"नात्यांमध्ये अडकलेलं स्त्री जीवन" : भाग ४ (अंतिम भाग)
राघवजींचे शब्द हॉलमध्ये घुमत राहिले आणि रेखाताईंच्या मनात विचारांचे काहूर माजले.
आजवर त्यांनी 'लोक काय म्हणतील' या एकाच तराजूत आपल्या घराला तोलले होते. पण त्याच क्षणी त्यांना जाणीव झाली की, त्या लोकांच्या पोकळ शब्दांनी घर चालत नाही, तर आर्यासारख्या समंजस माणसांच्या कष्टाने आणि प्रेमाने चालते.
रेखाताई जड पावलांनी आर्याच्या बेडरूमकडे वळल्या. दारावर टकटक करणार एवढ्यात त्यांना दरवाजा अर्धवट उघडा दिसला. आत आर्या आणि आदित्यच्या मधला संवाद त्यांच्या कानावर पडला.
आदित्य आर्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. रेखाताई तिथेच थबकल्या आणि गुपचूप आतला संवाद ऐकू लागल्या. आदित्य आर्याचा हात हातात घेऊन हळूवार आवाजात म्हणत होता, "आर्या, आईचं बोलणं मनावर नको घेऊस गं. तिचा राग क्षणिक आहे, हे तू ओळखलं नाहीस का इतक्या दिवसात? थोड्या वेळाने ती स्वतःच शांत होईल, तू विसरून जा ते."
पण त्यावर आर्याने जे उत्तर दिले ते ऐकून रेखाताईंना अगदी लाजिरवाणे झाले. आर्या रडवेल्या स्वरात आदित्यला समजावत होती, "अरे, पण तू पण आईला असं उलट बोलायला नको होतं. त्या मोठ्या आहेत आणि शेवटी आई आहेत. त्यांचा हक्क आहे आपल्यावर रागावण्याचा. चांगल्या गोष्टीसाठीच रागावतात ना त्या! आपल्यामुळे त्यांचं मन दुखावलं गेलं, हे मला जास्त टोचतंय."
स्वतःचा अपमान झाला असूनही, सासूच्या रागाचा मान राखणारी ही सून पाहून रेखाताईंच्या डोळ्यांत टचकन पाणी आलं. त्यांना मनोमन पटलं की, "शेवटी आपलं ते आपलं असतं; बाहेरचे लोक फक्त तमाशा बघायला येतात, पण सावरणारी ही आपलीच माणसं असतात."
इतक्यात राघवजी तिथे आले आणि हसतच म्हणाले, "रेखा, आज आपल्या पोरीमुळे कंपनीला अमेरिकेतील (US) एक मोठं प्रोजेक्ट मिळालं आहे! त्याची जंगी पार्टी तर ऑफिसमध्ये तिला मिळणारच आहे, पण त्याआधी तू घरी काहीतरी गोडधोडाचं कर, म्हणजे आम्हालाही खायला मिळेल!"
राघवजींचे हे शब्द ऐकून आर्याचा चेहरा आनंदाने खुलला. ती लाडिकपणे ओरडली, "बाबा...!" आणि तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
रेखाताईंचा खोटा अहंकार आता पूर्णपणे गळून पडला होता. त्या हळूच आत गेल्या आणि त्यांनी आर्याच्या डोक्यावर मायेने हात ठेवला. सासूला अचानक समोर बघून आर्या चपापून उभी राहिली, पण रेखाताईंनी काहीही न बोलता तिला कवेत घेतलं.
"आर्या, मला माफ कर पोरी," रेखाताई गहिवरल्या, "बाहेरच्या जगाला खूश करण्याच्या नादात मी घरातल्या खऱ्या सुखाचा अपमान केला. तू फक्त सून नाहीस, तर या घराला खऱ्या अर्थाने घरपण देणारी लक्ष्मी आहेस. उद्या तुझ्या आवडीचा गोडाचा बेत मी स्वतः हाताने बनवणार!"
आदित्य आणि राघवजी हे दृश्य पाहून सुखावले. नात्यांच्या गुंतागुंतीत अडकलेलं स्त्री जीवन आज प्रेमाच्या आणि कौतुकाच्या एका नवीन मोकळ्या श्वासाने फुलून गेलं होतं.
- समाप्त -
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
