Login

केळफूल पुस्तक परीक्षण

ईरा लेखिका सारिका कंदलगांवकर लिखित 'केळफूल' पुस्तकाबद्दल...
पुस्तक : केळफूल
लेखिका : सारिका कंदलगांवकर
प्रकाशन : युगंधरा पब्लिकेशन
परीक्षण : कामिनी खाने

लेखिका सारिका कंदलगांवकर म्हणजे ऑनलाईन, तसेच ऑफलाईन लेखन करणाऱ्या एक समृद्ध मराठी लेखिका आहेत. कौटुंबिक विषयांवर तर त्यांची विशेष पकड आहेच; पण प्रेम, सामाजिक, रहस्य रोमांचक कथालेखनातही हातखंडा आहे. ऑनलाईन प्रकाशित साहित्यासोबतच लेखिकेच्या 'समर्थांची लेक', 'देवी रक्षति रक्षितः' या लोकप्रिय कादंबऱ्याही प्रसिद्ध आहेत.

सुरुवातीलाच मुखपृष्ठावरील आकर्षक अक्षरांचे केळफूल शीर्षक आणि ते केळीच्या झाडाचे प्रसन्न चित्र लक्ष वेधून घेते. केळीचे पक्व आणि कच्चे घड समाजमनाच्या दोन रूपांचं प्रतिनिधित्व करतात, तर ती पाठमोरी स्त्री समंजसपणे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन दर्शवते. शांतता, चैतन्याचे प्रतिक असलेल्या हिरव्या रंगाची केळीची पाने 'ती'ची शांत, सकारात्मक छटा व्यक्त करतात. स्त्री आणि केळफूल ही तुलना नवनिर्मिती, स्त्रीविश्वाचे नानाविध पदर अधोरेखित करते. तर ब्लर्बमधून समोर येणारा प्रसंग स्त्रीला या पुस्तकाशी भावनिकदृष्ट्या आपलंसं करणारा ठरतो.

प्रसिद्ध लेखिका डॉ. स्मिता दातार यांनी प्रस्तावनेतून लेखिकेच्या लेखनशैलीची आणि कथाविश्वाची सुरेख ओळख दिली आहे. तर मनोगतातून लेखिकेने कथांचा आढावा घेत 'केळफूल' व्यक्त केलं आहे.

सुरुवातीलाच 'पहिलटकरीण' कथेसोबत स्त्रीचा नवा जन्म मानला जाणारा बाळंतपणाचा अनुभव मांडून लेखिका आपल्याला स्त्री विश्वात प्रवेश करायला लावते. जुन्या काळी लवकर लग्न झालेल्या 'ती'च्यापासून वय झालेल्या आईच्या काळजीपोटी पुढे येणारी 'ती'सुद्धा इथे भेटीस येते. लग्न आणि माहेर या विषयाचे अनेक पैलू इथे समोर येतात. आई गेल्यानंतर दागिन्यांवरून आलेला दुरावा असो किंवा मग लग्नानंतर पाहुणी झालेली ती! तिच्या मनाची अवस्था काय? याचा प्रत्यय कथा वाचताना येतो. नणंद म्हणजे कटकट, हक्क मागणारी अशी एक प्रतिमा तयार केली गेली आहे. मात्र नणंदासुद्धा जबाबदारी जाणतात, त्यांना माहेरच्या प्रेमळ ऊबेची आस असते. एकाने केलं म्हणून सर्वांना त्याच तराजूत तोलणं किती चुकीचं आहे हे सांगणाऱ्या कथा आवडण्यासारख्याच...

तिचं 'अफेअर', तेही लग्नानंतर... एक मुलगा असूनही ती या निर्णयापर्यंत पोहोचते. का? कसं? परिणाम? याभोवती फिरणाऱ्या कथानकासोबत तिच्या मर्यादा आणि विचारांची स्पष्टता समोर येते. तर लग्न, संसार, मुलं, जबाबदारी,... या सगळ्यात नवराबायकोच्या नात्यालाही एक वेळ हवा असतो. तोच विचार करून पुढाकार घेणाऱ्या तिच्या पदरी अहंकार, अपमानाचे वार येतात. ती तुटक होताच त्याला मात्र जाणिवा छळतात आणि संसारात समंजसपणा अस्तित्व दाखवतो; पण खरंच हे सर्व इतकं सहज असतं?

अवघा पाच वर्षांचा संसार आणि एक वर्षाचा मुलगा असलेल्या त्याचं अचानक जाणं काय परिस्थिती निर्माण करतं, तिच्या आयुष्यात काय पडसाद उमटतात इथपासून ते नवरा गेला की बायकोच्या नटण्यावर ज्या मर्यादा येतात त्या न पाळणाऱ्या ती'च्या कथेपर्यंत, तिच्या वागण्यामागची कारणं आणि आसपासच्या लोकांचा दृष्टिकोन यावर उजेड टाकणाऱ्या प्रबोधनपर कथा वास्तवाची जाणीव करून देतात.

'तू जाताना' कथा वाचताना तर नकळत डोळे ओलावतात. तिचा तो शेवटचा प्रवास वाचणं खरंच मनाला छळत राहतं. आयुष्याची सुरुवात जगताना अचानक शेवटच्या क्षणांची साठवण करणं काय असतं हे इथे समजतं.

जरी ती रखुमाई असली, तरी एक बायको आपल्या हक्काच्या वेळासाठी नवऱ्यावर रुसूच शकते, नाही का! 'चारचौघीं'ना गवसलेलं 'हरवलेलं माहेर', दैवाचा विचित्र खेळ, प्रेमाच्या आणाभाका, तिच्या जगात एक अनामिक ओळख निर्माण केलेली ती,... असं वैविध्य राखणाऱ्या या कथा आहेत. संसारातल्या प्रत्येक कुरबुरीचा उपाय एकमेकांपासून वेगळं होणं हाच असतो का? यासारखा विचारही या कथा करायला लावतात.

या कथासंग्रहाच्या निमित्ताने काही नेहमीचे, आसपास घडणाऱ्या घटनांचे विविधांगी पैलू समोर आणणारे प्रसंग परिणामकारकरीत्या समोर येतात. वास्तवाला कल्पकतेची झालर म्हणावी अशा या कथांमधून वास्तवाचे बाण मनात टोचत राहतात. काही कथा 'ओपन एंड कथा' प्रकारच्याही वाटू शकतात. त्यामुळे अपूर्णतेचा शिक्का न देता त्या शेवटानंतरच्या शक्यतांचा विचार करण्याला वाचकांना वाव आहे. नणंद या शब्दाचा अर्थ नव्याने सांगणाऱ्या कथांची रेलचेलसुद्धा नाती नव्याने समजायला लावणारी आहे. किंबहुना प्रत्येक कथेत मांडल्या गेलेल्या नात्यांचा विचार दृष्टिकोनाला नवा मुलामा देणारा ठरतो. तिची स्वप्नं, जबाबदाऱ्या, नाती, हतबलता, नियती, प्रेम या साऱ्या गोष्टींना इथे वाचा फुटते. स्त्री विश्वाच्या छटांचा हा संगम कधी हळवं व्हायला लावतो तर कधी कठोर! कथांची पार्श्वभूमी एकप्रकारची परखडताही घेऊन येते. शीर्षकाला साजेसे स्त्रीच्या आयुष्यातील विविध पदर इथे उलगडतात. लेखिकेच्या ओघवत्या भाषाशैली आणि मांडणीमुळे कथा वाचताना कुठेही क्लिष्टता जाणवत नाही. पुस्तकात काही शब्दचुका आहेत; पण त्या तांत्रिक कारणांमुळे असाव्यात. भाषाशैली, विषय, मांडणी, वास्तवाची जाणीव, सकारात्मकता,... अशा अनेक गोष्टी पाहता पुस्तकाचा छपाई दर्जा आणि साहित्यिक दर्जा उत्तम आहे असं म्हणता येईल.

'अफेअर'ची भूमिका काय आहे? ती नेहमी सहनशीलच कशाला हवी? प्रसंगी तिने घेतलेले चौकटीबाहेरचे निर्णय काय असतात? हे जाणून घेण्यासाठी हा स्त्री, समाज, संसार, परखडता, हळवेपणाने व्यापलेला स्त्री केंद्रित कथासंग्रह नक्की वाचून पहा.
© कामिनी सुरेश खाने (कलात्मक पान)
२ जुलै २०२६

पुस्तकासाठी संपर्क : 9867852484

सदर लिखाणाचा कॉपीराईट लेखिकेकडे असून यूट्युब चॅनेल अथवा इतर कुठेही याचा वापर केला गेल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी.



0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →