Login

माझा पैसा उधळण्यासाठी नाही भाग २ अंतिम

-------

माझा पैसा उधळण्यासाठी नाही   भाग १

https://www.irablogging.com/blog/majha-paisa-udhalnyasathi-nahi-_6383

माझा पैसा उधळण्यासाठी नाही   भाग २ अंतिम


जयंतला जेव्हा कळतं की जान्हवीने त्याच्या बाबांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यासाठी पैसे मागितले होते, तेव्हा त्याला खूप वाईट वाटतं. जान्हवी माहेरी गेली होती. तिला आणायला जयंत निघतो. जाताना त्याच्या डोक्यात विचार येतं होते की आपण एकदा तिचं पूर्ण बोलणं ऐकायला हवं होतं. एवढं झालंच नसतं. याचं विचारात तो जान्हवीच्या घरी म्हणजे माहेरी पोहचतो.

जयंतला आलेलं पाहून त्याचे सासरे उठून हसून त्याचं स्वागत करतात. सासूबाई चहा - पाणी देतात. जयंत जान्हवीशी बोलायचं आहे असं सांगतो. जान्हवीच्या रूम मध्ये जातो तर जान्हवी न्युज पेपरमध्ये काही तरी पाहत होती. जयंतने तिला आवाज दिला. जान्हवीने त्याच्याकडे निर्विकार डोळ्याने पाहिले. जयंत तिला क्षमा मागू लागला, " जान्हवी प्लीज मला माफ कर. मी तुझं बोलणं ऐकून न घेता कॉल कट करायला नको होता. माझं चुकलं. "
"तुमचं काय चुकलं ते नीट मला सांगाल?" जान्हवी.
" तुझं न ऐकता फोन ठेवला आणि नंतर बंद केला हे चुकलं माझं. मला माफ कर. " जयंत.
" नाही जयंत तुम्ही इथे चुकला नाहीत. तुम्ही चुकला तिथे जिथे मी तुम्हाला बाबा सिरीयस आहेत हे सांगितल्यावर कोणाचे बाबा हे विचारलं नाही तिथे. जर तुमचे बाबा सिरीयस आहेत हे कळलं असतं तर तुम्ही लगेच पैसे पाठवले असते आणि लगेच धावत पळत आला असतात. तेच जेव्हा तुम्हाला वाटलं की माझे बाबा आजारी आहेत आणि त्यासाठी मी पैसे मागतेय तेव्हा तुम्हाला ते पैसे उधळणे वाटलं.  मी माझं करिअर, माझी नोकरी सर्व सोडून तुमच्या घराला वेळ दिला. तुमच्या घरच्यांची सेवा केली. तुम्ही मात्र माझ्या घरच्यांना पाण्यात पहाता का? " जान्हवी.
" सॉरी जान्हवी, अगं तू नेहमी तुझ्या भावाला पैसे द्यायचीस म्हणून गैरसमज झाला माझा. म्हणून मी तसं म्हणालो. " जयंत.
" हो देत होते मी माझ्या भावाला पैसे दर महिन्याला. का माहित आहे? पुढच्या महिन्यात तुमचा वाढदिवस आहे. तुमच्या आवडीची बाईक किती दिवसापासून तुम्ही घ्यायची म्हणत होतात. पण काही ना काही कारणांमुळे राहून गेलं. त्यामुळे तुम्हाला सरप्राईज देण्यासाठी त्याच्याकडे मी गाडीसाठी पैसे देत होती. आणि जरी समजा, मी माझ्या माहेरी पैसे दिले असते तरी, काय चुकीचं आहे त्यात? मी तुमचे पैसे चोरून किंवा तुमच्या खिश्यावर जास्त ताण देऊन तर मागत नव्हते ना. जे घर खर्चाचे होते त्यात काटकसर करून मी बाजूला काढत होते. त्यात तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे.? आणि तसं पाहिलं तर मी तुम्हाला किती बोलायला आणि ऐकवायला पाहिजे होतं? जेव्हा तुम्ही मला न सांगता माझ्या बँकेतले सर्व पैसे काढून घेतले होते. मी ६ महिन्याची गरोदर असताना मला जॉब सोडायला लावला. मी संसारासाठी ऐकत गेले, करत गेले. त्याचं दरम्यान सीमा ताईंच्या ( जान्हवीची नणंद ) मुलाचं बारस होतं. मोठा धूमधडाक्यात साजरा केला आणि महिन्याभराने मला कळलं की त्यात तुम्ही मला न विचारता माझ्या बँकेतून काढून पैसा वापरला. मी ते पैसे माझ्या डिलिव्हरीसाठी जमवले होते. माहेरी पैसाचा ताण पडू नये म्हणून. ते सर्व पैसे तुम्ही मला न विचारता आवाजवी खर्च केला. तेव्हा नाही वाटलं आपण न सांगता दुसऱ्याचा पैसा उधळतोय. तेव्हा नाही वाटलं की न सांगता दुसऱ्याचा पैसा घेणं म्हणजे चोरीच असते?

माझ्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यासाठी पैसा हवा कळल्यावर पैसा उधळला जातोय असं वाटायला लागलं तुम्हाला. मान्य तुम्हाला वाटलं की मी पैसे माहेरी देते, गैरसमज झाला तरीसुद्धा बाबा सिरीयस आहेत हे कळल्यावर तुम्ही लगेच पैसे पाठवायला हवे होते शेवटी जीवन - मरणाचा प्रश्न होता. हाच विचार मी केला असता आणि माझं स्त्री धन गहाण ठेवून पैसे उभे केले नसते तर? माझ्या माहेरच्यांसाठी तुमचे विचार मला चांगलेच कळून चुकले आहेत. उद्या देव न करो पण खरंच जर अशी वेळ आली तर तुम्ही तर जीव गेला तरी मदत नाही करणारं. म्हणून मी ठरवलं आहे. बाईक बरोबर तुम्हाला घटस्फोटचं गिफ्ट द्यायचं. त्यानंतर मी पुन्हा जॉब सुरु करेन आणि मला कोणासमोर हात पसरावे लागणार नाहीत. तुम्ही माझी, माझ्या घरच्यांची कधीही इज्जत करू शकतं नाही. तुमच्या लेखी माझ्या माहेरच्यांना किंमत नाही. तुमच्यासाठी, तुमच्या घरासाठी मी राबायचं, प्रत्येकाची काळजी घ्यायची, सर्वांना आपलं मानायचं पण माझ्याच घरचांशी तुम्ही असं वागायचं?
जर खरंच त्या दिवशी माझे बाबा त्या जागी असते आणि माझे दागिने सुद्धा माझ्याकडे नसते. तर माझ्या बाबाचं काय झालं असतं? तुम्ही तर दुसऱ्या दिवशी सुद्धा फोन करून विचारलं नाही बाबा कसे आहेत? ते मेले असते तरी तुम्हाला फरक नसता पडला. त्यामुळे अश्या माणसांसोबत मला नाही राहायचं ज्याला पैश्यापेक्षा मोठं काही नाही आणि माझ्या बाळा पण अश्या माणसाच्या सावलीत राहू द्यायचं नाही. त्यामुळे जा तुम्ही आता. नोटीस घरी पोहचेल तुमच्या.

जयंत जान्हवीला समजावण्याचा खूप प्रयत्न करतो पण जान्हवी त्याचं काहीही ऐकत नाही. तिला कळलं होतं की आपली आणि घरच्यांची जयंतला काहीही काळजी नाही. त्यामुळे अश्या एकतर्फी नात्यातून तिला मोकळं व्हायचं होतं ज्या नात्याला फक्त जान्हवी चालवत होती.

( नवरा - बायकोच्या नात्यात संवाद गरजेचा असतो. शिवाय लग्न म्हणजे दोन कुटुंब जोडली जातात तर काळजी फक्त एकाच कुटुंबाची केली जाते. कधी कधी एकमेकांना गृहीत धरतो आपण समोरच्याचा विचार करणे सुद्धा गरजेचं असतं. शक्यतो कोणती गोष्ट लपवू नये. कोणतीही गोष्ट करताना एकमेकांच्या संमतीने करावी. त्यामुळे नंतरचे वाद टळतात. एखादी गोष्ट पटत नसेल तेव्हा बोला आणि क्लिअर करा. गैरसमज वाढू देवू नका. दोन्ही कुटुंबाना समान मान - सन्मान द्या.)


समाप्त.....

0

🎭 Series Post

View all