नणंदबाई खूप दिवसांनी घरी आल्या होत्या. माहेरी त्यांचं स्वागत नेहमीप्रमाणे अगदी जोरात झालं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिची वहिनी सुलोचना. हिने नंदेचं भरभरून स्वागत केलं. एकतर आधीच खूप वर्षांनी आलेली, आणि त्यात घरात सर्वांची लाडकी अशी नणंद ही वहिनीचीसुद्धा लाडकी होती. नणंदबाईंचे इतके लाड करताना बघून आईलाही कौतुक वाटे. सहसा नणंद नावाचा प्राणी हा वहिनीचा शत्रू असतो. परंतु इथे सुलोचना मात्र आपल्या नणंदेला जिवापाड प्रेम करत असे.
माहेरी असे झालेले लाड बघून नणंदाईंना खूप छान वाटे. परंतु, नणंदाईंना एक गोष्ट सतत खटकायची. ती म्हणजे सणावाराला त्या कधीही माहेरी आल्या की वहिनी तिथेच असे. म्हणजे ती माहेरी जातच नव्हती. नणंदाबाईंना हळूहळू ही गोष्ट लक्षात आली की वहिनी सहसा माहेरी जातच नाही. अगदी सणावारालासुद्धा. कधीतरी सहा महिन्यांतून किंवा वर्षातून एखाद्या दिवशी गेली तर गेली. आणि तेही सकाळी गेली की संध्याकाळी परत येणार. नणंदाईंना शंका आली. तिने लगेच आईला विचारलं.
आई, तू वहिनीला माहेरी पाठवत नाहीस का? कारण बघावं तर सणवाराला वहिनी इथेच असते. तू तिला काही बंधनं घातली नाहीस ना? किंवा भाऊ तर तिला आडवत नाही ना? तसं असेल तर मला अजिबात चालणार नाही. माझ्या लाडक्या वहिनीला त्रास दिलेला मला अजिबात चालणार नाही.
नणंदाबाईंचं आपल्या वहिनीवर असलेलं हे प्रेम बघून आई हसली आणि म्हणाली, "नाही ग बाई, इतकी गुणी सून असताना आम्ही कशाला तिच्यावर मर्यादा टाकू, कशाला तिच्यावर बंधनं घालू? उलट आम्ही कितीतरी वेळा तिला सांगतो की, 'अगं बाई, माहेरी जाऊन ये, थोडा आराम करून ये. किती कामं करतेस.' पण ती टाळाटाळ करते."
नणंदाई म्हणाल्या, "पण असं का? मुलींना माहेर म्हणजे जिव्हाळ्याचं ठिकाण. पण वहिनी मात्र माहेरी जायला टाळाटाळ का करते? काहीतरी कारण असेल. मला तर शंका येते."
आईलाही शंका आली, असं का असेल? मग नणंदबाईंनी याचा शोध घ्यायचं ठरवलं. वहिनीच्या नात्यातील बरेच जण नणंदबाईंच्या ओळखीचे होते. कामानिमित्ताने त्यांच्याशी नणंदबाईंचं बोलणं झालं आणि नणंदबाईंनी मुद्दाम विषय काढला. वहिनीच्या माहेरचा नणंदबाईंनी विषय काढला. आणि हळूहळू त्यांच्या लक्षात आलं की वहिनीच्या माहेरी वहिनीची वहिनी, म्हणजेच वहिनीच्या भावाची बायको, हिच्यामुळे सुलोचना तिच्या माहेरी जात नव्हती.
नातेवाईकांकडे अजून खोदून खोदून विचारलं. तेव्हा नणंदबाईंना समजलं की नवीनच लग्न झालेलं असताना सुलोचना जेव्हा जेव्हा माहेरी जाई, तेव्हा तेव्हा तिची वहिनी तिचा सतत अपमान करत असे. तिला घालून पाडून बोलत असे. कारण काहीच नाही. फक्त नणंदबाई आल्यानंतर तिच्यासाठी वहिनीला दोन कामं जास्त करावी लागायची. एवढंच.
सुलोचनाच्या लक्षात आलं होतं की तिच्या वहिनीला ती आल्यानंतर काम पुरायचं. सुलोचनाला वाईट वाटलं. तेव्हा तिने स्वतःहून वहिनीचा भार कसा कमी करता येईल याकडे लक्ष दिलं. वहिनीला मदत करत गेली. परंतु यासाठी आपल्या नणंदेबद्दल जिव्हाळा निर्माण होण्याऐवजी तिच्यामुळं तिरस्कारच वाढत गेला. आणि हा हळूहळू इतका वाढला की नणंदबाई आल्यानंतर टोमणे मारणे, घालून पाडून बोलणे, तिला न येण्यासाठी कारण देणे अशा गोष्टी वहिनीच्या वाढत गेल्या.
सुरुवातीला नवीन नवीन नणंदबाईंचा मान ठेवणं भाग होतं. परंतु जसं वहिनीला मूल झालं, वहिनीची घरावरची पकड मजबूत झाली, तसतसं वहिनीने सुलोचनाला तिच्या माहेरपासून दूर करण्यासाठी एकही संधी सोडली नाही. सुलोचना अत्यंत भोळी.
सुलोचनेला वाटलं, आपल्या जाण्यामुळे भाऊ आणि वहिनीच्या संसारात फूट पडत असेल, तर आपण माघार घेतलेली बरी. फार तर काय, माझं माहेर दुरावेल, मला हक्काची जागा राहणार नाही. पण किमान भाऊ आणि वहिनीचा संसार तर वाचेल. आपल्या न जाण्याने माहेरी भलं होत असेल, तर तेच ठीक.
असं मनावर दगड ठेवून सुलोचनाने विचार केला आणि माहेरी जाणं टाळलं.
जेव्हा सुलोचनाच्या नणंदेला ही गोष्ट कळली, तेव्हा तिला अत्यंत वाईट वाटलं. आणि आता तिला हळूहळू काही गोष्टींचा उलगडा होऊ लागला. मी आल्यावर वहिनी माझे इतके लाड का करते, माझ्यासाठी चार कामं जास्तीची का करते, मला माहेरपण पूर्णपणे अनुभवता यावं यासाठी प्रयत्न का करते, मला कुठल्याही गोष्टीची कळ सोसावी लागू नये म्हणून प्रयत्न का करते.
याचं कारण आता कळलं की सुलोचना माझ्यामध्ये तिला स्वतःला बघत होती. नणंद म्हणून तिच्या माहेरी सुलोचनाला जी वागणूक मिळाली, तीच आपल्या नणंदेला तिच्या माहेरी मिळू नये यासाठी सुलोचना कायम कटिबद्ध राहिलेली.
नणंदाईंना वाईट वाटलं. डोळ्यात पाणी आलं.
सुलोचनाच्या नणंदेने ठरवलं, जर वहिनी मला माझं माहेरपण देत असेल, तर वहिनीलाही तिचं माहेरपण दिल्यावाचून मी राहणार नाही.
एके दिवशी नणंदाईंनी सुलोचनाला घेतलं आणि म्हणाल्या,
क्रमशः
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
