Login

नात्यांची पाऊलवाट १

दोन एकट्या पालकांची प्रेम कथा
भाग १: नवी सकाळ

घड्याळाचा गजर कर्कश आवाजात वाजला आणि कौशिकने दचकून डोळे उघडले. पहाटेचे साडेपाच वाजले होते. त्याने कपाळावर आलेला घाम पुसला आणि त्याच्या पलंगाशेजारी पाहिले. आठ वर्षांची अनया अजूनही गाढ झोपलेली होती, तिचे केस विस्कटलेले होते आणि चेहऱ्यावर एक निरागसता झळकत होती. कौशिकने एक दीर्घ श्वास घेतला. आजचा दिवस दोघांसाठीही खूप महत्त्वाचा होता. नव्या शहरात, नव्या घरात आणि अनयाच्या नव्या शाळेचा हा पहिलाच दिवस होता.

दोन वर्षांपूर्वी झालेल्या त्या भीषण अपघाताने कौशिकचे आयुष्य मुळापासून उपटून टाकले होते. त्याची पत्नी सुप्रिया, त्याला आणि अनयाला सोडून कायमची निघून गेली. त्या अपघातातून कौशिक शारीरिकदृष्ट्या तर सावरला, पण मनावर झालेली जखम अजूनही ताजी होती. तेव्हापासून तो फक्त आणि फक्त अनयासाठी जगत होता. तिचे हसणे, तिचे रडणे, तिचं संगोपन हीच आता त्याच्या आयुष्याची व्याख्या झाली होती. पुणे शहरातल्या सुप्रियाच्या आठवणी त्याला जगू देत नव्हत्या, म्हणूनच त्याने बदली करून घेऊन या अगदी अनोळखी अशा मुंबई शहरात येण्याचा निर्णय घेतला होता.

"अनू... बाळा, ऊठ. आज शाळेचा पहिला दिवस आहे ना?" कौशिकने तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत विचारले.

अनयाने डोळे चोळत कुस बदलली, "बाबा, अजून पाच मिनिटे प्लीज... खूप झोप येतेय."

"नाही गं अनु, आज अजिबात उशीर करून चालणार नाही. तुझी नवी शाळा, नवे मित्र वाट पाहत आहेत, आणि मलाही आवरून ऑफिसला भेट द्यायची आहे. लवकरात लवकर वर्क फ्रॉम होम करून घेतले कि झाले. लवकर ऊठ पाहू." कौशिकने तिला अंथरुणातून जवळजवळ ओढतच उठवले.

कौशिक स्वयंपाकघरात गेला आणि त्याचीच खरी तारांबळ उडाली होती. घरात अजून सगळे सामान नीट लावायचे होते. डबे कुठे आहेत, चमचे कुठे ठेवलेत, याचा काहीच पत्ता लागत नव्हता. त्याने गॅस पेटवला आणि चहासाठी पाणी ठेवले, पण खरा प्रश्न होता अनयाच्या डब्याचा आणि नाश्त्याचा. सुप्रिया असताना सकाळी घरात गरमागरम पोहे, उपमा किंवा पराठ्यांचा सुवास दरवळायचा. कौशिकला ऑफिसला निघताना कधीच कसली काळजी नसायची. पण आता ... आज सगळेच  त्याला एकट्याला करायचे होते.

फ्रिज उघडून पाहिले तर सध्या, कालच्या राहिलेल्या ब्रेडचे अर्धे पाकीट आणि अमूल बटरचा लहान डबा होता. कौशिकने कपाळावर हात मारून घेतला.

"अरे देवा! आज पहिल्याच दिवशी हिला डबा काय द्यायचा, नवीन शाळेत कॅन्टीन कसे आहे अजून माहित नाही?" त्याने कसेबसे ब्रेड टोस्ट केले आणि त्यावर लोणी लावून प्लेटमध्ये ठेवले. डब्यासाठीही त्याने तेच ब्रेड-बटर पॅक केले.

तेवढ्यात अनया अंघोळ करून, तिचा नवा युनिफॉर्म घालून स्वयंपाकघरात आली. दोन पोनी बांधलेली अनया खूपच गोड दिसत होती, आई गेल्यापासून तिने स्वतःचे केस स्वतः बांधायची सवय लावली होती आणि तिला जास्त त्रास नको म्हणून कौशिकने तिचे केस खांद्याच्या वरपर्यंत ठेवून कापून टाकले होते. तिने डायनिंग टेबलवरची पाव -लोण्याची प्लेट पाहिली आणि तिचा चेहरा एकदम कडू झाला.

"बाबा... हे काय आहे?" अनयाने तोंड वाकवून विचारले. 

"नाश्ता आणि तुझा डबा! अनु आज ब्रेड-बटर खाऊन घे. आज पहिलाच दिवस आहे ना, म्हणून थोडी गडबड झाली," कौशिकने तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

"पण बाबा, आज शाळेचा पहिला दिवस आहे. मम्मी मला पहिल्या दिवशी नेहमी माझी आवडती बटाट्याची भाजी असलेला पराठा द्यायची. मला हा पाव-लोणी नाही खायचा." अनयाने पाय आपटत हट्ट धरला.

तिच्या तोंडून मम्मी हा शब्द ऐकताच कौशिकच्या काळजात एक छोटी कळ आली. त्याला सुप्रियाची आठवण आली, पण त्याने स्वतःला सावरले. तो अनयाच्या समोर गुडघ्यावर बसला आणि तिचे दोन्ही हात हातात घेतले.

"अनू, माझी गोड मुलगी आहे ना? बघ, आपण या नव्या शहरात कालच आलोय. घरात अजून पराठ्याचे सामान आणायचे  आहे. तुझा बाबा प्रॉमिस करतो, आज संध्याकाळी आपण सगळे सामान आणूया आणि उद्या... उद्या पक्का तुला गरम गरम पराठा डब्यात देईन. आजच्या दिवसापुरते सांभाळून घेशील ना प्लीज?" कौशिकने अगदी विनवणीच्या स्वरात विचारले.

अनयाने कौशिकच्या चेहऱ्यावरील ती रिक्वेस्ट पाहिली. ती लहान असली तरी समजूतदार होती. तिने एक सुस्कारा सोडला,

"ओके बाबा. फक्त आजच्या दिवसापुरतंच हं! उद्या जर पराठा नाही मिळाला, तर मी शाळेत जाणार नाही."

"हो, नक्की! थँक्यू माझी आई!" कौशिकने तिच्या गालाचा पापा घेतला आणि तिला घाईघाईने राहिलेल्या गोष्टी संपवून घराबाहेर पडला.

दुसरीकडे, त्याच शहराच्या एका दुसऱ्या भागात, ३५ वर्षांची कामिनी आपल्या घरातून बाहेर पडण्याची तयारी करत होती. कामिनी दिसायला अत्यंत सुसंस्कृत, करारी पण तितकीच प्रेमळ स्त्री होती. चार वर्षांपूर्वी तिने एका अत्यंत कटू कौटुंबिक कलहानंतर घटस्फोट घेतला होता. त्या अपघाती नात्याच्या जखमा मनावर घेऊन ती या शहरात आली होती. भूतकाळातील कटू आठवणींना मागे सारून, तिने स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी एक लहानशी बेकरी सुरू केली होती. तिची बेकरी आता हळूहळू छान चालत होती. तिच्या जगण्याचा एकमेव आधार होता तिचा १० वर्षांचा मुलगा, शार्दूल.

"शार्दूल! बॅग भरलीस का रे? तुझा कंपास बॉक्स कुठे आहे?" कामिनीने हॉलमधून आवाज दिला.

"हो आई, सगळे ठेवलंय. पण तू माझ्या डब्यात काय दिले आहेस?" शार्दूल धावतच स्वयंपाकघरात आला.

कामिनीने हसून त्याला जवळ घेतलं, "तुझे आवडते चीज सँडविच आणि आपल्या बेकरीतले फ्रेश कपकेक्स! पहिल्या दिवशी काहीतरी गोड हवे ना?"

"वा! आय लव्ह यू आई!" शार्दूल खुश होऊन म्हणाला.

"चल, आता अजिबात उशीर करायचा नाही. पहिल्या दिवशी शाळेत वेळेवर पोहोचायला हवे," कामिनीने त्याची बॅग उचलली आणि ते दोघेही बाहेर पडले.

शाळेचे गेट मुलांच्या आणि पालकांच्या गर्दीने गजबजलेले होते. कौशिक अनयाचा हात धरून तिला वर्गापर्यंत सोडायला आला. तिसरी अ चा वर्ग समोरच होता.

"बाय अनू, ऑल द बेस्ट! नीट राहा, नेहमीप्रमाणे कोणाशी भांडू नकोस," कौशिकने तिला निरोप दिला.

"बाय बाबा, दुपारी वेळेवर या." अनया वर्गात गेली. वर्गात बऱ्याच बाकांवर मुले बसली होती. अनयाने पाहिले की मधल्या रांगेत एका बाकावर एक मुलगा एकटाच बसला होता. ती तिथे गेली आणि रिकाम्या जागेवर बसली. तो मुलगा दुसरा कोणी नसून शार्दूल होता.

शार्दूलने अनयाकडे जरा रागानेच पाहिले. त्याने आपली बॅग बाकाच्या मध्योपाठ ठेवली.

"हे बघ, ही माझी जागा आहे. तू तिकडे सरकून बस," शार्दूल म्हणाला.

"का? हा काय तुझ्या घरचा बाक आहे का? मी पण इथेच बसणार ते पण पाय पसरून." अनयाने जोरात उत्तर दिले आणि आपली बॅगही तिथेच ठेवली.

दोघांमध्ये पहिल्याच मिनिटाला शीतयुद्ध सुरू झाले. काही वेळाने महाजन बाई वर्गात आल्या. त्यांनी सगळ्यांची ओळख करून घेतली आणि लिहायला सांगितले. अनयाने आपली पेन्सिल काढली, पण लिहिता लिहिता तिची पेन्सिल तुटली. तिने कंपास बॉक्स शोधला, पण घाईघाईत कौशिक तिला शार्पनर द्यायला विसरला होता. तिने शेजारी बसलेल्या शार्दूलकडे पाहिले.

"ए, मला तुझे शार्पनर दे ना जरा," अनयाने हक्काने विचारले.

"नाही देणार. मगाशी कशी भांडत होतीस? मी माझ्या वस्तू कोणाला शेअर करत नाही," शार्दूलने तोंड फिरवले.

"आला मोठा शहाणा, कंजूस कुठला, एक शार्पनर द्यायला काय होतंय?" अनयाने रागारागात शार्दूलच्या बाकावरची पट्टी ओढली.

"माझी पट्टी सोड, ए मुलगी, सोड माझी पट्टी." शार्दूल ओरडला.

"नाही सोडणार, तू मला शार्पनर दे आधी." अनयाने पट्टी जोरात खेचली, आणि त्या गडबडीत शार्दूलचा कंपास बॉक्स खाली पडला. खळ्ळखळ्ळ आवाज झाला.

"काय चाललंय तिथे? शार्दूल, अनया, पहिल्याच दिवशी भांडण? शांत बसा दोघेही, नाहीतर मला शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षा करावी लागेल." महाजन बाईंनी दटावले. दोघांनी एकमेकांकडे रागाने पाहिले आणि तोंड फुगवून बसले.

दुपारी शाळा सुटण्याची बेल वाजली. पालक गेटपाशी वाट पाहत उभे होते. कौशिक ऑफिसच्या लंचच्या वेळेत धावतपळत आला होता, त्याला धाप लागली होती. तिथेच बाजूला कामिनीही उभी होती. गेट उघडताच मुलांची तुडूंब गर्दी बाहेर आली.

अनया आणि शार्दूल एकत्रच बाहेर आले. पण बाहेर येतानाही दोघे एकमेकांना खांदे मारत होते.

"पुन्हा माझ्या बेंचवर बसायचे नाही, समजलीस ना?" शार्दूलने ओरडून सांगितले.

"मला पण तुझ्यासारख्या खडूस मुलासोबत बसायची अजिबात हौस नाही." अनयाने त्याला वाकुल्या दाखवल्या.

शार्दूलनेही तिला जीभ दाखवली आणि रागाने तोंड वेडेवाकडे केले.

गर्दी खूप जास्त होती. कौशिक "अनू... अनू..." म्हणून ओरडत गर्दीतून वाट काढत होता. तिकडून कामिनीही "शार्दूल..." म्हणून पुढे येत होती. अचानक दोन्ही मुले आपापल्या पालकांकडे धावली. गर्दीच्या गोंधळात आणि लोकांच्या येण्याजाण्यामुळे कौशिक आणि कामिनी अगदी एकमेकांच्या शेजारून गेले, पण दोघांचेही लक्ष फक्त आपल्या मुलांकडे असल्याने ते एकमेकांना दिसले नाहीत.

"काय गं अनू, कसा गेला पहिला दिवस?" कौशिकने तिचा हात धरत विचारले.

"खूप घाणेरडा बाबा, माझ्या बाकावर एक अत्यंत मूर्ख आणि खडूस मुलगा बसला होता. त्याने मला शार्पनर सुद्धा दिले नाही," अनयाने रडकुंडीला येऊन सांगायला सुरुवात केली.

तिकडे शार्दूल कामिनीचा हात ओढत सांगत होता,

"आई, आज वर्गात एक नवीन मुलगी आली होती. इतकी भांडकुदळ आहे ती, तिने माझा कंपास बॉक्स खाली पाडला. मला ती मुलगी अजिबात आवडली नाही."

दोन्ही पालक आपापल्या मुलांच्या तोंडून भांडणाचे किस्से ऐकत ऐकत घरी घेऊन गेले.

रात्रीची वेळ झाली होती.

कामिनीच्या घरी, शार्दूल जेवतानाही त्या मुलीचीच निंदा करत होता.

"आई, ती इतकी रागीट आहे ना, तिचे डोळे तर ती असे मोठे मोठे करून बघत होती..."

कामिनीने त्याचा घास थांबवला,

"शार्दूल, हे काय चाललंय? पहिल्या दिवशी कोणाबद्दलही असे वाईट बोलू नये बेटा. ती नवीन असेल, घाबरली असेल. उद्या तू स्वतःहून तिच्याशी छान बोलायचे."

"मी? अजिबात नाही." शार्दूल म्हणाला.

"शार्दूल, आय डोन्ट लाईक दिस बिहेविअर. उद्या तू आपल्या बेकरीतला तो छोटा चॉकलेट केक तिच्यासाठी घेऊन जा आणि तिची माफी माग, समजले?" कामिनीने थोडे कडक आवाजात सांगितले. शार्दूलने नाखुशीने होकार दिला.

तिकडे कौशिकच्या घरात, अनया बेडवर पडून अजूनही शार्दूलला शिव्या घालत होती. "बाबा, तो मुलगा खूप वाईट आहे. मी उद्या त्याच्या शेजारी बसणारच नाही."

कौशिकने तिच्या डोक्यावरून हात फिरवला, "अनू, असे नाही म्हणायचे बाळा. नवीन शहरात आपल्याला मित्र बनवायचे असतात, शत्रू  नाही. कदाचित त्याची चूक नसेलही. उद्या तू स्वतःहून त्याला सॉरी म्हण, ठीक आहे?" अनयाने तोंड फुगवून कुस बदलली.

रात्रीचे बारा वाजले होते. दोन्ही घरांमध्ये शांतता पसरली होती. मुले झोपली होती.

कौशिक आपल्या बाल्कनीत येऊन उभा राहिला. रात्रीचा गार वारा सुटला होता. समोर शहराचे दिवे चमकत होते. त्याच्या हातात सुप्रियाचा एक जुना फोटो होता. त्याच्या डोळ्यातून एक अश्रू घळघळला.

"सुप्रिया... आज पहिल्याच दिवशी माझी किती तारांबळ उडाली माहीत आहे? तिला साधा पराठा देखील करून देता आला नाही मला. मी किती अपयशी बाप आहे ना? मी तिला आईचे प्रेम कधीच देऊ शकणार नाही. या एकटेपणाची भीती वाटते मला सुप्रिया... मी एकटा कसा सांभाळू तिला? का सोडून गेलीस मला?" कौशिक अत्यंत व्याकुळ होऊन स्वतःशीच बोलत होता. त्याच्या मनातील एकाकीपणा त्याला कसा पोखरत होता हे त्याचे त्यालाच माहित नव्हते.

त्याच वेळी, काही अंतरावर असलेल्या एका अपार्टमेंटच्या खिडकीत कामिनी उभी होती. ती आकाशाकडे पाहत होती. तिच्या मनातही भूतकाळाचे वादळ शमले नव्हते.

"शार्दूल मोठा होतोय. आज तो भांडला, त्याला समज द्यायला महेश असायला हवा होता. मी त्याला आईचे प्रेम देतेय, पण महेशची जागा मी कधीच घेऊ शकणार नाही. समाज मला स्वतंत्र स्त्री म्हणून बघतो आहे, पण या चार भिंतींच्या आड असणारा एकटेपणा फक्त मलाच माहीत आहे. मी माझ्या मुलाला नीट सांभाळू शकीन का?" कामिनीने स्वतःच्याच हातानेच स्वतःचे अश्रू पुसले.

दोन वेगवेगळ्या घरांमध्ये, दोन वेगवेगळ्या जिवांमध्ये, एकच सारखी एकाकीपणाची भावना आणि आपल्या मुलाला दोन्ही पालकांचे प्रेम न देऊ शकल्याची खंत घेऊन, कौशिक आणि कामिनी रात्रीच्या अंधारात स्वतःलाच दोष देत जागे होते. त्यांना ठाऊक नव्हते की, नियतीने त्यांच्या मुलांच्या माध्यमातून त्यांच्या आयुष्याची दोरी एकमेकांशी जोडायला सुरुवात केली होती.

भालचंद्र नरेंद्र देव

क्रमशः 

सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे इरा फेसबुक पेज वर येतील, त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा.

ता क: ही कथा पुस्तक काल्पनिक आहे. यातील नावे, पात्रे, स्थळे आणि घटना या लेखकाच्या कल्पनेचा अविष्कार आहेत किंवा काल्पनिक पद्धतीने ती योजली आहेत. कोणाही जिवंत वा मृत व्यक्तीशी, घटना प्रसंगाशी किंवा ठिकाणांशी त्यांचे साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

सर्व हक्क राखीव आहेत, लेखकाच्या स्पष्ट लेखी परवानगीशिवाय या प्रकाशनाचा कोणताही भाग कोणत्याही स्वरूपात किंवा कोणत्याही प्रकारे पुनरुत्पादित किंवा कॉपी केला जाऊ शकत नाही किंवा कोणत्याही डिस्क, टेप, मीडिया किंवा इतर माहिती स्टोरेज डिव्हाइसवर हस्तांतरित किंवा पुनरुत्पादित केला जाऊ शकत नाही. पुस्तक परीक्षणातील संक्षिप्त अवतरण वगळता.

copyright: ©®

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →