नात्यांची पाऊलवाट ४१

दोन एकट्या पालकांची प्रेमकथा

भाग ४१: माफीचा योग

जानकी राज या प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरच्या त्या एका व्हिडिओमुळे द बेक हाऊसवर पुन्हा एकदा संकाटाचे काळे ढग जमा झाले होते. ऑनलाईन मागवल्या जाणाऱ्या ऑर्डर्स अचानक रद्द झाल्या होत्या आणि सोशल मीडियावर बेकरीविरोधात प्रचंड संतापाची लाट पसरली होती. बेकरीत बसून रडण्यापेक्षा या प्रकरणाच्या तळामुळाशी जाऊन सत्य समोर आणणे गरजेचे आहे, हे कौशिकने कामिनीला पटवून दिले होते.

"कामिनीजी, आपण घाबरून मागे हटलो तर लोकांना वाटेल आपण खरंच दोषी आहोत. आपण स्वतः जाऊन जानकी राजशी बोलायला हवे," कौशिकने सांगितले.

कामिनीने डोळे पुसले.

"पण कौशिकजी, ती आपल्यावर इतकी रागावली आहे, ती आपले ऐकून तरी घेईल का?"

"प्रयत्न तर करावाच लागेल," असे म्हणत कौशिकने जानकीच्या मॅनेजरचा नंबर मिळवून फोन फिरवला.

पहिल्या प्रयत्नात जानकीने भेटण्यास साफ नकार दिला. तिचा मॅनेजर फोनवर खेकसला,

"तुम्हाला लाज वाटत नाही का? तुमच्या खराब पेस्ट्रीमुळे मॅडमची अवस्था काय झालीये माहितीये? आम्ही तुमच्यावर लीगल ॲक्शन घेणार आहोत. मॅडम तुमच्यापैकी कोणालाही भेटणार नाहीत."

कौशिकने संयम सुटू दिला नाही. तो पुन्हा फोनवर म्हणाला,

"बघा, तुमच्या रागाचे कारण मी समजू शकतो. पण जरा विचार करा, १ मिलियन फॉलोअर्स असलेल्या एका मोठ्या इन्फ्लुएन्सरला मुद्दाम खराब पेस्ट्री पाठवून कोणती बेकरी स्वतःच्या पायावर दगड मारून घेईल? आम्ही आमची बाजू मांडायला ५ मिनिटांसाठी येतोय. जर तुम्हाला आमचे बोलणे पटले नाही, तर तुम्ही कायदेशीर कारवाई करायला मोकळे आहात."

कौशिकच्या या तार्किक बोलण्यामुळे मॅनेजर थोडा विचारात पडला, आणि जानकीशी बोलून, सरतेशेवटी ती भेटायला तयार झाली.

दुपारी कौशिक आणि कामिनी जानकीच्या वांद्रे येथील आलिशान फ्लॅटवर पोहोचले. जानकीने आधीच तिच्या हॉलमध्ये दोन-तीन छुपे कॅमेरे आणि माईक सेट करून ठेवले होते. तिला वाटले होते की हे दोघे माफी मागायला आले आहेत, आणि या भेटीचे स्टिंग ऑपरेशन करून ती पुन्हा सोशल मीडियावर टाकेल, जेणेकरून तिला आणखी व्ह्यूज मिळतील.

कामिनीचा चेहरा भीतीने आणि संकोचाने थोडा पांढरा पडला होता, पण तिच्या शेजारी उभा असलेला कौशिक एखाद्या भक्कम भिंतीसारखा शांत दिसत होता.

जानकी सोफ्यावर बसली होती. तिच्या चेहऱ्यावर अजूनही ॲलर्जीचे हलके डाग दिसत होते. तिने हात घडी घालून उपहासाने विचारले,

"हो... बोला. काय स्पष्टीकरण द्यायचे आहे तुम्हाला? माझी तब्येत बिघडवून तुम्ही माझे सेलिब्रेशन खराब केलेत. आता अजून काय वाताहत करायची आहे."

कौशिक पुढे वाकला आणि त्याने अत्यंत आदराने स्पष्ट शब्दांत बोलायला सुरुवात केली.

"जानकीजी, सर्वात आधी तुमच्या आरोग्याला झालेल्या त्रासाबद्दल आम्ही मनापासून माफी मागतो. पण एक विचार करा... कामिनीजी स्वतः या बेकरीच्या मालकीण आहेत आणि त्या रोज स्वतःच्या हाताने बेक करतात. आम्हाला हे चांगल्या प्रकारे ठाऊक होते की ही ऑर्डर तुमची आहे आणि तुमचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. अगर तुमचे ते सेलेब्रेशन लोकांनी पहिले असते तर केक आमचा होता हे सांगून आम्हाला तुमच्या ब्रँडचा फायदा झाला असता. अशा वेळी जर आम्हाला अन्नात काही भेसळ करायचीच असती, तर आम्ही तुमच्याच पेस्ट्रीमध्ये ती नक्कीच केली नसती! कारण त्याचा परिणाम आमच्या बिझनेसवर किती भयंकर होईल, याची कल्पना आम्हाला आहे."

जानकी कौशिककडे पाहत राहिली. त्याचा मुद्दा अगदी रास्त होता.

कौशिक पुढे म्हणाला, "कामिनीजींना आणि त्यांच्या बेकरीला बदनाम करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून कोणीतरी सतत कटकारस्थाने करतंय. काही दिवसांपूर्वीच बेकरीवर एफडीएची खोटी धाड पाडण्यात आली होती. तिथेही कामिनीजींवर खोटे आरोप लावले गेले होते, जे नंतर न्यायालयात खोटे ठरले, तरी अजून केस संपलेली नाही. तुमच्या या प्रकरणातही असेच काहीतरी घडले आहे. पेस्ट्रीमध्ये कामिनीजींनी नाही, तर तिसऱ्याच कोणातरी व्यक्तीने बेकरीच्या किचनमध्ये किंवा डिलिव्हरीदरम्यान ते केमिकल मिसळले असेल, त्याची चौकशी आम्ही करूच पण ही गोष्ट तिथपर्यंत वाढू शकते, तुमचे फॉलोवर खूप आहेत, त्यांनी एकदा आम्हाला वाळीत टाकले की मग आम्हाला पुन्हा उठून चालणे कठीण जाईल."

कामिनीनेही आपले थरथरणारे हात जोडले आणि आव्हानात्मक आवाजात जानकीला म्हणाली,

"मॅडम, मी एक आई आहे आणि अन्न हे माझ्यासाठी परमेश्वर आहे. ग्राहकांच्या जिवाशी खेळणे तर दूरच, मी स्वप्नातही असा विचार करू शकत नाही. तुम्ही हवं तर आमच्या बेकरीची आणि माझी कसून चौकशी करा, पण कृपया आमच्या प्रामाणिकपणावर शंका घेऊ नका."

कामिनीच्या डोळ्यांतील निष्पापपणा, तिचा प्रामाणिकपणा आणि कौशिकचा तो तर्कशुद्ध युक्तिवाद ऐकून जानकीच्या मनात असलेला राग पार विरघळून गेला. तिच्या लक्षात आले की या दोघांची खरंच काही चूक नाहीये, उलट त्यांना कोणीतरी मोहरा बनवून वापरत आहे.

जानकीने खुर्चीवरून उठून छुप्या कॅमेऱ्यांचे रेकॉर्डिंग बंद केले. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि कामिनीजवळ आली.

"आय एम सो सॉरी कामिनीजी..., तुमच्या माफीचा व्हिडिओ बनवून पुन्हा सोशल मीडियावर टाकायचा माझा प्लॅन होता, त्यामुळे मी छुपे कॅमेरे लावून ठेवले होते, पण आता माझ्या मनात तसे काही नाही, तुमची परिस्थिती पाहून मला आपल्या स्त्री वर्गावर अभिमान वाटतो. एकट्या असून तुम्ही स्वतः कष्ट करून आपल्या मुलीला सांभाळता" जानकी हळूवार आवाजात म्हणाली.

"मी खूप घाईत निर्णय घेतला आणि वस्तुस्थिती न जाणता तुमच्यावर आरोप केले. माझ्या शरीरावर आलेले चट्टे बघून, मला तुमचा खूप राग आला होता, पण तुमच्या पाठीमागे इतके मोठे षड्यंत्र चाललंय याची मला कल्पना नव्हती, तरीच माझ्या मनात संशय आला होता की गेल्या  वेळी जेव्हा मी बेकरीत येऊन तुमची पेस्ट्री चाखली होती तेव्हा मला का काही झाले नाही, आणि ती आवडल्यामुळेच मी पेस्ट्री ऑर्डर तुमच्या दुकानात दिली होती."

कौशिक हसला, "समजू शकतो जानकीजी. पण आता ही जी हानी बेकरीच्या नावाची झाली आहे, ती कशी भरून काढायची?"

जानकीने लगेच आपला फोन हातात घेतला.

"त्याची काळजी तुम्ही करू नका. चूक माझी झाली आहे, तर ती दुरुस्त करण्याची जबाबदारीही माझीच आहे."

जानकीने लगेचच तिच्या कॅमेऱ्यासमोर उभे राहून एक नवीन व्हिडिओ रेकॉर्ड केला.

व्हिडिओमध्ये जानकी अत्यंत गांभीर्याने म्हणाली,

"हाय गाईज! काल मी द बेक हाऊस बेकरीबद्दल जो व्हिडिओ पोस्ट केला होता, त्याबद्दल मला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करायची आहे. या प्रकरणात बेकरीची किंवा कामिनीजींची कोणतीही चूक नव्हती. कोणीतरी तिसऱ्याच व्यक्तीने बेकरीचे नाव खराब करण्यासाठी आणि कामिनीजींना त्रास देण्यासाठी त्या पेस्ट्रीमध्ये केमिकल मिसळले होते. कामिनीजी अत्यंत प्रामाणिकपणे आणि स्वच्छतेने काम करतात. मी माझी ती आधीची पोस्ट डिलीट करत आहे आणि बेकरीची व कामिनीजींची मनापासून माफी मागते! प्लिज, तुम्ही सर्वांनी '
द बेक हाऊसला पूर्वीसारखाच पाठिंबा द्या."

जानकीने तो व्हिडिओ तात्काळ तिच्या इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया हँडल्सवर अपलोड केला.

काही मिनिटांतच तो व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला. ज्या लोकांनी बेकरीला शिव्या दिल्या होत्या, तेच लोक आता कामिनीच्या जिद्दीचे कौतुक करू लागले. बेकरीवर आलेले एवढे मोठे संकट कौशिकच्या हुशारीमुळे आणि कामिनीच्या सत्यामुळे एका क्षणात टळले होते.

घरच्या रस्त्याने जाताना कामिनीने कौशिककडे पाहिले. तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते.

"कौशिकजी... हे आता नेहमीचेच झाले आहे, जर आज तुम्ही माझ्यासोबत नसता, तर मी पार उध्वस्त झाले असते. तुम्ही प्रत्येक वेळी माझे जग वाचवता," कामिनी भावुक होऊन म्हणाली.

कौशिकने गाडी चालवताना तिच्याकडे पाहिले आणि प्रेमाने हसला,

"कामिनीजी, मी तुम्हाला आधीच सांगितलंय... तुमच्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटासमोर ढाल बनून उभे राहणे हे आता माझ्या आयुष्याचे ध्येय आहे. तुम्ही एकट्या नाही आहात."

त्या संध्याकाळच्या तांबड्या उन्हात, कामिनी आणि कौशिक यांच्यातील विश्वासाचा बंध आणखी घट्ट झाला होता. पण इकडे, खुशीचा आणि चंद्रहासचा हा डावही उधळला गेल्यामुळे खुशीच्या मनातील विष आता अधिकच आक्रमक रूप धारण करणार होते.

क्रमशः

भालचंद्र नरेंद्र देव ©®

सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे इरा फेसबुक पेज वर येतील, त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा.

ता क: ही कथा पुस्तक काल्पनिक आहे. यातील नावे, पात्रे, स्थळे आणि घटना या लेखकाच्या कल्पनेचा अविष्कार आहेत किंवा काल्पनिक पद्धतीने ती योजली आहेत. कोणाही जिवंत वा मृत व्यक्तीशी, घटना प्रसंगाशी किंवा ठिकाणांशी त्यांचे साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

सर्व हक्क राखीव आहेत, लेखकाच्या स्पष्ट लेखी परवानगीशिवाय या प्रकाशनाचा कोणताही भाग कोणत्याही स्वरूपात किंवा कोणत्याही प्रकारे पुनरुत्पादित किंवा कॉपी केला जाऊ शकत नाही किंवा कोणत्याही डिस्क, टेप, मीडिया किंवा इतर माहिती स्टोरेज डिव्हाइसवर हस्तांतरित किंवा पुनरुत्पादित केला जाऊ शकत नाही. पुस्तक परीक्षणातील संक्षिप्त अवतरण वगळता.

copyright: ©®


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →