आपल्याच घरात सर्वांनी वहिनीची बाजू घेतलेली पाहून अंबिकाचा अहंकार दुखावला आणि ती रागाने पाय आपटत तडक निघून गेली.
पुढे...
भाग 3
अंबिका डोळ्यात राग आणि अपमानाची भावना घेऊन आपल्या सासरी पोहोचली. घरात येताच तिने संतापाने सामान फेकले आणि रडत रडत सोफ्यावर बसली.
तिचा नवरा, सुरेश, सुशिक्षित, अत्यंत समंजस आणि शांत स्वभावाचा होता. त्याने अंबिकाला रडताना पाहून पाणी दिले आणि शांतपणे विचारले, "काय झाले अंबिका?
माहेरहून एवढ्या रागात का आलीस? काही गडबड झाली का?"
अंबिकाने फणकाऱ्याने घडलेला सर्व प्रकार सांगितला. "बघा ना, त्या किरणने मला माझ्याच आई-वडिलांसमोर काय काय सुनावले!
अंबिकाने फणकाऱ्याने घडलेला सर्व प्रकार सांगितला. "बघा ना, त्या किरणने मला माझ्याच आई-वडिलांसमोर काय काय सुनावले!
आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे आई-बाबा आणि सागरही तिच्याच बाजूने बोलले. माझं माहेर आता माझं राहिलंच नाही. सगळ्यांनी मिळून माझा अपमान केला."
सुरेशने संपूर्ण गोष्ट शांतपणे ऐकून घेतली. तो काही वेळ शांत बसला आणि मग अतिशय संयमाने म्हणाला, "अंबिका, मला एक प्रामाणिक उत्तर दे.
जर माझ्या बहिणीने—म्हणजे तुझ्या नणंदेने—आपल्या घरात रोज येऊन तुझ्या स्वयंपाकात चुका काढल्या, तू कोणते कपडे घ्यावे, मी तुला कुठे घेऊन जावे, आपल्या घराची रचना कशी असावी यात सतत ढवळाढवळ केली, तर तुला चालेल का?"
अंबिका अचानक स्तब्ध झाली. सुरेश पुढे म्हणाला, "तुला जसं तुझं हे घर स्वतःच्या हाताने सजवायला आवडतं, तसाच किरणलाही तिच्या सासरच्या घराबद्दल निर्णय घेण्याचा पूर्ण हक्क आहे.
तू लग्नानंतर या घराची सून झालीस, तशी ती त्या घराची सून आहे.
तुला जर तुझ्या संसारात दुसऱ्या कोणाचा हस्तक्षेप चालत नाही, तर तू तरी तिच्या संसारात का ढवळाढवळ करावीस?
तू माहेरची लेक आहेस, तिथे प्रेमाने जावंस, मालकीण बनून दुसऱ्यांवर हुकमत गाजवायला नाही."
अंबिका आधी चिडली, "म्हणजे तुम्हीही मलाच बोलणार का? तुम्ही तर माझे नवरा आहात ना!"
सुरेश हसला आणि म्हणाला, "मी तुझा नवरा आहे म्हणूनच तुला खरी गोष्ट सांगतोय. स्वाभिमान आणि अहंकार यातला फरक समजून घे."
सुरेश हसला आणि म्हणाला, "मी तुझा नवरा आहे म्हणूनच तुला खरी गोष्ट सांगतोय. स्वाभिमान आणि अहंकार यातला फरक समजून घे."
सुरेश कामाला निघून गेला, पण त्याचे शब्द अंबिकाच्या मनात घर करून राहिले. दिवस सगळं राग राग करण्यात गेलास पण संपूर्ण रात्र ती विचार करत राहिली. शांत डोक्याने विचार केल्यावर तिला स्वतःची चूक स्पष्ट दिसू लागली.
तिला जाणवले की माहेरच्या प्रेमाच्या नावाखाली ती नकळत भावाच्या सुखी संसारात विष कालवत होती आणि किरणचा स्वाभिमान दुखावत होती. पश्चात्तापाने तिचे डोळे पाणावले.
