Login

लाल साडीची हाक - भाग १

मंजुलिका


कोकणात समुद्राच्या काठावर एक छोटंसं गाव होतं काळेवाडी.

गाव तसं सुंदर, पण त्याच्यावर कायम एक विचित्र सावली पसरलेली. दिवसाढवळ्या नारळाची झाडं डुलायची, आंब्याचा गोड वास यायचो, पोरं रस्त्यावर खेळायची… पण सूर्य मावळला की सगळं गाव शांत व्हायचं.

इतकं शांत की स्वतःच्या श्वासाचो आवाजही मोठो वाटायचो.

गावाच्या टोकाला एक जुना वाडा होतो.

मोठ्ठो, दगडी, काळसर भिंतींचो.

लोक त्याला सावंतांचा वाडो म्हणायचे.

त्या वाड्यात राहायचो गावातलो सगळ्यात दबदबा असलेलो माणूस आण्णा सावंत.

आण्णा म्हणजे रुबाब.

उंच बांधा, पांढरं शुभ्र धोतर, खांद्यावर उपरणं, कपाळावर चंदन, आणि ताठ मिशा.

गावातल्या बैठकीत तो बसलो की बाकीच्यांची बोलती बंद.

त्याचं लग्न झालेलं होतं.

त्याची बायको सुनंदा.

साधी, शांत, देवभक्त.

रोज सकाळी अंगण झाडायची, देवळात दिवा लावायची आणि वाड्याची काळजी घ्यायची.

पण आण्णाचं मन मात्र स्थिर नव्हतं.

त्याला कायम काहीतरी नवीन, गूढ, आकर्षक हवं असायचं.

त्या वर्षी गावात मोठी जत्रा भरली.

देवळासमोर रोषणाई, ढोल, ताशे, गोंधळ, हलव्याचे दुकान, खेळणी, आणि लोकांची गर्दी.

सगळं गाव आनंदात.

आण्णा पण गावकऱ्यांसोबत उभो होतो.

तेवढ्यात गर्दीतून ती दिसली.

लाल साडी.

लांब काळे केस.

नाकात मोत्याची नथ.

डोळे इतके खोल की त्यात माणूस हरवून जावा.

ती चालत होती, पण तिच्या पायाचा आवाजही नव्हता.

जणू ती जमिनीवर नव्हतीच.

आण्णाची नजर तिच्यावर खिळली.

“गण्या… ही कोण?” आण्णा कुजबुजला.

गण्या इकडं तिकडं पाहत म्हणाला, “आण्णा, गावातली नाय वाटता.
आधी कधी दिसली नाय.”

ती बाई हळूच वळली.

सरळ आण्णाकडं पाहिलं.

ओठांवर हलकंसं हसू.

आण्णाच्या छातीत धडधड वाढली.

पहिल्यांदाच त्याला एखाद्या बाईकडं पाहून असं काहीतरी वेगळं वाटलं.

जत्रा संपली.

लोक घरी गेले.

पण आण्णाच्या डोक्यात तीच.

घरी पोहोचल्यावर सुनंदा म्हणाली, “काय झालं? आज खूप शांत दिसताय.”

“काही नाय,” आण्णा म्हणाला.

पण त्याचे डोळे अजूनही कुठंतरी हरवलेले.

त्या रात्री...

वाड्यात सगळे झोपले.

बाहेर वारा सुटलेलो.

खिडक्या कडाडत होत्या.

आण्णा अर्धवट झोपेत होता.

तेवढ्यात....

छन… छन… छन…

पैंजणांचा आवाज.

आण्णाचे डोळे उघडले.

त्याने आजूबाजूला पाहिलं.

खोलीत कुणीच नाय.

पुन्हा आवाज.

छन… छन…

यावेळी खिडकीबाहेरून.

आण्णा उठलो.

हळूच खिडकी उघडली.

आणि त्याचा श्वास अडकलो.

खाली अंगणात ती उभी होती.

तीच.

लाल साडी.

लांब केस.

ती वर बघून हसत होती.

आण्णाचं हृदय जोरात धडधडू लागलं.

तो नकळत बाहेर पडला.

अंगण ओलांडलं.
ती मागं वळली आणि चालू लागली.

आण्णा तिच्या मागोमाग.

गाव झोपलेलं.

रस्ता रिकामा.

फक्त चंद्रप्रकाश आणि समुद्राचा दूरचा आवाज.

ती गावाच्या टोकाला घेऊन गेली.

जिथं एक जुनी विहीर होती.

त्या विहिरीबद्दल गावात खूप गोष्टी सांगितल्या जायच्या.

कोणी म्हणायचं तिथं बाईनं जीव दिलो.

कोणी म्हणायचं अमावस्येला तिथं आवाज येतात.

म्हणून रात्री तिकडं कुणी जात नाय.

ती विहिरीजवळ थांबली.

हळूच म्हणाली, “आलात?”

पहिल्यांदाच तिचा आवाज ऐकू आलो.

गोड… पण थंड.

आण्णा जवळ गेला.

“तू कोण?”

ती हसली.

“माझो शोध घेतलात ना?”

“नाव काय तुझं?”

ती हळूच पुढं आली.

“मंजूलीका.”

नाव ऐकताच आण्णाला विचित्र शहारा आला.

“गावात नवीन आयेस?”

ती काही बोलली नाय.

फक्त विहिरीकडं बघत राहिली.

आण्णानं तिच्या हाताला स्पर्श केला.

हात बर्फासारखो थंड.

आण्णा दचकला.

“तुझो हात इतको थंड कशान?”

ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, “मी खूप वर्ष वाट बघत आसय.”

“कशाची?”

“या घराची… आणि तुमची.”

आण्णा गोंधळला.

तेवढ्यात...

विहिरीतून आवाज आला.

धप्प!

जणू काहीतरी पाण्यात पडलं.

आण्णा घाबरून विहिरीत डोकावला.

आत काळोख.

पाणी दिसत नव्हतं.

फक्त अंधार.

मग अचानक...

खालीनं कुजबुज.

“आण्णा…”

आवाज अगदी स्पष्ट.

आण्णा मागं सरकला.

“कोण?”

मंजूलीका हसू लागली.

पण ते हसू साधं नव्हतं.

जरा जास्त मोठं.

जरा जास्त थंड.

“घाबरलात?”

आण्णा काही बोलायच्या आत त्याची नजर विहिरीजवळ पडलेल्या वस्तूवर गेली.

एक काळा कापड.

त्यावर लिंबू, कुंकू, काळे धागे आणि राख.

मध्यभागी एक छोटी मानवी कवटी.

आण्णाचा घसा कोरडा पडला.

“हे कसले प्रकार?”

मंजूलीका खाली बसली.

त्या कवटीवर हात फिरवत म्हणाली, “काही स्वप्नं पूर्ण करायला करणी करावी लागता.”

आण्णा दोन पावलं मागं झाला.

“तू नेमकी कोण आयेस?”

ती उभी राहिली.

हळूहळू त्याच्याकडं चालू लागली.

“तुमका जे हवं होतं… तेच.”

वारा जोरात सुटलो.

तिचे केस उडू लागले.

आणि अचानक तिचा चेहरा बदलू लागला.

डोळे लाल.

ओठ काळे.

हसू विकृत.

आण्णा भीतीनं गोठलो.

ती त्याच्या अगदी कानाशी आली.

आणि कुजबुजली

“मी मरूनही परत आली… फक्त तुमच्यासाठी.”

आण्णाच्या अंगावर काटा उभो राहिला.

तो पळायला वळला.

पण मागून तिचा हात त्याच्या खांद्यावर पडला.

बर्फासारखा थंड.

आण्णा वळून पाहतो तर...

मंजूलीका त्याच्याकडं बघत होती.

आणि तिचे पाय...

उलटे होते.

क्रमशः


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →