भाग २: अनोळखी ओळख
रात्रीच्या अस्वस्थ करणाऱ्या शांततेनंतर अखेर मुंबई शहरात एक नवीन सकाळ उजाडली. काल रात्री मनात दाटून आलेले निराशेचे ढग कौशिकने सकाळी उठल्या उठल्या बाजूला सारले होते. त्याने काल रात्रीच स्वतःशी पक्का निश्चय केला होता की, काहीही झाले तरी आज अनयाला डब्यात आलू पराठाच द्यायचा. त्यामुळे तो पहाटे साडे चारलाच उठला. काल संध्याकाळी येताना त्याने बाजारातून मोठे बटाटे, गव्हाचे पीठ आणि कोथिंबीर मिरची आले असा सगळा आवश्यक मसाला विकत आणला होता. स्वयंपाकघरात थोडी शोधाशोध करून त्याने शेवटी परात आणि लाटणे शोधून काढलेच.
कौशिकने कधीतरी सुप्रियाला पराठा करताना पाहिले होते, त्या आठवणींच्या जोरावर त्याने पीठ मळायला सुरुवात केली. पीठ कधी जास्त सैल तर कधी जास्त घट्ट होत होते, पण त्याने हार मानली नाही. बटाट्याची भाजी तर त्याचा हाताचा मळ होता, त्याने बटाटे उकडून हळद मिरच्यांची फोडणी देऊन , भाजी बनवली,आणि पीठात भरून पराठे गोल करायचा प्रयत्न केला, पण पराठ्याचा आकार भारताच्या नकाशासारखा झाला होता. शेवटी त्याने एका बशीच्या सहाय्याने त्यावर दाब टाकून गोल पराठा बनवलाच. डबा पॅक करताना त्याच्या चेहऱ्यावर एक मस्त समाधान आले होते.
तेवढ्यात अनया डोळे चोळत स्वयंपाकघरात आली. तिने नाकाजवळ हात नेऊन हवेत सुवास घेतला,
"वा बाबा! आज शेवटी पराठा झालाच, खमंग वास सुटलाय सगळीकडे."
कौशिकने हसून तिचा डबा दाखवला,
"बघ, बाबाने आपले प्रॉमिस पूर्ण केले. आज डब्यात आलू पराठा आणि टोमॅटो सॉस असणार आहे."
अनयाने खुश होऊन कौशिकला घट्ट मिठी मारली, "थँक्यू बाबा! यू आर द बेस्ट!" कालचा तिचा सगळा राग एका क्षणात पळून गेला होता.
तिकडे कामिनीच्या घरीही सकाळची लगबग सुरू होती. कामिनीने शार्दूलसाठी डबा तयार केला आणि सोबतच आपल्या बेकरीतून आदल्या दिवशी रात्री खास तयार केलेली फ्रेश मॅंगो पेस्ट्री एका सुंदर छोट्या बॉक्समध्ये पॅक केली.
"शार्दूल, हा बॉक्स तुझ्या बॅगेत नीट ठेव. काल मी जे सांगितले होते ते लक्षात आहे ना?" कामिनीने विचारले.
शार्दूलने तोंड वाकडे केले, "हो आई, लक्षात आहे. त्या भांडकुदळ मुलीला द्यायची आहे ना ही पेस्ट्री?"
"शार्दूल, ती भांडकुदळ नाहीये. ती नवीन आहे आणि चॉकलेट किंवा मॅंगो पेस्ट्री पाहिल्यावर कोणीही खुश होते. आज तुम्ही दोघे नक्की चांगले मित्र व्हाल, मला खात्री आहे. चल, दप्तर घे मग आपण निघूया," कामिनीने त्याचा गालावर हात फिरवत निरोप दिला.
शाळेची पहिली बेल वाजली आणि मुले आपापल्या वर्गात जाऊन बसली. अनया आज थोडी लवकर आली होती आणि ती बाकावर बसून आपली वही काढत होती. तेवढ्यात शार्दूल वर्गात आला. त्याने अनयाकडे पाहिले. ती पुन्हा त्याच्याच बाकावर बसली होती. कालच्या भांडणामुळे दोघांच्याही मनात थोडी अढी होतीच. शार्दूल घुश्श्यातच तिच्या बाजूला येऊन बसला. त्याने आपल्या बॅगेतून तो छोटा बॉक्स काढला आणि न बोलता सरळ अनयाच्या समोर धरला.
अनयाने दचकून त्या बॉक्सकडे आणि मग शार्दूलकडे पाहिले,
"हे काय आहे?"
शार्दूलने आपले डोळे इकडेतिकडे फिरवले,
"ते... काल आपले भांडण झाले ना, म्हणून माझी आई म्हणाली की तुला सॉरी म्हणायला. आमच्या बेकरीतली फ्रेश मॅंगो पेस्ट्री आहे ही. खास तुझ्यासाठी बनवली आहे तिने."
मॅंगो पेस्ट्री हे नाव ऐकताच अनयाचे डोळे चमकले. तिने तो बॉक्स उघडला. आतमध्ये अत्यंत सुंदर आणि सुबक अशी पिवळीधमक पेस्ट्री होती, ज्यावर पांढरी पिवळी क्रीम लावलेली होती. अनयाला पेस्ट्री खूप आवडायची. तिने लगेच बॉक्स हातात घेतला आणि एक छोटा तुकडा तोंडात टाकला.
"वा! ही खूपच भारी आहे. तुमची स्वतःची बेकरी आहे?" अनयाने आश्चर्याने विचारले.
"हो, माझी आई चालवते. खूप छान केक्स बनवते ती," शार्दूलने अभिमानाने छाती फुगवून सांगितले.
"थँक्यू शार्दूल! आणि सॉरी हं, काल मी पण तुझ्याशी उगाच भांडले. माझ्यामुळे तुझा कंपास बॉक्स पडला ना! माझ्या बाबांनी पण मला सांगितले होते की नवीन शहरात मित्र बनवायचे असतात," अनयाने हसून आपला हात पुढे केला.
"फ्रेंड्स?" शार्दूलने हसून तिचा हात हातात घेतला.
"फ्रेंड्स!" अनया म्हणाली.
एका छोट्या पेस्ट्रीने कालचे सगळे कटू वातावरण एका क्षणात शांत करून टाकले होते. त्या दिवशी मधल्या सुट्टीत अनयाने आपला आलू पराठा आणि शार्दूलने आपले सँडविच एकमेकांशी शेअर करून खाल्ले. अवघ्या काही तासांतच ते एकमेकांचे सगळ्यात चांगले मित्र बनले होते. ते एकमेकांना आपापल्या जुन्या शहरांबद्दल, मित्रांबद्दल सांगत होते.
दुपारची वेळ झाली. शाळा सुटायला अवघी पंधरा मिनिटे बाकी असताना अचानक बाहेर आभाळ दाटून आले. काळेकुट्ट ढग जमा झाले आणि बघता बघता विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला. पावसाचा वेग इतका प्रचंड होता की समोरील रस्ते एका मिनिटात पाण्याने भरून गेले.
शाळा सुटल्याची बेल वाजली. सगळी मुले आरडाओरडा करत बाहेर आली. ज्या मुलांकडे छत्र्या किंवा रेनकोट होते, ते आपल्या पालकांकडे जात होते. पण अनया आणि शार्दूल दोघांकडेही छत्री नव्हती. सकाळी ऊन असल्यामुळे दोघांच्याही पालकांनी त्यांना छत्री दिली नव्हती. दोघेही धावत येत शाळेच्या मुख्य गेटपाशी असलेल्या मोठ्या शेडखाली थांबले. बाहेर पाऊस कोसळतच होता.
कौशिक नेहमीप्रमाणे वेळेवर पोहोचला होता. सुदैवाने त्याच्या गाडीच्या डिकीत एक मोठी कौटुंबिक छत्री नेहमी असायची. तो ती मोठी छत्री उघडून शेडपाशी पोहोचला. त्याला अनया तिथे उभी असलेली दिसली.
"अनू! बाळा, ये लवकर," कौशिकने आवाज दिला.
अनयाने बाजूला उभ्या असलेल्या शार्दूलकडे पाहिले, "बाबा, हा शार्दूल आहे, माझा नवीन मित्र. त्याच्याकडे पण छत्री नाहीये."
कौशिकने शार्दूलकडे पाहिले. शार्दूल बिचारा थंडीने थोडा कुडकुडत होता. कौशिकचा स्वभाव मुळातच दयाळू होता. त्याने हसून शार्दूलला जवळ घेतले,
"अरे हो का? काळजी करू नकोस बेटा. माझ्याकडे खूप मोठी छत्री आहे. आपण तिघेही यात मावू. तुझी आई कुठे आहे? बाहेर गेट जवळ वाट पाहतेय का?"
"नाही, माझी आई अजून आली नाहीये," शार्दूलने उत्तर दिले.
"ठीक आहे, तोपर्यंत तू आमच्यासोबत चल. आपण माझ्या गाडीपाशी उभे राहून तुझी आई येईपर्यंत वाट पाहू," कौशिकने अत्यंत आपुलकीने शार्दूलच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याला आपल्या छत्रीखाली घेतले. तिघेही हळूहळू गाडीच्या दिशेने निघाले होते.
दुसरीकडे, कामिनीची बेकरीत एका मोठ्या ऑर्डरमुळे प्रचंड तारांबळ उडाली होती. त्यातच अचानक आलेल्या या मुसळधार पावसामुळे तिला वेळेवर निघता आले नाही. जेव्हा तिने बाहेर पाहिले, तेव्हा तिला जाणवले, की शाळा सुटून गेली आहे. ती घाबरली. ती घाईघाईने रस्त्यावर आली, पण पावसामुळे एकही रिक्षा थांबायला तयार नव्हती. शेवटी एका रिक्षावाल्याला विनवणी करून ती रिक्षात बसली आणि शाळेकडे निघाली. तिच्या मनात सारखी एकच भीती होती, शार्दूल एकटा असेल, तो घाबरला असेल, मुंबई शहरात तो कोणा अनोळखी माणसाच्या जाळ्यात तर अडकणार नाही ना? चार वर्षांपूर्वीच्या कटू अनुभवांमुळे तिचा पुरुषांवरचा आणि जगावरचा विश्वास उडाला होता.
रिक्षा शाळेच्या गेटपाशी थांबली. कामिनीने रिक्षाचे पैसे दिले आणि ती छत्री न घेताच पावसात धावत गेटच्या दिशेने धावू लागली. समोरचे दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली.
तिचा ८ वर्षांचा शार्दूल एका अनोळखी, उंच पुुरुषाच्या छत्रीखाली उभा होता आणि तो पुरुष शार्दूलच्या खांद्यावर हात ठेवून काहीतरी बोलत होता. कामिनीच्या मनात एका क्षणात भीतीचे आणि रागाचे काहूर माजले. तिच्या डोळ्यांसमोर भूतकाळातल्या सगळ्या वाईट गोष्टी फिरू लागल्या.
ती कोणत्याही गोष्टीचा विचार न करता धावत गेली आणि अत्यंत धसमुसळेपणाने तिने शार्दूलचा हात धरून त्याला कौशिकच्या हातातून जोरात बाजूला खेचले. कौशिक या अचानक झालेल्या हल्ल्याने पुरता दचकला.
"शार्दूल!" कामिनी अत्यंत कडक आणि रागीट आवाजात ओरडली. तिने शार्दूलला आपल्या मागे ओढले आणि कौशिककडे वळून ती नाही नाही ते बोलू लागली.
"कोण आहात तुम्ही? माझ्या मुलाच्या जवळ येण्याची तुमची हिम्मत कशी झाली? काय करत होतात तुम्ही त्याच्यासोबत? लाज नाही वाटत तुम्हाला लहान मुलांशी अशा चाली खेळायला? हल्ली लोकं किती खालच्या पातळीवर जाऊ शकतात याचा विचारही करवत नाही." कामिनीचा आवाज पावसातही स्पष्ट ऐकू येत होता. तिचा चेहरा रागाने लाल झाला होता आणि तिच्या शरीराला थरकाप सुटला होता.
कौशिक गप्प बसून पाहत राहिला, पण त्याच्या डोळ्यात कमालीचे आश्चर्य होते.
"मॅडम, तुम्ही चुकीचे समजत आहात..." कौशिक बोलायचा प्रयत्न करत होता.
पण कामिनी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. ती मागे वळली आणि तिने शार्दूलच्या पाठीवर जोरात एक रट्टा मारला.
"तुला किती वेळा सांगितले आहे की अनोळखी लोकांशी बोलायचे नाही? कोणाच्याही सोबत जायचे नाही? मग तू या माणसासोबत का चालला होतास? बुद्धी गहाण ठेवली आहेस का तुझी?" कामिनी ओरडली. शार्दूलच्या डोळ्यात धपाट्यामुळे पाणी आले.
"आई! आई, ते अनयाचे बाबा आहेत!" शार्दूल रडतच ओरडला आणि त्याने अनयाकडे बोट दाखवले, जी छत्रीखाली कामिनीचा रागीट चेहरा पाहून घाबरून उभी होती.
"आज तू दिलेल्या पेस्ट्रीमुळे ती माझी फ्रेंड बनली. माझ्याकडे छत्री नव्हती म्हणून अंकल मला मदत करत होते, ते वाईट माणूस नाहीत."
शार्दूलचे हे शब्द ऐकताच कामिनी जणू स्तब्ध झाली. तिच्या पाठीत सळसळून एक थंड लहर धावली. तिने बाजूला पाहिले, तिथे एक छोटी मुलगी अत्यंत घाबरलेल्या नजरेने तिच्याकडे पाहत होती. मग तिने कौशिककडे पाहिले. कौशिकच्या चेहऱ्यावर राग नव्हता.
कामिनीला एका क्षणात आपल्या धसमुसळेपणाची आणि केलेल्या कृत्याची प्रचंड लाज वाटली. तिचा राग विरघळला आणि तिची जागा पश्चात्तापाने घेतली. पाऊस तिच्या चेहऱ्यावरून वाहत होता, पण आता तिच्या डोळ्यातही शरमेचे पाणी आले होते.
"मी... मी खरोखर खूप दिलगीर आहे," कामिनी अत्यंत ओशाळवाण्या आवाजात म्हणाली. ती कौशिकच्या समोर हात जोडून उभी राहिली.
"माझा खूप मोठा गैरसमज झाला. आजकालची परिस्थिती पाहून एक आई म्हणून मी घाबरले होते. मी रागाच्या भरात तुम्हाला नाही नाही ते बोलले... प्लीज मला माफ करा."
कौशिकने एक दीर्घ श्वास घेतला आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू आले. तो पुढे झाला आणि म्हणाला,
"काही हरकत नाही मॅडम. मी समजू शकतो. आजकालच्या जगात आपल्या मुलाची सुरक्षा पाहताना आईचे घाबरणे अगदी स्वाभाविक आहे. तुम्ही तुमच्या मुलाची काळजी घेत होतात, यात तुमची काहीच चूक नाही. मला तुमचा राग आलेला नाही, मी तुमच्या जागी असतो तरी हेच केले असते."
त्या पावसाच्या सरींमध्ये, ते दोघेही आयुष्यात पहिल्यांदाच समोरासमोर आले होते. कौशिकने जेव्हा कामिनीच्या डोळ्यांत पाहिले, तेव्हा त्याला तिच्या रागाच्या मागे दडलेली भीती आणि आपल्या मुलासाठी असलेली टोकाची ममता, म्हणजेच एका खऱ्या आईचे प्रेम जाणवले. तिकडे कामिनीने जेव्हा कौशिकच्या बोलण्यातला साधेपणा पाहिला, तेव्हा तिला त्याच्या स्वभावातील सभ्यता जाणवली. तिने विचार केला की, ज्या माणसाला तिने एवढे सुनावले, तरी तो किती शांतपणे तिची समजूत काढत होता.
"माझ्या मुलाला पावसात मदत केल्याबद्दल... आणि माझ्या चुकीच्या वर्तणुकीनंतरही मला समजून घेतल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार," कामिनीने मान खाली घालून कृतज्ञता व्यक्त केली.
"अहो, त्यात काय मोठे! शार्दूल आता अनयाचा मित्र आहे, म्हणजेच तो माझ्या मुलासारखाच आहे," कौशिक म्हणाला.
"बाय शार्दूल! उद्या शाळेत भेटू!" अनयाने छत्रीखालून हात हलवला.
"बाय अनया!" शार्दूलनेही आपले डोळे पुसत हसून निरोप दिला.
कामिनीने शार्दूलचा हात धरला. तिने अजून एकदा कौशिककडे ओझरता कटाक्ष टाकला आणि ती शार्दूलला घेऊन गेटबाहेर उभ्या असलेल्या रिक्षाच्या दिशेने निघून गेली.
कौशिक आणि अनया आपल्या गाडीकडे चालू लागले. गाडी चालवताना कौशिकच्या डोक्यात कामिनीचा तो चेहरा सारखा फिरत होता. तिचा तो सुरुवातीचा राग, तिचा तो थरकाप आणि नंतर आलेला पश्चात्ताप... या सगळ्याच्या मागे एका आईचे ममत्व होते.
'शार्दूलच्या आईच्या चेहऱ्यावर एक अनामिक, खोल भीती सारखी दिसत होती. ती फक्त एका तिच्या मुलाची काळजी नव्हती, तर जणू काहीतरी खूप वाईट अनुभव आल्यासारखी ती घाबरलेली होती, कौशिक घराकडे जाताना मनातल्या मनात हाच विचार करत होता.
या मुंबई शहरातल्या पहिल्या पावसाने दोन वेगवेगळ्या दिशांना जाणाऱ्या आयुष्यांना एका छत्रीखाली आणून सोडले होते.
क्रमशः
भालचंद्र नरेंद्र देव
सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे इरा फेसबुक पेज वर येतील, त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा.
ता क: ही कथा पुस्तक काल्पनिक आहे. यातील नावे, पात्रे, स्थळे आणि घटना या लेखकाच्या कल्पनेचा अविष्कार आहेत किंवा काल्पनिक पद्धतीने ती योजली आहेत. कोणाही जिवंत वा मृत व्यक्तीशी, घटना प्रसंगाशी किंवा ठिकाणांशी त्यांचे साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
सर्व हक्क राखीव आहेत, लेखकाच्या स्पष्ट लेखी परवानगीशिवाय या प्रकाशनाचा कोणताही भाग कोणत्याही स्वरूपात किंवा कोणत्याही प्रकारे पुनरुत्पादित किंवा कॉपी केला जाऊ शकत नाही किंवा कोणत्याही डिस्क, टेप, मीडिया किंवा इतर माहिती स्टोरेज डिव्हाइसवर हस्तांतरित किंवा पुनरुत्पादित केला जाऊ शकत नाही. पुस्तक परीक्षणातील संक्षिप्त अवतरण वगळता.
copyright: ©®
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
