"नात्यांमध्ये अडकलेलं स्त्री जीवन" भाग :2
"हे अती होतंय आई, अशा किरकोळ गोष्टींचा ताण आमच्या कामावर होतो. जरा विचार कर!" असे बोलून आदित्य रागातच रूममध्ये निघून गेला.
आर्या लॅपटॉपसमोर बसून मीटिंगची तयारी करत होती, पण तिच्या डोळ्यांत पाणी होते. आदित्यने ते पाहिले, तिचे डोळे पुसले आणि हळूच म्हणाला, "आर्या, शांतपणे मीटिंग कर. विसर सगळं, मग बोलू आपण." आर्याने कृतज्ञतेने आदित्यचा हात थोपटला आणि कॉल सुरू केला.
अर्धा तास नॉन-स्टॉप प्रेझेंटेशन देऊन तिने अमेरिकेचा (US) एक मोठा प्रोजेक्ट यशस्वीरीत्या मिळवला.
तिचे कौतुक झाले, पण घरच्या वातावरणाने तिचे मन विषण्ण झाले होते.
आनंदाच्या भरात आर्या किचनमध्ये गेली आणि पसारा आवरू लागली.
रेखाताई पुन्हा तिथे आल्या आणि उपरोधाने म्हणाल्या, "राहू द्या हो, तुम्हाला मोठी कामे आहेत ते करा, हे आम्हीच उरकतो!"
आर्याला प्रोजेक्ट मिळाल्याचा आनंद होताच, पण त्या आनंदावर सासूबाईंच्या टोमण्यांचे विरजण पडले होते.
तिला जाणवले की, तिला एकाच वेळी दोन लढाया लढायच्या आहेत.
एक ऑफिसमधील स्पर्धेशी आणि दुसरी घराच्या चौकटीत स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी.
तिला मिळणारे 'स्वातंत्र्य' हे आदित्यच्या पाठिंब्यावर भक्कम होते, पण ज्या दिवशी घरातील अश्या परिस्थितीमुळे हा पाठिंबा थकेल, त्या दिवशी पुन्हा ती त्याच जुन्या नात्यात अडकली जाईल का? हा प्रश्न तिला अस्वस्थ करत होता.
त्या रात्री घरात एक प्रकारची जड शांतता होती. रात्री जेव्हा रेखाताई किचनमध्ये आल्या, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे तेच जुने तणावाचे भाव कायम होते. त्यांनी पेल्याची थोडी आदळआपट केलीच आणि म्हणाल्या, "अदित्य आणि राघव तुझी बाजू घेतात म्हणून तुला वाटत असेल की तू जिंकलीस, पण लक्षात ठेव आर्या, उद्या पुन्हा ते गावाकडचे लोक विचारतील, तेव्हा मलाच उत्तरं द्यावी लागतील."
नात्यांमध्ये अडकलेलं स्त्री जीवन असेच असतं. जिथे कधी कधी बाहेरच्या जगात मोठे विजय मिळवूनही घराच्या चौकटीत मात्र पुन्हा त्याच संघर्षाला सामोरे जावे लागते.
जड अंतःकरणाने ती मागचे सगळे आवरून बेडरूम कडे वळाली.
तिला ठाऊक होतं की, 'एक बोट दुसऱ्याकडे करताना चार बोटे स्वतःकडे असतात' हे तत्त्व जोपर्यंत माणूस स्वतःहून स्वीकारत नाही, तोपर्यंत ही जनरेशन गॅप आणि नात्यांमधील अंतर कायम राहणार.
क्रमश :
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
