नात्यांची पाऊलवाट ३९

दोन एकट्या पालकांची प्रेमकथा

भाग ३९: अनपेक्षित हातमिळवणी

'द बेक हाऊस' बेकरीच्या छोट्याशा किचनमध्ये आज भल्या पहाटेपासूनच लगबग सुरू होती. कौशिकने बेकरीची ऑनलाईन नोंदणी केल्याचा परिणाम आता स्पष्ट दिसू लागला होता. अंधेरीच्या आसपासच्या अनेक कॉर्पोरेट ऑफिसेसमधून आणि घरगुती कार्यक्रमांमधून ऑर्डर्सचा पाऊस पडत होता. कामिनीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो आणि नवा उत्साह स्पष्ट दिसत होता. केकचे पीठ तयार करणे, ते ओव्हनमध्ये बेक करणे आणि त्यावर सुंदर क्रीमची नक्षी काढणे... या सगळ्यात कामिनी पूर्णपणे गुंग झाली होती.

बेकरीत कामाचा व्याप वाढल्याचे पाहून खुशी रोज काही ना काही नवीन कारणे काढून तिथे हजेरी लावत होती. कधी ती शार्दूलचा अभ्यास घेण्याचे निमित्त करायची, तर कधी बेकरीत कामिनीला मदत करण्याचा आव आणायची.

"शार्दूल! हे बघ तुझ्यासाठी काय आणलंय मी," खुशीने अगदी प्रेमाचा आव आणत हातातले गरम समोसे आणि कटलेट्सचा डबा शार्दूलसमोर ठेवला.

शार्दूलने खुशीकडे पाहिले आणि तो हसला, "थँक्स खुशी दीदी! पण आई म्हणालीये की आधी अभ्यास पूर्ण करायचा."

"अरे, अभ्यास तर होतच राहील बाळा. आधी हे गरम गरम खाऊन घे नाहीतर थंड होईल, मग आपण सोबत अभ्यास करूया," खुशीने अत्यंत मऊ आवाजात त्याच्या डोक्यावरून हात फिरवला.

ती शार्दूलसोबत मैत्रीचे नाटक अगदी उत्तम प्रकारे वठवत होती. पण तिची नजर सतत काउंटरवर मदत करत बसलेल्या कौशिकवर आणि कामिनीवर असायची. कालच कामिनीच्या तोंडून कौशिकच्या प्रेमाची आणि लग्नाच्या मागणीची गोष्ट ऐकल्यापासून खुशीच्या आत सूडाचा अग्नी पेटला होता. ती बेकरीत येऊन दोघांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून होती.

पण हळूहळू खुशीच्या एक गोष्ट लक्षात आली होती की, तिच्या एकटीने कामिनीला कौशिकच्या आयुष्यातून बाजूला करणे जवळपास अशक्य होते. कामिनीच्या पाठीशी कौशिक एका भक्कम ढालीसारखा, खंबीरपणे उभा होता. संकर्षणची कायदेशीर साथ आणि कौशिकचे अढळ प्रेम... या दोन गोष्टींमुळे कामिनीला स्पर्श करणेही कठीण झाले होते. 'जोपर्यंत कौशिक कामिनीसोबत आहे, तोपर्यंत मी कौशिकला कधीच मिळवू शकणार नाही,' ही सत्यता खुशीच्या मनात पक्की बिंबली होती.

जेव्हा कौशिक त्याच्या ऑफिस साठी बेकारीतून निघून गेला आणि कामिनी किचनमध्ये गेली, तेव्हा खुशी बेकरीच्या कोपऱ्यात उभी राहून विचार करू लागली. तिचे डोके वेगाने फिरू लागले. 'शत्रूचा शत्रू तो आपला मित्र!' ही जुनी म्हण अचानक तिच्या डोक्यात लखकन चमकली.

कामिनीचा सर्वात मोठा शत्रू कोण? महेश दवणे आणि पुरंदऱ्यांचा मुलगा चंद्रहास पुरंदरे.

खुशीच्या चेहऱ्यावर एक कपटी हास्य उमटले. ती बेकरीच्या बाहेर गेली आणि तिने खिशातून फोन काढला. संकर्षणच्या फाईल्समधून तिने यापूर्वीच चंद्रहासचा पर्सनल नंबर चोरून ठेवला होता. तिने कोणतीही हिचकिच न करता थेट तो नंबर डायल केला.

दोन-तीन रिंग्सनंतर तिकडून एक रुबाबदार आणि कडक आवाज आला, "हॅलो, कोण बोलतंय?"

"हॅलो, मिस्टर चंद्रहास पुरंदरे?" खुशीने आपला आवाज अतिशय गंभीर केला.

"हो, मीच बोलतोय. पण तुम्ही कोण? आणि माझा प्रायव्हेट नंबर तुम्हाला कुठून मिळाला?" चंद्रहासने संशयाने विचारले.

"मी कोण आहे यापेक्षा मी कशासाठी फोन केलाय हे तुमच्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे," खुशी हळूच बेकरीच्या बाहेर अजून पुढे  येत म्हणाली.

"मी वकील संकर्षण यांची बहीण खुशी बोलतेय, मी कामिनी नाचणे हिच्या अगदी जवळची व्यक्ती आहे."

चंद्रहासच्या बाजूने काही सेकंद शांतता पसरली. मग तो उपहासाने हसला,

"वकिलाची बहीण मला फोन करतेय? काय भानगड आहे? कामिनीने नवी केस दाखल करायला पाठवलंय की काय?"

"नाही चंद्रहास," खुशीचा आवाज कठोर झाला.

"कामिनीला उध्वस्त करण्याची आणि तिच्याकडून शार्दूलला हिरावून घेण्याची तुमची जितकी इच्छा आहे, तितकीच इच्छा माझीही आहे. आपला शत्रू एकच आहे. मला तुम्हाला भेटायचे आहे... आत्ता."

चंद्रहास अत्यंत धूर्त बिझनेसमन होता. त्याला क्षणात समजले की समोरची मुलगी कामिनीच्या गोटातली असली तरी तिचे हेतू वेगळे आहेत.

"इंट्रेस्टिंग!" चंद्रहास म्हणाला.

"वरळीच्या 'द सेंट रेजिस' हॉटेलमध्ये पाचव्या मजल्यावरच्या लाउंजमध्ये ये. अर्ध्या तासात."

कॉल कट झाला. खुशीने मागे वळून पाहिले, कामिनी अजूनही किचनमध्ये व्यस्त होती. खुशीने पर्स सावरली आणि कोणालाही काही न सांगता बेकरीतून बाहेर पडली.

वरळीच्या त्या पंचतारांकित हॉटेलात, आलिशान झुंबर, मखमली सोफे आणि आल्हाददायक संगीत सुरु होते. चंद्रहास एका कोपऱ्यातल्या टेबलवर बसून ब्लॅक कॉफीचे घोट घेत होता. महागड्या सूटमधील त्याचे व्यक्तिमत्त्व आणि डोळ्यांतील मग्रुरता स्पष्ट दिसत होती.

खुशी तिथे पोहोचली. तिने हाय हील्सचा आवाज करत चंद्रहासच्या समोरच्या खुर्चीवर ताठ बसकण मारली.

चंद्रहासने तिला वरपासून खालपर्यंत पारखले आणि हसून म्हणाला,

"तर... वकील संकर्षणची बहीण! कामिनीच्या घरात राहून तिच्याच पाठीत खंजीर खुपसायला निघालीयेस? काय कारण आहे या अचानक झालेल्या शत्रूत्वाचे?"

खुशीने थेट मुद्द्यावर यायचे ठरवले,

"कारण काहीही असो चंद्रहासजी, त्यात तुम्हाला रस असायला नको. मुद्दा हा आहे की आपल्याला दोघांनाही कामिनीचा पराभव हवा आहे. तुम्हाला शार्दूल हवा आहे, ज्याच्यासाठी दुबईतून आणि तुमच्या वडिलांचा तुमच्यावर प्रचंड दबाव आहे. पण तुम्ही कितीही कायदेशीर डाव खेळले, तरी तुम्ही जिंकू शकत नाहीत."

चंद्रहासचे डोळे बारीक झाले, "असे का वाटते तुला?"

"कारण कामिनीच्या मागे कौशिक सरदेसाई नावाचा माणूस एका भल्या मोठ्या भिंतीसारखा उभा आहे." खुशी आवेशाने म्हणाली.

"कौशिक सरदेसाई कामिनीच्या प्रेमात पडले आहेत. त्यांनी कालच कामिनीला लग्नाची मागणी घातलीये. संकर्षणची कायदेशीर हुशारी आणि कौशिकचे खंबीर प्रेम... या दोघांच्या जोरावर कामिनी तुम्हाला कधीच शार्दूलला घेऊ देणार नाही."

चंद्रहासने कॉफीचा कप खाली ठेवला. त्याच्या चेहऱ्यावरचे हास्य गायब झाले.

"कौशिक सरदेसाई... तोच अडवायसर ना जो कोर्टात खूप उड्या मारत होता? मग तुझा प्लॅन काय आहे?"

खुशीने टेबलवर थोडे पुढे झुकत आपल्या मनातील विष ओकायला सुरुवात केली,

"प्लॅन सोपा आहे. आपल्याला कामिनी आणि कौशिकच्या नात्यात असे काही वितुष्ट आणायचे आहे, ज्यामुळे कौशिक स्वतः कामिनीचा तिरस्कार करू लागेल आणि तिच्यापासून कायमचा दूर निघून जाईल. एकदा का कौशिक तिच्या आयुष्यातून बाजूला झाला, की कामिनी पूर्णपणे एकटी पडेल. तिच्याकडे आर्थिक, मानसिक आधार उरणार नाही आणि ती मानसिकदृष्ट्या खचून जाईल. अशा वेळी तुम्ही सहजपणे बाल हक्क आयोग किंवा न्यायालयाचा वापर करून शार्दूलची कस्टडी कामिनीकडून हिसकावून घेऊ शकता."

चंद्रहासने खुशीकडे कौतुकाने पाहिले. एका वकिलाच्या बहिणीच्या डोक्यात इतके विषारी कारस्थान शिजत आहे, यावर त्याचा आधी विश्वास बसला नाही. पण हा प्लॅन त्याच्या फायद्याचा होता.

"छान! खूपच छान प्लॅन आहे," चंद्रहास मंद हसला. "पण या सगळ्यात तुझा फायदा काय? तू हे सगळे माझ्यासाठी फुकटात नक्कीच करणार नाहीस."

खुशीच्या डोळ्यांत कौतुकाऐवजी एक वेडेपणाचा भाव आला. तिने आपले हात घट्ट आवळले आणि म्हणाली,

"मला कौशिक सर हवे आहेत! मी त्यांच्यावर प्रचंड प्रेम करते. कामिनीने माझ्या प्रेमाचा घास हिरावून घेतलाय. मला ती कामिनी कौशिकच्या नजरेतून पूर्णपणे उतरलेली पाहायची आहे. कौशिक फक्त आणि फक्त माझेच झाले पाहिजेत."

चंद्रहासला तिची ही वेडी तळमळ पाहून प्रचंड आनंद झाला. ज्या कामासाठी तो लाखो रुपये खर्च करायला तयार होता, ते काम ही मुलगी फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी आणि प्रेमापोटी फुकटात करायला तयार होती.

चंद्रहासने आपला उजवा हात पुढे केला,

"डील! मला माझा होणारा भाचा शार्दूल कसाही करून कामिनीपासून दूर हवा आहे, आणि तुला तुझा कौशिक हवा आहे. आपण दोघे मिळून असा काही खेळ खेळू की कामिनीला समजणारही नाही तिच्यावर वार कुठून झाला ते."

खुशीने अजिबात न घाबरता चंद्रहासच्या हातात आपला हात दिला आणि हात मिळवणी केली.

"सांगा, काय करायचे आहे मला?" खुशीने विचारले.

चंद्रहासच्या चेहऱ्यावर एक भयंकर हास्य उमटले. त्याने टेबलवर थोडे झुकून खुशीच्या कानात आपला पुढचा प्लॅन सांगायला सुरुवात केली.

मुंबईच्या त्या पंचतारांकित हॉटेलमध्ये कामिनी-कौशिकच्या सुंदर प्रेमकथेला उध्वस्त करण्यासाठी एक भयंकर कट शिजला होता. एका बाजूला पैसा आणि सत्ता असलेला चंद्रहास होता, तर दुसऱ्या बाजूला प्रेमाच्या वेडात आंधळी झालेली खुशी होती. कामिनी आणि कौशिकच्या विश्वासावर आतापर्यंतचे सर्वात मोठे वादळ ययेऊन धडकणार होते.

क्रमशः 

भालचंद्र नरेंद्र देव ©®

ता क: ही कथा पुस्तक काल्पनिक आहे. यातील नावे, पात्रे, स्थळे आणि घटना या लेखकाच्या कल्पनेचा अविष्कार आहेत किंवा काल्पनिक पद्धतीने ती योजली आहेत. कोणाही जिवंत वा मृत व्यक्तीशी, घटना प्रसंगाशी किंवा ठिकाणांशी त्यांचे साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

सर्व हक्क राखीव आहेत, लेखकाच्या स्पष्ट लेखी परवानगीशिवाय या प्रकाशनाचा कोणताही भाग कोणत्याही स्वरूपात किंवा कोणत्याही प्रकारे पुनरुत्पादित किंवा कॉपी केला जाऊ शकत नाही किंवा कोणत्याही डिस्क, टेप, मीडिया किंवा इतर माहिती स्टोरेज डिव्हाइसवर हस्तांतरित किंवा पुनरुत्पादित केला जाऊ शकत नाही. पुस्तक परीक्षणातील संक्षिप्त अवतरण वगळता.

copyright: ©®


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →