Login

नाती सांभाळताना: भाग तीन (अंतिम)

नात्यांचे सुरेख गुंफण असलेली कौटुंबिक कथा
मागच्या भागात आपण पाहिलं कि समीरने आज सईची बाजू घरच्यांसमोर मांडली होती. त्यावरून घरात उलटसुलट चर्चा आणि वादविवाद सूरु होते. खरंतर सईला समजून घेण्यापेक्षा सगळे तिच्यावरचं रागावले होते. समीर त्याचं म्हणणं पटवून देऊ शकेल का? सुवर्णमध्य निघेल कि भांडण टोक गाठेल... बघूया ह्या भागात.


"हे बाकी बरोबर बोललास सम्या. सुनबाई आल्या दिवसापासून घराची जबाबदारी चोख संभाळते आहे. मला अभिमान वाटतो पोरीचा." एवढा वेळ शांत असलेले अण्णा बोलले. सईला मनोमन खूप बरं वाटलं. ह्या घरात आपल्यालाही समजून घेणारं कोणीतरी आहे हे पाहून ती ह्याही परिस्थितीत सुखावली.
सासूबाईंना मात्र अण्णांचा राग आलेला स्पष्ट दिसत होतं. त्या बोलल्या नाहीत पण त्यांच्या चेहऱ्यावरच्या रेषा चांगल्याचं ताणल्या गेल्या होत्या.
"फक्त घरातली म्हणजे स्वयंपाकची कामं नाही तर सगळ्यांच्या कपड्यांना इस्त्री करणं, बाजारहाट करणं, स्वस्त कुठे काय मिळेल ते हुडकुन काढून आपण मिळवलेल्या पैशाची बचत करणं, घरातल्या सगळ्या गोष्टींचा हिशोब ठेवणं, अगदी सांगायचं झालं तर कपड्यांच्या टबाच्या कडेवर साबणाचं वर्तुळ नं साठू देणं हेही कामचं म्हणावं की. कोणाच्या लक्षात सुद्धा येणार नाही अशी अनेक कामं ती हातावेगळी करते.झालंच तर आई अण्णांकडे चिमुकल्या जीवाला सांभाळून लक्ष देणं, त्यांच्या पथ्यपाणी औषधाच्या वेळा जपणं, छोट्या छोट्या वैद्यकीय अडचणी निपटण ते तर नित्याचं आहे. पण तुम्हाला वाटत ती घरीच तर आहे काय काम करते. आईच्या केसाला मेहंदी लावून देणं, घराची स्वछता ठेवणं, संडास बाथरूम पासून सगळं लखलखीत ठेवणं, सगळ्यांच्या आवडीनिवडी जपून रांधून वाढणं, हॅंगरवर कपडे लावून जागच्याजागी ठेवणं, सगळ्यात महत्वाचं सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य कायम ठेवणं, सिलेंडर संपल्यावर तो नोंदवून त्याची डिलिव्हरी घेऊन तो लावणं, अशी एक ना शंभर कामं ती रोज नं चुकता करतेय. गेले कित्येक दिवस. पण आज तिला उठायला जरा उशीर काय झाला आणि तुम्ही लगेच नाराज झालात. ती पण मनुष्य आहे विसर पडला आहे तुम्हाला." समीर बोलून थकला.
सईच्या डोळ्यात आता समीर विषयी अधिक प्रेम झळकत होतं. जो आपल्या आयुष्याचा सेंटर पॉईंट आहे त्या व्यक्तीला आपली किती कदर आहे ते पाहून ती सुखावली. बाकी पण सगळ्यांना कमीपणा वाटू लागला होता. दोघीमध्ये दुजाभाव केल्याचं दुःख पहिल्यांदाच सासूबाईंच्या चेहऱ्यावर दिसत होतं. वातावरण हलकं व्हावं म्हणून शेवटी मनीष म्हणाला..
"दादा तुझं म्हणणं पटलं आम्हाला. आम्ही वहिनीला गृहीत धरत गेलो. पण इथून पुढे असं होणार नाही. पुढच्या आठवड्यात वहिनीचा वाढदिवस आहे मी त्यावेळी तिला वर्षभराची योगा कलासची मेम्बर्शीप गिफ्ट म्हणून द्यायचं ठरवलं आहे. म्हणजे निदान आठवड्यातून तीन ते चार दिवस तरी साधारण तासभर वहिनीला वेगळ्या विश्वात रमायला मिळेल. आणि त्या वेळात आपण सगळे मिळून सांभाळू पिल्लूला. काय वहिनी आवडेल ना तुला?" मनीष ने सईकडे पाहत विचारले.
"अहो भाऊजी ह्याची काय गरज. उगीच माझ्यासाठी वेगळं काही खर्चिक करू नका. तुम्ही हे बोललात त्यातचं भरून पावले मी." सई आनंदात म्हणाली.
"आई वहिनी तुम्हाला वाईट वाटलं असेल मी बोललो त्याचं. पण त्याची खरंच गरजचं होती. कारण ती राबत होती आणि दुर्दैवाने कोणाला त्या गोष्टीचं काही पडलं नव्हतं. मला सईचं अस्तित्व जाणवून द्यायचं होतं. तिच्याशिवाय आपण अपूर्ण आहोत त्याची जाणीव तुम्हांला करून द्यायची होती. मला अगदी मान्य आहे ती ऑफिसला जात नाही, रेल्वे बस चा प्रवास रोज करत नाही, टायपिंग करत नाही, बॉसची बोलणीही ऐकत नाही, थोडक्यात काय तर वहिनीसारखं काम ती नक्कीचं करत नाही पण घरचं करणं हे महत्वाचं काम आहे ना. सुरुवातीला तीही नोकरी करायचीचं की पण आई अण्णांसाठी आणि आपल्या पिल्लूसाठी ती तिने सोडली. सध्या ती फक्त घर चालवणारी स्त्री आहे. रोज स्ट्रगल करणारी नवमाता आहे. कदाचित पिल्लू मोठं झाल्यावर ती परत कामावर रुजू होईलही पण तोपर्येंत?" असं बोलून समीर सोफ्यावर विसावला.
"सॉरी वहिनी मी असा विचार केलाच नाही. मी फक्त तुम्हाला गृहीत धरलं. इथून पुढे मात्र हि चूक होणार नाही. मला जमेल तसा तुम्हाला मी कामात हातभार लावेन. चुका झाल्या तर त्यातून मला शिकायला मिळेल. तुमची धाकटी बहीण म्हणून माफ करा." सोनाली अगदी वरमली होती. तिची चूक तिला समजली होती. तिच्या डोळ्यात आसवांनी गर्दी केली होती. पुढे होऊन सईने तिला मिठीत घेतलं.
"आज पासून आपण जावाजावा नाही तर बहिणी झालो. पूस बरं डोळे. "नाती सांभाळायची म्हणजे हे सारं होणारचं" फक्त मनमोकळं होता आलं पाहिजे." म्हणत सईने सोनालीच्या डोक्यावरून हात फिरवला. इकडे सासूबाईंनासुद्धा गहिवरून आलं होतं. दोघी सुना त्यांच्या कुशीत शिरल्या. सासूबाईही मायेच्या हातांनी त्यांना गोंजरत होत्या.
अवघडलेपण कधीच दूर सरलं होतं. नात्यांच्या सुंदर गुंफणीत हसणारं ते घरकुल कात टाकून पुन्हा चमकू लागलं होतं. सईने समाधानाने समीरकडे पाहिलं. तो तिच्याकडेचं पुर्णत्वाने पाहत होता.

संपूर्ण.

©️®️सायली पराड कुलकर्णी
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →