गावावरून परतलो तसे आधी शाळेत जाऊन मुलाचा निकाल आणला. अपेक्षेपेक्षाही चांगल्या मार्कात पास झाला मुलगा म्हणून अहोंना खूप कौतुक वाटलं.
"माझ्या व्हाट्सअप स्टेटसला लावू का बाळाची मार्कशीट?" त्यांनी दबक्या आवाजात विचारलं. मी सरळ नाही म्हटलं. सर्वांना वाटत असेल किती खाष्ट बाई आहे ही बापाला मुलाचे कौतुकही करू देत नाही.
पण मला विचारायचं आहे अरे काय लावलं आहे हे? व्हाट्सअप असो किंवा फेसबुक, इंस्टाग्राम सगळीकडे सोशल मीडियावर आईबाप आणि नातेवाईकांचे एकच काम सुरू आहे, सरसकट आपल्या मुलांच्या मार्कशीट स्टेटसला, स्टोरीला लावणे, पोस्ट टाकणे. मी त्यांच्या विरोधात आहे असे मुळीच नाही. मात्र आपल्या मुलांचे कौतुक सोशल मीडियावर मिरवतांना थोडा तरी आपल्या मुलांच्या खाजगी आयुष्याचा विचार करावा असे मला वाटते. अरे त्या मार्कशीटवर त्यांची संपूर्ण माहिती दिलेली असते. कोणत्या शाळेत आहेत, त्यांचा सीट क्रमांक कोणता आहे, शहर कोणते आहे? आणि किती काही. मला चांगली जाणीव आहे की आताच्या काळात काहीच लपवाछपवी जमत नाही पण म्हणून का आपण आपल्या मुलाबाळांची माहिती अशी स्वतःच्या हाताने चोरांना देणे योग्य आहे का?
कोण कुठे कशाप्रकारे आपल्या मुलांना या माहितीचा आधार घेऊन त्यांच्या जाळ्यात ओढू शकतं, किडनॅप करण्याचा कट रचू शकतं हे काही सांगता येत नाही हो. आधीच सोप्या करिअरच्या नावावर काय काय कोर्सेस थोपवल्या जातात मुलांवर. या माहिती द्वारे मुलांना अशा कोर्सेसच्या जाळ्यात ओढण्यासाठी पुरेसा डाटा मिळतो.
पुढील आयुष्यात काय होईल कोणालाच माहित नाही आहे. भविष्य कोणी बघितलं आहे. अशात पुढे मुलाला आता पेक्षा कमी मार्क्स मिळाले, तो ठरवल्याप्रमाणे करियरमध्ये यशस्वी नाही झाला तर तर ती सोशल मीडियावर टाकलेली मार्कशीट त्याला नियमित चिडवत राहणार. त्यात काही खार खाणारी टपून असलेली मंडळी, "अरे त्यावेळी किती छान मार्क्स मिळाले होते. आता काय झालं?" असं बोलून ताप द्यायला सरसावतात.
तसेच ज्या मुलांना तुलनेने कमी मार्क्स मिळाले आहेत त्यांचं काय? त्यांच्यात एकतर न्यूनगंड निर्माण होऊ शकतो किंवा या टॉपर मुलांन विषयी ईर्षा. दोन्हीही घातकच. कमी मार्क्स किंवा नापास झाल्यामुळे मुलांनी आत्महत्या करू नये म्हणून बोर्डाने किती काही नियोजन केले. कोणीही मुलं नापास होणार नाही याची काळजी घेतल्या जाते. नाहीतर आमच्यावेळी कधीकधी 15-20 टक्के मुलं नापास व्हायची. आता कोणी नापास झालेलं काय सत्तर टक्क्यापेक्षा कमी गुण मिळालेलंही माझ्या कानावर येत नाही. इतकेच काय आता मार्कशीटवर ग्रेड टाकण्यात येतो A, B, C वगैरे वगैरे. पण काय उपयोग. आई वडील आणि इतर मंडळ लगेच बेरीज करून टक्के काढतं.
खरं पाहता माझ्या सोबत दहावीला असलेल्या टॉपर मुलींपैकी काहीच करियरच्या वाटेला गेल्या आहेत. बाकींची गत ती सध्या काय करतेय अशी झाली आहे. तर त्या टॉपर मुलींपेक्षा मी 45% वाली बऱ्यापैकी नोकरीही करत आहे आणि आपले छंदही जोपासत आहे. त्यामुळे मला मार्कांचे वेड कधीच नव्हते आणि नाहीही. मला वाटतं,
"करियर करायला जिद्द हवी असते व त्या जिद्दीला कष्टांची जोड द्यावी लागते."
तेव्हा माझी सर्व पालकांना हात जोडून विनंती आहे की कौतुक करायचेच आहे, सर्वांना सांगायचे आहे आपल्या मुलाच्या यशाबद्दल तर खुशाल सांगा पण त्याचा पुरावा देण्यासाठी सरसकट मार्कशीट चा फोटो सोशल मीडियावर टाकू नका. इथे सर्वही आपले हितचिंतक नसतात. कशाला कोणाच्या डोळ्यात यायचे? आपल्या मुलांना आणायचे? जितके आपल्या मुलांना सोशल मीडिया पासून दूर ठेवता येईल तितके चांगले.
तळटिप : हे माझे विचार आहेत आणि मी हे कोणावरही थोपवण्याचा प्रयत्न करत नाही आहे. फक्त माझ्या लिखाणातून मन मोकळे करत आहे. तुमचे विचार कदाचित वेगळे असतील. मी त्यांचा मान राखते.
धन्यवाद.
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
