Login

Mazi Aai

मायेच्या ओढीने व्याकुळलेली चिमणी..
माझी आई

ए, आई ऐक ना…!

तुझ्या हातचा घास... तुझी हक्काची मिठी...तुझा गोड ओरडा... तुझ्या चेहऱ्यावरचा हळवा राग... आणि घरात न दिसणारं तुझं अस्तित्व खूप खूप मिस करतोय गं आई!

असं अचानक ध्यानीमनी नसतानाही तू दूर निघून गेलीस... मुलांना, घरादाराला पोरकं करून.
तू गेल्यापासून घर अगदी शांत शांत होऊन गेलंय. तू असताना आम्ही चीडचीड करायचो... जे पटत नाही ते सगळं तुला सांगून योग्य मार्ग काढायचो. निगेटिव्ह विचार न करता पॉजिटीव्ह विचार करायला तू डोळे वटारून सांगायचीस...
तुझी मुलं लहानाची मोठी झाली. आणि तू आजीही झालीस. आमच्या चुका त्या कितीही लहान किंवा मोठ्या असो आमची तू कधीच शिक्षेविना सुटका केली नाहीस. पण नातवंडाना मात्र सगळ्या शिक्षा माफ केलीस. असं म्हणतात आजीची माया मुलांपेक्षा नातवंडांवर खूप असते. अगदी तुझीही माया तुझ्या नातवंडावर खूप होती.
तू गेल्यापासून सगळं कसं एकदम शांत तर झालंच आहे. शिवाय तुझ्या लाडक्या लेकीचं लिखाण सुद्धा बंद झालंय…तू माझ्या बाजूला बसून माझ्या लिखाणाला आपुलकीने पाहायचीस. आणि मग मलाही लिहायला स्फुर्ती मिळायची. तू सोबत बसल्यावर क्षणभराचा कंटाळाही मला कधीच जाणवायचा नाही. पण तू गेल्यापासून हातातली पेन थरथरतेय…वहीचा कागद आसवांनी ओला होतोय. काय लिहू? कशी लिहू? काहींचं कळेनासं झालंय बघ.

तू रोज माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवून कडा कडा बोटं मोडायचीस. गालावर ओठ टेकवायचीस…तुझ्या या कृतिनेच तू माझ्यावरचं प्रेम दाखवून द्यायचीस…तू कितीही ओरडलीस तरी आम्हाला तुझा कधी राग आला नाही. कारण तूझा ओरडाही तुझ्यासारखाच प्रेमळ आणि हळवा होता गं…

आम्ही तुझ्या मायेच्या महासागरात आजपर्यंत आनंदाने विहारत होतो , खेळत होतो, बागडत होतो. तुझ्या विशाल कुशीत निजत होतो. आणि आज त्याचं सुखाला आम्ही पोरके झालो. तू नेहमी माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवून कडा कडा बोटं मोडायचीस. कोणाची नजर लागू नये म्हणून दृष्ट काढायचीस. लिहिताना मी कंटाळून जाऊ नये म्हणून जवळ बसून असायचीस. गरीबाला तुझ्या कथेत अव्वल स्थान असुदे असं तू मला नेहमी सांगायचीस. मीही तुझ्या शब्दाचा मान ठेऊन गरीब पात्राना कथेसाठी निवडायचे. तू गेल्यापासून माझी लेखणी पोरकी झालीय गं आई.

तू शिक्षणाने अडाणी होतीस पण अनेक गावठी औषधे शोधून तू डॉक्टर झालेलीस…उगाच का तुझ्या औषधासाठी मुंबईहून मूळव्याध पेशंट यायचे. खूप गुण होता तुझ्या हातच्या औषधानां…ज्यांनी ज्यांनी औषध घेतलं ज्यांना तू कायमचं बरं केलंस ते सगळे घरी येऊन दुःखात सहभागी झाले. तू फक्त आमची आई नव्हतीस तर अनेकांचा तारणहार डॉक्टर होतीस. तुझ्याकडे पाहून मला पहिल्या डॉक्टर आनंदीबाईची आठवण होते. ज्यांनी पहिली डॉक्टर म्हणून अनेक रुग्णांना बरं केलं. आणि तुही अनेकांना जीवदान दिलेस. आनंदी बाईंचा डोक्यावरचा पदर कधी ढळला नव्हता आणि तुझ्याही डोक्यावरचा पदर कधी तू खाली पडू दिला नाहीस.

तुझ्या डोळ्यातल्या धाकांनी तू आम्हाला घडवलं आहेस. कधीच एकही हात तू आम्हाला लावला नाहीस. तुझ्या धाकात एव्हडं सामर्थ्य होतं की आम्ही दोघेही बहीणभाऊ तोंडातून एकही शब्द न काढता थरथरत असू. आई तुझं गोडवे गायला सुरु केलं तर भलं मोठं पुस्तकंच लिहून होईल. जरी तू जगाला दिसायला सर्वसामान्य स्री वाटत असलीस तरी तुझ्यात इतकं टॅलेंट होते की भुवया उंचावल्याशिवाय राहणारच नाहीत.

आई आज तू जाऊन तीन महिने होताहेत…अजूनही आम्ही कुणीही सावरलेलो नाहीय. भलेही जगाला दाखवण्यासाठी चेहऱ्यावर हसू ठेवून वावरावं लागतंय. पण आतून मात्र क्षणाक्षणाला कंठ दाटून येतोय गं.
तुझ्या अनेक आठवणीनी जीव कासावीस होतोय.. डोळे कठोकाठ भरून येतात. महतं प्रयासाने स्वतः ला सावरावं लागतंय. तू गेल्यापासून घरादाराचा प्रत्येक कोपरा सुनासुना वाटतोय. घर जनू रिकामी मुकपणे तुझ्यासाठी रडत असतं गं..

तुझ्या कष्ठाच्या पैशाने तू उभं केलेलं हे घर.. नाही नाही घर नाही हं महल होय तुझा महल अगदी निस्तेज होऊन बसलाय. जिव नसल्यागत अगदी ढम्म!

आई तू निघून गेलीस गं…माझ्यावर घरादाराची जबाबदारी विश्वासाने सोपवून. तू दिलेल्या या जबाबदारीला मी नक्की यशस्वीपने पार पाडणार आहे. काळजी मुळीच करू नकोस तुझ्या लेकीवर तुझा खूप विश्वास आहे तो विश्वास ती सार्थ ठरवेल नक्कीच!

दररोज तुझे देव देव्हाऱ्यात न्हाऊ माखून चमकत आहेत…रोज तुझ्या अंगणातली तुझी जिवाभावाची तुळस हट्टाने माझ्याकडून पूजा करून घेतेय…तुझ्या महालाचा उंबरवठा मोठ्या दिमाखात रोज सजतो आहे. आणि तुझी आवडती फुलझाडे खूप मोठा फुलांचा वर्षाव करत आहेत…

तू नाहीस म्हणून कदाचित जेवनही चव लागत नाहीय. कितीही चांगले बनवले तरी आईशिवाय अन्नाचा घास कसा चव लागेल गं आई? तू होतीस तेंव्हा माझं सतत कांही ना कांही सर्रास बनवणं, खाणं सुरूच असायचं.. तू गेल्यापासून कांही करून खावंसं वाटतंच नाहीय गं.. रोज तुझ्यासाठी तुझ्या आवडीच्या भाज्या आणि गरमागरम भाकरी तुला खाऊ घालायचे. पण आता भाकरी कधी थंड होतात कळतही नाही गं.

तुला आवडणारा फणस, फणसाची भाजी आणि अंबाड्याची भाजी खायला मिळत नाहीय. अर्थातच एक वर्ष आई गेल्यानंतर खायचं नाही असं म्हणताहेत लोकं काय खरं असेल का गं आई? बाकी रोजचे रुटीन तेच सुरु आहे. तू रोज वरून पाहतेच आहेस.

एक बरं आहे गं आई…वरून तू आम्हाला बिनधास्त बघत असणार पण आम्हाला मात्र तू दिसत नाहीस गं हेच खूप मोठं दुःख जीवास सलतंय..!
पण कांही का असेना आम्ही तुला दिसतोय यातच आम्ही समाधानी आहोत गं.. माहिती नाही तुझी आमची भेट कधी होईल पण तोवर तुझ्या भेटीसाठी हा जीव रोजच कासावीस होऊन जाईल.

आई…तुझ्या नसण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून येणार नाही हे माहिती असूनही, तुझं घरात अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी खूप धडपडतेय गं…तुझ्या सगळ्या आवडी निवडी, तुझी रोजची दिनचर्या, तुझा आवडता कामाचा वेळ सारं कांही पाळत आहे मी.. तुला अजिबात बसून राहायला आवडत नव्हतं ना…म्हणून मीही अजिबात बसत नाहीय तू गेल्यापासून मीही स्वतः ला कामात झोकून दिलंय..काहीही म्हण आईचे गुण लेकीत कमीतकमी 85%तरी असणारच ना गं?
आई तुला माहितेय तुझी नात चांगल्या गुणांनी पास झालीय गं…आपण तिला कोणताही क्लास लावला नव्हता तरीही तूझ्या म्हणण्याप्रमाणे अभ्यास करून तुझी लाडकी नात पास झालीय. पण हे सुख प्रत्यक्षात अनुभवण्या आधीच तू मात्र अनंताच्या प्रवासाला निघून गेलीस. तुझ्या आशिर्वादाने सगळं कांहीठीक आहे. काळजी करू नकोस..

तू असताना मी मनापासून तुझी काळजी घ्यायचे.. आजारपणात तुझ्या उशाशी बसून असायचे…पण आता तू दूर गेल्यावर एका गोष्टीचं खूप वाईट वाटतंय गं आई…तुझी आता तिथं कोण काळजी घेईल गं? आजारी पडल्यावर कोण तुझ्या उशाला बसून राहील? जेवण गोड नाही लागल्यावर तुझ्या जिभेची चव परत आणणारा खरडा कोण बनवून देईल गं? हात पाय दुखत आहेत म्हणून कोण चेपून देईल गं आई?

जिथे असशील तिथं आनंदात रहा…स्वतःला जप.. स्वतःची काळजी घे…बाकी इथली जबाबदारी नेटाने मी सांभाळेल असं वचन देतेय मी तुला.

तुला एक गोष्ट सांगायची राहूनच गेली बघ…

तुझ्या विरहात अडीच महिने घालवल्यानंतर मी पुन्हा लेखणी हाती घेतलीय. आणि फक्त पंधरा दिवसात पन्नास कवितांचा पाऊस पाडलाय…तुझ्यासाठी लिहिताना अगदी एकाग्र चित्ताने लिहू लागते. लिहिताना तू माझ्या जवळ बसल्याचा भास होतो. आणि आजूबाजूला स्मित हास्य करून मी लिहिण्यावर फोकस करते.अजून बरंच कांही करायचं आहे. अजून एक सरप्राईज आहे बरं का ते तुला तुझ्या पहिल्या पुण्यतिथीस मिळेल. तोवर धीर धर..!

एका मूकबधिर मुलीला शिकवून सवरून एक उत्कृष्ट लेखिका आणि साहित्याचे रत्न बनवणाऱ्या माझ्या आईचा किती अभिमान वाटतोय ते शब्दात नाही सांगू शकत आई मी…

तू नेहमी आमच्या सोबत रहा…बाकी कांही नकोय मला. तुझा आशीर्वादाचा हात कायम माझ्या डोक्यावर राहू दे…घरात सुख, शांति, समाधान नांदू दे….

बाकी तू मात्र अजिबात रडू नकोस हं…जरी तू खूप दूर असलीस तरी आमच्या अगदी जवळ म्हणजे आमच्या काळजात वसली आहेस…आय लब्यु आई.. मिस यु…

©सविता पाटील रेडेकर.








0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →