माहेरची ओढ...भाग 3
दीपिका येईस्तोवर अंजलीला वाट बघणे गरजेचे होते, पंधरा ते वीस दिवसानंतर दीपिका आली, त्यानंतर अंजली माहेरी गेली ती फक्त दोन दिवस राहून आली. आता मात्र अंजलीला खूप राग यायला लागला ती पंधरा दिवस राहणार आणि मी फक्त दोन दिवस याचाच तिला खूप वाईट वाटलं. जाऊ दे, सोडून दे असं म्हणून तिने गोष्टी सोडून दिल्या. आता प्रत्येक उन्हाळ्यात आणि दिवाळीत असंच व्हायला लागलं बघता बघता दीपिकाला दिवस गेले.
प्रेग्नेंसी मध्ये पण दीपिकाने प्रत्येक गोष्टीमध्ये खूप नाटकं केले, मळमळ उलटीचा त्रास होत नसे तरीही घरी तसं सांगून ती रूममध्ये दिवसभर आराम करत होती, त्यामुळे कामाचा सगळा भार अंजली वर येत होता.
एकदा अंजलीने सासूबाईला विचारलं.
"आई आपण घरात कामवाली बाई ठेवायची का? नाही म्हणजे बघा ना आता दीपिका पण प्रेग्नेंट आहे आणि सगळं काम माझ्यावर येतंय, तुम्हा सगळ्यांची मदत होते पण कुहू लहान आहे ना, तिला ही वेळ द्यायला जमत नाही."
सासूबाईंनी स्पष्ट नकार दिला.
"आपल्या घरात एवढ्या बायका आहेत मग कामवाली कशाला हवी."
अंजलीच्या सासूबाईंना बाईच्या हातचे काम आवडत नसतं त्यामुळे त्यांनी कधीच घरात कामवाली ठेवलेली नव्हती. अंजलीला खूप वाईट वाटलं तरी ती दिवसभर काम करत असायची.
दीपिकाचा सातवा महिना झाला आणि ती माहेरी गेली, डिलेवरी झाली आणि तिला पहिला मुलगा झाला. डिलिव्हरी नंतर सलग चार महिने ती तिच्या माहेरी होती. तिला मुलगा झाला म्हणून सासूबाई तिच्यावर जास्त खुश होत्या. चार महिन्यापर्यंत अंजलीने सगळ्यांचे सगळं केलं अगदी तिच्या नवऱ्याच्या म्हणजे आरवच्या डब्यापासून सगळं सगळं केलं.
चार महिन्यानंतर दीपिका घरी आली, सगळे तिच्या जवळ जवळ तिथेच कौतुक करायला लागले. आता मात्र अंजलीला खूप वाईट वाटायचं. मी इतकं सगळं करूनही दोन शब्द कौतुकाचे ऐकायला मिळत नाही आणि सगळं तिचं कौतुक करतायेत, तिच्या जवळ जवळ करतायेत.
या गोष्टीचं तिला खूप वाईट वाटायचं, नवऱ्याजवळ बोलली पण त्याचा उपयोग नाही. कारण नवऱ्याने कधीच तिची बाजू घेतलेली नव्हती. आज मात्र अंजलीचा बांध तुटला आणि ती खूप ढसाढसा रडली.
"अहो कधीतरी तुम्ही माझ्या बाजूने बोलत जा ना, खरंच तुम्हाला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही का? मी दिवसभर सगळ्यांचं सगळं करते तरी कौतुकाचे दोन शब्द मला कधीच ऐकायला मिळत नाही. ती काही न करता सगळे तिथेच कौतुक करतात, मला मुलगी झाली आणि तिला मुलगा झाला हे या मागचं कारण तर नाहीये ना? मग तुम्ही सांगा मला कितीही केलं तरी टोमणे मिळतातच."
"अंजली तुझं काय आहे ते तू बघून घे, मला तुमच्या बायकांमध्ये पाडू नकोस."असं बोलून तो मोकळा व्हायचा.
अंजलीची मनस्थिती खराब होत गेली, तिला स्वतःला वाटत होती की आपल्याला आरामाची गरज आहे.
तिने समीरला माहेरी जाण्याबद्दल विचारलं पण त्याने
नंतर बघू अस म्हणून गोष्ट उडवून दिली.
नंतर बघू अस म्हणून गोष्ट उडवून दिली.
सासूला विचारलं तर त्या बोलल्या दीपिकाचा मुलगा लहान आहे तू गेलीस तर काम कोण करणार. आम्ही आहोत ग पण तरी आम्हीच सगळं करायचं का?
दिवस, महिने, वर्ष उलटली.
एकदा अंजलीच्या घरून फोन आला,
"हॅलो आई बोल ग."
"हॅलो अंजली अग तुझा दादा आलाय यूएसए वरून,कधी येतेस त्याला भेटायला?"
"आई अग मला जमणार नाही." बोलताना तिचा कंठ दाटून आला.
"तुझी दुसरी मुलगी आहे ना तिला बोलव, मी तुझी मुलगी आहे हे विसरून जा."
"का अग असं बोलतेस?"
"मग काय करू आई, तीन वर्षे झालीत मी तिकडे आलेली नाही, येण्याची इच्छा केली आणि विचारलं तर हे लोक येऊ देत नाहीत. समीर तर लक्षच देत नाहीत. काय करू मी?"
अंजलीला रडायला आलं आणि तिने फोन ठेऊन दिला.
