Login

माहेरची ओढ...भाग 5 अंतिम

Maherchi oth pratek stri la Aste
माहेरची ओढ...भाग 5 अंतिम

ती समोर काही बोलणार तोच समीर उठून उभा झाला.

"अंजली बस कर, झालं तुझं आता शांत हो. आणि हो तू आता जात नाही आहेस. दोन चार दिवसानंतर मी तुला पोहचवून देतो."


"अहो असं काय करताय? हे नेहमीचंच आहे, आई काही बोलल्या का? तुम्ही सांगा त्यांना माझी जायची इच्छा आहे, प्रत्येकवेळी मी माझं मन का मारायचा. मला आता असं मन मारून जगायचं नाही आहे. सगळे स्वतःच्या मनाने वागतात मी काही करायला गेले की सगळ्यांना प्रॉब्लेम होतो. हे आता असं पुढे चालणार नाही. मी आजच जाणार म्हणजे जाणार."


"बाबा प्लिज जाऊ द्या ना."

"हो कुहू मी नाही कुठे म्हणतोय, मी दोन चार दिवस थांब बाळा."

समीर खोलीतून निघून गेला. अंजली स्थब्ध खाली बसली. कुहू पण तिच्या बाजूला बसली.
अंजलीला खूप रडायला आलं हा माणूस माझी कधीच साथ देऊ शकत नाही मी का राहतेय इथे कुणास ठाऊक? नकळतपणे तिच्या मनात विचार येऊन गेला.

ती उठली, डोळे पुसले आणि कामाला लागली.

दिवस सरत होते, हळूहळू दोघांमध्ये दुरावा निर्माण होऊ लागला, दोघांमध्ये अबोला होता.

समीरने थोडं तिला समजून घ्यावं इतकीच तिची इच्छा होती.

एक दिवस सकाळी नाश्त्याच्या वेळेला ती तिची बॅग घेऊन बाहेर आली, सगळ्यांच तिच्याकडे लक्ष गेलं.

"अंजली हे काय? बॅग घेऊन कुठे निघालीस?" तिच्या सासूबाईने विचारलं.

"आई मी माहेरी जातेय?"

"अग पण अशी अचानक, आणि तेही कुणाला काहीही न सांगता, न विचारता."


"मी आता तुम्हाला सांगायलाच आले, की मी निघतेय."

"काही विचारायची पद्धत आहे की नाही."

"असेल पण मला आता त्याची गरज वाटत नाही."

तिच्या अश्या बोलण्याचा समीरला राग आला.

"अंजली ही काय पद्धत आहे तुझी आईशी बोलण्याची?"

"अहो मी तर काहीच बोलले नाही, मी फक्त माझ्या जाण्याबद्दल सांगायला आले आहे. ते ही तुम्हा सगळ्यांना माहिती असावं म्हणून.

"अंजली बॅग आत घेऊन जा." समीर तिच्यावर चिडला.

"जाणार नाही."

तिने एका हातात बॅग घेतली दुसऱ्या हाताने मुलीचा हात पकडला आणि जायला निघाली.

"एक पाऊल जरी पुढे टाकलंस ना तर या घराचा दरवाजा नेहमीसाठी तुझ्यासाठी बंद होईल."

"मला फरक पडणार नाही." अस म्हणून तिने एक पाऊल पुढे टाकला.


"सुनबाई चुकीचं वागतेयस तू?

"बाबा तुम्हाला तुमच्या मुलामध्ये कधीच चूक दिसली नाही ना, आज मी एक पाऊल पुढे टाकला तर तुम्ही मला पटकन बोलताय."

"खरतर मला तुम्हाला कुणालाच दुखवायचं नाही आहे, पण काय करू लग्नाला इतकी वर्ष झालीत पण परिस्थिती बदललीच नाही. माहेरी जाण्याची ओढ प्रत्येक मुलीला असते, तुमची मुलगी पण येते ना, ती इथे यावी, तिने माहेरपणाचा आनंद घ्यावा असं वाटतं ना, त्या येतात त्यात मला आनंदच आहे, पण माझ्या आनंदाचा कुणी विचारच करत नाही.

वर्षातून दोनदा माहेरी जाऊन दोन दिवस राहावं एवढीच माझी इच्छा असते, पण यासाठी सुद्धा माझा मानसिक त्रास दिला जातो. समीर कधीच माझ्या मनासारखं होऊ देत नाहीत. मी त्यांना समजून घेते, ते चुकीचे वागले तरी त्यांच्या चुका पोटात घेते, त्यांना त्रास नको म्हणून स्वतःच्या मनाला मुरडून टाकते. अजून काय करायला हवं मी तुम्हीच सांगा."

तिने दीर्घ श्वास घेतला आणि ती तिच्या माहेरपणाला गेली.

समाप्त:

माहेरपणाची ओढ प्रत्येक लेकीला असते, घरच्यांनी पण थोडं समजून घ्यायला हवं. खरी साथ जोडीदाराची असते, त्याने तिला थोडं समजून घ्यावं, एवढीचं तिची इच्छा असते.
दोघांनीही एकमेकांना समजून घ्यायला हवं, एकमेकांना सांभाळून घ्यायला हवं.
नात दोन मनाचं असतं, दोघांनीही जपायला हवं
समजूतदारपणा कमी पडला की नात्यात
दुरावा हा येणारचं.


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →