पुस्तक : गुंफण नात्यांची
लेखिका : शुभांगी मस्के
प्रकाशन : वेलवेट कविशा प्रकाशन
परीक्षण : कामिनी खाने
मुखपृष्ठावरील बालपण, आई-मुलाचे नाते आणि वयाच्या प्रत्येक टप्प्यावरील प्रेमळ साथ, सहजीवन दर्शवणाऱ्या जोडप्यांच्या चित्राकडे पाहून नात्यांची गुंफण स्पष्ट होते. जी सुरुवातीलाच 'गुंफण नात्यांची' या चपखल शीर्षकासह लक्ष वेधून घेते. तर याला साथ देते उबदार स्पर्श दर्शवणारी रंगसंगती आणि बदामाचा, धाग्यास्वरूप आकार, तोरणांची जोड या कथासंग्रहातील प्रेम, कौटुंबिक विश्वाची ओळख करून देतात.
लेखनासाठी मिळालेलं प्रोत्साहन ते आजवरचा लेखनप्रवास आपल्या लेखनशैलीची ओळख करून देत लेखिकेने मनोगतातून थोडक्यात पण सुंदर शब्दांत व्यक्त केला आहे. स्त्री कथाकारांबद्दल बोलून लेखिकेच्या लेखनशैलीचा सुरेख आढावा घेत प्रसिद्ध लेखक देवा झिंजाड यांनी प्रस्तावनेतून कथासंग्रहाची चपखल ओळख करून दिली आहे. तर प्रकाशिकेच्या ब्लर्बमधून लेखिका आणि तिचं लेखन समोर येतं.
लेखनासाठी मिळालेलं प्रोत्साहन ते आजवरचा लेखनप्रवास आपल्या लेखनशैलीची ओळख करून देत लेखिकेने मनोगतातून थोडक्यात पण सुंदर शब्दांत व्यक्त केला आहे. स्त्री कथाकारांबद्दल बोलून लेखिकेच्या लेखनशैलीचा सुरेख आढावा घेत प्रसिद्ध लेखक देवा झिंजाड यांनी प्रस्तावनेतून कथासंग्रहाची चपखल ओळख करून दिली आहे. तर प्रकाशिकेच्या ब्लर्बमधून लेखिका आणि तिचं लेखन समोर येतं.
शीर्षकाला साजेशी नात्यांची गुंफण या सर्व कथांमधून भेटीस येते. लग्न म्हटल्यावर त्याचे अनेक पैलू असतात. त्यापैकी एक महत्त्वाचा भाग म्हणजे जेव्हा एखाद्याचं ठरलेलं लग्न मोडतं. एखाद्या मुलीचं ठरलेलं लग्न तुटलं की तिच्यासमोर बऱ्याच अडचणी येतात याची उदाहरणं आपण आसपास पाहतो. त्यातही जर ते लग्न बराच काळ जुळलेलं असेल, मुलगा-मुलगी एकांतात भेटले असतील बरेचदा; तर? तर येणाऱ्या असंख्य प्रश्नांपैकी 'कळीचा मुद्दा' या कथेत येतो. तिला साथ कोणाची मिळते? तिच्या नव्या आयुष्याची सुरुवात कशी होते? हे पाहण्यासाठी तर 'कडू गोड आठवणींचा हिंदोळा' वाचायलाच हवा. एकीकडे लग्न झाल्यावर सासऱ्यांची अडचण वाटू लागलेली ती आणि आई नसल्याने वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय याची पुरेपूर जाणीव असलेला तो. पण वेळीच तिला चांगलीच चपराक बसते. ती चपराक कशी आणि काय? हे हा 'सुशिक्षित आणि सुसंस्कृत'मधला फरक वाचताना कळतं.
शहरात राहणारी पूजा लॉकडाऊनमध्ये आजीकडे गावालाच अडकते. जुन्या चालीरीती पाळणाऱ्या आजीचे पाळीविषयीचे विचार तिच्या मनात असतात त्यामुळे ती तिच्या पाळी येण्याचं दडपण घेते. पण वेळेनुसार आजीच्या मनात बरंच काही रुजलेलं असतं... आणि इथेच चित्र बदलतं! या सकारात्मकतेसोबतच माहेर आणि माहेरवाशिणीचे विचारही कथांमधून समोर येतात. हीच कडी सासरशी जोडली जाते, तीही नाजूक बंधाची तितकीच घट्ट वीण धरून... आपली लेक सासूच्या इतकी जवळची होऊन तिला आई म्हणते, जवळिकीने वागते यात कुठेतरी एका आईच्या मनाला काहीतरी जाणवतं; पण जेव्हा जावई आपला लेक बनून वागतो तेव्हा मात्र ती अनामिक भावना कुठच्या कुठे पळून जाते. आदर दाखवण्यासाठी कोणत्याही विशिष्ट परंपरांची गरज नाही हे सांगत सासूसुनेतल्या एका मैत्रीपूर्ण नात्याचा बंधसुद्धा 'नाजूक धाग्या'सह अनुभवायला मिळतो.
तीन पिढ्या एकत्र नांदत असताना पिढीनुरूप कुरबुरी चालायच्याच आणि अशाच कुरबुरी लक्षात घेऊन एक छान बोध देणारी कथा एकीकडे तर दुसरीकडे कोणतीही नवी गोष्ट शिकण्यासाठी वयाची मर्यादा आड येत नाही या शिकवणीसोबत मनं जपणारी नात्यांची वीण दाखवणारी तीन पिढ्यांची कथाही इथे वाचायला मिळते. नणंद म्हणजे कटकट हा विचार कितीही पसरवला गेला तरी अनुभव चांगुलपणा लपवत नाहीत, हेही इथे अनुभवायला मिळतं आणि वयाच्या एका टप्प्यावर 'तो' निघून गेल्यावर तिच्या जगण्याला नवा रंग देणारा 'ती'चा मुलगाही मनात घर करून जातो.
पाऊस... कोणाचा आवडता, तर कोणाचा नावडता. असंच एक जोडपं, समीर पाऊसवेडा तर राधा अगदी विरुद्ध. पण शेवटी ही 'स्पेस' मिटते बरं... ती कशी? का? याची प्रेमळ गुंफण बघायला मिळते. इथे गवसतो एक दीर्घकालीन सुखी संसाराचा मंत्र अन् मातृत्वाच्या कड्या जुळलेला एक वेगळेपण जपणारा धागासुद्धा. इथे स्वतःला सिद्ध करणारी तीसुद्धा आहे आणि चहाचा गोडवाही!
या कथासंग्रहाच्या निमित्ताने एकप्रकारची सकारात्मकता अनुभवायला मिळते. कौटुंबिक विषय म्हटल्यावर बरेचदा काहीतरी नकारात्मक भूमिका समोर आणल्या जातात, मात्र लेखिकेने प्रत्येक कथेतून सर्व नात्यांना सकारात्मक प्रभावाने पुढे आणलं आहे. कदाचित यामुळेच कथांचे विषय ओळखीचे असले तरीही कथा परिणामकारकरीत्या वाचकांच्या मनात उरतात. कौटुंबिक विषयासोबत सामाजिक पार्श्वभूमीही समोर येते त्यामुळे वाचकांना वैचारिक मंथन करण्यासही वाव मिळतो. जुन्या-नव्या पिढ्यांना आवडतील असे विषय लेखिकेने छान हाताळले आहेत. काही तांत्रिक चुका आहेत; पण सहज भाषाशैली, मांडणी, विषय, रंजकता, इ. मुद्दे वाचकांना कथांसोबत खिळवून ठेवतात. एकूणच पुस्तकाचा साहित्यिक, छपाई दर्जा उत्तम आहे.
असा हा कौटुंबिक, सामाजिक, प्रेम, स्त्री विशेष,... अशा सर्वच विषयांना हात घालणारा, नात्यांची सकारात्मक छटा व्यक्त करणारा सुरेख कथासंग्रह नक्की वाचून पहा.
© कामिनी सुरेश खाने (कलात्मक पान)
१७ जुलै २०२६
१७ जुलै २०२६
पुस्तकासाठी संपर्क : 9822813006
सदर लिखाणाचा कॉपीराईट लेखिकेकडे असून यूट्युब चॅनेल अथवा इतर कुठेही याचा वापर केला गेल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी.
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
