Login

माहेरची ओढ...भाग 4

Maherchi oth lagli ki rahavat nahi
माहेरची ओढ...भाग 4

आठ दिवसांनी तिचा भाऊ, वहिनी, तिचे आई वडील सगळे तिला भेटायला आले.

त्या सगळ्यांना बघून अंजलीला खूप आनंद झाला,
त्यांचा पाहुणचार, बोलणं झालं आणि ती लोकं जायला निघाली.

अंजली दारापर्यंत सोडायला गेली, त्यांना असं जाताना बघून अंजलीचं मन भरून आलं.

पाणवलेल्या डोळ्यांनी तिने त्यांना निरोप दिला आणि खोलीत येऊन तिने तिचं मन मोकळं केलं. अश्रूंना वाट दिली, दीर्घ श्वास घेतला आणि पुन्हा कामाला लागली.

कुहू हळूहळू मोठी व्हायला लागली, तिची शाळेची तयारी, तिची छोटी छोटी कामे ती स्वतः करायला लागली.

समीरची सवय बंद होत नव्हती. दररोज थोडं का होईना पण तो पिऊन यायचा. कुहूच्या पण लक्षात यायला लागलं.

ती एकदा अंजली जवळ बोलली, अंजलीला तिला काय सांगावं, कसं समजवाव कळत नव्हतं. काहीतरी कारण सांगून तिने वेळ मारून नेली. पण असं किती दिवस चालायचं तिला कळत नव्हतं.


अंजली त्याला समाजवायची पण तो तिचं कधीही ऐकत नसे.

कुहूला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या, अंजलीने जायची तयारी केली. बॅग पॅक करून ती रेडी होती.
समीर घरी आला,

"बाबा आम्हाला आजीच्या गावाला नेऊन द्या."

समीरला आश्चर्य वाटलं.

"अंजली काय आहे हे?"

"आम्ही गावाला जातोय."

"कुणाला विचारलंस?"

"कुणाला काय विचारायचं, तिला पंधरा दिवस सुट्ट्या आहेत, नंतर तिचे क्लासेस सुरू होणार आहेत म्हणून विचार केला की जाऊन यावं. कुहूची पण इच्छा आहे."

"सतत माहेर माहेर करत असतेस, असं काय आहे ग तुझ्या माहेरी?"


"माझ्या माहेरी प्रेमाची माणसे आहेत,
सावली देणारं अंगण आहे
प्रेम आणि जिव्हाळा आहे.
मायेचा ओलावा आहे..

आईच्या कुशीत शिरुन तिच्याकडून
कोडकौतुक करुन घ्यायचं आहे.
मन मोकळं करून बोलायचं आहे.
तिच्या कुशीत डोकं घालून
रडायचं आहे.."

एका आईला आपली लेक सुखाने संसार करतेय ह्यातच खूप खूप सुख असतं पण त्या सुखात रमलेल्या आपल्या लेकीशी थोडा वेळ काढून आपल्या मनातलं खूप काही सांगायचं असतं, विचारायचं असतं, लेकीला ते सगळं ऐकून घ्यायचं असतं. तिलाही खुप काही सांगायचं असतं."


तिचं बोलणं ऐकत समीर पलंगावर बसला. कुहूला जवळ बसवलं.

"अग थांब थांब किती बोलशील?


"माहेरपण" म्हणजे नक्की काय ग?

समीरने तिला विचारले.

"लग्नाला इतकी वर्षे उलटलीत, अजूनही तुझा नवखेपणाच दिसतोय, मला एकदा सांग काय असत हे माहेरपण.
तू तर या घरची राणी आहेस, सासुरवासही नाही तुला, तरी माहेरी जाऊन काय करायचंय?
प्रवासाचे कष्ट घेऊन तुला काय सुख मिळेल त्यापेक्षा आठ दिवस सुटटी घे आणि मस्त धमाल कर
शॉपिंग कर, मनसोक्त फिर कशाला हवंय माहेरपण?"

तिनेही हसत उत्तर दिले.

वर्ष सरोत कितिही ,
ओढ काही सरत नाही
सासरी गेल्याशिवाय खरंतर
माहेरपण कळत नाही.

लग्नानंतर तुम्ही तुमचं घर सोडून गेला असतात ना तेव्हा तुम्हाला कळलं असतं माहेरपण काय असतं आणि माहेरची ओढ काय असते.

दारात माझी वाट पाहणा-या आजीचा तो केविलवाणा चेहरा, आईच्या डोळ्यात लेकीला भेटण्याची आस सगळं डोळ्यासमोर येत आणि मन सुन्न करून जातं.


प्रत्येक स्त्रीला वाटतं वर्षातुन एकदातरी  माहेरी जायला मिळावे, एकदातरी जाण्यासाठी मन आतुर असावे.
लेकीला प्रेमाने जवळ घेणारे बाबा असावे.
न सांगताही मनातलं ओळखणारी आई असावी.
'बसा तुम्ही आवरते मी' अस  म्हणणारी वहिनी असावी.
प्रेमाने डोक्यावर हात ठेवणारा भाऊ असावा.
बस ग आत्या आराम कर अस म्हणणारे भाचवंड असावेत.

तुम्हाला माझ्या मनाची अवस्था का कळत नाही आहे, अहो दोन दिवस जरीमाहेरी जाऊन आले ना की प्रसन्न वाटेल मला. मला जेव्हा जेव्हा जायची इच्छा असते तुम्ही कधीच होकार देत नाही. आज बघू, उद्या बघू असंच म्हणता.

ती समोर काही बोलणार तोच समीर उठून उभा झाला.

क्रमशः


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →