Login

माझंच काय ते चुकलं - 1

मोठी स्वप्न पाहणाऱ्या सूनीताची कटू कहाणी
माझंच काय ते चुकलं - 1



"सुनीता.. अग ए सुनिता. ऐकलंस का ग!"
ह्या आहेत सुनीताची सासू सुलभा ताई, सकाळी सकाळी जोरात ओरडुन त्या सुनीताला आवाज देत होत्या.

"काय बाई! हिला कितीही मोठ्याने आवाज दिला तरी ऐकून न ऐकल्या सारखं करत असते. मुद्दामहून करत असेल ही अशी, मला चांगलीच माहिती आहे हीची खोड."
सुलभा ताई मंदिरात जायला निघाल्या होत्या, जवळच शंकराचे मंदिर होते. महादेवाला रोज पाणी घालायला जात असे त्या, पण त्यांना तांब्याच्या लोट्यात पाणी सुद्धा सुनीताच भरून द्यायची आणि मग त्या जायच्या. पाणी घालायच्या निमित्ताने तिथेच बसून राहायच्या, प्रसाद म्हणून कोणी काही दिलं की तेव्हढाच पोटाला आधार. घरात काही धड नव्हतंच; त्यामुळे त्या तिथे मंदिरात जाऊन बसायच्या.

आज सुनीताची बरीच गडबड सुरू होती. सासूबाईंचा आवाज ऐकला तर होता तिने, पण तिला हातातल्या कामातून जरा सुद्धा वेळ मिळत नव्हता त्यांना पाणी नेऊन द्यायला.

सुनीता बिचारी किचनमधे व्यस्त होती, तिच्या नवऱ्याचा म्हणजेच राकेशचा डबा बनवण्यात. सकाळी सकाळी नुसती धांदल उडायची तिची. राकेशचा डबा तयार करायचा, त्याचा चहा, नाश्ता आणि त्यांची दीड दोन वर्षांची गोंडस कन्या वैष्णवी.. तीच सुद्धा आवरून द्यावं लागायचं. लहान पोरं ती; त्यामुळे भरपूर लक्ष ठेवावे लागायचे तिच्याकडे.

ह्या सगळ्या घरातल्या कामात सुनीताचा दिवस कसा निघून जायचा ते तिलाही कळत नव्हते. राकेश कामावर डबा घेऊन गेला की मग तिला थोडासा वेळ मिळायचा, पण त्यातही सासूबाईंची कुरकुर असायचीच; त्यामुळे तिला जरा सुद्धा उसंत मिळत नव्हती. त्यात आणि छोटी वैष्णवी कडेवरच असायची दिवसभर काम करतांना. तिला सुद्धा सासूबाई घेत नव्हत्या थोडा वेळ सांभाळायला.

"ती राहत नाही बाई माझ्याकडे, तिला फक्त तूच लागते."
असे म्हणून त्या हे काम सुद्धा अगदी शिताफीने टाळून द्यायच्या; त्यामुळे सुनीताला अगदी भार व्हायचा कामाचा.

घरात कायम अठरा विश्व दारिद्र्य आणि त्यात सासू अशी, नवरा ही जास्त बघत नव्हता तिला. त्याला तरी कुठे सवड म्हणा! तो सकाळी निघाला सायकलवर डबा घेऊन, की रात्रीचं घरी यायचा. दिवसभर कामासाठी वणवण फिरायचे आणि काय जमेल ते चार पैसे घरी आणायचे. यातच समाधान मनायची सुनीता.

तिलाही वाटायचं की आपला संसार सुखाचा व्हावा, घरात गरजेच्या चार वस्तू आणाव्यात, पण हे सगळं करण्यासाठी हातात पैसा लागतो. आणि तोच नव्हता तिच्याकडे. हौस मौज करायला होतंच काय म्हणा तिच्याकडे!

घरात वापरा पुरती भांडी, त्यातलीही काही तुटकी फुटकी आणि चेपलेली होती. एक लाकडी खाट, त्यावर सासूबाई दिवस रात्र ठाण मांडून असायच्या. चार पत्र्याच घर, त्यातही पाऊस आला की सगळं घर गळायच, पण तरीही ती हे सगळं सांभाळुन घ्यायची.

इतकी बेताची परिस्थिती असतानाही तिने कधी कुरबुर केली नाही की राकेश जवळ कसला हट्ट केला नाही.
बालपण ही गेलं असच वणवण फिरतं आणि आता लग्नानंतर तरी सुखाचे दिवस मिळतील ही आशा मनात होती.. पण त्यावरही पाणी फिरले. आगीतून फुफाट्यात जाणे, ही म्हण जणू काही तिलाच लागू व्हायची.
तिची आता फक्त एकच ईच्छा होती.

"आपलं काहीही असो, पण आपल्या लेकीला चांगल शिकून मोठ्ठं करायचं. साहेबीन बनवायचं, हे असं लाचाऱ्या सारखं जीवन तिच्या वाटेला नको यायला."

तिलाही वाटायचं आपण कामावर जावं, घराला हातभार लागेल आणि नाही काही झालंच तर निदान खाण्यापिण्याचे तरी पैसे सुटतील. पण तिचा हा सुद्धा विचार मनातच राहिला. कारण राकेशने तिला मनाई केली होती बाहेर जाऊन काम करण्यासाठी.
"मी करतोय ना सगळं, बघतो ना मी. माझ्या परीने सगळं सांभाळण्याचा प्रयत्न करतोय.. आणि त्यातही तुला जमत नसेल तर तसं सांग.. नाहीतर तू तुझ्या माहेरी निघून जा तिकडेच."

राकेशचे असे बोल ऐकून सुनीता कायम शांत व्हायची. कसेबसे रडत कढत दिवस ढकलायचे, हे तिला पटायचं नाही.

पण तिला सुद्धा वाटायचं, आपला संसार सुखाचा व्हावा. घरात चांगल्या वस्तू असाव्यात. लेकीला चांगल चुंगल करून खाऊ घालावं.. पण इथे तर दोन वेळेस आपल्याच खाण्याचे वांदे, त्यातून बाळाला काय करून द्यावं. घालायला चांगले कपडे नाही की खायला सुध्दा घरात डबे भरलेले नाही.

फुटक्या पत्र्याच्या छताकडे बघत सुनीता तिच्या सुखी संसाराची स्वप्न बघायची. तिचे हे स्वप्न कधी पूर्ण होईल? देवालाच माहिती!


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →