पुस्तक : मार्तंड
लेखिका : निशा संजय थोरे
प्रकाशन : सदिच्छा पब्लिशिंग हाऊस
परीक्षण : कामिनी खाने
लेखिका : निशा संजय थोरे
प्रकाशन : सदिच्छा पब्लिशिंग हाऊस
परीक्षण : कामिनी खाने
लेखिका निशा संजय थोरे या ऑनलाईन व्यासपीठांवर लेखन करणाऱ्या एक समृद्ध लेखिका आहेत. कौटुंबिक, प्रेम, रहस्य, ऐतिहासिक असे विविधांगी लेखन करणाऱ्या लेखिकेची आतापर्यंत दोन पुस्तके प्रकाशित असून सदर 'मार्तंड' ही ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली कादंबरीसुद्धा लेखिकेच्या व्यासंगी लेखनाची जाणीव करून देते.
सुरुवातीलाच मुखपृष्ठावरील 'इतिहासाच्या पानांत हरवलेली एक रक्तरंजित प्रेमकहाणी...' या वाक्यासह आकर्षक सोनेरी रंगाचे 'मार्तंड' शीर्षक लक्ष वेधून घेते. 'मार्तंड' शब्दातील तलवारीचा वापर कादंबरीतील शौर्याला व्यक्त करतो. तर किल्ला आणि त्यावरील भगवा ध्वज शिवकालीन पार्श्वभूमी स्पष्ट करतात. तिथेच एक मावळा एका पायात घुंगरू बांधलेल्या, भरजरी पोशाख व दागिने घातलेल्या स्त्रीला जणू किल्ला आणि स्वराज्याची ओळख करून देत असावा. तर बाजूलाच एक मावळा घोड्यावर एका नऊवारी नेसलेल्या स्त्रीसोबत स्वार आहे आणि त्यांच्यामागे सैन्य ढाल-तलवारी घेऊन धावत आहेत, यावरून पाठलागाची पार्श्वभूमी दिसून येते. बाजूला एका नावेशेजारी चिता जळताना दिसते. मलपृष्ठावर एकीकडे लढाईचे दृश्य आहे तर दुसरीकडे एक जोडपे चंद्राच्या साक्षीने नदीकिनारी बसलेले आहे. एकाच वेळी इतिहास, युद्ध परिस्थिती, शौर्य आणि प्रेमकथेला व्यक्त करणारे हे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ पुस्तकाबद्दल उत्सुकता निर्माण करतात.
ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित कादंबरीला व्यक्त करत प्रसिद्ध लेखक देवा झिंजाड यांनी प्रस्तावना आणि ब्लर्बमधून अगदी चपखल शब्दांत कादंबरी आणि ऐतिहासिक लेखनाला मांडलं आहे. 'ऐतिहासिक कल्पित लेखन करताना लेखकाची जबाबदारी ही एखाद्या अग्निपरीक्षेपेक्षा कमी नसते.' हे वाक्य खरंच वास्तवाची जाणीव करून देणारं आहे. लेखिकेच्या जबाबदार लेखनाचा अनुभव येणं हे कादंबरीचं यश आहे. ऐतिहासिक लेखनाकडे वळण्यापासून ते ऐतिहासिक कादंबरी निर्मिती करेपर्यंतचा प्रवास लेखिकेने मनोगतातून सहजपणे व्यक्त केला आहे.
कादंबरीच्या सुरुवातीलाच समोर येते एक शहजादी, तिला वाचवणारा 'तो' आणि स्वराज्यातील महत्त्वाच्या घडामोडी... अर्थात या सर्व गोष्टींच्या कड्या जुळलेल्या आहेत. 'मार्तंड' स्वतःच्या शौर्याने आदिलशाहीच्या सैन्यात स्थान मिळवतो खरा; पण तरीही आदिलशाहीतून काही शंकाकुशंका होत्याच. पुढे येतात काही परीक्षा आणि रंगमहालाच्या प्रकरणासोबत खऱ्या अर्थाने कादंबरीतील महत्त्वाच्या वळणांना सुरुवात होते. अमीनाबाईच्या कोठीत मार्तंडबाबत काही डाव रचले जातात. तेव्हाच एक लावण्यवती प्रकाशझोतात येते, ती म्हणजे मेहर. मार्तंडच्या शौर्याने तीही नकळत त्याच्यावर भाळते; पण कोठीत आणि मार्तंडच्या आयुष्यात जे काही सुरू असतं त्यामुळे या दोघांची जवळीक इतकीही सोपी नक्कीच नसते. दोन जीवांना एकमेकांसाठी ओढ जाणवत असतानाच अचानक मार्तंडला बाजींकडून परतीचं बोलावणं येतं आणि दोघांच्याही मनात एक अनामिक वादळ उठतं. शेवटी चंद्राच्या साक्षीने भावनांना वाट गवसतेच...
अफजलखानाची अपकीर्ती आणि त्याच्या कुकर्मात साथ देणारी आपलीच माणसं बघून नकळत रक्त खवळतं. पण दुसरीकडे तुळजापूरच्या भवानी मातेवर आलेलं संकट आणि ते दूर ठेवण्यामागे घेतलेली मेहनत पाहून आपल्या स्वराज्याच्या मावळ्यांचा अभिमानही वाटतो. अफझलखानाची पार्श्वभूमी, तुळजापूर घडामोडी लिहिताना ऐतिहासिक पार्श्वभूमी योग्य रीतीने, घटनांना धक्का न लागू देता समोर आणण्याचा प्रयत्न लेखिकेला छान जमलाय. आडून आडून जे गुप्त संवाद, सांकेतिक संवाद येतात त्यातून बरेच तर्कवितर्क लावले जाऊ शकतात. कावेरी-मेहरचा प्रवास वाचल्यावर राजेंच्या कृपेने स्त्रीच्या अब्रूला मिळालेल्या संरक्षणाचा आणखीनच अभिमान वाटतो. नाहीतर आज परिस्थिती नक्कीच निराळी असती.
मार्तंडची आसपासच्या राजकारणात, काय भूमिका आहे याची जाणीव करून देणारे प्रसंग एकामागोमाग एक येत राहतात. हे सगळं सुरू असताना 'बडेखान' या पात्राबद्दल एकप्रकारची उत्सुकता वाटते. कैद होऊनही 'सावित्री'चे करारीपणा, निडरपणा, हुशारीचे गुण लक्षात राहण्यासारखेच. मार्तंड आणि सावित्रीला बंदी बनवल्यानंतरचे प्रसंग तर अक्षरशः काळीज पिळवटून टाकणारे आहेत. सावित्रीच्या इभ्रतीचा प्रश्न असतानाच अचानक मेहरचं सौंदर्य तिथे मदतीला धावून येतं. तुळसा नावाची रणचंडिका 'स्त्री' त्याहीवेळी सक्षम, शूर होती याची ग्वाही देणारी ठरते. बंदीवानांचा सुटकेचा थरार, ते शर्थीचे प्रयत्न पुन्हापुन्हा शिवरायांच्या काळातील घटना आपण प्रत्यक्ष जगत आहोत अशी जाणीव करून देतात आणि मावळ्यांच्या निष्ठेचीही... चंद्रभागेतीरी एक जिजाऊंची लेक स्वराज्याच्या कामी येते आणि मुखपृष्ठावरील ती नावेशेजारची चिता डोळ्यांसमोर ज्वाळांनी भडकत राहते. 'ती' नक्की कोण? हे तर कादंबरी वाचल्यावरच कळेल.
बहिर्जींचं अनोखं रूप, कावेरीची नव्याने ओळख, काही खुलासे यांसोबत कथानक अंतिम टप्प्यात येतं. एकीकडे शिवा आणि त्याच्या बायकोसारखी जीव वाचवणारी माणसं, तर दुसरीकडे धनासाठी इमान विकणारा गावकरी; स्वराज्यातील इमानदारी आणि आपल्यातलेच शत्रू दोन्हींचं इथे दर्शन घडतं. 'त्या'चा तो एक अखेरचा मुजरा आणि कावेरीने दुःखावेग आवरून दाखवलेली हुशारी, तत्परता काळजाला भिडतात. सुभानमंगळ किल्ल्यावर अखेर तो महत्त्वाचा निरोप पोहोचतो आणि मावळ्यांच्या निष्ठेची प्रचिती येते.
बऱ्याच वर्षांनंतर घरी गेलेली कावेरी, अफझलखानाचा वध आणि स्वराज्यातील आनंदोत्सव पाहताना मन आनंदाने भरून येतं. तर राजगडावर जाण्यासाठी आलेला सांगावा आणि मल्हारीच्या आईचा आक्रोश बघून नकळत डोळे ओलावतात. शिवबा आणि जिजाऊंच्या शब्दांनी आधार नव्याने समजतो. एक तडफदार अध्याय संपूनही एक नवा अंकुर या स्वराज्याच्या हितासाठी रुजलेला असतो. कादंबरीची पानं संपतात; पण एका उग्र वादळाच्या अस्तित्वाने सुरू होणाऱ्या अध्यायाची चाहूल देतच...
या कादंबरीच्या निमित्ताने स्वराज्याच्या मावळ्याला पुढे आणणारी एक अनोखी, दर्जेदार ऐतिहासिक प्रेमकथा वाचायला मिळते. ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन इतिहासाची मोडतोड न करता ऐतिहासिक-कल्पित लेखन समोर आणण्याचा प्रयत्न लेखिकेला उत्तमरीत्या जमला आहे. शिवरायांचे गुप्तहेर खाते आणि अफझलखानाचे आक्रमण, हे या कथानकातील महत्त्वाचे मुद्दे आहेत. प्रसंगांची गुंफण वाचकांना कथेशी जोडून ठेवते. महत्त्वाच्या ऐतिहासिक पात्रांवर समोर येणाऱ्या कादंबऱ्यांमध्ये एका साधारण तरीही असाधारण अशा मावळ्याची भूमिका, आयुष्य समोर आणण्याचा हा विचार त्या काळाची एक वेगळी बाजू मांडणारा ठरतो. शिवरायांच्या काळातील गुप्तचर विभागाच्या कामाची सूक्ष्म, अभ्यासपूर्ण बाजू हेर विभाग आणि लेखिका दोन्हींच्या कामातील बारकावे लक्षात घ्यायला लावणारी आहे. इतिहास म्हणजे गंभीर विषय ही चौकट काहीशी विसरायला लावून हळव्या, तितक्याच शूर क्षणांची उधळण करत इतिहासाची पाने समोर येतात आणि वाचनात रंजकताही अनुभवायला मिळते. आलंकारिक, ऐतिहासिक, ग्रामीण, राजेशाही,.. अशी प्रत्येक भाषाशैली छान जमली आहे, प्रसंगानुरूप भाषा योग्य वळण घेते. ज्यामुळे वाचक खिळून राहतात. ऐतिहासिक लेखन न आवडणाऱ्यांनाही आवडेल अशी ही कादंबरी. लेखिकेने ऐतिहासिक आणि काल्पनिक घटनांचे खुलासे करून यालाच इतिहास समजू नये ही विनंती केल्याने वाद, आक्षेप नक्कीच टाळले जातील. कादंबरी कुठेही भरकटलेली न वाटता सहज, चित्तवेधक आहे. तांत्रिक चुकासुद्धा तुरळक प्रमाणात आहेत. संदर्भांचा उल्लेख केल्याने विश्वासार्हता वाढते. भाषाशैली, मांडणी, विषय, सखोल अभ्यासपूर्ण लेखन, इ. गोष्टी पाहता कादंबरीचा साहित्यिक दर्जा, छपाई दर्जा अतिशय उत्तम आहे असे म्हणता येईल.
बडेखान कोण? मार्तंडसोबतची 'ती' कोण? स्वराज्याच्या सेवेतील निष्ठावंत, शिवरायांच्या काळातील थरार आणि पराक्रम जाणून घेण्यासाठी ही प्रेम, इतिहास, शौर्य, निष्ठा, बलिदान, बुद्धिमत्ता, त्याग, इ. ची गुंफण असलेली सुरेख कादंबरी नक्की वाचून पहा.
© कामिनी सुरेश खाने (कलात्मक पान)
३० जून २०२६
© कामिनी सुरेश खाने (कलात्मक पान)
३० जून २०२६
पुस्तकासाठी संपर्क : 9890495565
सदर लिखाणाचा कॉपीराईट लेखिकेकडे असून यूट्युब चॅनेल अथवा इतर कुठेही याचा वापर केला गेल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी.
