Login

माझंच काय ते चुकलं - 2

मोठी स्वप्न पाहणाऱ्या सुनीताची कटू कहाणी
माझंच काय ते चुकलं भाग - 2


"सूने झालं की नाही तुझं? आवर पटकन मला उशीर होतोय."
राकेश बाहेर सायकल घेऊन उभा होता, पण अजूनही सूनिताचा डबा तयार नव्हता झालेला; त्यामुळे तिची सासू आणि नवरा.. दोघेही तिच्यावर मोठ्याने खेकसत होते.

"हो झालंच, हे काय आणतच होते डबा."
घाईघाईने डब्याचं झाकण बंद करत सुनीता बाहेर आली आणि राकेशच्या हातात डबा दिला.

"उद्या पासून हे ही काम जमत नसेल तर सांग तसं, मी बघेन दुसरं काहीतरी. तसेही बाहेर प्रत्येक कामाला बाई भेटते."
राकेशच्या ह्या अशा बोलण्यावर सुनीताला खूप रडू आलं, पण तरीही ती सगळं सहन करत होती. का? तर फक्त तिच्या सुखी संसारासाठी.

सुखं.. म्हणायला तरी होतं का त्यात काडीच सुख. नुसती उठता बसता बोलणी आणि रात्री कामावरून आल्यावर राकेशची बडबड.. वीट आला होता तिला ह्या सगळ्याचा, पण पर्याय नव्हता. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सुरू होता सगळा.


राकेश जात नाही कामावर तोवर सासूबाई बाहेर आल्या आणि तिला बोलू लागल्या,
"अग मला पाण्याचा तांब्या देतेस ना! जाऊ दे बाई मला मंदिरात. तिथे तरी शांती मिळेल मनाला, नाहीतर इथं घरात काय तुझं तोंड बघत बसायच का मी."

सुनीता चुपचाप आत गेली, जुन्या साडीचा पडदा लावून केलेली न्हाणी, तिथे रंगाची बादली.. बाजूलाच ड्रम भरून ठेवलेला होता त्यातूनच तांब्यात पाणी भरत ती बाहेर आली.

"आण इकडे, एव्हढस काम करायला पण चार तास! आवर आता बाकीचे कामं. मी घरी येईपर्यंत स्वयंपाक तयार ठेव म्हणजे झालं."
असे बोलून त्या निघून गेल्या मंदिरात.

"तो महादेव पण किती परीक्षा बघतो, काहीतरी असं घडू दे म्हणजे सगळं चांगल सुरळीत होईल."
असे म्हणून तिने आहे त्या जागी उभ राहून त्या महादेवाला हात जोडले.


"सुने.. ए सुने, जरा बाहेर ये ग!"
बाजूची कमला तिला आवाज देत होती.


"अग त्या महादेवाला नुसतं हात जोडून काही उपयोग नाही. काहीतरी हालचाल करायला पाहिजे त्यासाठी."
बाजूच्याच घरातील कमलाने तिचं महादेवाला हात जोडून केलेली विनंती ऐकली होती.

"म्हणजे?"
सुनीता तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघू लागली.

"अग म्हणजे काहीतरी काम शोध, त्याशिवाय का चांगल होईल आपलं. घरबसल्या कोण पैसे देणार आहे आपल्याला. मी इथे दिवसभर चार लोकांची धुणीभांडी करते तेव्हा कुठे दोन वेळेचं जेवण सुखाने खातोय. नाहीतर माझ्या नवऱ्याच्या जीवावर ते सुद्धा मिळालं नसतं मला. घरात नवरा, सासू सासरे, चार पोरं.. इतक्या सगळ्यांना पोसायच म्हणजे काही सोप्पं काम नाहीये. मी कमवते आहे म्हणून खाताय सगळे."

कमला तिच्या कामाचं कौतुक सांगत होती सुनीताला, तिलाही ते पटलं. कारण काम केल्याशिवाय कोणी पैसे देणारं नव्हतं आपल्याला.. हेच खरं आहे.

कमला चाळीतून मोठ्या ऐटीत कामाला निघायची. लोकांच्या घरची धूनी भांडीच करायची, पण तरीही ती स्वतः च्या जीवावर पैसे कमवत होती. लोकांना तिचं काम आवडलं की ते तिला खायला द्यायचे, कपडे द्यायचे.. इतकचं काय तर घरात लागणाऱ्या वस्तू सुद्धा ते तिला देऊन टाकायचे; त्यामुळे कमलाच घर कसं भरल्या सारखं वाटायचं.

यंदाच्या दिवाळीला तिच्या मालकीनीने म्हणे तिला भारी काठाची साडी दिली आणि पोरांना मोठ्ठी पिशवी भरून खाऊ, मिठाईचे बॉक्स पण दिले होते. कमला तीच साडी घालून आख्ख्या चाळीत मिरवत फिरत होती, हे सगळं सुनीताला माहिती होतं.

कमला वर तिचा नवरा तर खुशच असायचा, पण तिचे सासू सासरे सुद्धा तिला काहीच बोलत नव्हते. सासू तर ती कामाला जाते म्हणून घरातले अर्धे काम करून घ्यायची. पोरांना डबा भरून देणे, त्यांना शाळेला सोडणे, घरातील इतर कामं.. अशा कामांना त्या हातभार लावायच्या; म्हणून कमला कामावर वेळेवर जायची.

कमलाच हे सुख बघून सुनीताला ही तिचा हेवा वाटला,

"आपणही काहीतरी कामं केलं पाहिजे.. किंवा मग कमला सारखं लोकांच्या घरी कामाला गेलं पाहिजे. निदान माझ्या वैष्णवीसाठी तरी हे केलंच पाहिजे मला."


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →