नात्यांची पाऊलवाट ३६

दोन एकट्या पालकांची प्रेमकथा

भाग ३६: नवा डाव

अंधेरीच्या त्या गल्लीत द बेक हाऊसचे शटर उघडून आता तीन दिवस झाले होते. प्रशासनाचे ते लाल सील निघाल्यामुळे कामिनीच्या जिवात जीव आला होता खरा, पण अजूनही व्यवसायाची गाडी पूर्ववत रुळावर येत नव्हती. सुरूवातीला जुने ग्राहक बेकरीच्या दारात येऊन रेंगाळायचे, पण आत यायला घाबरायचे. काही दिवसांपूर्वीच इथे गाड्या आल्या होत्या, गुंड आले होते आणि पोलिसांचा फेरा पडला होता. त्यामुळे काहीतरी भानगड असावी' अशा संशयाने लोक लांबूनच डोकावून निघून जायचे.

अशा बिकट प्रसंगी आजूबाजूच्या दुकानदारांनी मात्र कामिनीला साथ दिली. शेजारच्या किराणा दुकानाचे पांडुरंग काका असोत वा बाजूचे चहावाले भाऊ, त्यांनी कामिनीवर पूर्ण भरवसा ठेवला होता. त्यांच्या दुकानात येणाऱ्या प्रत्येक गिऱ्हाईकाला ते आवर्जून सांगायचे,

"अहो, कामिनी ताईंच्या दुकानातला केक आणि बिस्किटे एकदम शुद्ध अन ताजी असतात. ते पोलिसांचे प्रकरण उगाच कोणीतरी त्यांना त्रास द्यायला केले होते. तुम्ही बिनधास्त जा."

त्या सर्वांच्या पाठिंब्यामुळे काही ग्राहक हळूहळू वळू लागले होते, पण तरीसुद्धा पूर्वीसारखी गर्दी जमत नव्हती. बेकरीचा रोजचा खर्च, वीजबिल आणि सामानाचा खर्च निघणेही कठीण होत होते.

कौशिक ही गोष्ट रोज संध्याकाळी टिपत होता. तो स्वतःचे काम आटोपून रोज संध्याकाळी साडेसात वाजता न चुकता बेकरीवर पोहोचायचा.

"कामिनीजी,"

एके दिवशी संध्याकाळी गल्ल्यावर बसलेल्या कामिनीच्या हातात चहाचा कप देत कौशिक म्हणाला,

"फक्त या चार भिंतींवर अवलंबून राहून चालणार नाही. आता जमाना बदललाय. आपण आपली बेकरी ऑनलाईन नेऊया का? स्विगी, झोमॅटोवर नाव नोंदवू आणि सोशल मीडियावर आपल्या बेकरीचे फोटो टाकू. काय वाटते तुम्हाला?"

कामिनीने चहाचा घोट घेतला आणि गोंधळून त्याच्याकडे पाहिले,

"ऑनलाईन? कौशिकजी, मला त्यातले फारसे काही समजत नाही हो."

"मी आहे ना!" कौशिक हसून म्हणाला.

"मी करतो सगळी सेटिंग्स. पण त्याआधी आपल्याला गिऱ्हाईकांना आकर्षित करण्यासाठी काहीतरी नवीन द्यायला हवे. बाजारात मिळतात तसले साधे केक नाही, तर काहीतरी भन्नाट."

त्या संध्याकाळपासून बेकरीच्या मागच्या किचनमध्ये नवीन प्रयोगांची सुरुवात झाली. कौशिक आणि कामिनी रोज रात्री उशिरापर्यंत नवनवीन केकच्या रेसिपीज बनवण्याचा प्रयत्न करायचे. कामिनी जेव्हा वेगवेगळ्या फ्लेव्हर्सचे मिश्रण करायची, तेव्हा कौशिक आवडीने तिच्या कल्पकतेला दाद द्यायचा.

एकदा चॉकलेट आणि स्ट्रॉबेरीचे कोम्बिनेशन बनवताना कामिनीच्या हातावर क्रीमी टेक्सचर लागले. कौशिकने तिची अडचण ओळखून हळूच तिच्या हातातील बाऊल पकडला.

"असे नाही, याला एकाच दिशेने ढवळायला हवे, तरच केक स्पंजी होईल," कामिनीने अगदी जवळ उभे राहून सांगायला सुरुवात केली.

दोघेही इतके जवळ होते की कामिनीला कौशिकच्या श्वासांची उब जाणवत होती. तिने मान वर करून पाहिले, तर कौशिक तिचीच कृती अत्यंत आत्मीयतेने पाहत होता. दोघांच्या नजरा एकमेकांत गुंतल्या. त्या साध्याशा किचनमध्ये, व्हॅनिला आणि चॉकलेटच्या मंद सुवासात, एका सुंदर आणि परिपक्व प्रेमाचा अंकुर हळूहळू फुलत होता. हे तरुण वयातील बाळबोध प्रेम नव्हते; तर दोन वादळातून गेलेल्या, एकमेकांना सावरून धरणाऱ्या प्रौढ जिवांचे, एकमेकांच्या आदरावर आधारित असलेले प्रेम होते.

पण या सगळ्या नात्यांच्या खेळात एक तिसराच धागा विणला जात होता, ज्याची कोणालाच कल्पना नव्हती.

संकर्षणची लहान बहीण खुशी... तिचे कोर्टाच्या कागदपत्रांचे काम खरे तर आदल्या दिवशीच संपले होते. पण या दोन-तीन दिवसांत कौशिकचा तो खंबीरपणा, त्याचा शांत स्वभाव, संकटाच्या वेळी कामिनीच्या पाठीशी ढाल बनून उभे राहणे आणि त्याचे ते देखणे रूप... या सगळ्या गोष्टींमुळे खुशी नकळत कौशिकच्या प्रेमात पडली होती. पंचविशीतील खुशीच्या भाबड्या मनाला कौशिकचे व्यक्तिमत्त्व प्रचंड भावले होते.

आता कोर्टाचे काम संपले तरीसुद्धा तिला कौशिकच्या जवळ राहायचे होते. त्यामुळे रोज संध्याकाळी ती देखील बेकरीत हजर व्हायची.

"कामिनी ताई! मी आले!" खुशीने अगदी उत्साहात बेकरीत प्रवेश केला.

तिची नजर आधी संपूर्ण दुकानात फिरली. कौशिक कॉम्प्युटरवर काहीतरी ऑनलाईन फॉर्म भरत बसला होता. त्याला बघताच खुशीच्या चेहऱ्यावर एक चमक आली. तिने तात्काळ अनयाजवळ धाव घेतली.

अनया बाजूला बसून गिटार उराशी धरून काहीतरी सुरांचा रियाज करत होती. खुशीने तिच्या अगदी जवळ जाऊन तिला मिठी मारली,

"माझी गोड अनया! काय वाजवतेयस आज?"

खरे तर खुशीला संगीतातला फारसा गंध नव्हता, पण कौशिकला संगीत आवडते हे तिला ठाऊक झाले होते. त्यामुळे ती अनयावर उगाच खोटे खोटे प्रेम दाखवू लागली होती.

"अनु, तुला माहितीये? तुझा आवाज खूप छान आहे. पुढच्या महिन्यात शहरात एक मोठी ज्युनिअर संगीत स्पर्धा आहे. मी तुला त्यासाठी तयार करणार आहे." खुशी मोठ्याने म्हणाली, जेणेकरून तिचा आवाज कौशिकपर्यंत पोहोचावा.

अनयाने निरागसतेने तिच्याकडे पाहिले,

"खरंच खुशी दीदी? पण मला गिटारचे सगळे कॉर्ड्स अजून येत नाहीत."

"मी शिकवेन ना. रोज आपण प्रॅक्टिस करायची," खुशी अनयाच्या पाठीवर हात फिरवत म्हणाली.

टेबलवरून हे सगळे पाहणारा कौशिक हसला. त्याला वाटले की खुशी खरोखरच त्याच्या मुलीवर मनापासून प्रेम करतेय आणि तिची काळजी घेतेय. कौशिकने मान वर करून खुशीकडे पाहिले आणि म्हणाला,

"थँक्स खुशी! तू अनयाला खूप छान सांभाळतेस. संकर्षण खरंच सुदैवी आहे की त्याला तुझ्यासारखी बहीण मिळाली."

कौशिकचे ते कौतुकाचे शब्द ऐकून खुशीचे मन मयुरासारखे नाचू लागले. तिला वाटले की ती कौशिकच्या मनात जागा बनवत आहे, पण कौशिकच्या मनात खुशीबद्दल फक्त एका मैत्रिणीसारखा आणि मित्राच्या बहिणीसारखा भाव होता, हे तिला समजत नव्हते.

या शांततेच्या आणि प्रेमाच्या वातावरणामागे दिल्ली आणि मुंबईत कारस्थानाची नवी जाळी विणली जात होती.

दुबईहून महेशचा फोन आल्यानंतर दादासाहेब पुरंदरे चंद्रीकेची मानसिक परिस्थिती पाहून भयंकर चिडले होते. त्यांनी तात्काळ दिल्लीहून चंद्रहासला फोन लावला आणि त्याला मुंबईत पुन्हा सक्रिय होण्याचे आदेश दिले.

"चंद्रहास, ती बेकरीची जागा आणि कोर्टाचा वाद बाजूला ठेव," दादासाहेब फोनवर कडक आवाजात म्हणाले.

"आपल्याला तो मुलगा हवा आहे... शार्दूल. महेश आणि चंद्रिकेची अवस्था बिकट आहे. जर मुलगा मिळाला नाही, तर आपले सगळे प्लॅन्स फसतील, मला चंद्रिकेला गमावायचे नाही. कामिनीला अशा ठिकाणी मारा जिथे तिला सर्वात जास्त वेदना होतील.सध्या तिच्या दुकानात कोणी जात नसेल, कदाचित त्या शार्दुलची शाळेची फी पण राहिली असेल, याचा मोठा मुद्दा बनव, बाकी तुला काय करायचे ते कळले असेलच."

चंद्रहासच्या विकृत डोक्यात एक नवी युक्ती सुचली. कायदेशीर मार्गाने जागा बळकावणे अवघड जात होते, पण एका आईकडून तिचे मूल हिरावून घेणे कायद्याच्याच एका दुसऱ्या पळवाटेने शक्य होते.

त्याने आपल्या महागड्या वकिलांच्या फौजेशी चर्चा केली आणि मुंबईतील 'बाल हक्क आयोगात' कामिनीच्या विरोधात एक अत्यंत बनावट तक्रार नोंदवली.

तक्रारीमध्ये अत्यंत हुशारीने आणि खोट्या पुराव्यांसहित लिहिले गेले होते:

१) कामिनी नाचणे हिची सध्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत खालावलेली असून, तिच्या बेकरीवर प्रशासनाची कारवाई झाली आहे.
२) तिच्याकडे उत्पन्नाचा कोणताही स्थिर स्त्रोत नाही.
३) ती एका आठ वर्षांच्या लहान मुलाचा (शार्दूलचा) सांभाळ करण्यास आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या असमर्थ आहे. मुलाच्या शिक्षणाकडे आणि आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे.

त्यामुळे बाल हक्क कायद्यानुसार शार्दूलला तात्काळ कामिनीच्या तावडीतून सोडवून बालसुधारगृहात ठेवावे किंवा त्याच्या अधिकृत सख्ख्या वडिलांच्या (महेश दवणेच्या) ताब्यात द्यावे, ते त्याची काळजी घेण्यास समर्थ आहेत.

तक्रार दाखल केल्यानंतर चंद्रहास आपल्या केबिनमध्ये खुर्चीवर मागे टेकून बसला. त्याच्या हातात दारूचा ग्लास होता. त्याच्या चेहऱ्यावर एक हसू उमटले.

"कामिनी..." चंद्रहास स्वतःशीच पुटपुटला,

"तुझी ती बेकरी तर मी नंतर उध्वस्त करेनच, पण आधी तुझ्या काळजाचा तुकडा तुझ्यापासून वेगळा करतो. बघू तुझा तो वकील मित्र संकर्षण आणि तो कौशिक आता तुझा मुलगा कसे वाचवतात ते."

कामिनी आणि कौशिक बेकरी ऑनलाईन नेण्याच्या आणि प्रेमाच्या नव्या विश्वात पाऊल टाकत होते, तर दुसरीकडे बाल हक्क आयोगाची एक भयंकर टांगती तलवार कामिनीच्या मातृत्वावर आणि शार्दूलच्या भविष्यावर येऊन लटकली होती.

क्रमशः

भालचंद्र नरेंद्र देव ©®

सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे इरा फेसबुक पेज वर येतील, त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा.

ता क: ही कथा पुस्तक काल्पनिक आहे. यातील नावे, पात्रे, स्थळे आणि घटना या लेखकाच्या कल्पनेचा अविष्कार आहेत किंवा काल्पनिक पद्धतीने ती योजली आहेत. कोणाही जिवंत वा मृत व्यक्तीशी, घटना प्रसंगाशी किंवा ठिकाणांशी त्यांचे साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

सर्व हक्क राखीव आहेत, लेखकाच्या स्पष्ट लेखी परवानगीशिवाय या प्रकाशनाचा कोणताही भाग कोणत्याही स्वरूपात किंवा कोणत्याही प्रकारे पुनरुत्पादित किंवा कॉपी केला जाऊ शकत नाही किंवा कोणत्याही डिस्क, टेप, मीडिया किंवा इतर माहिती स्टोरेज डिव्हाइसवर हस्तांतरित किंवा पुनरुत्पादित केला जाऊ शकत नाही. पुस्तक परीक्षणातील संक्षिप्त अवतरण वगळता.

copyright: ©®


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →