Login

वाळन पुस्तक परीक्षण

प्रवीण बोपुलकर लिखित वाळन कथासंग्रहाबद्दल...
पुस्तक : वाळन
लेखक : प्रवीण बोपुलकर
प्रकाशन : सर्जनशील पब्लिकेशन, पनवेल
परीक्षण : कामिनी खाने

कवी, गझलकार, लेखक प्रवीण बोपुलकर म्हणजे ऑनलाईन तसेच ऑफलाईन व्यासपीठांवर लेखन करणारे एक समृद्ध लेखक आहेत. अवतरणचिन्ह हा त्यांचा अनेक पुरस्कारप्राप्त कवितासंग्रह प्रकाशित असून जीएसटी अधिकारी म्हणून काम सांभाळत साहित्यविश्वातही उल्लेखनीय मुशाफिरी केली आहे.

सुरुवातीलाच पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील ठळक अक्षरातील 'वाळन' शीर्षक लक्ष वेधून घेते. सोबतच एक गरीब परिस्थितीचा शाळकरी मुलगा एका हातात तांब्या नि दुसऱ्या हातात गाठोड्यासारखी थैली घेऊन कच्च्या रस्त्याने अनवाणी जाताना दिसतो. ज्यातून या कथासंग्रहातील एक उल्लेखनीय वळण प्रकाशझोतात येते. आजूबाजूला असलेली घरं, हिरवळ, गुलमोहोर-सोनमोहोराची झाडं गावाची पार्श्वभूमी स्पष्ट करतात. तर तिथेच आसपास दिसणाऱ्या मंदिर आणि मशिदीमुळे धार्मिक सलोखा अधोरेखित होतो.

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र माने यांनी ब्लर्ब आणि प्रस्तावनेतून लेखक आणि कथासंग्रहाची चपखल ओळख करून दिली आहे. तर लेखकाच्या अनुभवांना शब्दरूप मिळण्याच्या प्रवासाची पार्श्वभूमी लेखकाने मनोगतातून अगदी सहज, थोडक्यात स्पष्ट केली आहे. पहिलाच कथासंग्रह असल्याने काही कमीजास्त होण्याच्या शक्यतेची जाणीव प्रांजळपणे मांडल्यामुळे फक्त हेच नाही तर पुढील लेखनप्रवासात लेखकाकडून अधिकाधिक उत्तम साहित्य भेटीस येत राहील याची खात्री वाटते.

'वाळन' ही पहिलीच कथा. मामाच्या गावाला शाळा शिकायला असलेला दत्ता आजोळच्या सर्वच कामांत हातभार लावायचा असं म्हणायला हरकत नाही. तरीही त्याला जी वागणूक मिळायची ती पाहून वाईट वाटतं. दत्ता शाळेत हुशार; पण परिस्थिती एखाद्याला कशी हतबल बनवते याची जाणीव ती वागणूक आणि ते 'वाळन' करून देतात. शेवटी मात्र परिस्थितीची टोचणी कथानकाला एका निर्णायक वळणावर आणते. संपूर्ण कथेत दत्ता आणि त्याची परिस्थिती नजरेसमोर उभे राहतात, हेच कथानकाचे यश आहे.

वर्षोनुवर्षे एका गावी जाण्यासाठी प्रवासाची अवस्था तीच असते. आणि गाव? गावात जो सर्व धर्मांचा एकोपा असतो, त्याला मात्र कुठेतरी गालबोट लागलेलं असतं. हा 'बदलाव' पाहताना आपसूकच आसपास घडणाऱ्या घटना आठवतात. तर दुसरीकडे 'ईदी' मागून खूश झालेल्या मित्रांचा आनंद फार काळ न टिकता मनात बरेच प्रश्नरूपी विचार रुजवून जातो.

पहिल्या मुलीच्या जन्मानंतर बहुतांश घरांमध्ये 'दुसऱ्या चान्स'ची चर्चा सुरू होते. गावी गेल्यावर अशाच चर्चेला वैतागलेल्या सोनलच्या डोळ्यांत शेवटी मात्र अतुलच्या एका निर्णयामुळे अश्रू तरळतात. त्या निर्णयामुळे अतुलच्या मनात प्रश्नांनी घर केलेलं खरं; पण तो आपल्या मुलीचा विचार करण्यात ठाम होता हेही खरं! इथला नायक या विषयावरील नेहमीच्या नायकांपेक्षा काहीसा वरचढच ठरतो हे मान्य करायला हवं. असाच गावाचा अनुभव सांगता सांगता एक ट्रेनचा प्रवास भेटीस येतो. काही जणांना इतरांना 'मनस्ताप' देण्यात असुरी आनंद मिळतो तशाच प्रवाशांची ही गोष्ट. अशीच मुंबईची लोकल आणि त्यातल्या सीटचे अलिखित नियम यावर भाष्य करणारी 'चौथी सीट' मुंबईच्या लोकलमधले सवयीचे प्रसंग डोळ्यांसमोर उभे करते.

परिस्थितीने घेतलेला बळी काय असतो हे 'जीवन एक संघर्ष' कथा वाचताना कळतं. पैशाचं सोंग आणता येत नाही असं म्हणतात आणि याचसाठी एक शेतकरी लहानसा धंदा सुरू करतो. अर्थात सावकाराची मदत घेऊन... पण हाच सावकार शेवटी या कुटुंबाच्या उद्ध्वस्त होण्यासाठी कारणीभूत ठरतो. ही हतबलता हृदयापाशी रुतणारी वाटते एवढं नक्की. पुढे शहरात आपलं घर असावं या स्वप्नासोबत एक खाऊनपिऊन सुखी कुटुंब भेटीस येतं. पाठोपाठ आणखी एका अगदी विरुद्ध बाजू असलेल्या कुटुंबाची ओळख होते. तिथे श्रीमंती तर असते; पण माणूस? माणसांसोबत नात्यांची वीण, जाणीव सगळंच हरवलेलं असतं. पैसा तर असतो; पण एक वेगळीच घुसमटही अस्तित्व दाखवते. हे हृदयस्पर्शी कथानक आजच्या 'वांझ श्रीमंती'ला व्यक्त करण्यात यशस्वी ठरले आहे.

'ती' जिच्या आयुष्यात तीन लग्नांनंतरही संसारसुख नव्हतंच. त्यामुळे ती एकटी असते; पण तिच्या 'काटक' वृत्तीने तिच्यातील एकप्रकारचा वेगळेपणा सिद्ध होतो. तर आणखी एक हल्ली बराच समोर येणारा विषय इथे वाचायला मिळतो. सुखी संसाराचे स्वप्न पाहिलेल्या अविनाशने आपल्या बायकोच्या शिक्षणासाठी, नोकरीसाठी मानसिक, आर्थिकदृष्ट्या बरीच मेहनत घेतलेली असते. मात्र नोकरीत स्थिरता आल्यावर तीच बायको आपल्या मुलींचाही विचार न करता त्याला अक्षरशः नकोसं करते. अशावेळी खरंच 'चूक कोणाची?' हा प्रश्न पडतो.

एखाद्याला मदत करताना मदत घेणाऱ्याची जी अवस्था असते, जे विचार असतात तेच विचार शेवटपर्यंत राहतील याची अजिबात खात्री नसते याची जाणीव करून देणारी कथा वाचकाला आपसूकच जवळची वाटेल. कारण बऱ्याच जणांना असा अनुभव आलेला असतो. प्रमोदने आपल्या मावसभावासाठी, अनिलसाठी परिस्थिती पाहता आवश्यक ते सगळं काही केलं. अगदी सगळं काही पुरवलं; पण तरीही शेवटी अनिलच्या चुका न पाहता सगळीकडून तोच दोषी ठरवला गेला. यात 'कृतज्ञ ते कृतघ्नते'चा धडा मात्र तो शिकलेला. आपल्याच दुकानात आपल्याच कामाचे, तेही 'बोहनी' करणारे पैसे मागण्यासाठी श्यामला मुजोरी सहन करावी लागते. तर ऑफिसमध्ये सर्वांना हैराण केलेला 'फापटपसारा'ही असाच अवतीभवती अनुभवलेला.

कथासंग्रह वाचताना प्रत्येक वेळी सकारात्मक प्रभाव आणि तसाच सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्नही जाणवतो. प्रत्येक कथेला वास्तवाची झालर आहे जी समाजभान, संयम राखून आहे. अनुभवांना कल्पनेची जोड देऊन लेखकाने परंपरा, संघर्ष, परिस्थिती, मानसिकता,.. अधोरेखित करत प्रबोधनाचा ठसा उमटवला आहे असं म्हणता येईल. या सर्वच कथांमधील पात्रं, घटनांमध्ये जिवंतपणा जाणवतो. कदाचित यामुळेच कल्पनेपेक्षा वास्तवाचे भान राखणारे लिखाण मनाला काहीसे जास्तच स्पर्शून जाते याचा प्रत्यय येतो. वऱ्हाडी भाषा समजत नसेल तरीही कथांमधील ती वऱ्हाडी पार्श्वभूमी उत्तमरीत्या वाचकांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरते. 'वाळन' कथेचा समावेश विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात झाला आहे हे या कथासंग्रहाच्या परिणामकारकतेचेच यश आहे. ग्रामीण आणि शहरी जीवनाचा समतोल साधत लेखकाने दोन्ही ठिकाणच्या वाचकांना आपलीशी वाटणारी भाषाशैली, विषय मांडून एक उत्तम रचना समोर आणली आहे. या कथासंग्रहाच्या निमित्ताने अतिशय सहजसोप्या भाषेतील उत्तम दर्जाचे साहित्य वाचायला मिळते. समाजाच्या छटा अनुभवत भावनिक, वैचारिक मंथन करायला लावणारे कथानक वाचायला मिळते. पुस्तकात काही तुरळक शब्दचुका आहेत; पण त्या तांत्रिक कारणांमुळे असाव्यात. ग्रामीण वातावरणात रुजलेल्या कथांची ओघवती भाषाशैली, मांडणी, रंजकता वाचकाला खिळवून ठेवतात. निवडक मुद्द्यांचा आणि पात्रांचा वापर करून उत्तम रचना केली आहे असे म्हणता येईल. किचकटपणाही जाणवत नाही, तसेच पुस्तक छोटेखानी आहे. एकूणच पुस्तकाचा साहित्यिक दर्जा, छपाई दर्जा उत्तम आहे असे म्हणता येईल.

असा हा ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित समाज, नाती, स्वभाव, सलोखा, प्रवास, परंपरा,... अशा विविधांगी छटा दाखवणारा 'वाळन' कथासंग्रह नक्की वाचून पहा.
© कामिनी सुरेश खाने (कलात्मक पान)
२३ जून २०२६

पुस्तकासाठी संपर्क : 7720945002


सदर लिखाणाचा कॉपीराईट लेखिकेकडे असून यूट्युब चॅनेल अथवा इतर कुठेही याचा वापर केला गेल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी.


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →