Login

मर्यादित चौकट (कोष)भाग ३अंतिम

मर्यादित चौकट (कोष) भाग 3 अंतिम

जलद लेखन
मर्यादित चौकट (कोष)
भाग ३
अंतिम

सुहासिनी उठली आरशासमोर जाऊन उभी राहिली. तिने स्वतःला आरशात न्याहाळले.

किती लठ्ठ होत चालली आहेस तू. स्वतःच्या आरोग्याचा कधी विचार केला का? सुहासिनीने स्वतःचं स्वतःच्या मनाला प्रश्न केला. ऑफिसमध्ये जातपर्यंत घरची कामं. ऑफिसमध्ये गेल्यावर ऑफिसची जबाबदारी. थकून भागून घरी आल्यावर परत तेच. नाही, आता मी इतरांबरोबर स्वतःलाही वेळ देणार. या केवळ विचाराने सुहासिनीचे मन प्रफुल्लित झाले. तिने मैत्रिणी सोबत टूरला जाण्याचा विचार पक्का केला. आणि सुहास जवळ बोलून सुद्धा दाखवला.


सुहास म्हणाला, अगं जा की. मी कधी तुला मनाई केली आहे का? तूच तर सारखी कामात गुंतलेली असते. (स्वगत)जा निवांत जा तू. तेवढाच मलाही मोकळा वेळ मिळेल.

काही म्हटलं कां तुम्ही? सुहासिनी म्हणाली.

नाही गं.खरंच जा तू टूरला. तेवढंच बरं वाटेल तुला आणि आता मुलंही मोठी झाली आहेत.

नवऱ्याच्या तोंडून हे ऐकून सुहासिनीला आता सुस्मिता किती बरोबर बोलत होती हे कळलं.

खरंच स्त्रिने स्वतःला एका मर्यादित चौकटीत(कोष) गुंतवून घेतले आहे. मी आहे म्हणून सर्व आहे. माझ्या हातच्या स्वयंपाकाची चव यांना आवडते. मुलांना आवडते.अर्थातचं सर्वाच्या बाबतीत असे म्हणता येणार नाही. पण बऱ्याच स्त्रियांच्या बाबतीत असे घडते. पुरुष मंडळी एक तासासाठी बाहेर गेल्यानंतर घरी परत यायला दोन तास लावतील. पण स्त्री मात्र दोन तासासाठी बाहेर गेल्यावर एका तासात घरी परत येते. हीच तिची मर्यादित चौकट. हाच तिचा तिने स्वतःच स्वतःभोवती निर्माण केलेला कोष.

बालसंगोपना बरोबरच ज्या जबाबदाऱ्या परंपरेने स्त्री वर्गाकडे आल्या त्यात स्वयंपाक ही गोष्ट पण आली. याचा अर्थ आज स्त्रियांच्या वाट्याला फक्त याच जबाबदाऱ्या आहेत असे नाही.

आज असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे स्त्रियांचा सहभाग नाही. पण डब्यासाठी कोणती भाजी करू? रात्री भाताबरोबर 'पिठलं' करू की 'कढी पकोडा' ? यासारख्या अत्यंत रटाळ प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतात. ही सत्य परिस्थिती आहे. अनेकदा 'कर काहीतरी'. यात 'विचारण्यासारखे काय आहे'? अशी उत्तरे ऐकावी लागतात. तेव्हा यात विचारण्यासारखं काहीच नाही. मग हा खटाटोप कशाला? फक्त माझ्यासाठीच का? असेही प्रश्न मनात येतात.

शिक्षण, अर्थार्जन या क्षेत्रात आज स्त्री-पुरुषांमधे पूर्वीच्या तुलनेने खूप समानता आहे. मग स्वयंपाक हेच क्षेत्र स्त्रियांशी अजूनही इतके घट्ट का बांधले गेले आहे? हळूहळू ही वीण ही सैल होते आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे.आज तशा बऱ्याच सोयी उपलब्ध आहे. म्हणूनच कधीकधी तरुण शहरी जोडपी कामावरून परत येताना चेंज म्हणून भाजी पोळी केंद्रातून भाजी पोळी विकत आणतात.

अनेक ठिकाणी तर निवडलेल्या, चिरलेल्या भाज्या मिळतात. असे केले तर पूर्वीसारखे, 'काय पोळी भाजी विकत आणतेस'? असे कुत्सित नजरेने बघून कुणी काही म्हणणारही नाही. कारण ही आज काळाची गरज आहे. तरीसुद्धा बऱ्याच जणी अजूनही हे सर्व करण्यात, स्वतःला दमाविण्यात धन्यता मानत आहे.
नाही. मी आता माझ्या स्वतःसाठी वेळ देणार. स्वतःसाठी जगणार. याचा अर्थ नवऱ्याला, मुलांना वाऱ्यावर सोडणार असे नाही. पण नवरा, मुलं यांना जेवढा वेळ देते तेवढा वेळ मी स्वतःलाही देणार. स्वतःलाही जपणार. असे म्हणत सुहासिनीने स्वतःभोवती एक गिरकी घेतली आणि ओठावर आवडीचे गाणे गुणगुणत सुस्मिताला फोन लावला.

समाप्त

सौ. रेखा देशमुख
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →