नांदा सौख्यभरे..

बाहेरच्या लोकांचे ऐकून छोटी सून सासूला बोलते, मोठी सून जावेला कसे समजावते ही सांगणारी कथा


ईरा शाॅर्ट फिल्म लघुकथा स्पर्धा-जुलै:-२०२६

शीर्षक:- नांदा सौख्यभरे

"आई, काय हो, सारख्या त्या रडारड आणि रटाळ असलेल्या मालिका पाहत बसता. कंटाळा येत नाही का हो, तुम्हाला? बंद करा पाहू तो टिव्ही आधी? जेव्हा बघावं आपलं तेच ते." मीरा वैतागून थोड्या चढ्या आवाजात सासू कमलताईंना म्हणाली.

"अगं मीरा, काय हे? कशी बोलत आहेस तू आईंशी? थोडं जीभेला लगाम दे." मीराची मोठी जाऊ शालिनी डोळे दाखवत तिला दरडावत म्हणाली.

"अगं शालू, असू दे गं. ती काही चुकीचे बोलत नाही. मलाही काही मालिका पाहायला विशेष आवडत नाही गं. पण काय करू वेळ जात नाही म्हणून आपलं पाहतेय बाई मी बापडी." तोंड बारीक करून कमलताई टिव्ही बंद करत म्हणाल्या.

त्यांचा उतरलेला चेहरा पाहून शालिनीला वाईट वाटलं. ती काही बोलणार तोच मीरा तोंड वाकडे म्हणाली,"घ्या आता तोंड पाडून बसायला काय झालं? वेळ जात नाही म्हणे, जायचं ना बाहेर थोडावेळ गप्पा मारायला. मालिका आवडतं नाही म्हणता तरी पाहता ना. माहिती आहे मला तुम्ही कशासाठी पाहता ते? आम्हा सुनांना त्रास देण्यासाठीच ना."

"अगं शांत हो मीरा, काहीही काय बोलतेस, इतकी वर्षे झाली आपल्या लग्नाला आईने आपल्याला कधीच त्रास दिला. मलातरी काही आठवत नाही. तुझ्या आधी या घरात मी आली आहे. कधीच सरकून बस म्हणाल्यात नाहीत. अगदी ताईमध्ये आणि आपल्यामध्ये कधीच दुजा भाव केला नाही. तुला तरी आठवत का गं आईंनी कधी त्रास दिलेला? हं... बोल‌ं ना!" शालिनीला मीरावरती खूप राग आला होता. तिने रागात तिला प्रश्न विचारला.

मीरा नकारार्थी मान हलवत खाली मान घालून गुपचूप उभी राहिली.

"मग इतकं कशी काय बोललीस तू आईला? आधी माफी माग त्यांची?" शालिनीने जरब आवाजात तिला माफी मागण्याची खूण केली.

शालिनीचे बोलणे ऐकून कमलताईंचे डोळे भरून आले होते.

"ताई, अहो माझ्या मैत्रिणीची सासू अशाच टिव्हीवरील मालिका पाहून तिला त्रास देत होती असे तिने मला सांगितले होते. तेव्हा मग माझ्या मनात तिच भीती बसली. म्हणून मी अशी बोलले." मीरा हाताची बोटे एकमेकांत गुंफून नरमाईने म्हणाली.

"अरे देवा! काय करू गं मी तुझं? अगं वेडे, आपल्या आईंमध्ये आणि तुझ्या मैत्रिणीच्या सासूमध्ये काहीतरी साम्य आहे का? त्यांना मी चांगली ओळखते, त्या कशा आहेत आणि आपल्या आई कशा आहेत ते? कोणीतरी सांगत आणि तू लगेच विश्वास ठेवतेस. स्वतःचं डोकं चालवता येत नाही का तुला? आता मला लक्षात येतंय की गेले काही दिवस तू आईंशी अशी का वागत आहेस ते? तू कितीही वाईट वागलीस तरी आई तुझ्याशी चांगल्याच वागत होत्या ना. हेही तुझ्या लक्षात आलं नाही का गं तुझ्या? चल माफी माग आधी त्यांची." शालिनीने आधी तिच्या बालिशपणावर हात मारून घेतला आणि नंतर तिला चांगलंच फैलावर घेतले.

"आई, मला माफ‌ करा. काही विचार न करता मी तुम्हाला काहीबाही बोलले." शालिनीच्या बोलण्याने मीराच्या डोक्यात प्रकाश पडला. तिने खाली मान घालून कमलताईंची माफी मागितली.

"अगं मीरा, असू दे, तू माफी मागू नकोस. तुझा गैरसमज झालाय. मी कधीच वाईट हेतूने टिव्ही पाहत नाही गं. तू म्हणतेस बाहेर जा गप्पा मारायला. तिथे जाऊन पाहिले मी. तिथे बाया आपल्या सासू-सूनाबद्दल कागाळी करत असतात.
मला बाई नाही आवडत ते. म्हणून मी तिकडे जात नाही." कमलताईंनी मीराला माफ करत बाहेर न जाण्याचं कारण सांगितले.

"बघितलंस मीरा, आईने किती पटकन मोठ्या मनाने तुला माफ केलं ते. आणि अजून एक त्या फक्त मालिका पाहत नाहीत, बातम्या, गाणी, कधी पिक्चर, तर कधी माहितीपट बघतात. पण जेव्हा तू पाहते तेव्हा त्या मालिका पाहताना तुला दिसतात. आई खूप चांगल्या आहेत." शालिनी तिला जवळ घेत म्हणाली.

"नाही गं पोरींनो, तुम्ही चांगल्या आहात म्हणून मी चांगली वाटते तुम्हाला." कमलताई त्या दोघींना प्रेमाने पाहत म्हणाल्या.

"नाही ओ आई, तुम्ही आम्हाला समजून घेता, छान वागता म्हणून आम्हीही चांगले वागतो." शालिनी त्यांच्या गळ्यात पडत म्हणाली.

"एकमेकांना समजून घेऊन राहिलो तर सगळं चांगले होते. मीच जर खाष्ट सासू असली तर मीरा म्हणते तशी त्या टिव्हीतल्या सासू सारखी तर तुम्हीही तशाच वागल्या असत्या ना. पण तसं तर मला काही जमणार नाही हं, मीरा." कमलताईंनी मीराकडे पाहून मिश्किल हसत म्हणाल्या.

"अहो आई, तुम्हाला या जन्मी काय सात जन्मातही तसं वागायला जमणार नाही बघा. पण मीरासाठी एकदा ट्राय करा हं. त्यात मी मदत करेन तुम्हाला." शालिनी मीराकडे पाहून डोळा मारत हसून खट्याळपणे म्हणाली.

"काय ओ ताई, चेष्टा करताय काय माझी. चुकलं माझं मान्य केलं की मी." मीरा लहान मुलीसारखं ओठ काढून म्हणाली.

"हो बाबा, आम्ही कुठे नाही म्हणतोय. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मीरा. बाहेरच्या लोकांचं ऐकून आपल्या माणसांवर विनाकारण आरोप लावू नये आणि अविश्वासही दाखवू नये. लोक काय तमाशा पाहायला तयार असतात. आपण सुखाने नांदत आहोत, हे काही लोकांना बघवत नसतं. त्यात तू आहेस हलक्या कानाची आणि भोळी म्हणून मग असं काहीतरी कोणी भरवून देतो आणि तू त्यांचं ऐकतेस." शालिनी मीराला समजावत म्हणाली.

"होय ताई, खरं आहे हे, माझ्या भोळेपणाची मला चांगलीच शिक्षा मिळाली. माझ्या सुखी संसाराची मीच माती करत होते. आईसमान सासूला उगीच दुखावले मी. आई, पुन्हा एकदा माफी मागते तुमची. माफ करा मला." मीरा आधी शालिनीला व नंतर कमलताईंच्या पायावर माथा टेकवून म्हणाली.

"अगं वेडी आहेस का, मीरा तू? उठ बरं. तुझी जागा पायात नाही गं राणी, माझ्या मनात आहे." त्या तिला गळ्यांशी लावून घेत म्हणाल्या.

"अन् माझी जागा कोठे आहे, आई?" शालिनी हनवुटीवर बोट ठेवून लटक्या रागाने विचारले.

"तुझी जागा तर मनात आधीपासूनच आहे, वेडाबाई, ये इकडे." कमलताईंनी तिला कवेत येण्यासाठी हात पुढे केले. तशी शालिनी त्यांना जाऊन बिलगली.

"ताई, मला ना आता त्या मालिकेत सासू-सुना सारखं वाटतंय.‌ अं...काय बरं..हा आठवले.. नांदू सुख बरे." मीरा आधी खुदकन हसत व नंतर वरती डोळे घेत आठवत म्हणाली.

"ए बावळट, ते नांदा सौख्यभरे असतं." शालिनी तिला करेक्ट म्हणाली.

"हा तेच ते.." मीरा हसून म्हणाली.

"म्हणजे मीरा तुही मालिका पाहतेस ना?" कमरेवर हात ठेवून भुवया आकसून घेत तिच्याकडे रोखून पाहत शालिनीने तिला विचारले.

जीभ दाताखाली धरत डोकं खाजवत मीरा हलकेच हसली.

तशा शालिनी आणि कमलताईही मोठ्याने हसू लागल्या.

समाप्त-

बाहेरच्या लोकांचे ऐकून घरातल्या माणसांवर आरोप लावून अविश्वास दाखवू नये.

©️ जयश्री शिंदे (रत्नश्री)


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →