ईरा शॉर्टफिल्म लेखन स्पर्धा -
मुलांचे भविष्य अंधारात
“भारतीऽऽऽ, ए भारती…अगं आवरलं की नाही अजून? चल की जाऊ; पोरं शाळेत सोडायची की नाही आज तरी.” असे म्हणत कल्पना भारतीसोबत फोन वरून बोलत होती.
भारतीनेही तिची काम उरकली होती आणि आपल्या मुलाची शाळेला जायची तयारी करून तीही घराबाहेर निघण्याच्या तयारीतच होती. फोन हातात घेत ती कल्पनाला म्हणाली, “अगं ये ना निघून; माझे झालेय, आता तुलाच फोन करणार होते.”
“बरं बरं निघतेच मी”, असे म्हणत कल्पना आपल्या मुलाला घेऊन शाळेत सोडवण्यासाठी घराबाहेर पडली.
कल्पना आणि भारती या दोघी दोन तीन मिनिटांच्या अंतरावर राहत होत्या. त्यांची मुले एकाच वर्गात शिकत होते त्यामुळे मुलांना शाळेत ने - आण करताना त्यांची आणि त्यांच्या मुलांची चांगलीच गट्टी जमली होती. दोघींची मुले जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकायला होती. शाळा गावापासून एक किलोमीटर अंतरावर असल्यामुळे मुलांना त्या स्वतः शाळेत ने -आण करत असे.
घरातून बाहेर पडल्यावर थोड्या अंतरावर दोघींची रस्त्यावर भेट झाली तिथून पुढे त्या दोघी आणि त्यांची मुले एकत्र शाळेकडे निघाले.
घरातून बाहेर पडल्यावर थोड्या अंतरावर दोघींची रस्त्यावर भेट झाली तिथून पुढे त्या दोघी आणि त्यांची मुले एकत्र शाळेकडे निघाले.
चालता चालता भारती कल्पनाला म्हणाली, “काय बाई म्हणावं आता! इतकी धावपळ करायची, सगळं वेळेत आवरायचं आणि मुलांना शाळेत आणून सोडायचं पण शाळेत गेल्यावर पहावं तर काय; वर्गशिक्षकच दिवसभर वर्गावर नाहीत.मुलांच्या अभ्यासाचे आणि शिक्षणाचे काय?”
पटकन कल्पना म्हणाली, “हो की गं! अगदी बरोबर बोललीस.”
अनेक प्रश्नांनी अनुत्तरित भारती असणारी म्हणाली, “सर सांगत होते की ‘शासनाचे जे काम आहे ते करणे शिक्षकांना बंधनकारक आहे. आमचा नाईलाज आहे. मनात असूनही आम्ही मुलांना शिकवू शकत नाही.’ आता यावर आपण पालकांनी तरी काय करावं बरं?”
भारतीच्या बोलण्याला सहमती दर्शवत कल्पना म्हणाली, “खरंच आहे बाई तुझं; अजून महिनाभर तरी वर्गावर वर्गशिक्षक नसणार आहेत; पण यामुळे मुलाचं किती नुकसान होतंय हे शासनाला कधी समजणार काय माहित?”
“हो ना गं; सर तरी काय करणार? शासनाने सक्तीने मतदानाचे काम शिक्षकांनी पार पडायचे असा आदेश दिल्यावर ते तरी काय करणार म्हणा; पण यामुळे आपल्या मुलांचे किती नुकसान होते. महिन्याभराचा अभ्यास बुडतोय. अभ्यासक्रम मागे राहतोय; शिवाय मुलांकडे दुर्लक्ष होतेय ते वेगळंच.” भारती मुलांच्या काळजीपोटी पोट तिडकीने बोलत होती.
कल्पना म्हणाली, “बघ ना गं! जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकांवर मुलांना शिकविण्याशिवाय शासनाची इतर कामं सोपवली जातात त्यामुळे मुलांचे जे नुकसान होते ते कुणाच्याही लक्षात का येऊ नये बरं? तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांकडे कमी दर्जाचे शिक्षण असते असे हिणवून काही लोकं इंग्लिश शाळेकडे जास्त ओढ घेत आहेत आणि त्यात भर म्हणजे जर शिक्षक शाळेत हजर राहू शकले नाहीत तर मग लोकं तर अजूनच शाळांना नावे ठेवणार ना.”
भारती म्हणाली, “मराठी शाळेला का बरं कमी लेखायचे? कोण म्हणतं की मराठी शाळा कमी दर्जाची असते! आपल्या शाळेतील शिक्षक किती छान शिकवतात मुलांना. वेगवेगळे उपक्रम राबवतात, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय स्पर्धा असतात त्यात आपल्या शाळेतील मुले नेहमी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतात."
कल्पना म्हणाली, "हो ना… त्यासाठी आपल्या शिक्षकांचे खरंच कौतुक वाटते. पण त्यांना जर मुलांना शिकवायला वेळच नाही मिळाला तर मात्र अवघड आहे."
भारती चिंताग्रस्त मनाने म्हणाली, “शिक्षकांना आणि मुलांना त्यांची गुणवत्ता दाखविण्यासाठी पूर्ण वेळ एकमेकांसाठी देणे खूप गरजे आहे. पण आपलं बोलणं शासनाला कधी पटणार? त्यांच्यामुळे फक्त आपल्याच मुलांचे नाही तर जिल्हा परिषदेच्या सर्व शाळेतील मुलांचे नुकसान होत आहे. आमच्या मुलांच विचार करणार तरी कोण?”
हताशपणे कल्पना म्हणाली, “सरकारच्या या असल्या वागण्यामुळे काही लोकं आपल्या मुलांना मराठी शाळेत न घालता इंग्लिश शाळेत घालायला लागले आहेत.”
निराशेच्या स्वरात भारती म्हणाली, “हो ना गं प्रत्येक पालकाला आपल्या मुलांचे भविष्य चांगले उज्वल व्हावे असेच वाटत असते पण हे सरकार मुलांचे भविष्य अंधारात लोटत आहे.”
कल्पना म्हणाली, “सध्याचे हेच वास्तव आहे आणि ते खूपच वाईट आहे. येणाऱ्या पिढीचे नुकसान उघड्या डोळ्यांनी पाहावे लागते त्यामुळे जीव नुसता तुटतोय बघ; असं कुठवर चालणार काय माहित? सरकार मराठी शाळेच्या मुलांची आणि मुलांच्या भविष्याची दखल घेणार आहे हा एक अनुत्तरित प्रश्न आहे ना.”
कल्पनाच्या बोलण्याला दुजोरा देत भारती म्हणाली, " हो ना गं, कधी सरकारला लक्षात येतेय आणि शिक्षकांना फक्त मुलांना शिकवून मुलांचे उज्ज्वल भविष्य घडविण्याकडे जास्त लक्ष देण्यासाठी प्रयत्न केला जातोय काय माहित."
बोलता बोलता ते शाळेत पोहोचले. निराश मनाने मुलं शाळेत सोडून त्या दोघी परत घराच्या दिशेने माघारी फिरल्या.
—----------------
—----------------
©® सौ. वनिता गणेश शिंदे
