"नात्यांमध्ये अडकलेलं स्त्री जीवन भाग :3
आदित्य देखिल आर्याच्या मागे रागाने बेडरूम रूममध्ये निघून गेला आणि हॉलमध्ये एक जड शांतता पसरली.
रेखाताईंचा चेहरा अद्याप रागाने लाल होता. त्या राघवांकडे वळून म्हणाल्या, "बघितलंत ना? आर्याच्या नादाला लागून लेक कसा हाताबाहेर गेलाय? उद्या हे गावाकडचे पाहुणे गेल्यावर काय सांगतील? म्हणतील रेखाच्या घरात सुनेचं राज्य आणि लेक गुलामासारखा राबतोय!"
राघवजींनी हातातला पेपर बाजूला ठेवला आणि चष्मा काढून रेखाताईंकडे रोखून बघितलं.
ते अतिशय शांत पण ठाम आवाजात म्हणाले, "रेखा, तू ज्यांच्या सुनेच्या घरकामाचं कौतुक करतेयस ना, तिला साधी बँकेची स्लिप तरी भरता येते का ग? विचारून बघ तिला एकदा! साधी सही करायला सुद्धा दहा वेळा नवऱ्याला विचारणारी ती पोरगी तुला गुणी वाटते. कारण ती फक्त राबतेय.त्या मुलीला दोष देत नाही मी, पण तिचं जग फक्त त्या चौकटीच्या आतच ग! रांधा वाढा उष्टी काढा.
पण आर्या तशी नाहीये, हे लक्षात घे."
रेखाताई यावर काही बोलणार इतक्यात राघवजींनी पुन्हा सुनावले, "तुझा लाडका लेक, हा तुझा आदित्य, हा फक्त ऑफिस सांभाळतो.
संध्याकाळी आला की सोफ्यावर पाय पसरून बसतो.हं करतो बायकोला मदत पण जेंव्हा ती त्याला मदत मागते तेंव्हाच.
पण तुझी सून आर्या ती ऑफिसही सांभाळते आणि घरातल्या प्रत्येक गोष्टीकडे ती जातीनं लक्षही देते.
सकाळी दूध,पेपर ते किरकोळ भाजीपाला व्यवस्थित भाव करून आणण्यापर्यंत,आपली औषधं आणि आपलं रूटीन चेकअप.सगळं ती निमुटपणे करते. तुला सून म्हणून तिचा अभिमान असायला हवा रेखा तिचा पण तुला त्याचं कौतुक करण्यापेक्षा लोकांच्या टोमण्यांची जास्त काळजी आहे."
"अगं, आज त्या पाहुण्यांना दिलेले ते महागडे गिफ्ट्स, तू सांगितले होतेस का आर्याला? नाही ना! तिच्या मनानं, प्रत्येकाच्या आवडीनिवडी ओळखून तिनं ते आणलेत. ती आपली प्रतिष्ठा जपतेय आणि तू तिची इज्जत काढतेयस?
त्या पाहुण्यांकडे गडगंज संपत्ती आहे म्हणून तू डोळे दिपवून घेतेस? पण ती त्यांनी कमावलेली नाही, वाडवडिलांच्या आयत्या पिठावर रेघोट्या ओढणारे लोक आहेत ते! स्वतःच्या कर्तृत्वावर एक रुपया कमवायची त्यांची लायकी नाही आणि तू त्यांच्यासमोर आपल्या पोराचं हसं होतंय म्हणून रडतेयस? उलट अभिमान वाटू दे तुला मुलगा आणि सुनेचा! "
बेडरूममधून आर्या हे सगळं ऐकत होती. आज सासरे तिच्या बाजूने इतक्या खंबीरपणे उभे राहिले होते.
राघवजी पुढे म्हणाले, "लोक काय म्हणतील, या एकाच विचाराने तू तुझ्या घरातल्या लाखमोलाच्या हिऱ्याची किंमत करायला विसरली आहेस. दुसऱ्याकडे एक बोट दाखवताना चार बोटं स्वतःकडे असतात हे विसरू नकोस.
ज्या दिवशी लोकांच्या नजरेतून बघणं सोडून स्वतःच्या घराकडे मायेने बघशील, त्या दिवशी तुला आर्याचं मोठेपण कळेल.
अलिप्त हो रेखा आता या मोहमायातून, नाहीतर सुखाच्या संसारातील खऱ्या आनंदाला तू मुकशील."
राघवजींचे हे शब्द ऐकून रेखाताई सुन्न झाल्या. शेवटी "लोक काय म्हणतील" या गारुडामुळे आपण आपल्याच घरात शुल्लक गोष्टीवरून वातंग माजवतो आणि आनंदाच्या क्षणांना मुकतो, हे सत्य आता त्यांना टोचू लागलं होतं.
क्रमश:
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
