Login

माणुसकी ..,...!

माणुसकी म्हणजे काय ह्याचे दर्शन देणारी एक कथा
आई तुम्हाला किती वेळा सांगायचं की त्या कोपऱ्यावरच्या मावशींकडून भाजी घेत नका जाऊ. त्यांचा भाजीपाला किती शिळा असतो .
तुम्हीच बघा हे, पिकून नरम पडलेले टोमॅटो, टणक झालेली भेंडी, पानं सुकलेली मेथी , अर्धे कच्चे लिंबू . काय उपयोग तरी आहे का याचा ? पैसे मोजतो ना आपण .
शिवाय जास्त कोणी फिरकत पण नाही त्यांच्याकडे.

म्हणूनच मी घेते गं तिच्याकडून .बिचारी पोटासाठी कमवायला सकाळपासूनच पाटी घेऊन बसून असते. शारदाबाई आपल्या सुनेला म्हणजे दीप्तीला म्हणाल्या.

आणि हे काय तुम्ही का हे कपडे घडी घालत बसला आहात राधाबाईंचं काम ना हे ? - दिप्ती

हो गं ती दिवसभरात ४ घरी धुणीभांडी करते . किती दमत असेल ? म्हणून मीच थोडेफार हलकी काम करते. तेवढंच तिला तिच्या लेकरांना वेळ देता येतो.

शारदाबाईंच उत्तर ऐकून दीप्तीने कपाळावर हात मारला.

३ महिन्यांपूर्वी सासऱ्यांच क्रियाकर्म आटोपलं आणि दिप्ती व केतन शारदाबाईंना कायमच शहरात घेऊन आले. खेड्यात आयुष्य गेलेल्या शारदाबाईंना दुसऱ्या लोकांबद्दल फार कळवळा होता. परोपकाराची त्यांना आवड होती. यामुळे गावातील बरीचं माणसं त्यांच्याशी जोडली होती.

पण त्यांच्या या स्वभावामुळे दीप्तीला आता टेन्शन आलं.
रात्री जेवणं आटोपली तसा तिने केतनला इशारा केला.

केतन - आई दिप्ती काय म्हणते ते खरं आहे का ? मला समजलं की तू विनाकारण लोकांना मदत करत असतेस ?

तुझ्यासाठी हे नवीन आहे का ?
आणि तू ही त्याच वातावरणात वाढला आहेस. आठव बरं गावी असताना तुझे वडीलदेखील गरजूंना मदत करायचे . शारदाबाई शांतपणे म्हणाल्या.

केतन - माहित आहे मला . पण त्यावेळची परिस्थिती वेगळी होती..शिवाय ते गावचं वातावरण . माणसंही साधी आणि प्रामाणिक.
याउलट इथे शहरी भागात असं वागून चालत नाही . कोण, कधी, कसा याचा फायदा घेईल सांगता येत नाही.
तुझ्या माहितीसाठी सांगतो, तू इथे यायच्या सहा महिने आधी आपल्या खालच्या मजल्यावर जे साहनी कुटूंब आहे ना त्यांच्या बाबतीत एक घटना घडली.
दोघे नवरा बायको ४ दिवसांसाठी बाहेरगावी गेले होते वयस्कर आई वडीलांना घरीच ठेवून.
जाताना वॉचमनला सांगितलं घरी येणाऱ्या जाणाऱ्यांवर लक्ष ठेवायला आणि वरवर काही काम असेल तर करायला.
आणि तुला विश्वास बसणार नाही आई , त्या वॉचमन ने त्याच्या दुसऱ्या साथीदारासोबत मिळून त्यांच्याच घरी चोरी केली. आता दोघेही बसलेत तुरुंगात आणि ती केस अजून चालूच आहे.

हो आई , आणि राधाबाईंच्या आधी एक दुसरी बाई आपल्याकडे कामाला होती. दुसऱ्या घरी पण कामं करायची ती . तिच्या कामाचा भार थोडा हलका व्हावा म्हणून वरवरची कामं मी कधीतरी करायचे. पण नंतर नंतर मात्र ती फार नखरे करू लागली. हे नाही करणार , ते नाही करणार. वरून पगारही मी तिला संपूर्ण कामाचा देत होते . शेवटी ती ऐकत नाही म्हणून काढून टाकले तिला. दीप्तीनेही आपली बाजू मांडली.

केतन - एकदा आपण चहा घेत असताना गॅस सिलिंडर घेऊन माणूस आला होता तेव्हा पण तू त्याला आग्रह करून चहा दिलास . खरंतर तेव्हाच मी तुला बोलणार होतो पण म्हटलं जाऊदे माणुसकी म्हणून ठीक आहे पण इथे शहरी भागात कसं आहे ना की आपण चांगल्या हेतूने मदत करायला जाऊ पण कधी कधी ते प्रकरण आपल्याच अंगाशी येऊ शकतं . नाहीतर एखादा माणूस आपल्या परिस्थितीचा गैरफायदाही घेऊ शकतो.
त्यातही तू दिवसभर घरी एकटीच. त्यामुळे प्लीज असं काही करु नकोस जेणेकरून आपण एखाद्या त्रासात पडू. दोघांनी शारदाबाईंना समजावले आणि झोपायला निघून गेले.

एक महिन्यानंतर....

शारदाबाई आता बऱ्यापैकी स्वतःवर संयम ठेवून होत्या. विनाकारण मदत करणं, दुसऱ्यांच्या आयुष्यात चांगल्या हेतूने हस्तक्षेप करणं त्यांनी आता टाळलं होतं.
दिप्ती आणि केतनही आता निर्धास्त होते.

एकदा संध्याकाळी खाली शारदाबाई फेरफटका मारत होत्या तेव्हा त्यांना रस्त्याच्या पलीकडे आडोशाला एक नऊवारी नेसलेली साठीची स्त्री चिंतित असलेली दिसली . सोबत एक नऊ दहा वर्षांचा लहान मुलगा देखील होता. त्यांना तिथे थांबून आता तास उलटला होता . मध्ये एकदोन वेळा तिने लोकांना थांबवून काहीतरी विचारले होते पण त्याने तिचे समाधान झाले नव्हते. आता अंधार पडू लागला तशी त्या स्त्री च्या चेहऱ्यावर काळजी दिसू लागली.
शारदाबाई हे सर्व पाहत होत्या पण त्यांना राहून राहून दिप्ती केतनचे बोलणे आठवत होते -" शहरी भागात असं वागून चालत नाही कोणी गैरफायदाही घेऊ शकतो."
त्या थांबल्या . पण मनात लगेच दुसरा विचार आला.
"भीतीपोटी माणुसकी सोडायची नसते आणि माणुसकीपोटी डोळे बंदही ठेवायचे नाहीत."

त्यांनी पुढे होऊन त्या स्त्रीची चौकशी केली. तेव्हा तिने सांगितले की , आम्ही फार दुरून आलो आहोत.
या मुलाची आई म्हणजेच माझी सून इथे जवळच्या दवाखान्यात ऍडमिट आहे. ३ दिवसातच सोबत आणलेले पैसे संपले. आता मला जरा हे औषध आणायला ५०० रुपये कमी पडत आहेत. मेडिकल मध्ये चौकशी केली पण कोणी उद्यापर्यंत थांबायला तयार होईना.
मुलाचे वडील दुपारीच गावी पैशांची सोय करायला गेले आहेत ते उद्या आले की तुमचे पैशे परत करू.
त्या स्त्रीच्या बोलण्यात शारदाबाईंना खरेपणा जाणवला त्यांनी आपल्या बटव्यात असलेले ९०० रुपये त्या स्त्रीला देऊ केले पण प्रामाणिकपणे तिने वरचे पैसे नाकारले व ५०० रुपये घेऊन उद्या इथेच भेटा असं सांगून आभार मानत निघून गेली.

त्यानंतर सलग २ दिवस जोडून सुट्ट्या आल्यामुळे दिप्ती आणि केतन घरीच होते. दोघेही परत चिडू नयेत म्हणून शारदाबाई खाली गेल्याच नाहीत. शिवाय ५०० रुपयांनी शारदाबाईंच काही नुकसान होणार नव्हतं. उलट एका गरजू व्यक्तीला मदत केल्याचे त्यांना समाधान मिळाले होते.

थोड्यावेळाने सोसायटीचा नवा वॉचमन शारदाबाईंच नाव घेत घरी आला . तसेच त्याने माहिती दिली की खाली एक वयस्कर स्त्री आणि पुरुष त्यांची चौकशी करत आहे.
ते दोघे कोण असावेत हे शारदाबाईना समजले त्या तशाच खाली निघाल्या.

आता हा काय नवीन प्रकार ? असे म्हणत दिप्ती आणि केतनही पाठोपाठ गेले.

शारदाबाईंना समोर पाहून ती स्त्री पुढे आली आणि तिने पिशवीतून नीट घडी केलेली पाचशेची नोट देत म्हणाली,
काल तुम्ही दिलेल्या पैशांमुळे माझ्या सुनेसाठी वेळेत औषधं घेता आलं.

त्यांना थांबवत शारदाबाई म्हणाल्या, याची काही गरज नाही . तुमच्या वागण्याबोलण्यातून तुमचा खरेपणा दिसतो. मी काही फार मोठं काम केले नाही.
फक्त डोळे उघडे ठेऊन मदत केली आहे.

हो मावशी तुमच्यासारख्या चांगल्या लोकांमुळे माणुसकी अजूनही टिकून आहे. नाहीतर हल्लीची लोकं फसवले जाण्याच्या भीतीपोटी मदत करत नाहीत.
त्यामुळेच हे पैसे परत करणे आमचे कर्तव्य आहे.
त्या स्त्री चा तरुण मुलगा हात जोडत म्हणाला आणि दोघेही पैसे परत करून एक मोठं ओझं हलकं झाल्याच्या आनंदात निघून गेले.

केतन आणि दीप्तीला आता काय उत्तर द्यावं या आविर्भावात शारदाबाई पाठी वळल्या.

अगं ते मी काय ...

काही म्हणू नका आई आता.
आज तुम्ही आम्हाला एक नवीन धडा दिलात.
भीतीपोटी माणुसकी सोडायची नसते. उलट भीती आणि सावधगिरी सांभाळून ती जपायची असते.
तरचं चांगुलपणाचा विश्वास वाढेल.

शेवटी खऱ्या अर्थाने दिप्ती आणि केतनला शारदाबाईंचे वागणे उमगले -
माणुसकी ही फक्त पैशांची किंवा वस्तूंची मदत नसते.
कधीकधी हसणं, समजून घेणं, हात देणं – हे देखील माणुसकी आहे.
जर आपण हे लक्षात ठेवलं आणि डोळसपणे वागलो, तर कधीही आपल्याला धोका होणार नाही.
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →