भाग ४२: अनयाचा उद्रेक
जानकी राजच्या त्या व्हिडिओने सोशल मीडियावर जादू केली होती. कालपर्यंत ज्या बेकरीच्या नावावर लोक बोट उचलत होते, तिथेच आज सकाळपासून ग्राहकांची तुफान गर्दी उसळली होती. बेकरीचे काउंटर रिकामे झाले होते आणि ऑनलाईन मागवल्या जाणाऱ्या ऑर्डर्स वेळेवर पूर्ण करताना कामिनीच्या आणि तिच्या नोकरांच्या नाकी नऊ आले होते. पण या प्रचंड धावपळीतही तिच्या चेहऱ्यावरचा आनंद लपत नव्हता.
रात्रीचे नऊ वाजले होते. बेकरीचे शटर अर्धे खाली ओढले गेले होते. कामिनी काउंटरवर बसून आजचा हिशोब करत होती, तर कौशिक शेजारी उभा राहून गल्ल्यातील पैशांची जुळवाजुळव करत होता.
"कामिनीजी," कौशिकने हळूच तिच्या हातातील वही बाजूला ठेवली.
"आजचा हिशोब उद्या सकाळी केला तरी चालेल. आधी जरा निवांत बसा."
कामिनीने हसून मान खाली घातली,
"कौशिकजी, आज जे काही घडलंय, त्यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. काल रात्री मी किती घाबरले होते..."
"मी म्हणालो होतो ना, सत्याचाच विजय होतो," कौशिक तिच्या अगदी जवळ खुर्ची ओढून बसला. त्याचा आवाज प्रेमाने ओथंबलेला होता.
"कामिनीजी... संकटे येत राहतील, आणि आपण त्याला सामोरे जात राहू. पण आज मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट विचारायची आहे."
कामिनीने त्याच्या डोळ्यांत पाहिले. तिथे एक प्रेमाचा भाव होता.
"आपण किती दिवस असे परक्यांसारखे एकत्र राहून लढा देणार?" कौशिकने कामिनीचे थरथरणारे हात आपल्या हातात घेतले.
"आता आपण आपल्या या नात्याला एक अधिकृत नाव द्यायला हवे. मी पुन्हा विचारतोय... कामिनीजी, तुम्ही माझ्याशी लग्न कराल? माझ्या कुटुंबाचा, माझ्या आयुष्याचा आणि अनयाचा एक भाग व्हाल?"
कामिनीचे मन एका क्षणासाठी थरारले. तिने आपला हात हळूच मागे घेण्याचा प्रयत्न केला.
"कौशिकजी... मी? मी एक परित्यक्ता आहे, एका मुलाची आई आहे. लोक काय म्हणतील? तुमच्यासारख्या प्रतिष्ठित माणसाने एका..."
"लोक काय म्हणतात याने मला फरक पडत नाही," कौशिकने तिचा हात घट्ट धरला.
"मला फक्त तुमची साथ हवी आहे. मी शार्दूलवर माझ्या स्वतःच्या मुलासारखे प्रेम करतो, हे मी तुम्हाला वेगळे सांगायला हवे का?"
कामिनीचे डोळे पाण्याने भरून आले. भूतकाळातील महेशच्या जखमा आणि अन्याय या पुरुषाच्या एका स्पर्शाने पार पुसले गेले होते. कौशिकचा तो निश्चयी चेहरा आणि शार्दूलबद्दलची त्याची काळजी पाहून कामिनीचा सगळा संकोच गळून पडला.
तिने ओल्या डोळ्यांनी मंद हसून होकारात मान हलवली,
"हो, कौशिकजी... मी तयार आहे."
कौशिकच्या चेहऱ्यावर एक सुंदर, निखळ हास्य फुलले. पण त्याच वेळी, बेकरीच्या बाहेरील अर्ध्या ओढलेल्या शटरच्या फटीतून हा सर्व संवाद आणि दृश्य पाहणारी एक व्यक्ती उभी होती 'खुशी'
खुशीचे हात रागाने गच्च आवळले गेले होते. तिच्या तळपायाची आग मस्तकाला गेली होती. 'ही घटस्फोटीत कामिनी... कौशिक सरांशी लग्न करणार? आणि मी गप्प पाहत राहू?' खुशी दात ओठ खात स्वतःशीच पुटपुटली. कौशिक आता तिच्या हातातून पूर्णपणे निसटत चालला होता.
थेट कौशिकला विरोध करणे अशक्य होते, कारण कौशिक तिच्यावरच भडकला असता. त्यामुळे खुशीच्या विकृत डोक्याने कौशिकची सर्वात मोठी दुर्बलता शोधून काढली, त्याची लहान, निष्पाप मुलगी अनया.
दुसऱ्या दिवशी सकाळी खुशी मुद्दाम कौशिकच्या घरी पोहोचली. कौशिक काही कामानिमित्त खालच्या फ्लॅटमध्ये कोणाला तरी भेटायला गेला होता. खुशी संधी साधून थेट अनयाच्या खोलीत गेली. अनया तिथे बसून आपल्या बाहुलीशी खेळत होती.
"अनु!" खुशीने अत्यंत गोड, प्रेमाचा आव आणत हाक मारली आणि अनयाजवळ जाऊन बसली.
"खुशी दीदी! तू आलीस?" अनया हसून म्हणाली.
"हो गं माझी गोड अनु... तुझ्याशी गप्पा मारायला आलेय." खुशीने तिला जवळ घेतले आणि तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाली,
"अनु, तुला एक नवी गोष्ट ऐकायची आहे का?"
"हो! कसली गोष्ट?" अनया उत्साहाने विचारू लागली.
खुशीच्या चेहऱ्यावर एक हास्य उमटले. तिने अनयाच्या डोळ्यांत डोळे घालून अत्यंत नाट्यमय आणि भीतिदायक आवाजात बोलायला सुरुवात केली.
"गोष्ट एका छोट्या मुलीची... जिच्या घरात तिचे बाबा एक नवी 'सावत्र आई' घेऊन येतात."
'सावत्र आई' हा शब्द ऐकताच चिमुकल्या अनयाच्या भुवया उंचावल्या.
"माहितीये अनु, ती सावत्र आई दिसायला खूप गोड आणि प्रेमळ असायची," खुशीने अनयाच्या मनात विष पेरण्यास सुरुवात केली.
"सुरुवातीला ती त्या लहान मुलीला खूप मफिन्स द्यायची, खूप गोड बोलायची. पण एकदा का तिचे बाबांशी लग्न झाले, की तिचे खरे रूप समोर आले. ती सावत्र आई त्या लहान मुलीवर भयंकर अत्याचार करायला लागली."
अनयाचा चेहरा थोडा घाबरल्यासारखा झाला,
"अत्याचार? म्हणजे काय दीदी?"
"म्हणजे," खुशीने तिचा हात घट्ट पकडला,
"ती त्या मुलीला खायला अजिबात द्यायची नाही. उपाशी ठेवायची. तिच्याकडून घरातील सगळा केर काढून घ्यायची, लादी पुसून आणि भांडी धुवून घ्यायची, आणि जर त्या मुलीने रडून तिच्या बाबांकडे तक्रार केली, तर ती सावत्र आई तिला काळोख्या खोलीत बंद करायची. ती फक्त स्वतःच्याच मुलावर प्रेम करायची आणि बाबांच्या मुलीला घरातून हाकलून द्यायचा प्रयत्न करायची."
खुशीने हे सर्व इतक्या जिवंत आणि भीतीदायक पद्धतीने रंगवून सांगितले की, अनयाचे छोटेसे हृदय धडधडू लागले. तिचे डोळे भीतीने मोठे झाले.
"दीदी... सावत्र आई खूप वाईट असते का?" अनयाने थरथरत्या आवाजात विचारले.
"खूप वाईट असते अनु." खुशीने तिच्या डोक्यात शेवटची मेख मारली.
"ती बाहेरून खूप प्रेमळ असण्याचे नाटक करते, पण आतून ती खूप दुष्ट असते."
अनया आतून पूर्णपणे हादरून गेली होती. खुशीने तिच्या निष्पाप मनात सावत्र आईबद्दल भयंकर भीतीचे आणि द्वेषाचे बी पेरले होते.
त्याच दिवशी संध्याकाळी बेकरीच्या वरच्या खोलीत एक छोटेसे घरगुती आनंदाचे वातावरण होते. कौशिक आणि कामिनी अत्यंत उत्साहात होते. त्यांनी अनया आणि शार्दूलला एकत्र बसवून आपल्या लग्नाबद्दल सांगण्याचे ठरवले होते.
कामिनीने खास अनयासाठी तिची आवडती व्हेनिला मफिन्स एका प्लेटमध्ये सजवून आणली होती.
"शार्दूल, अनया..." कौशिक प्रेमाने दोघांच्या जवळ बसला.
"आज आम्हाला तुम्हाला एक खूप छान गोष्ट सांगायची आहे. आता आपण सगळे एकत्र एकाच घरात राहणार आहोत. कामिनी मावशी आणि मी... आम्ही दोघे लग्न करणार आहोत."
कामिनीच्या चेहऱ्यावर एक हसरे, भावुक रूप होते. ती मफिन्सची प्लेट घेऊन अनयाजवळ गेली.
"अनु बाळा," कामिनी अत्यंत मऊ आवाजात म्हणाली,
"ही बघ तुझी आवडती मफिन्स. आता आपण रोज एकत्र राहू, खेळू. मी तुला खूप खूप प्रेम देईन..."
कामिनीने प्रेमाने आपला हात अनयाच्या डोक्याकडे नेला.
पण अनयाच्या डोळ्यांसमोर सकाळी खुशीने सांगितलेली ती क्रूर सावत्र आईची गोष्ट जशीच्या तशी उभी राहिली. उपाशी राहणारी ती लहान मुलगी, काळोखी खोली आणि ती दुष्ट आई... अनयाच्या मनात भीतीने थैमान घातले. कामिनीचा तो प्रेमळ स्पर्श तिला एखाद्या चेटकीणीसारखा वाटला.
"नाही!"
अनया प्रचंड रागाने आणि भीतीने किंचाळली. तिने कामिनीचा हात इतक्या जोरात बाजूला ढकलला की कामिनीच्या हातातील मफिन्सची प्लेट जमिनीवर पडून काचेचे तुकडे झाले आणि मफिन्स खाली सांडले.
बेकरीत एका क्षणात स्मशानशांतता पसरली. कामिनी आणि कौशिक दोघेही जागीच स्तब्ध झाले.
"मला सावत्र आई नकोय." अनया रडत रडत जोरात ओरडली. तिचे डोळे रागाने लाल झाले होते.
"मला ही कामिनी मावशी नकोय. ही खूप वाईट आहे. ही मला उपाशी ठेवेल.मला हिच्यासोबत नाही राहायचे."
कामिनीच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या छातीत सणकन वेदना झाली. 'मी? मी अनयाला उपाशी ठेवेन?' कामिनी अविश्वासाने त्या लहान मुलीकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यांतून टरटरा अश्रू वाहू लागले.
"अनु! हे काय वागणे आहे?" कौशिक चिडून उभा राहिला.
"कामिनी मावशी तुझ्याशी किती प्रेमाने बोलत्येय..."
"नाही! बाबा तुम्ही वाईट आहात!" अनयाने दोन्ही हातांनी आपले कान झाकून घेतले. ती रडत रडत धावली आणि ती बेकरीच्या बाहेर जाऊन गाडीत बसली आणि गाडीचे दार आतून जोरात लावून घेतले.
"अनु! दार उघड अनु!" कौशिकने गाडीच्या दरवाज्यावर हात मारले, पण आतून फक्त अनयाच्या मोठ्याने रडण्याचा आवाज येत होता.
कामिनी खाली बसली. तिने दोन्ही हातांत तोंड लपवले आणि ती ढसाढसा रडू लागली. तिचे मन पूर्णपणे दुखावले गेले होते. ज्या मुलीला ती स्वतःच्या लेकीसारखे प्रेम देणार होती, तीच मुलगी तिला चेटकीण समजत होती.
कौशिक अत्यंत काळजीने आणि चिंतेत कामिनीजवळ आला. त्याला समजत नव्हते की अचानक अनयाच्या डोक्यात हा सावत्र आईचा विचार आलाच कसा?
पण या सगळ्या गोंधळात, बेकरीच्या बाहेर उभी असलेली खुशी मात्र आपल्या डावाच्या पहिल्या यशावर मनातून विकृत आनंद साजरा करत होती. तिच्या चेहऱ्यावर एक विजयी हसू उमटले होते. कामिनी आणि कौशिकचे हे लग्न तिने पहिल्याच फटक्यात उध्वस्त करून दाखवले होते.
क्रमशः
भालचंद्र नरेंद्र देव ©®
सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे इरा फेसबुक पेज वर येतील, त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा.
ता क: ही कथा पुस्तक काल्पनिक आहे. यातील नावे, पात्रे, स्थळे आणि घटना या लेखकाच्या कल्पनेचा अविष्कार आहेत किंवा काल्पनिक पद्धतीने ती योजली आहेत. कोणाही जिवंत वा मृत व्यक्तीशी, घटना प्रसंगाशी किंवा ठिकाणांशी त्यांचे साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
सर्व हक्क राखीव आहेत, लेखकाच्या स्पष्ट लेखी परवानगीशिवाय या प्रकाशनाचा कोणताही भाग कोणत्याही स्वरूपात किंवा कोणत्याही प्रकारे पुनरुत्पादित किंवा कॉपी केला जाऊ शकत नाही किंवा कोणत्याही डिस्क, टेप, मीडिया किंवा इतर माहिती स्टोरेज डिव्हाइसवर हस्तांतरित किंवा पुनरुत्पादित केला जाऊ शकत नाही. पुस्तक परीक्षणातील संक्षिप्त अवतरण वगळता.
copyright: ©®
