस कोसळू लागला. पाऊस इतका तीव्र होता की काही मिनिटांतच रस्ते पाण्याने भरू लागले.

अचानक आलेल्या या पावसाने लहानगी अनया पूर्णपणे गांगरली. ती पुढे धावू लागली, पण त्याच वेळी रस्त्यावरून एक प्रचंड मोठी लग्नाची वरात निघाली होती. ढोल-ताशांचा भयंकर आवाज, फटाक्यांचा धूर, आणि नाचणाऱ्या माणसांची तुफान गर्दी, छत्री धरून जाणाऱ्या लोकांच्या आणि गाड्यांच्या त्या अभूतपूर्व गर्दीत चिमुकली अनया पूर्णपणे भरकटली.

तिला तिच्या घराचा रस्ताच सापडेनासा झाला. लोकांच्या धक्काबुक्कीत ती मागे मागे फेकली गेली. पाऊस तिच्या अंगावर कोसळत होता, कपडे ओलेचिंब झाले होते आणि सभोवताली फक्त अनोळखी चेहऱ्यांची आणि गाड्यांच्या हॉर्नची गर्दी जमली होती, त्यातून मार्ग काढून घराची इमारत कुठे आहे, हे तिला अजिबात कळत नव्हते.

धावत धावत अनया अंधेरीच्या एका अत्यंत गजबजलेल्या, अनोळखी आणि मोठ्या मुख्य रस्त्यावर येऊन पोहोचली. आजूबाजूला उंच उंच इमारती आणि वेगवान गाड्या होत्या. तिच्या ओळखीचे तिथे काहीही नव्हते.

अनया एका बंद दुकानाच्या शेडखाली उभी राहिली. भीतीने तिचे हातपाय थरथरत होते. पावसाच्या पाण्याचा आणि तिच्या डोळ्यांतील आसवांचा एकच पूर आला होता.

"बाबा... बाबा कुठे आहात तुम्ही?" अनया पावसाच्या आणि वाहनांच्या आवाजात लहान स्वरात, हुंदके देत ओरडू लागली.

एका चिमुकल्या, निष्पाप जीवाची ताटातूट झाली होती. खुशीच्या एका विषारी शब्दाने त्या निष्पाप, निरागस मुलीला या अनोळखी शहराच्या रस्त्यावर एकाकी आणि भीतीच्या दाट सावलीत आणून सोडले होते.

क्रमशः

भालचंद्र नरेंद्र देव ©®

ता क: ही कथा पुस्तक काल्पनिक आहे. यातील नावे, पात्रे, स्थळे आणि घटना या लेखकाच्या कल्पनेचा अविष्कार आहेत किंवा काल्पनिक पद्धतीने ती योजली आहेत. कोणाही जिवंत वा मृत व्यक्तीशी, घटना प्रसंगाशी किंवा ठिकाणांशी त्यांचे साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

सर्व हक्क राखीव आहेत, लेखकाच्या स्पष्ट लेखी परवानगीशिवाय या प्रकाशनाचा कोणताही भाग कोणत्याही स्वरूपात किंवा कोणत्याही प्रकारे पुनरुत्पादित किंवा कॉपी केला जाऊ शकत नाही किंवा कोणत्याही डिस्क, टेप, मीडिया किंवा इतर माहिती स्टोरेज डिव्हाइसवर हस्तांतरित किंवा पुनरुत्पादित केला जाऊ शकत नाही. पुस्तक परीक्षणातील संक्षिप्त अवतरण वगळता.

copyright: ©®



0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →