Login

मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा...

आपल्या बालमित्राची अंत्यविधी पार पाडून सगळे मित्र त्यांच्या कट्ट्यावर शोक सभा करत होते पण त्या शोक सभेत झाला असा खुलासा की सगळेच हैराण झाले.
लघुकथा लेखन स्पर्धा एप्रिल 2026

विषय- मुखवट्यामागची नाती

शीर्षक- मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा...


आपल्या बालमित्राची अंत्यविधी पार पाडून सगळे मित्र त्यांच्या नेहमीच्या कट्ट्यावर बसले होते. तेवढ्यात त्यांच्यापैकी एक बोलला...

"खूप वाईट झालं यार..." रमेशच्या आवाजात औदासीन्य होते.

"हो ना..." सगळ्याच मित्रांनी रमेशच्या वाक्याला दुजोरा दिला.

"ठणठणीत होता सुधाकर... पण असा कसा अचानक सोडून गेला तो, काहीच कळेना... पंधरा दिवसाआधी माझ्या क्लिनिकमध्ये मंथली चेकअपला आला होता तेव्हाही अगदी हसतमुखच होता... त्याचे रिपोर्ट्सही नॉर्मलच होते." दिग्विजय बोलला.

"अरे, तुम्हाला सांगतो एक आठवड्यापूर्वी बोलणं झालं होतं आमचं... किती प्रसन्नतेने बोलत होता. जाणवलंही नाही की त्याला कशाचं टेन्शन असेल..." विश्वनाथ बोलला.

"खरं सांगायचं तर मीही हाच विचार करतोय, कारण आपण त्याला लहानपणापासून ओळखतो यार... आपल्याला माहितीये आपला सुधाकर कसा माणूस आहे! अगदी दिलखुलास व्यक्तिमत्त्व असणारा आपला मित्र इतक्या दबावात होता असेल असं मला काही वाटत नाही." कौस्तुभनेही त्याचे मत मांडले.

"बरोबर बोलतोयस तू... सुधाकर आयुष्यात कधी कशाला घाबरला नाही मग अशा कोणत्या संकटात तो पडला होता की त्याने आपलं आयुष्यच संपवून टाकलं?" मिलिंदने प्रश्न उपस्थित केला, तसे वातावरणात गांभीर्य पसरले.

"मलाही हाच प्रश्न पडलाय. बिचाऱ्या काकू किती रडत होत्या. वहिनीची अवस्था तर बघवतच नाही. रावी तर किती छोटीशी आहे आणि इतक्याशा वयात तिला काय काय बघावं लागतंय..." विश्वनाथचा कंठ दाटून आला; पण त्याने स्वतःला सावरले.

"मला ना संशय आहे..." रमेश चाचरत बोलला, तसे सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या.

"कसला?" कौस्तुभने भुवया एकवटून विचारले.

"मला वाटतं की सुधाकरने आत्महत्या केली नसेल. तो असं करूच शकत नाही. प्रत्येक बाबतीत सारासार विचार करणारा तो... आपल्या कुटुंबाला कायम जपणारा तो आपल्या कुटुंबाला निराधार करून जाईल, हे पटत नाहीये यार माझ्या बुद्धीला..." रमेशने त्याच्या मनातली शंका वर्तवली.

"म्हणजे तुला म्हणायचं काय आहे?" मिलिंदने थेट प्रश्न विचारला.

"नक्कीच काहीतरी गौडबंगाल आहे. हे प्रकरण दिसतं तितकं सोपं नाही. कदाचित... कदाचित त्याची हत्या करून कोणीतरी मुद्दाम आत्महत्या सिद्ध केले असेल तर?" रमेशने अंदाज बांधला तसा तिथे शुकशुकाट पसरला. सगळे एकमेकांकडे अविश्वासाने पाहू लागले.

"तसं पाहायला गेलं तर हे शक्य आहे; पण कोण करेल असं? आणि का?" दिग्विजयने ती शांतता भंग करत विचारले.

"आता तो एवढा मोठा जिल्हाधिकारी असल्यावर त्याचे शत्रू तर असतीलच ना..." रमेशने अतिशय महत्त्वपूर्ण मुद्दा छेडला.

"ह्म्म." आता सगळ्यांनीच हुंकार भरला; पण बऱ्याच वेळपासून दोन मित्र शांत होते, किशोर आणि ध्रुव.

"गप्प बसा. इथे परिस्थिती काय आणि तुम्ही काय बोलत आहात? विनाकारण सुतावरून स्वर्ग गाठू नका आणि पोलिसांनी आत्महत्या सिध्द केल्यावर तुम्ही कोण हत्या झालीये म्हणणारे? तो आपला मित्र होता, त्याच्या मरणाचं आश्चर्य आणि दुःख वाटतंय आपल्याला मान्य आहे; पण तोंडाला येईल ते बोलू नका." किशोर सगळ्यांकडे रागीट कटाक्षाने पाहत बोलला. तसे सगळेच काही वेळ शांत झाले.

"तुझं ठीक आहे किशोर; पण पोलीस तपास करत आहेत. अजून निष्कर्ष निघालेला नाही. प्रथमदर्शनी सुधाकरने आत्महत्या केली आहे, असं वाटत असलं तरी पोलीस यंत्रणा सर्व बाजूंनी विचार करत आहे." ध्रुव बोलला.

"हो रे; पण आपल्या मित्राचा खून झाला असेल अशी कल्पना करावीशी वाटत नाही मला..." किशोरचा आवाज आता थोडा सौम्य झाला होता.

"ह्म्म... पण सुधाकर आत्महत्या करणाऱ्यातला नाही, हेही तितकंच खरंय. साधारण तीन दिवसांपूर्वी मला त्याचा फोन आला होता आणि तो जरा स्ट्रेस्ड वाटत होता. शिवाय आमचं जे बोलणं झालं त्यावरून ही शंका नाकारता येत नाही की त्याने आत्महत्या केली नसून त्याचा खून झाला आहे." ध्रुवने खुलासा केला, तसे सगळ्यांचे डोळे मोठे झाले.

"काय बोलला होता तो? त्याने सांगितलं होतं का त्याच्या स्ट्रेसचं कारण?" किशोरने विचारले.

"त्यावेळी मी जरा बिझी होतो म्हणून धावतं-पळतं बोलणं झालं आमचं..." ध्रुवने सांगितले.

"हो; पण तो नेमकं काय बोलला होता? आठव बरं... कदाचित त्यावरून आपल्याला अंदाज लावता येईल की नेमकं काय सुरू होतं त्याच्या आयुष्यात..." दिग्विजय बोलला.

"तो बोलला होता की आपण कोणावर कितीही डोळे झाकून विश्वास ठेवला तरी काही लोक दगा देतातच. त्याच्याकडे एक कोणतंतरी प्रोजेक्ट आलेलं त्याविषयीच काहीतरी होतं त्याच्या मनात कदाचित..." ध्रुव बोलला.

"प्रोजेक्ट?" विश्वनाथसह सगळ्याच मित्रांना जरा आश्चर्य वाटले.

"ह्म्म. अनाथ मुलांसाठीच्या एका नवीन योजनेसंदर्भात होतं बहुतेक..." ध्रुव आठवत बोलला.

"त्याचं काय?" रमेशने कपाळावर आठ्या पाडून विचारले.

"सुधाकरचं म्हणणं होतं की त्याने खोलवर त्या योजनेचा अभ्यास केला असून ती योजना एक स्कॅम आहे आणि यात खूप मोठमोठी लोकं सामील आहेत." ध्रवने माहिती दिली.

"तुला सांगितलेलं का सुधाकरने की त्या योजनेत कोणते नामवंत लोक सामील आहेत?" किशोरने घाईतच विचारले.

"नाही ना... म्हणजे त्यासाठीच आम्ही भेटणार होतो काल... तो मला परस्पर भेटल्यावर सविस्तर सगळं सांगणार होता. तो तर हेही बोलला होता की त्यात सामील असणाऱ्या लोकांबद्दल मला कळलं तर माझा मैत्रीवरून विश्वास उडेल..." ध्रुव बोलला, तसे सगळेच विचारात पडले.

"मैत्री? म्हणजे सुधाकरचा एखादा मित्र सामील आहे त्या स्कॅममध्ये?" कौस्तुभने भुवया उंचावल्या.

"ॲंड पार्शियली सुधाकरच्या खूनातही..." मिलिंद हनुवटीवर बोट चोळत बोलला.

"पण सुधाकरचा कोणता मित्र?" कौस्तुभने प्रश्न केला.

"एक मिनिट, तो फक्त सुधाकरचा मित्र असेल तर ध्रुवचा मैत्रीवरून विश्वास उडेल असा का बोलला होता सुधाकर?" रमेशने नेमका प्रश्न विचारला.

"म्हणजे?" सगळेच आता पेचात पडले होते. मनातल्या मनात सगळ्यांनी एकच निष्कर्ष काढला होता.

"ह्म्म. तो व्यक्ती जो कोणी आहे तो फक्त सुधाकरचा मित्र नाही तर ध्रुवचाही मित्र आहे..." रमेश बोलला.

"आणि कदाचित आपलाही... कोणीतरी आहे जे मैत्रीचा मुखवटा लावून आपल्यासोबत सध्या या चर्चेतही उपस्थित आहे." विश्वनाथ गांभीर्याने बोलला तसे सगळेच एकमेकांना अविश्वासाने बघू लागले.

"म्हणजे आपल्यापैकी कोणीतरी?" मिलिंदच्या कपाळावर प्रश्नचिन्ह होते.

"कसं शक्य आहे? तुम्ही उगाच काहीही तर्क लावत आहात... तुम्ही..." किशोर कपाळाला आलेला घाम पुसत बोलला.

"किशोर..." ध्रुवने किशोरकडे रोखून बघितले.

"हं? ह्म्म..." किशोर अडखळत बोलला.

"तू पॅनिक का होतोय?" ध्रुवने विचारले.

"अरे माहितीये ना हा किती फुद्दू आहे... खून वगैरेचा विचार करूनच तो थरथरायला लागला असेल. ए पॅंट ओला तर नाही केला ना?" मिलिंद मस्करीत बोलला.

"सिच्युएशन काय आणि तुमचं काय..." विश्वनाथने डोळे फिरवले, तसा मिलिंद गप्प झाला.

"बघ ना..." किशोर हलके हसला.

"अरे शांत बसा! ध्रुवने किशोरला हाक दिली होती... त्याचं राहिलं, यांची मस्करी आणि खेचाखेचीच सुरू झाली. ध्रुव बोल तू..." रमेश बोलला, तसे आता सगळे शांत झाले.

"किशोर..." ध्रुवने परत किशोरकडे पाहिले.

"हा बोल ना..." किशोर निश्चिंतपणे उत्तरला.

"सुधाकरच्या मोबाईलमध्ये शेवटचा कॉल तुझा आहे... तर मला विचारायचं होतं की तुमचं काही बोलणं झालं होतं का? त्याने तुला काही सांगितलं का?" ध्रुवने विचारले.

"नाही." किशोरने स्पष्ट नकार दिला.

"पण तुमचं पाच मिनिटं बोलणं झालं होतं... या पाच मिनिटात तुला काहीतरी हिंट आली नाही का? कारण तुझा कॉल झाला आणि अर्ध्या तासातच सुधाकरने आत्महत्या केली, हा फक्त योगायोग वाटत नाही. तो काहीतरी तुला बोलला असेल किंवा तुला काहीतरी गडबड जाणवली असेल ना... आठवून बघ जरा." ध्रुव गांभीर्याने विचारपूस करत होता.

"अरे ॲक्च्युली मी एअरपोर्टला होतो ना... चेन्नईला जाण्याची गडबड होती. त्यामुळे पाच मिनिटे जरी आमचं बोलणं झालं तरी नेटवर्क इश्यूमुळे काहीच कळलं नाही. मी सॉरी बोलून फोन ठेवून दिला होता." किशोर खाली मान घालून बोलला.

"कॉल रेकॉर्ड देऊ शकतोस का? सुधाकरचा डेटा रिकव्हर व्हायला वेळ लागेल. तोपर्यंत तुझ्याकडून कॉल रेकॉर्ड घेऊन मी माझ्या टीमला नॉईस रिमुव्हर वापरून तुमचं काय बोलणं झालं ते बघू शकतो." ध्रुव किशोरकडे आशेने बघत होता.

ध्रुव पोलीस खात्यात असल्याने ही चर्चाही एकप्रकारे चौकशीच होती; पण त्याने त्याच्या मित्रांना ती जाणीव होऊ दिली नाही.

"अरे माझ्या मोबाईलमध्ये कॉल रेकॉर्डचं सिस्टीम ऑन नाही." किशोर हळूच बोलला.

"व्हॉट नॉन्सेन्स..." ध्रुव जरासा चिडला.

"सॉरी..." किशोरने लगेच माफी मागितली.

ध्रुवने सुस्कारा सोडला. सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटत असताना ध्रुवचा फोन वाजला. थोडा वेळ बोलून त्याने फोन ठेवला.

"एक गुड न्यूज आहे." ध्रुव उत्साहात बोलला.

"काय?" सगळ्यांनी एकत्र विचारले.

"सुधाकरच्या केसमध्ये एक मोठी लीड मिळाली आहे. सुधाकरच्या मृत्यूच्या जस्ट पाच मिनिट आधी सुधाकरने एक रेकॉर्डींग मला मेल करून ठेवली होती. त्याच्या मोबाईलमध्ये तर करप्ट झाली ती रेकॉर्ड फाईल; पण माझ्या मेल बॉक्समध्ये असेल अजूनही... आताच कळेल आपल्याला की सुधाकरचा खून झालाय की त्याने आत्महत्या केली आहे!" ध्रुव सुचक हसत बोलला.

सगळ्यांचेच चेहरे खुलले होते. त्यानंतर ध्रुवने घाईतच मोबाईलमध्ये मेल तपासले. त्यातला सुधाकरचा शेवटचा मेल त्याने उघडला. त्यात एक रेकॉर्ड फाईल होती. ती डाऊनलोड होताच सगळ्यांनी ती रेकॉर्डिंग ऐकली; पण ती रेकॉर्डिंग ऐकून सगळेच हादरले आणि ते सगळेच एका व्यक्तीकडे अविश्वासाने पाहू लागले आणि तो होता त्यांचा मित्र किशोर.

"हो, मी मारलं त्याला..." सगळ्यांच्या नजरा हेरून केसांत हात फिरवत किशोरने शेवटी कबूल केले.

"पण का?" सगळ्यांनी एकच प्रश्न विचारला.

"खूप हौस होती त्याला मरण ओढवून घेण्याची... प्रामाणिकपणाची खाज होती त्याला..." कुत्सितपणे हसत किशोर बोलला.

"अरे आपण एकाच अनाथाश्रमात वाढलो. एवढे उन्हाळे-पावसाळे एकत्र पाहिलेत आणि तू असा वागलास? बालमित्र होतो रे आपण... मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा असतो, असं म्हणतात; पण तू तर स्वतःच एक वणवा आहेस. शी! लाज वाटते तुला मित्र म्हणायची... मैत्रीसारख्या पवित्र नात्याला लाजवलंस तू..." विश्वनाथ किशोरला एक ठोसा मारत बोलला.

अंग काठीने बलदंड असल्याने एकाच ठोस्यात किशोरच्या तोंडातून रक्त बाहेर पडले; पण तरीही किशोर विक्षिप्त हसला.

"हो होतो ना बालमित्र; पण तुम्ही विसरलात आपण कसं मोठं झालो? किती झळ सोसावी लागली गरिबीची... कसंबसं त्या दरिद्रीच्या दलदलीतून बाहेर पडलो आणि आता पैसा चरणस्पर्श करत होता तर तो सुधाकर म्हणायला लागला मी चुकीच्या मार्गाने पैसे कमावतोय! कसला चुकीचा मार्ग? अख्खं जग करतं तेव्हा काही नाही; पण मी केलं तर मी अनैतिक वागतोय? राजकारणात असाच उतरलो नाही मी... बऱ्याच ठिकाणी घाम गाळला आणि तेव्हा कळलं की इथे असंच वागावं लागतं. पदावर बसून सरळ मार्गाने नाही मिळत ना तितका पैसा या एका योजनेतून मला मिळत होता, सो मी केली अप्रुव्ह ती योजना... केली सही, दिला शिक्का मारून..." किशोर अभिमानाने बोलत होता. त्याचे शब्द ऐकून 'हा आपलाच मित्र आहे का?' हा प्रश्न त्या सगळ्यांना पडला.

"पण त्या सुधाकरला बरी हौस दुसऱ्याच्या भानगडीत लुडबुड करायची... त्याचं काम सही करणं होतं; नाही त्याला खोलवर अभ्यास करायचा होता. त्याने केला, त्याला कळलं आणि मग तो मला शहाणपणा शिकवू लागला. मी त्याला आधी खूप शांतपणे सांगितलं की बाबा रे, शांत बस. काही चुकीचं नाही. वाटेल तर मी त्यालाही पैसे द्यायला तयार होतो; पण तो बोलला त्याला लाच घ्यायची नाही. शिवाय ही योजना स्कॅम आहे, हे सिद्ध करायला निघाला होता तो... शेवटी मग माझा नाईलाज झाला आणि प्लॅन करून त्याच्याच खास माणसाला त्याचा खून करण्याची जबाबदारी दिली. सुधाकरच्या खास माणसाने बळजबरी बीपीच्या गोळ्या सुधाकरच्या घशात कोंबल्या आणि मग तो तळमळत मेला. लाईव्ह पाहिलं मी, खूप वाईट वाटलं; पण मला नडला तो कायमचा संपला." किशोर तिरकसपणे बोलला.

त्याला मित्र म्हणायला आता सगळ्यांना लाज वाटत होती. सगळे तिरस्काराने त्याच्याकडे बघत होते.

"शेवटी मासा गळाला लागला." ध्रुव टाळ्या वाजवत हसून बोलला.

"ए वेड-बिड लागलं का सुधाकर कसा मेला हे ऐकून? हं! पण काळजी नको करू आता तुम्हालाही त्याच्याकडेच पाठवतो." किशोर ओठांचा कोपरा उंचावत आसुरी स्वरात बोलला.

"त्याची काही गरज नाही, मीच आलोय तुझ्याकडे..." मागून एक ओळखीचा आवाज आला, तसे सगळे मागे वळले.

"सु... सुधाकर?" किशोर अडखळत पुटपुटला. त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वास होत नव्हता.

"हो मीच!" सुधाकर बोलला. सगळे मित्र त्याला बघून खूश होते. प्रश्न होते मनात, त्यांनी ध्रुवकडे पाहिले. त्याने एक इशारा केला आणि सगळे काय समजायचे ते समजून गेले.

"तू इथे कसा? तू... तू मेला होता ना? तुला मारलं होतं ना? मी तुला माझ्या डोळ्यांनी मरताना पाहिलंय..." किशोर गोंधळला होता.

"कधीकधी जसं दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं. जसा तू! मी तुला जिवलग मित्र मानायचो; पण तू तर मैत्रीच्या मुखवट्यातला पक्का वैरी निघालास." सुधाकर दात ओठ खात बोलला.

"तू मेला होता... तू जिवंत कसा? म्हणजे तुझ्या सेक्रेटरीने मला धोका दिला. त्याने तुला मारलंच नाही. माझ्याशी गद्दारी केली..." किशोर रागाने मुठी आवळत बोलला.

"नाही, त्याने तुझ्याशी गद्दारी केली नाही. त्याने तुझीच साथ दिली तरीही मेलो नाही मी, कारण ध्रुव माझ्यासोबत होता." सुधाकर बोलला आणि किशोर आ वासून पाहत राहिला.

"काय?" किशोरला धक्का बसला.

"हो! तुला त्या योजनेविषयी जाब विचारण्याआधीच मी ध्रुवला तुझ्या योजनेचा खराखुरा आढावा दिला होता. इतर कोणाशी बोलण्याआधी परस्पर तुझ्याशी बोलावं असंही वाटलेलं; पण क्षणात जाणवलं की एक अनाथ असून तू अशा योजनेचा भाग झालास, याचा अर्थ तू आमचा जुना मित्र किशोर राहिलाच नाही. तुझ्या डोळ्यावर पडदा चढला आहे लालसेचा, हे प्रकर्षाने जाणवलं मला म्हणून तुझ्याआधी मी ध्रुवला गाठलं, त्याला सगळी हकीकत सांगितली. त्यालाही काही स्कॅम्समध्ये तुझी इन्व्हॉलमेंट असल्याची शंका होती; पण खात्री नव्हती. माझ्यामुळे त्याची खात्री झाली मग त्यानेच तुझ्याविरूद्ध पुरावे गोळा करण्यासाठी एक मास्टर प्लॅन आखला. आम्हाला कळलं होतं माझा सेक्रेटरी थोड्याशा पैशाखातर विकला गेला. तो तुझी साथ देऊन, माझा विश्वासघात करून माझा खून करेल, ही कल्पना आधीच होती ध्रुवला... त्यामुळे बीपीच्या गोळ्यांऐवजी आम्ही स्वॅप केल्या होत्या." सुधाकरने सविस्तर विश्लेषण दिले. मित्रांनी तर सुधाकर आणि ध्रुवला मनातूनच दाद दिली.

"पण तुला डॉक्टरांनी चेक केलं तेव्हा त्यांनी तुला मृत घोषित केलं होतं? दोन तीन वेळा पल्सेस चेक केल्या होत्या. मी त्या सेक्रेटरीला पण सांगितलं होतं चेक करायला... त्यानेही सांगितलं होतं की तुझं हृदय बंद पडलंय." किशोरला काही तर्क लागत नव्हता.

"हाच तर प्लॅन होता. ध्रुवने पोटॅशियम क्लोराईड आधीच मला इंजेक्ट केलं होतं. पोटॅशियम क्लोराईडच्या इफेक्टने पल्सेस इतक्या स्लो होतात की काहीच गती जाणवत नाही आणि हृदयाची धडधडही जाणवत नाही म्हणून बरेचदा प्रायमरी चेकअपमध्ये मृत घोषित केलं जातं. सेम माझ्या बाबतीत झालं. सेक्रेटरीने त्या गोळ्या जरी कोंबल्या तरी त्यामुळे मला काहीच झालं नाही; पण पोटॅशियम क्लोराईड खूप मोठी रिस्क होती, ॲंटीडोट आधीच तयार होतं फक्त वेळेशी झुंज होती, मात्र ध्रुवने आधीच बंदोबस्त केला होता. मला ॲम्बुलन्समध्ये शिफ्ट करताच ॲंटिडोट इंजेक्ट केलं आणि मी मरणाच्या दारातून तुला तुरुंगात डांबायला आलो; पण घाई करायची नव्हती. तुला आणि एकंदरीत सगळ्यांना खात्री व्हावी की मी मेलोय म्हणून एका अनौरस मृतदेहाची तुझ्या आणि सगळ्या मित्रांच्या हस्ते अंत्यविधी पार पाडली. खरंतर तुला फक्त अटक झाली असती तर मला समाधान मिळालं नसतं. मुखवट्यामागचा तू कसा आहे हे मला सगळ्यांना दाखवायचं होतं म्हणून या शोक सभेच्या माध्यमातून तुझ्याकडून सगळं वदवून घेतलं आणि तुझ्याही नकळत तू पोपटासारखा खरं बोललास." सुधाकर तुच्छ कटाक्ष टाकून बोलला आणि किशोरने मुठी आवळल्या.

"आता आयुष्यभर ती योजना किती महागात पडली तो विचार करत बस तुरुंगात..." ध्रुव किशोरच्या हातातून बंदूक हिसकावून घेत बोलला.

"मी... मी तुरुंगात नाही जाणार. एकतर तुम्हाला मारणार... नाहीतर स्वतःचा जीव घेईल मी..." किशोरने जोर लावून ध्रुवला हिसका देऊन बंदूक परत स्वतःकडे घेतली.

"किशोर वेडेपणा सोड..." सगळे मित्र त्याला समजावत होते.

"नाही... मी दरिद्रतेत जन्माला आलो तरी सगळं गमावून मरणार नाही. मी पदावर राहूनच श्रीमंती पायाशी लोळत आहे तेव्हाच मरेल. मी गरीब म्हणून मरणार नाही..." किशोर वेड्यागत बोलला आणि त्याने सगळ्यांच्या नकळत स्वतःवर गोळी झाडली. दुसऱ्याच क्षणी तो ओरडून खाली कोसळला आणि सर्व मित्र त्याच्या जवळ गेले.

"काही नाही झालंय त्याला... तो गोळी फायर करणार त्याआधीच इन्स्पेक्टर श्रीनिवास यांनी शिताफीने मागून किशोरच्या हातावर गोळी झाडली म्हणून किशोर आत्महत्या करू शकला नाही. किशोरची इतक्या सहज सुटका नाही. त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळणार. शिवाय जसा आपला भ्रम दूर झाला तसा त्या सर्व जनतेचा भ्रम दूर व्हायला हवा ज्यांनी याला मत दिले." ध्रुव बोलला.

त्यानंतर तो किशोरला घेऊन इन्स्पेक्टर श्रीनिवाससोबत निघून गेला.

काहीच तासांत बातमी प्रसारित झाली, किशोरचा मुखवटा गळून पडला व त्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आला. जसे किशोरच्या मित्रांना किशोरच्या मुखवट्यामागची मैत्री कळून आली होती, तसेच त्याने जी नाती सुसंस्कृतपणाचा मुखवटा धारण करून जोडली होती, तीसुद्धा तुटली होती. जनतेच्या हिताचा विचार करणारा नेता ही किशोरची प्रतिमा मलिन झाली. किशोरसह जे जे त्या योजनेत समाविष्ट होते त्यांच्यावरही कारवाई झाली.

राहिला प्रश्न सुधाकर आणि त्याच्या मित्रांचा तर घडलेल्या प्रकाराने अर्थात ते सुन्न झाले होते. किशोरमुळे मैत्री या नात्याविषयी संभ्रम झाला होता खरा; पण ध्रुवही मित्रच होता ना! विश्वनाथने म्हटल्याप्रमाणे किशोर वणवा असला तरी ध्रुवने सिद्ध केले होते की 'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा' असतो. ध्रुवने सुधाकरची साथ दिली म्हणून सुधाकर जिवंत होता. त्यामुळे त्या सगळ्यांचा मैत्रीवरून विश्वास उडाला नाही. प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. तसेच मित्रही काही दिखाव्याचे असतात आणि काही मित्र जिवाला जीव देणारे असतात! जे बोलून नव्हे कृतीतून मैत्री निभावतात, हे मात्र सुधाकरसह इतर सर्व मित्रांना पटले होते.

समाप्त.

© सेजल पुंजे.
२७/०४/२०२६.
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →