Login

मनाचिये ठायी

मनाचिये ठायी
लघुकथा
विषय - मनाच्या गाभाऱ्यात
शीर्षक - मनाचिये ठायी

" विदुला, एवढा वेळ काय करत आहे किचनमध्ये." वेदांतने आपली पत्नी विदुलाला आवाज दिला.

"अहो, तुमची साडेआठ ची ट्रेन आहे नां? मी तुमच्या डब्यासाठी तिखटपुऱ्या , चटणी, भाजी बनवत आहे."

अगं पण एवढं सगळं कशासाठी? तुझं आपलं प्रत्येक वेळेला हेच असतं इतका डबा देतेस की, ट्रेन मधले सहप्रवासी सुद्धा मनात म्हणत असतील या व्यक्तीची बायको किती सुगरण आहे म्हणून.

"तुमचं आपलं काहीतरीच हो."

अहो, माझी आई नेहमी म्हणायची प्रवासाला निघताना खायच्या वस्तू सोबत असाव्यात. 'भूक नसो पण शिदोरी असो'. म्हणून.

"बरं बाबा."

चल, सात वाजले निघतो मी आता. यावेळेला थोडा ट्राफिकही असतो. लवकर निघालेलं बरं

बाय पिल्लू,बाय वैदेही, वेदांतने दोन्ही मुलींना गोंजारत म्हटले.
बाय बाबा.
बाय विदुला.
फोन कराल पोहोचल्यावर.विदुला म्हणाली.

हो.

सर्वांनी वेदांतला प्रेमाचा निरोप दिला.

विदुला व वेदांत यांना दोन मुली. वेदांतची एक वर्षापूर्वी ट्रान्सफर झाली होती. मोठी मुलगी वैदेहीच्या शाळेमुळे तो नोकरीच्या गावी सध्या त्यांना नेऊ शकत नव्हता. आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून तो मुलींच्या भेटीसाठी यायचा. विदुला एक गृहिणी. वेदांत जेव्हा घरी यायचा तेव्हा तिचा वेळ कामातच जायचा. छोटी वैष्णवी दोन वर्षाची व वैदेही आठ वर्षाची होती. वैदेहीला शाळेत पोहोचवून देणे, तिचा अभ्यास घेणे, घरची कामे, छोटीची काळजी विदुलाला दिवसही पुरायचा नाही.

आताशा वेदांत घरी आल्यावर सतत फोन मध्ये व मुलींमध्ये रमायचा. म्हटलं तर म्हणायचा, "अगं विदुला ऑफिसची कामे इतकी वाढली की, खूप दमायला होतं बघ."

"अहो पण'...

विदुलाला वाटायचं जणू तो आपल्याशी बोलायचं टाळतो आहे.

"का तो असा वागतो आहे?"

विदुलाच्या मनात अनेक शंकाकुशंका घर करू लागल्या होत्या.

तेवढ्यात विदुलाची मैत्रीण वृषाली तिच्या घरी आली.

"का गं विदुला, असा चेहरा पाडून बसली आहेस."

"काही नाही गं"

"हे बघ विदुला. मी तुला चांगली ओळखते. सांग बघू काय झालं ते?" वृषाली विदुलाला विश्वासात घेत म्हणाली. पण आधी मला सांग
वैदेही, वैष्णवी, कुठे आहेत?

वैष्णवी झोपली आहे. वैदेही शाळेत गेली आहे.विदुला म्हणाली.

ठीक आहे.

"वृषाली, माझ्या मनातल्या शंकांचं निरसन करशील का?"विदुलाने वृषालीला मोठ्या आशेने विचारले.

सांग. बिनधास्त सांग. तुला काय म्हणायचं आहे ते.

पण विदुला, तूच म्हणतेस की, तुला दिवसभर खूप काम पुरतात म्हणून. म्हणजे तुझं शरीर कामात असतं आणि मन? मन मात्र सैरभैर धावत असतं. असंच ना? वृषाली म्हणाली.

हो ग वृषाली.

अगं, वेदांत एवढ्या दिवसानंतर घरी येतो तर त्याने माझ्याशी नीट बोलावं की नाही.? पण नाही. सारखा फोनवर असतो. कुणी दुसरी स्त्री तर त्यांच्या जीवनात आली नसेल नां गं?याच विचाराने माझी चिडचिड सुरू होते. मनाची घालमेल सुरू होते. विदुला मनातलं बोलत होती.

विदुला, वेदांत तुझ्यासोबत नीट बोलत नाही. म्हणजेच तुमच्या मध्ये संवाद होत नाहीत. या गोष्टीसाठी तुझ्या मनाने सर्व मर्यादा पार केल्या.आश्चर्य आहे.हा सर्व तुझ्या मनाचा संशय आहे. तू सुशिक्षित आहेस. त्याला समजून घे. न बोलण्याचं कारण विचार. आणि हो जरा मनाच्या गाभाऱ्यात डोकावायला शिक. आज प्रत्येक क्षेत्रातील नोकरदार मंडळींमध्ये कामाचा प्रचंड व्याप वाढलेला आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे नात्यांमध्ये संवाद कमी झाला आहे. पूर्वी एकत्र कुटुंबात एकमेकांचा एकमेकांना आधार होता. आता विभक्त कुटुंबात माणसं एकटी पडत चालली आहेत. मोबाईल, सोशल मीडिया, संवादाच्या जागी मेसेज आणि सहवासाच्या जागी स्क्रीन.
यामुळे जवळ असूनही परस्परांमधील अंतर वाढलं आहे. ताणतणाव वाढले आहेत. त्यामुळे मनातली खदखद बाहेर येण्याऐवजी आतचं साठून राहते.

पटतंय नां, मी काय बोलत आहे ते?
वृषाली तीला समजावत म्हणाली.

तू वेदांतशी याबाबतीत अगदी मोकळेपणाने बोल. त्याला विश्वासात घे. उगाच आपलं "उचलली जीभ आणि लावली टाळ्याला" अगं संवादाचा अभाव असेल तर गैरसमज वाढत जातात. दोन्ही बाजूंनी वेगवेगळा विचार सुरु होतो. त्यातूनच समोरच्याबाबत घृणा, द्वेष, संताप या भावना निर्माण होतात. ज्यावेळी तणावाचा मनावर दबाव वाढतो तेव्हा विचारशक्ती डळमळते. जे सध्या तुझ्या बाबतीत घडत आहे.

आभासी माध्यमातून कधीही न पाहिलेल्या मित्र-मैत्रिणींच्या अपडेट्स आपल्याकडे असतात. मात्र आपल्याच घरी राहणाऱ्याच्या मनात काय चाललं आहे हे कळत नाही. मनातल्या साठलेल्या तणावाला बाहेर काढण्यासाठी हक्काचं कुणी मिळालं नाही तर अक्षरशः त्या व्यक्तीचा श्वास गुदमरायला लागतो. म्हणून वेळीच सावध हो. घराचे दरवाजे बंद करणे सोपे असते. पण मनाचा दरवाजा उघडा ठेवणे फार महत्त्वाचे आहे. ज्यातून चांगले विचार प्रवेश करतील व मन आनंदित होईल.

अगं प्रत्येक व्यक्ती स्पेशल असते. त्यांच्यातलं आवडतं तेवढेचं निवडता येत नाही. जे त्यांच्यासोबत येतं तेही नात्याचा एक भाग म्हणून स्वीकारावं लागतं. त्यासाठी प्रसंगी आपला अहंकार बाजूला ठेवावा लागतो.

पण एकदा का आपण दुसऱ्याला जसं आहे तसं मान्य करायला शिकलो की, मनातला ताण कमी होतो. अपेक्षांचा दाब कमी झाला की, संवाद मोकळा होतो आणि शांततेला जागा निर्माण होते. नातं जुळवणं म्हणजे सर्व गोष्टी तंतोतंत जुळणं नव्हे, तर न जुळणाऱ्या गोष्टींबरोबरही समतोलाने जगण्याचं कौशल्य शिकलं तर नाती जोपासता येतात. परस्परांमध्ये सुधारणा होते.

विदुला ऐकते आहेस नां मन लावून माझं बोलणं?वृषाली म्हणाली.

आता मनाला ताब्यात घे. फक्त आणि फक्त चांगला विचार कर. मनाला सकारात्मकतेकडे वळव. म्हणजे नकारात्मकतेला वावचं मिळणार नाही.

अगं विदुला, मन, मानसिकता आणि जगणं यातला परस्पर संबंध शेत, बियाणं आणि मशागत असा सरळ साधा आहे. म्हणजे नुसतं शेत चांगलं असून चालत नाही तर बियाणं पण चांगलं पाहिजे आणि मशागत पण उत्तम पाहिजे. तरच कणसा कणसात टपोर दाना भरतो. म्हणजे मन चांगलं असून चालत नाही तर त्याच बरोबर योग्य मानसिकता, चांगले विचार जोपासून त्याद्वारे जीवनाला योग्य प्रतिसाद दिला तरच जगणं समृद्ध होतं.
संत तुकारामांचे बोल माहित आहे नां तुला ?

मन करा रे प्रसन्न
सर्व सिद्धीचे कारण .

हो गं

छान. मी तुला माझ्याकडून समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.बघ तुला पटतंय का ते. वृषाली म्हणाली.

हो वृषाली, छान पटलंय मला तुझं बोलणं. खूप बरं वाटलं तुझे विचार ऐकून. अगदी योग्यपणे समजावून सांगितलेस तू मला. त्यामुळे माझ्या मनावरचा सर्व ताण नाहीसा झाला बघ. विदुला वृषालीला बिलगत म्हणाली.

छान.

बरं निघू मी आता.
काळजी घे. म्हणत वृषाली निघून गेली. आणि प्रसन्न मनाने विदुला आपल्या कामाला लागली.

सौ. रेखा देशमुख
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →