Login

तुझं माझं आभाळ पुस्तक परीक्षण

ईरा लेखिका सौ. सुप्रिया रामचंद्र जाधव यांच्या पुस्तकाबद्दल....
पुस्तक : तुझं माझं आभाळ
लेखिका : सौ. सुप्रिया रामचंद्र जाधव
प्रकाशन : वेलवेट कविशा प्रकाशन
परीक्षण : कामिनी खाने

लेखिका सौ. सुप्रिया रामचंद्र जाधव या ऑनलाईन व्यासपीठांवर लेखन करणाऱ्या एक समृद्ध लेखिका आहेत. ग्रामीण विषयावर त्यांची विशेष पकड असून त्यांच्या बहुगुणी व्यक्तिमत्त्वात लेखन, वाचन, वक्तृत्व, सादरीकरण,.. अशा नानाविध छटांचा संगम पाहायला मिळतो.

मुखपृष्ठावर रंगांची उधळण करणाऱ्या रम्य सांजेला साजेशा वातावरणात तळ्याकाठी बसलेलं एक जोडपं आणि समोरच आयुष्यभर जोडीदाराशी एकनिष्ठ राहणारे सारस पक्षी पाहून प्रेम आणि नात्याची अतूट वीण लक्षात येते. तर निसर्गरम्य वातावरणातील मानवी झलक कथासंग्रहातील समाज व्यक्त करत असावी. आभाळातील मुक्तविहार करणारे पक्षी वैचारिक मंथन, स्वातंत्र्य दर्शवत कथासंग्रहाची आणखी एक बाजू स्पष्ट करतात. तर ठळक, आकर्षक अक्षराचे 'तुझं माझं आभाळ' शीर्षक आणि लेखिकेचे नाव रंजकता, सौंदर्यासाठी चपखल ठरतात.

सदर पुस्तक हे वेलवेट कविशा पब्लिकेशनने केलेल्या जागतिक विक्रमात सहभागी पुस्तक आहे. सुरुवातीलाच मनोगतातून लेखिकेच्या साहित्यिक घडवणूक आणि निरीक्षणशक्तीची जाणीव होते. तर प्रसिद्ध लेखक देवा झिंजाड यांच्या प्रस्तावनेतून आणि प्रकाशिकेच्या ब्लर्बमधून लेखिकेचे सखोल निरीक्षण आणि कथांमधील वेगळेपण अधोरेखित होत राहते.

प्रेम या शब्दाच्या विविधांगी छटा दाखवणाऱ्या कथा या कथासंग्रहात वाचायला मिळतात. प्रेम म्हणजे प्रेम असतं; पण यात प्रत्येकाच्या मताला किंमत असते, हे अगदी योग्य शब्दांत सांगणारी 'योग्य समज' कथा, तर 'तुम दूर नजर आये'मधला अस्तित्वाची जाणीव ठेवलेला तरुण वयातील प्रेमाचा अंकुर. 'अधुरी एक कहाणी'मधील प्रेम, प्रेमाचा दिवस आणि त्यासोबत जोडलेला तो हळवा कोपरा प्रेमाच्या गडद छटेचा अनुभव देतात तर 'तुझं माझं आभाळ' ही सान्वी आणि रेगेन यांच्या प्रेमाची नावाप्रमाणेच अनोखी कहाणी. एका साधारण विचारांच्या कुटुंबातील मुलगी आणि परदेशातील मुलगा... कसं जुळतं हे नातं? यासाठी घरचे तयार होतात की नाही? या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी तर कथाच वाचायला हवी.

चांगुलपणा खरंतर मिरवण्यासारखा असतो नाही का! पण जेव्हा याच चांगुलपणाचा समोरून खूप फायदा घेतला जातो तेव्हा तो चांगुलपणासुद्धा फार त्रासदायक वाटतो. कुमुद पण अशीच चांगुलपणा अंगी असणारी स्त्री. याची किंमत मोजल्यानंतर एका मर्यादेनंतर एक नातं अबोल होतं खरं; पण तिच्या स्वभावाला मान मिळतो हेही खरं! तर दुसरीकडे अशाच हातचं राखून न ठेवता सढळ हाताने मदत करणाऱ्या सदाशिवला स्वतःची खराब परिस्थिती आल्यावर मात्र कोणीही मदत करत नाही. परिस्थिती बदलते की नाही? सदाशिव यातून काय शिकतो? असं बरंच काही जाणून घेण्यासाठी 'उदार हृदयाला फटका आणि शिकवण' कथा वाचायला हवी.

लग्नाच्या बंधनासोबत बरंच काही जोडलेलं असतं आणि यातील लहानसहान गोष्टी लक्षात घेऊन महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकणाऱ्या कथासुद्धा इथे वाचायला मिळतात. पैसा, सौंदर्य अशा गोष्टीत न अडकता स्वभाव जाणून घेऊन साथीदाराची निवड करणं कसं योग्य आहे हे सांगणारी 'निवड' कथा असो नाहीतर दिखाऊ लग्न टाळून जास्त खर्च न करता, मुलीकडची परिस्थिती समजून समंजसपणे वागणाऱ्या स्थळाची आणि जुळणाऱ्या नात्याची 'अजून काय हवं?' कथा. हल्लीच्या हुंडाबळी घटना पाहताना एका ठाम निर्णयाची किती आवश्यकता आहे हे क्षणोक्षणी जाणवत असतं. अशाच भर लग्नात ठाम निर्णय घेणाऱ्या नंदिनीची 'निर्णय' कथा आजच्या आणि जुन्या पिढीने आवर्जून वाचावी अशीच आहे. याशिवाय कौमार्य विषयाला हात घालणारी 'डाग' कथा परंपरा वेळेनुसार बदलू शकतात, याची जाणीव करून देते. तर रंगावरून मोल ठरणाऱ्या संसाराची परिस्थिती आणि नवऱ्याची साथ दाखवणारी 'कुरुप कोण?' कथासुद्धा वास्तवाची झालर राखणारी आहे. मानपानाचा खेळ, नवऱ्याने बायकोला मदत करणं, आपल्या माणसांसाठी खपणारी 'ती', तिच्या नोकरी असण्या-नसण्याने तयार झालेली एक गाठ, उंबरठ्याआडच्या कैदेत वर्षोनुवर्षे राहिलेली 'ती',.. अशा अनेक गोष्टींचा ऊहापोह करताना लग्न आणि स्वभावाच्या विविध छटा डोकावत राहतात.

रिटायर 'अडचणी'ला समोर आणणारी कथा कोणताही जास्तीचा ड्रामा न दाखवता एक साधंसरळ चित्र समोर उभं करून सकारात्मक प्रभाव टाकते. 'शिक्षेच्या धड्यात' विद्यार्थ्यांचा राग, शिक्षेसाठी प्रतिक्रिया, गुरुजींचा राग, शिकवण,... असं बरंच काही अनुभवायला मिळतं. शेजारधर्मातून नाती कळतात. प्रत्येकाचं वेगळेपण लक्षात घेऊन बोध देणारा 'बगीचा' फुलतो आणि संकल्पाचा हलकेफुलकेपणाही अनुभवायला मिळतो.

सहजसोपी भाषाशैली ही या कथासंग्रहाची सर्वात जमेची बाजू म्हणता येईल. सामाजिक विषयांवर भाष्य करणारं कथानक कमी शब्दांत, तितकीच परिणामकारकता ठेवून मांडणं लेखिकेला उत्तमरीत्या जमलं आहे. सगळं काही आपल्या आजूबाजूला घडणारं; पण तरीही वाचताना हवंसं वाटणारं. अगदी लहानशा कथा आहेत ज्यात सकारात्मक छटांचा शिडकावा आहे. यात समाज, प्रेम, लग्न, नाती, स्वभाव, सहजता,... असं बरंच काही अनुभवायला मिळतं. विषयाच्या सुरेख मांडणीमुळे वाचताना कंटाळा येत नाही. स्त्रीच्या आयुष्यातील संघर्ष, प्रेमाचे रंग, मानसिकता, परंपरा,... अशा कित्येक मुद्यांना लेखिकेने हात घालून त्यांना योग्य न्याय दिला आहे. पुस्तक वाचल्यावर प्रस्तावनेतील वाक्य आवर्जून आठवतं की या कथांतून स्त्रीलेखनाची नवी दिशा दिसते जी ना अतिशय आक्रमक आहे, ना अतिशय भावुक; तर ती साधी, सच्ची आणि प्रभावी आहे. आणि खरोखरच या कथासंग्रहातील प्रत्येक कथा अशीच प्रभाव पाडणारी आहे. कथेनुसार भाषा सुयोग्य वळणं घेत जाते. काळाची गरज असलेले बरेचसे विषय वाचायला मिळतात हे विशेष. तांत्रिक चुकासुद्धा अगदीच नगण्य असून ओघवती भाषाशैली, मांडणी, विषय, वास्तववादी चित्रण, सकारात्मकता,... अशा अनेक गोष्टी पाहता पुस्तकाचा छपाई दर्जा आणि साहित्यिक दर्जा उत्तम आहे असं म्हणता येईल.

समाज, प्रेम, लग्न, नाती, स्वभाव, स्त्री, परंपरा, संघर्ष, मानसिकता,... अशा अनेक विषयांना स्पर्श करणारा हा सुरेख कथासंग्रह नक्की वाचून पहा.

© कामिनी सुरेश खाने (कलात्मक पान)
६ जून २०२६

सदर लिखाणाचा कॉपीराईट लेखिकेकडे असून यूट्युब चॅनेल अथवा इतर कुठेही याचा वापर केला गेल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी.



0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →