नणंदचा हक्क भाग १
@लघुकथा
©® आरती पाटील - घाडीगावकर
" वहिनी हे पैंजण मी ठेवते. मला खूप आवडले आहेत. " असं म्हणत सोनाली कविताचे पैंजण घेऊन जाणार, तोच कविताने सोनालीचा हात पकडला.
" थांबा ताई, हे पैंजण मला ह्यांनी वाढदिवसानिमित्त दिले होते. त्यामुळे ते नका नेऊ. " कविता पैंजण सोनालीच्या हातातून परत घेत म्हणाली.
" मग काय झालं ? शेवटी आहे तर तो माझा भाऊच ना ? त्याने दिलेल्या गोष्टींवर माझा पाहिला हक्क आहे. " सोनाली आपला हेका सोडायला तयार नव्हती.
" ताई ह्यांनी नवरा म्हणून मला हे गिफ्ट दिलं आहे. त्यावर तुमचा हक्क नाही. आणि आता तर मी अजिबात देणार नाही. " असं म्हणत कविताने पैंजण घेऊन कपाटात ठेवले. ते पाहून सोनालीला खूप राग आला.
ती रागाने आपल्या आईकडे म्हणजेच रेवतीबाईंकडे गेली आणि सर्व सांगितलं. रागाने लाल झालेल्या रेवतीबाई रागातच कविताच्या रूममध्ये गेल्या.
" तुझी हिम्मतच कशी झाली माझ्या लेकीला एखादी गोष्ट नाही म्हणायची ? " रेवतीबाई रागाने कविताला म्हणाल्या.
" आई, ह्यांनी प्रेमाने दिलेली गोष्ट मी कशी देऊ ? त्यात नवरा बायकोच प्रेम आहे. किमान तुम्ही तरी समजून घ्या. याआधी सुद्धा कितीतरी गोष्टी ताईंनी घेतल्या आहेत. ज्या कधीच परत केल्या नाहीत. " कविता आपली बाजू समजावत म्हणाली.
" या गोष्टी तू मला नको समजावूस. आणि नणंदचा मान असतो. तिचं मन कधीच दुखवायचं नसतं. माहेरच्यांनी या गोष्टी शिकवल्या नाहीत वाटत. " रेवतीबाई.
" आई पण.... " कविता काही बोलणार तोच रेवतीबाई पुन्हा गरजल्या, " दे म्हणाले ना ? दे लगेच. "
कविताने नाईलाजाने सोनालीला पैंजण दिले. पण कविता या प्रकारामुळे खूप नाराज झाली. तिच्या मनात सासूबाई आणि नणंद विषयी अढी निर्माण झाली. याआधी सुद्धा सोनालीने वस्तू घेतल्या होत्या. कविताने जास्त विचार न करता दिल्या ही होत्या. पण आज जे झालं त्यामुळे तिला धक्का बसला होता. अविनाश आणि कविताच्या लग्नाला वर्ष झालं होत. पण या वर्षभरात सोनालीने कविताला खूप त्रास दिला होता. छोटी नणंद म्हणून कविता समजून घेत होती पण आता हे जास्त होत होता.
संध्याकाळी अविनाश आल्यावर तिने सर्व प्रकार त्याच्या कानावर घातला. त्यावर अविनाश म्हणाला, " कविता यार, छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या करत जाऊ नकोस. तुला मी नवीन आणून देईन. "
" अविनाश, तुला काय वाटत ? मी नवीन घेऊ शकत नाही का ? जॉब करते मी सुद्धा विसरलास की काय ? पण त्यात तुझं प्रेम आहे म्हणून मी देत नव्हते. पण कदाचित मी चुकीची होते. एखादी वस्तू दिली म्हणजे प्रेम असेलच असं नाही ना. असो.. यापुढे मला तुझ्याकडून काहीच नकोय. समजलं मला जे समजायचं होत ते. "
त्यानंतर कविता घरातल्या लोकांशी जेवढ्यास तेवढं वागायला लागली. अविनाशने तिचा राग जावा म्हणून तिच्यासाठी एक सुंदर साडी आणली आणि तिच्या हातात ठेवली. कविता ती साडी घेऊन तडक सासू आणि नणंद कडे गेली आणि सासूबाईंच्या हातात साडी ठेवत म्हणाली, " ही साडी ह्यांनी आणली आहे. ज्यात प्रेम नाही. आज ना उद्या ही सुद्धा तुम्ही घेणारच. त्यापेक्षा आताच ठेवा. आणि अविनाश यापुढे माझ्यासाठी काहीही आणायचं नाही. हे शेवटचं. तसही जो नवरा आपल्या बायकोची बाजू ती बरोबर असताना सुद्धा घेऊ शकत नसेल, तर कशाला मला वाईट वाटेल असं वागतोय ? तू एखादी गोष्ट माझ्यासाठी आणणार, ती ताई किंवा आई नेणार, मला वाईट वाटणार. त्यापेक्षा ही फालतुगिरीच नको. तुम्हांला यांना जे द्यायचं आहे ते डायरेक्ट देत जा. मी मध्ये नको. " असं बोलून ती तिथून गेली.
" मोठी आली तोरा दाखवणारी. नाही घेणार तर नको घेऊस. माझ्या मुलाच्या आयुष्यात आई आणि बहीण आधी नंतर तू." असं म्हणत रेवतीबाईंनी नाक मुरडलं. आणि सोनालीने सुद्धा साडी आपल्या कपाटात ठेवून दिली.
अविनाशला वाईट वाटलं. पण जे झालं त्याला तो सुद्धा कुठेतरी जबाबदार होताच.
क्रमश :
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा