पुस्तक : गुज अंतरीचे
लेखिका : हेमा पाटील
प्रकाशन : वेलवेट कविशा प्रकाशन
परीक्षण : कामिनी खाने
लेखिका : हेमा पाटील
प्रकाशन : वेलवेट कविशा प्रकाशन
परीक्षण : कामिनी खाने
लेखिका हेमा पाटील या प्रामुख्याने ऑनलाईन व्यासपीठांवर लिहिणाऱ्या प्रतिभासंपन्न मराठी लेखिका आहेत. आध्यात्मिक विषयांवर त्यांची विशेष पकड असून कौटुंबिक, गूढ, प्रेम असे विविधांगी लेखनही त्यांनी केलेले आहे.
गडद निळ्या रंगातून गूढता, रहस्य दर्शवत मुखपृष्ठ आपल्या शैलीची झलक दाखवतं. शीर्षस्थानी असलेला पर्वत कथेचा मोठा आवाका दाखवतो तर सभोवतालचं तेज अध्यात्माची जाणीव करून देतं. प्रकाशमय वलय अंतराळ आणि ऊर्जेला व्यक्त करत असतानाच मध्यभागी असलेल्या शीर्षकाने जणू कथासंग्रहाच्या दोन बाजू स्पष्ट केल्या आहेत. कारण शीर्षकाखाली एक भयावह आकृती/ भूत एका पुस्तकात रमलेल्या स्त्रीमागे उभे आहे. भीती, गुपित की आणखी काही? असा प्रश्न पडू शकतो. एकंदरीत मुखपृष्ठावर मानवी मनाचा प्रभाव आहे असं वाटतं.
सदर पुस्तक हे वेलवेट कविशा पब्लिकेशनने केलेल्या जागतिक विक्रमात सहभागी पुस्तक आहे. प्रसिद्ध लेखक नितीन अरूण थोरात यांच्या प्रस्तावनेतून लेखिकेच्या लेखनशैलीची आणि पुस्तकातील कथांची थोडक्यात; पण वाचनाची उत्सुकता निर्माण करणारी ओळख होते. सदर कथासंग्रह वेळात वेळ काढून चवीचवीने वाचायला हवा हे वाक्य मनोमन पटतं. प्रकाशिकेने लिहिलेल्या ब्लर्बमुळे लेखिकेची लेखनशैली आणि पुस्तकाची खासियत समोर येतात. या गूढ, रहस्यमय कथासंग्रहामागची पार्श्वभूमी, प्रवास लेखिकेच्या मनोगतातून सहजपणे व्यक्त होतात.
सदर पुस्तक हे वेलवेट कविशा पब्लिकेशनने केलेल्या जागतिक विक्रमात सहभागी पुस्तक आहे. प्रसिद्ध लेखक नितीन अरूण थोरात यांच्या प्रस्तावनेतून लेखिकेच्या लेखनशैलीची आणि पुस्तकातील कथांची थोडक्यात; पण वाचनाची उत्सुकता निर्माण करणारी ओळख होते. सदर कथासंग्रह वेळात वेळ काढून चवीचवीने वाचायला हवा हे वाक्य मनोमन पटतं. प्रकाशिकेने लिहिलेल्या ब्लर्बमुळे लेखिकेची लेखनशैली आणि पुस्तकाची खासियत समोर येतात. या गूढ, रहस्यमय कथासंग्रहामागची पार्श्वभूमी, प्रवास लेखिकेच्या मनोगतातून सहजपणे व्यक्त होतात.
'एका बाहुलीची गोष्ट' ही आहे तरसवाडीतली गोष्ट. विषय? अगदी ओळखीचा; पण तरीही कल्पनाशक्तीचा यथोचित वापर केलेला. हल्ली ठिकठिकाणी बायकांचे गळलेले केस जमा करण्यासाठी लोक फिरत असतात. त्या बदल्यात मिळतात पैसे, भांडी... पण मग नेलेल्या केसांचं काय? या प्रश्नाचं उत्तर लेखिकेने तंत्रविद्या, भाबडेपणा, रहस्यं, काहीसा थरार,... याद्वारे उत्तमरीत्या गुंफलं आहे. सुरुवातीचं वर्णन, संवाद, ग्रामीण भाषाशैली, विषयाची मांडणी सर्वच उत्तम.
'रुममेट' या कथेत आईच्या अतिकाळजीमुळे बाहेरच्या जगाशी संबंध नसलेल्या, आईवर अवलंबून असलेल्या आर्याची ओळख होते. आईची भूमिका, कोषात अडकलेली आर्या, स्वीटीचं रहस्य, आर्याचा उपाय,.. या सर्व प्रश्नांची उत्तरं कथा वाचल्यानंतरच मिळतील.
ती'च्या तावडीत सापडलेल्या त्याची आणि 'ती'ची कथा काय? या प्रश्नासह नदीचा डोह की मनाचा डोह म्हणावं असं काहीसं चित्र ही 'डोह' कथा वाचताना वाटतं. तर विलक्षण अनुभूती देणाऱ्या 'गुहा' कथेत आध्यात्मिक, वैचारिक मंथन जाणवते. 'शोध प्रतिशोध' कथेत नात्यातल्या लहानसहान गोष्टी कशा प्रकारे मनात तेढ निर्माण करतात हेही अनुभवायला मिळतं आणि 'गुंतता हृदय हे' कथेत एका ट्विस्टसह भावना अन् आठवणींच्या विश्वात जाता येतं.
'गुप्त संघर्ष' ही या कथासंग्रहातील सर्वात दीर्घ अशी रहस्य राखणारी पण तरीही वेगळी कथा. यात कल्पनाशक्ती, अध्यात्म, विज्ञानाचा वापर छान केला आहे. 'गुज अंतरीचे' ही कथा वाचकाला वाचनानुभव आणि भीती, मनाचे खेळ यांच्यात रमायला लावणारी आहे.
या कथासंग्रहात रहस्य, गूढ, विज्ञान, अध्यात्म,... अशा अनेक विषयांची झलक पाहायला मिळते. या कथा मानवी मनाला केंद्रस्थानी ठेवून भावनिक, वैचारिक मंथन करायला लावतात. मन, मनावरील ताबा यांभोवती फिरणाऱ्या सर्वच कथा जशा हलक्याफुलक्या स्वरूपाच्या, तरीही गूढतेने व्यापलेल्या आहेत; तशीच सदर पुस्तकातील सर्वात दीर्घ कथा 'गुप्त संघर्ष' एका वेगळ्या पद्धतीने समोर आली आहे. या कथेतील गंभीरता, अध्यात्म, विज्ञान, कल्पना, अभ्यास, अशा अनेक गोष्टींचा मिलाफ आपल्याला एका वेगळ्या विश्वात घेऊन जाणारा ठरतो. अशा प्रकारच्या विषयावरील कथा न आवडणाऱ्या वाचकांना कदाचित ही कथा इतर कथांच्या तुलनेत थोडीशी वेगळी वाटू शकते; पण ही कथा वेगळेपण जपणारी आहे एवढं नक्की! 'एका बाहुलीची गोष्ट' कथेत तंत्रविद्या आणि मानवी भाबडेपणाच्या विश्वाला असं काही रंगवलं आहे की मला व्यक्तिशः ही कथा खूप आवडली. रहस्यमय वातावरणात सजलेल्या या पुस्तकाची ओघवती भाषाशैली, मांडणी, अभ्यासपूर्ण लेखन, रंजकता वाचकाला खिळवून ठेवतात. रहस्य, गूढ हाताळणं लेखिकेला छान जमलं आहे. तांत्रिक चुकासुद्धा अगदीच नगण्य आहेत. एकूणच साहित्यिक आणि छपाई दर्जा उत्तम आहे असं म्हणता येईल.
मानवी मन, भय, गूढ, रहस्य, विज्ञान, अध्यात्म, तंत्रविद्या, कल्पनाशक्तीचा सुयोग्य वापर,... अशा अनेक गोष्टींची सुरेख गुंफण असलेला हा कथासंग्रह नक्की वाचून पहा.
© कामिनी खाने (कलात्मक पान)
२९ एप्रिल २०२६
२९ एप्रिल २०२६
पुस्तकासाठी संपर्क : 9011034253
सदर लिखाणाचा कॉपीराईट लेखिकेकडे असून यूट्युब चॅनेल अथवा इतर कुठेही याचा वापर केला गेल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी.
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
