नाळ..

गावाशी, तिच्या मातीशी आणि गावातील माणसांशी जोडलेली नाळ कधीच तुटत नाही हे सांगणारी शॉर्ट फिल्म


ईरा शाॅर्ट फिल्म स्पर्धा-जुलै:-२०२६

शीर्षक:- नाळ

दृश्य:-१

स्थळ:- गावातील एका रस्त्यावर लहानपणीच्या जीवलग मैत्रिणी मिताली आणि गौरी भेटतात.

गौरी:- (गाल फुगवून) बया, कवाधरन तुम्हास्नी बघातिया. पर तुम्ही हाय की, त्यांच्या संगट बोलत हुता. तुमचं तर ध्यानबी नव्हतं आमच्याकडं. आता काय बाया, म्या कमी शिकलेली, गावंढळ भाषा बोलणारी, तुम्हास्नी कशी चाललं, नव्हं?

मिताली:-(तिच्यासारखं नाटकी अंदाजात हाताची घडी घालून सूर लावत) आवं गौराबाय, आम्हास्नी थोडं बोलू द्याल की न्हाय की तुम्हीच बोलत राहणार हायसा. कवाधरन आम्हीबी बोलाया बघतुया, पर तुम्ही हाय की तुमच्या ह्यो तोंडाचा पट्टा त्या पिठाच्या चक्कीवानी धाडधाड चालूच ठेवलं हायसा. अन् मग तुम्हीच असं बोलतासा व्हय, शोभत का तुम्हास्नी आं?

गौरी:-(तोंडाचा फुगा करून) जा बया, तू मला चिडवत हायस ना? बघ, पुन्यांदा माझ्यावानी बोलून म्या गावंढळ, गावठी हाय दावून देतीयसा की. समद कळतं मला...हुं!

गौरी नाकही मुरडते.

मिताली:-(तिचे फुगलेले गाल ओढत हसत) अगं माझी राणी, तुला नाही चिडवल मी. उलट असे बोलण्याने माझी या मातीशी आणि तुझ्याशी नाळ किती घट्ट जुळली हे सांगायचं होतं मला. अगं वेडे, अशा गावरान भाषेत बोलण्याने जी आपुलकी, जो गोडवा आहे ना तो मला खूप भावतो. लय भारी वाटतं असं बोलायला.

गौरी:-(भुवया उंचावत बोट नाचवत आनंदाने) खरंच नव्हं?

मिताली:- (तिला कवेत घेत भावूक होऊन) हो गं बाई, अगदी खरं! मी कितीही शिकून मोठी होऊ दे. पण आपलं गावं, ही गावातील माती, गावाकडची भाषा, इथली मायेची आपुलकीची माणसं आणि खास करून तुला मी कधीच विसरणार नाही.

गौरी:-(तिला मिठीत घेत) व्हयं, गावं, गावातील माणसं अन् भाषा अशीच असत्याती नव्हं मनाला जोडणारी, कायम मनात घर करून राहणारी.

मिताली:- (हळव्या सुरात)अगदी बरोबर, बोललीस बघ तू, गौरी. गावातल्या मातीची सर तिथे शहाराला येत नाही बघ.

गौरी:-(तिचे हात हातात घेत) म्हणूनश्यान तर म्या हे गाव सोडलं न्हाई अन् कवा सोडणारबी न्हाई.

मिताली:- (मिश्किल स्वरात हसत) अग्ग बाई, खरंच काय? पर लग्न झाल्यावर तर तुला हे गावं सोडून जावं लागेलच ना.

गौरी:-(लाजून) हट्! चावट कुठली! लगीन झाल्यावरबी म्या इथंच राहणार हाय.

मिताली:-(प्रश्नार्थक भुयवा उंचावत हनवुटीवर बोट ठेवत) ते कसं बरं?

गौरी:-(डोळा मारत मिश्किलपणे) इथल्याच पोरीशी लगीन करून.

मिताली:-(आश्चर्याने) काय सांगतेस काय! तुझं लग्न ठरलं पण?

गौरी:-(लाजून खाली मान घालत) व्हय, बोलणी चालू हाय.

मिताली:-(कडकडून मिठी मारत) लय भारी! म्या तर लय नाचणार तुझ्या लग्नात.

गौरी ओंजळीत चेहरा घेऊन लाजते आणि मिताली तिच्याभोवती फिरत नाचू लागते.

नंतर दोघीही हसत-हसत रस्त्याने पुढे निघतात. चालता चालता गौरी खाली वाकून मातीची चिमूट उचलते. मितालीही ती माती कपाळाला लावते. दोघी एकमेकींकडे बघून हसतात.

समाप्त-

कितीही मोठं झालं तरी आपलं गाव, आपली भाषा आणि आपल्या मातीशी जुळणारी नाळ कधीच तुटू देऊ नये.

©️ जयश्री शिंदे


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →