नात्यांमध्ये अडकलेले स्त्रीजीवन (भाग १)
रेखाताईंच्या कानात गावाकडच्या पाहुण्यांची कुजबुज आधीच गुंजू लागली होती. निमित्त तसं साधंच होतं.
आर्याची आज ऑफिसची एक अतिशय महत्त्वाची मीटिंग असल्याने तिला वेळेचं गणित जुळवणं कठीण जात होतं. त्यात गावाकडून पाहुणे आले होते, म्हणून पती आदित्यने स्वतःहून पुढाकार घेऊन सकाळचा नाश्ता आणि चहा करण्याची जबाबदारी उचलली होती.
पण रेखाताईंच्या नजरेत हा केवळ चहा-नाश्त्याचा विषय नव्हता, तर त्यांच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या संस्कारांना आणि प्रतिष्ठेला एक मोठा धक्का होता.
"आमच्या वेळी नव्हतं बाई असं काही! तुमचं आपलं छान आहे, नवऱ्याला सांगायचं आणि मोकळं व्हायचं. आणि नवरे पण काय, जणू ताटाखालचे मांजरच!" रेखाताईंनी आपला संताप सून आर्यासमोर व्यक्त केला.
त्यांचे हे शब्द आर्याच्या काळजाला जखम करून गेले.
विशेषतः गावाकडची पाहुणेमंडळी हॉलमध्ये बसलेली असताना आदित्यची स्वयंपाकघरातील ही लुडबूड त्यांना घोर अपमान वाटत होती.
"गावात आता यावर चवीने चर्चा होणार, लोक तिखटमीठ लावून सांगणार की रेखाच्या मुलाला बायकोने कसं राबवून घेतलंय," ही भीती रेखाताईंच्या मनाला पोखरत होती.
रेखाताईंना आर्याचे घरासाठी केलेले कष्ट दिसत नव्हते असे नाही, पण त्यांच्या मते स्त्रीने घराबाहेर कितीही नाव कमावले तरी उंबरठ्याच्या आत ती फक्त 'सून' असावी.
आदित्य जेव्हा जेव्हा आर्याला किचनमध्ये मदत करायला यायचा, तेव्हा तेव्हा रेखाताईंच्या प्रचंड त्रागा करायच्या. कारण आदित्यला असं आर्याला प्रत्येक कामात मदत करताना पाहून त्यांना त्यांचे पती राघवजींचा तो जुना काळ आठवायचा, ज्यांनी आयुष्यात कधी पाण्याचा पेलाही स्वतःहून घेतला नव्हता.
आर्याला मिळणारे स्वातंत्र्य आणि तिला पतीचा भक्कम पाठिंबा पाहून त्यांच्या मनातील जुन्या जखमा पुन्हा ताज्या होत होत्या म्हणूनच रेखाताईची जास्त चिडचिड होत होती.
आदित्यला आईचा स्वभाव ठाऊक होता. तो शांतपणे आईला म्हणाला, "अगं आई, लोक काय बोलतात याची मला मुळीच पर्वा नाही. लोकांचं कसं असतं, ते घोड्यावर पण बसू देत नाहीत आणि पायी ही चालू देत नाहीत. आज मी आर्याला नाही, तर तुला मदत केली आहे असं समज."
"लोक काय म्हणतील मला? बायकोचा गुलाम? चालेल, बोलू दे त्यांना! मला स्वतःच्या घरातील कामं करायला मुळीच कमीपणा वाटत नाही."
आदित्यला माहीत होतं की, तो स्वयंपाकघरात मदत करून वर्षानुवर्षांपासून चालत आलेली ही चुकीची प्रथा आपण बदलण्याचा प्रयत्न करत आहोत. जिथे केवळ स्त्रियांनीच स्वयंपाक करावा असा अलिखित नियम होता.याचा आईला जास्त त्रास होत आहे.
पण कटू वास्तव हे होतं की, गावाकडचे पाहुणे जेव्हा बाहेर जाऊन चर्चा करतील, तेव्हा ते आर्याच्या शिक्षणाबद्दल किंवा तिच्या कर्तृत्वाबद्दल कौतुक करणार नाहीत. कारण त्यांना आर्याचं कार्यक्षेत्र माहीत नाही आणि ते समजून घेण्याची त्यांची इच्छाही नाही.
ते आपल्याच जुन्या निकषांवरून आर्याच्या वागणुकीवर आणि आदित्यच्या 'बदललेल्या' स्वभावाबद्दल बोलतील. हाच तो सामाजिक दबाव, जो स्त्रियांना मिळालेल्या स्वातंत्र्याला नेहमी संशयाच्या नजरेने पाहतो.
क्रमशः...
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
