Login

माझी माणसं? भाग 1

गोष्ट अधुऱ्या संसाराची
"माझ्या घरच्या माणसांना जाब विचारायचा नाही. त्यांच्या चुका काढायच्या नाहीत आणि महत्त्वाचं म्हणजे, त्यांना उलट उत्तर द्यायचं नाही." छाया ताई आपल्या सुनेवर ओरडल्या.

"माझ्या घरची माणसं म्हणजे? आई, काय बोलताय हे? हे घर माझा नाहीये? या घरातली माणसं माझी नाहीयत?" बोलताना प्रणालीचा आवाज कापत होता.

"तू या घराला आपलं मानलं असतंस तर आज माझ्या नवऱ्याला जाब विचारायची तुझी हिम्मत झाली नसती." छाया ताईंचा आवाज आणखीन वाढला.

"मी काय केलं संजय? सकाळी जाताना मी लाईट बिलाचे पैसे बाबांकडे देऊन गेले होते. ते भरलं की नाही, एवढंच विचारलं मी. यात माझं काय चुकलं?" प्रणाली आपल्या नवऱ्याकडे बघून म्हणाली. तशी त्याने आपली नजर खाली वळवली.

"तो काय बोलणार? तू चुकलीस आणि त्यालाच काय विचारतेस? मी काय केलंय म्हणून!" ताई.

"बाबा, निदान तुम्ही तरी बोला. हे असं उठसूट सुनेला बोल लावणं बरं दिसतं? या घरात आल्यापासून बघते मी, इतरांनी चुका केल्या तरी त्या माझ्याच माथी मारल्या जातात. मी नक्की कुठे कमी पडते, हे तरी सांगा. घरचं सगळं आवरून नोकरीला जाते. ऑफिसमध्ये जीव तोडून काम करते. आल्यावरही घरची काम सुटत नाहीत."
प्रणाली रडत होती. तरी अप्पा शांत होते. घरात वादाचे प्रसंग आले की ते शांत बसत. कोणाची बाजू घेत नसत. त्या मागचं खरं कारण हे होतं की, छाया ताईंपुढे त्यांच्या शब्दाला किंमत नव्हती.

"मग काही जगावेगळं करत नाहीस. आजकाल जवळपास सगळ्या बायका हेच करतात. याचा इतका माज तर आपल्या माहेरी निघून जायचं. आम्हाला फरक पडत नाही." ताई.
यावेळी प्रणाली खरंच सामान भरून माहेरी निघून गेली. तिच्या मागून जाणाऱ्या संजयला छाया ताईंनी अडवलं.
"बायको मागे गेलास तर या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद होतील." हे ऐकून संजयची पावलं आपसूकच मागे वळली.

"अरे, माहेरी किती दिवस राहील ती? कुठंही गेली तरी फिरून पुन्हा इथंच जायचंय तिला." ताई तोऱ्यात म्हणाल्या. आपली सून मागच्या वेळेसारखी आठवड्याभरात पुन्हा घरात येईल अशी त्यांची समजूत झाली.

आठाचे पंधरा दिवस झाले. केलेले फोन प्रणाली उचलत नव्हती. आता मात्र संजयला बायकोची आठवण यायला लागली. तिची अनुपस्थिती घरात जाणवायला लागली.
वयानुसार ताईंचे हात -पाय भरभर काम करत नव्हते. पंधरा दिवस त्यांनी कढ काढली. आता मात्र त्यांना सुनेची आठवण यायला लागली. "संजय, जाऊन तुझ्या बायकोला घेऊन ये. मी रागाच्या भरात बोलून गेले खरी. पण माझा हातून घरची कामं होत नाहीत रे." ताईंनी आपल्या मुलासमोर ठेवणीतला सूर काढला.

"आई, तुला तुझ्या रागावर नियंत्रण ठेवायलाच हवं. हल्ली साधा साध्या गोष्टी तुझ्या मनाला लागतात. असो, तू काळजी करू नको. मी आजच जाऊन प्रणालीला घेऊन येतो."
संजय प्रणालीच्या ऑफिसमध्ये पोहोचला. तिच्या वागण्यातला, दिसण्यातला बदल त्याला सुखावून गेला. "आईने घरी बोलावलं आहे."

"यावेळी मी घरी येणार नाहीय संजय. गेली चार वर्षे मी हेच सहन करत आले. तुझ्या आईने मला आपलं मानलं असतं तर अशा किरकोळ गोष्टींसाठी त्या माझ्यावर चिडल्या नसत्या. त्या घरासाठी मी काय केलं नाही? माझा स्वभाव बदलला. तुमच्या आवडी -निवडी जपण्याचा प्रयत्न केला. आई-बाबांच्या स्वभावाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला.
सून म्हणून 'सासूचा त्रास ' सहन केला. या साऱ्यांत तू माझ्यासाठी कधी उभा राहिलास? बायको म्हणून तू माझी किंमत ठेवली असतीस तर त्यांनीही सून म्हणून माझी किंमत ठेवली असती. किमान "

"प्रत्येकाच्या घरात हेच असतं. मग आपलं घर इतरांहून वेगळं आहे की काय?" संजय हसत म्हणाला.

"मी पुढच्या तीन वर्षांसाठी परदेशी जातेय आणि ही संधी मी सोडणार नाहीय. कारण यासाठी मी किती मेहनत केली आहे ते तुला चांगलंच माहितीय." प्रणाली त्याचा अंदाज घेत म्हणाली.

"आईला विचारलंस?" संजय.

"माझे आई -बाबा यासाठी तयार आहेत आणि तुझ्या आईचं म्हणशील तर त्यांनी मला घरातून बाहेर व्हायला सांगितलं असताना मी त्यांना परवानगी विचारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही." प्रणाली ठामपणे म्हणाली.
"मला वाटतं तू ही पुढच्या सहा महिन्यात तिकडे यावंस."
हे ऐकताच संजयच्या डोळ्यात उत्साह चमकला. पण काही क्षणातच तो मावळला.


क्रमशः
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →