Login

पडसाद पुस्तक परीक्षण

ईरा लेखिका स्वाती बालूरकर देशपांडे लिखित पडसाद पुस्तकाबद्दल...
पुस्तक : पडसाद
लेखिका : स्वाती बालूरकर देशपांडे
प्रकाशन : लोकव्रत प्रकाशन
परीक्षण : कामिनी खाने

कोणतीही घटना तिचे लहानमोठे पडसाद उमटण्याची जणू काळजी घेत असते. अशाच काही अनुभवांचे 'पडसाद' दाखवणारा हा कथासंग्रह.

लेखिका स्वाती बालूरकर देशपांडे या प्रामुख्याने ऑनलाईन व्यासपीठांवर लेखन करणाऱ्या एक समृद्ध लेखिका आहेत. शिक्षिका असलेल्या लेखिकेचा ललित, काव्य, कथा असा विविधांगी लेखन वावर आहेच; पण 'केली पण प्रीती' हा छापील स्वरूपातील कथासंग्रहही प्रसिद्ध आहे.

मुखपृष्ठावरील अमूर्त कलेच्या माध्यमातून काही मानवी चेहरे, अर्थात स्त्री चेहरे समोर येतात. आकारांच्या गुंत्यात अडकलेल्या मिटलेल्या डोळ्यांना पाहून एकप्रकारची गूढता, वैचारिक खोली जाणवते. तर या गुंत्याबाहेरचे पक्षी स्त्री स्वातंत्र्याला दर्शवत असावेत. लोकव्रत प्रकाशनाच्या ब्लर्बमुळे लेखिका आणि सदर कथासंग्रह दोन्हींची थोडक्यात पण अचूक ओळख होते.

सुरुवातीलाच प्रकाशकीयच्या निमित्ताने डॉ. शिरीष कुलकर्णी यांनी केलेलं प्रत्येक कथेचं विश्लेषण आणि एकंदरीत आढावा या कथासंग्रहाला चपखलपणे व्यक्त करतात. त्यांचं सुरुवातीचं 'सयंत, सुसंवादी पण परिणामकारक शैलीत विचारमंथन करणारा कथासंग्रह म्हणजे पडसाद.' हे वाक्य मनोमन पटतं. तर मनोगतात लेखिका सांगतात तसं या कथासंग्रहात स्पष्ट, कुजबुजणारे स्वर, निःशब्द स्वर, जिवंत अनुभव आहेत. त्याही पलीकडे म्हणजे हे पडसाद आहेत. आणि खरोखरच प्रत्येक कथेसोबत या पडसादांची जाणीव होत राहते.

चौकट शब्दासोबत आपसूकच एक बंधन, मर्यादा समोर येते. 'अनाकलनीय चौकट' ही अशाच मर्यादेत राहणाऱ्या केतकीची कहाणी. लग्नाच्या इतक्या वर्षांनंतर नवऱ्याचं सत्य समोर येणं आणि त्यावर बदला म्हणून तिने काहीतरी चौकटीबाहेरचं ठरवणं; पण तरीही चौकटीत राहणं! अशी काहीशी ही कथा. तर सापशिडीच्या खेळात जसं कितीही शिड्या चढल्या तरी कोणताही साप माणसाला शून्यावर आणू शकतो याचं मर्मस्पर्शी वर्णन करणाऱ्या 'सापशिडी' कथेतील अरुण आणि संजनाच्या आयुष्यात सापामुळे एक वाईट वळण येतं. ते वळण काय? सापाचा या दोघांशी काय संबंध असेल? याची उत्तरं तर कथा वाचतानाच समजतील.

'तहान' ही एक हृदयाला चटका लावणारी कथा म्हणता येईल. सध्याच्या घडीला जो बलात्काराचा विषय सतत या ना त्या तऱ्हेने समोर येतोय, तो या कथेत समोर येतो. अवघ्या पाच-सहा वर्षांच्या मुलीबाबत घडलेली ही घटना. तिला आईवडिलांच्या अनुपस्थितीत सांभाळणाऱ्या शांताक्काच्या मनातही नव्हतं की हे असं काही होईल; पण दहावीत असलेल्या रक्षितच्या तहानेने त्या चिमुकल्या जीवाच्या आयुष्याला भलत्याच दरीत लोटलं. तर 'असं का झालं?' ही अशीच काहीशी आणखी एक कथा. श्यामलच्या प्रेमात असलेल्या नंदूने एकदा तिला आडबाजूला डोंगरावर नेलं. अर्थात त्याचा हेतू वाईट नव्हता; पण त्याला हा सल्ला देणाऱ्या मित्रांपायी श्यामलचा मात्र बळी गेला. प्रतिमा, प्रतिष्ठा, अब्रू,.. अशा अनेक गोष्टींचा विचार करून तिने जीव दिलेला. कारण फक्त नि फक्त ते मित्र! आणि नंदू? त्याच्या प्रेमाने; मित्रांवरील आंधळ्या विश्वासाने त्याचंही आयुष्य उद्ध्वस्त केलं. 'वासना' या विषयाला हात घालणाऱ्या या कथांमधून नकळत आजचं भयाण वास्तव डोळ्यांसमोर उभं राहतं.

'बाप माणूस' कथेतील अरविंद, एक जबाबदारी निभावणारा व्यक्ती; पण सध्या अगदीच एकटा पडलेला. हळूहळू उलगडतं त्याच्या बायकोचं सोबत नसणं आणि मुलांच्या अस्तित्वाचं कारण! असा जीव लावणारा 'बापमाणूस' दुर्मीळच... तर 'वांझोटी' आहे 'ती'ची कहाणी. जिला मातृत्व मिळण्यासाठी खूप काही सहन करावं लागतं. स्वप्नांनी त्रासलेली ती पाहताना मन व्याकूळ होतं. तिच्या भूतकाळात मात्र बरंच काही घडून गेलेलं, ज्याची तिला स्वतःलाच जाणीव नव्हती. मातृत्व दूर जाण्यामागे भूतकाळातील कर्मांचा हिशोब होता का? की मग घराण्याची परंपरा पुढे चालली होती? या बापाच्या आणि आईच्या अस्तित्वाच्या कहाण्या मनावर विचारांची पावलं उमटवत जातात.

एक अपघात, जिथे नीलांबरीचा मृत्यू होतो. ओळखपत्रे आणि इतर सामानावरून नवऱ्याला, रोहनला बोलावलं जातं; पण त्याला मात्र ती आपली बायको आहे हे मान्य नसतं. पोलिसांचा संशय, नानाविध तर्क आणि रोहनच्या मनातील भावना व्यक्त होत असतानाच तिची खबर मिळते. नक्की काय झालेलं? हा अपघात म्हणजे नाटक होतं की आणखी काही? 'कोडे सुटेना' कथेत असं एक रहस्यमय वातावरण अनुभवायला मिळतं. तर 'फक्त एकदा!' या काहीशा गूढ कथेत नवीन ठिकाणी राहायला आलेल्या वंदनाला त्या घरात एकटी असताना काही वेगळे, विचित्र अनुभव येतात. सहजासहजी कुणी विश्वास ठेवू शकत नाही अशा गोष्टी ती अनुभवत असते. मात्र शेवटी घरमालकीण आल्यावर वंदनाला त्या एका अतृप्त इच्छेबद्दल कळतं. ती अतृप्त इच्छा काय, यामागची पार्श्वभूमी काय हे जाणून घेण्यासाठी तर कथाच वाचायला हवी.

आवश्यक वेळी बाईला आपलं रूप बदलावंच लागतं याची जाणीव करून देणारी 'भाग्यरेषा' आणि अनेक निराशेच्या पावलांनंतरही कृष्णावर ठाम विश्वास दाखवून तो विश्वास सार्थ ठरतो हे सांगणारी 'कृष्णा, तू असतोस पाठीशी' ही कथा म्हणजे घरसंसारासाठी आयुष्य वेचणाऱ्या स्त्रियांना अधोरेखित करणाऱ्या छटाच! 'भयभीत' कथेतील सततच्या त्रासामुळे घाबरलेली अन् शेवटी काही खुलासे झाल्यावर भयमुक्त झालेली मीनल आणि कचरा वेचणाऱ्या सुभागीच्या परिस्थिती अन् विचारांचा फायदा घेत झालेला एक सौदा दाखवणारी 'सौदा' कथा परिस्थितीनुरूप मानसिक स्थिती कशी असते याचा विचार करायला लावतात.

जातीयवाद विषयावरील वादविवाद स्पर्धेला गाजवलेली शर्वरी स्वतःच एका जातीयवादी दंगलीच्या विळख्यात सापडते. पण जातीधर्माच्या चौकटीपलीकडे मैत्री निभावणाऱ्या तिच्या तोंडून आपसूकच बाहेर पडलेले दोन शब्द तिला या जाळ्यातून सुखरूप बाहेर काढतात. एकंदरीत सकारात्मक छटा दाखवणारी ही 'याह अल्लाह!' कथा. तर कुणाशीही न बोलणाऱ्या रूक्ष स्नेहासोबत बोलण्याची धडपड करणारी प्रिया; अशा दोघींभोवती फिरणारी एक वेगळी कथा. दोन टोकं असलेल्या या दोघींचं नातं तयार होतं का? कोणाच्या आयुष्यात कसे, काय परिणाम होतात? अशा विचारांची सांगड घातलेली 'अंकुर' कथा आणखी एक वेगळी छटा दाखवते.

या कथासंग्रहात स्त्री विषय केंद्रस्थानी पाहायला मिळतो. स्त्री काय किंवा पुरुष काय, एकंदरीत आयुष्यातील लहानमोठ्या घटनांचे 'पडसाद' कसे आयुष्यावर ठसे उमटवतात, हे सांगणाऱ्या या कथा. काही उमलणारे, विखुरणारे प्रवास समोर येतात. कुठे प्रतारणा दिसते तर कुठे हतबलता! वासना, नियती, लबाडी, कोरडेपणा, प्रेम, एकाकीपणा, नैराश्य,... अशा नानाविध छटांचा संगम इथे अनुभवायला मिळतो. 'पडसाद' या शीर्षकाला साजेशी वातावरणनिर्मिती लेखिकेने केली आहे. वाचताना स्त्री आणि पडसाद हे शब्द सतत मनात रुंजी घालतात. ओघवती भाषाशैली, मांडणी, विषय वाचकाला कथेशी जोडून ठेवतात. जुन्या-नव्या पिढ्या वाचू शकतील असे उद्बोधक विषय लेखिकेने उत्तमरीत्या गुंफले आहेत. पुस्तकात काही तुरळक शब्दचुका आहेत; पण त्या तांत्रिक कारणांमुळे असाव्यात. भाषाशैली, मांडणी, वास्तवाची झालर, समाजभान, संयम आणि संवेदनशीलतेची जोड असलेली परखडता,... अशा अनेक गोष्टी पाहता पुस्तकाचा छपाई दर्जा आणि साहित्यिक दर्जा उत्तम आहे असं म्हणता येईल.

स्त्री, पुरुष, मनाचा डोह, भावनांचा कल्लोळ, वास्तव, समाज,.. अशा विविधांगी विचारांनी रुजलेला हा 'पडसाद' कथासंग्रह नक्की वाचून पहा.
© कामिनी सुरेश खाने (कलात्मक पान)
१२ मे २०२६

सदर लिखाणाचा कॉपीराईट लेखिकेकडे असून यूट्युब चॅनेल अथवा इतर कुठेही याचा वापर केला गेल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी.




0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →