शीर्षक:- मान
भाग:-१
"अगं रंजना, तुझी साडी तर तुझ्या बहिणीच्या साडीपेक्षा हलकी वाटते ना गं?" लग्न मंडपात बसलेल्या रंजनाला लग्नाला आलेल्या एकीने तिचे कान भरले.
"हो ना, ही काय इथेच चार घरं ओलांडून राहते आणि हिचा नवरा मिळेल तो काम करतो. मग हिला कशाला भारीची साडी घेतील बरं?" दुसरी डोळे फिरवत म्हणाली.
"हा ना, बरोबर गं बाई. हिची बहीण लहान असूनही बघा तिला किती मान मिळतोय. का माहिती आहे का?" तिसरी एकजण म्हणाली.
"का गं?" पहिलीने हनवुटीवर बोट ठेवून विचारले.
"अय्या, तुला माहिती नाही काय? हिच्या बहिणीचा नवरा म्हणे तिकडे शहरात मोठ्या हुद्द्यावर नोकरीला आहे. म्हणून तर तिला ती लहान असूनही हिच्यापेक्षा तिला जास्त मान दिला जातो." तिसरी खूप काही मोठं माहिती असल्यासारखं सांगत होती.
रंजना सगळं ऐकत होती पण तोंडातून एक शब्द काढला नाही. ती लांबून आपल्या बहिणीला बघत होती. जी पूर्ण मंडपात सगळ्यांशी हसून बोलत होती.
रंजनाच्या मोठ्या भाचीचे लग्न होते. तिचा भाऊ महादेव व त्याची बायको विमल लग्नाच्या तयारीत होते. रत्ना त्यांची लहान बहीण. तिचा नवरा शहरात मोठ्या हुद्द्यावर नोकरीला होता.
रत्ना हसतमुख व मनमोकळ्या स्वभावाची. तिने कधीच आपल्या श्रीमंतीचा तोरा मिरवला नाही; पण रंजनाच्या मनात मात्र तिच्याबद्दल असूया निर्माण झाली होती. अर्थातच ती असूया लोकांच्या बोलण्याने निर्माण झाली होती.
भाचीच्या लग्नाच्या वेळी महादेवने तिला मदतीसाठी बोलावले होते. तर अजून लग्नाला अवकाश आहे, येईन नंतर असे म्हणून तिने जवळ असूनही येण्याचे टाळले.
लग्नाचा बस्ता बांधायचा होता, तिला बोलवण्यासाठी महादेवाने भाच्याला पाठवलं; पण तो स्वतः बोलवायला आला नाही म्हणून ती लवकर गेलीच नाही.
उशीर झालेला पाहून तो आणि रत्ना तिला बोलायला आले. तिला वाटलं की तो रत्नाला स्वतः आणायला गेला आणि तिला बोलायला मात्र मुलाला पाठवलं. खरं तर रत्ना फक्त त्याच्या एका फोनवर आली होती. हे तिला नंतर कळलं होतं. तरी तिचा गैरसमज कमी झाला नाही.
कपड्यांच्या दुकानात महादेवने आधी तिला विचारले,"रंजना, तुला कोणती साडी पाहिजे ते बघ? तुझ्या पसंतीने घे. किंमत कितीही असू दे त्याचा विचार करू नको."
"रत्ना कसली घेईल तशीच मीही तेवढ्याच किमतीची घेईन." साड्यांकडे एकवार बघत ती रत्नाकडे एक कटाक्ष टाकत म्हणाली.
"ताई, मला चकमक, जास्त भरलेली साडी आवडत नाही. माझी आवड वेगळी आहे, तुझी आवड वेगळी आहे. तुला आवडेल ती साडी घे. मी नंतर घेईन." रत्ना हसून तिला म्हणाली.
क्रमशः
काय उत्तर असेल रंजनाचे?
