Login

मधुमालती - नवी ओळख भाग एक

Story Of One Women Who Start New Journy Of Her Life
मधुमालती - नवी ओळख भाग एक

विषय - फिरुनी नवी जन्मेन मी.
************************

मालती ताई किचन मध्ये भाजी निवडत होत्या आणि बाहेर हॉलमध्ये रेवाची चिडचिड चाललेली होती....

अरे पण आपणच का?
तुला एकट्याला जन्माला घातले आहे का त्यांनी.
का फक्त तुझ्या शिक्षणासाठी पैसा खर्च केलाय.नाही ना. मग का म्हणून फक्त आपणच ही जबाबदारी घ्यायची.

अग जरा हळू बोल ना......आईला ऐकायला जाईल.

ऐकायला जाण्यासाठीच बोलते आहे मी.
रेवा मोठ्याने म्हणाली.

बाहेरचा हा सगळा तमाशा मालती ताई ऐकत होत्या. ते ऐकून त्यांना तिथे एक क्षणभर थांबण्याची इच्छा होत नव्हती. कशी -बशी त्यांनी भाजी निवडली आणि त्या पळतच आपल्या रूममध्ये गेल्या. गादीवर डोकं ठेवून अक्षरशः ओक्साबोक्शी रडल्या.
शांत हो,असं म्हणायलाही त्यांच्याजवळ कोणीही नव्हतं.
दहा पंधरा मिनिटांनी स्वतःच रडून रडून शांत झाल्या.
समोर एका टेबलावर मोहनरावांचा फोटो होता. मोहनराव,त्यांचे मिस्टर. दोन वर्षे उलटली होती त्यांना जाऊन.
मालती आणि मोहनरावांना दोन मुले. दोघांचेही लग्न त्यांनी मोठ्या थाटात केले.
थोड्या दिवसात,लहान मुलगा अमितला कंपनीतर्फे अमेरिकेला जाण्याचा चान्स मिळाला. त्यामुळे मालती ताई,मोहनराव,अंकित,रेवा आणि अमित ची बायको श्वेता असे सगळे मिळून राहत होते. परंतु अचानक मोहनराव हृदयविकाराच्या झटक्याने गेले आणि मालती ताई एकट्या पडल्या.
वडिलांना जाऊन वर्ष झाल्यावर अमित श्वेतालाही अमेरिकेला बरोबर घेऊन गेला.
आता अंकित,रेवा आणि मालती ताई असे तिघेच राहिले होते.

आपल्याला अमेरिकेतच सेटल व्हायचे आहे आणि तिथे घर घ्यायचे आहे,यासाठी अमितने यापुढे पैसे पाठवायला जमणार नाही असे अंकित ला फोन करून कळविले होते. म्हणून रेवाची दिवसभर तन- तन चालू होती.

तशीही ती आधीपासूनच मालतीताई बरोबर धूस-फुस घालतच होती पण मालती ताई तिला समजून घेत होत्या. घरात वाद नको म्हणून तिच्या प्रत्येक चुकीच्या गोष्टींकडे त्या दुर्लक्ष करत होत्या पण आज मात्र तिने हद्द पार केली होती. तिचे ते धारदार शब्द जणू मालती ताईंना घायाळ करत होते. आज त्यांना सगळं सहन करणं कठीण झालं होतं.
मोहनरावांचा फोटो हातात घेऊन त्या धाय मोकलून रडल्या. रडता रडताच बोलल्या

"का निघून गेले तुम्ही मला असे एकटीला सोडून. मलाही बरोबर घेऊन जायचे.नाही सहन होत आता.."

त्यांचे अश्रू पुसणारं तिथं कोणीही नव्हतं.त्या रात्री, त्या जेवण न करताच झोपी गेल्या.

दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठल्या.कपाटातले आपले सगळे कपडे त्यांनी बॅगमध्ये भरले.रूम आवरून ठेवली.
इकडे सकाळी सकाळीच रेवा आणि अंकित बाहेर निघाले होते. रेवा मालती ताईंना रागातच म्हणाली,

"आम्ही जरा बाहेर जातोय.संध्याकाळ होईल यायला. तुमचं तुम्ही नाश्ता आणि जेवण करून खा आणि हो कपडे धुवायचे राहिलेत तेवढे धुवून टाका."

"चल रे. " -------------अंकित कडे बघत रेवा.

"हो ....आई येतो." ------ अंकित

"अंकित,जरा ऐकतोस का?" --------मालती ताई.

"हां...बोल ना आई."

"अरे मला जरा बाहेर जायचं होतं."

"कुठे?आणि कशाला जायचे आता तुम्हाला.उद्या जा." -------रेवा.

"रेवा जरा गप्प बसतेस का." -----अंकित.

"मलाच गप्प बसायला सांग." --------रेवा.

"कुठे जायचे आहे आई? " ------अंकित.

"अरे काही नाही इथेच मैत्रिणीकडे जायचे आहे. जाताना घराची चावी शेजारी ठेवते, हे सांगायचं होतं नाहीतर उगाच तू काळजी करशील." ---------मालती ताई.

"हो ठीक आहे. जा तू." ------ अंकित.

अंकित आणि रेवा जातात.

मालती ताईनी घरातील सर्व काम आवरली. त्या
आपली बॅग घेऊन निघाल्या. शेवटचं आपलं घर त्यांनी निरखून बघितलं. तिथल्या टेबलवर,फुलदाणीवर,सोफ्यावर आपला हात फिरवला.जुन्या आठवणींनी त्यांचे डोळे भरून आले. दुःखद अंतःकरणाने त्यांनीं दाराला कुलूप लावले, आपले डोळे पुसले.घराची चावी शेजारी ठेवली.

त्या शहरात मलतीताईंचे जवळचे असं कोणी नव्हते. फक्त एक जूनी मैत्रीण होती, सुशीला.अधून- मधून तिच्याशी त्यांचा फोन होत असे. तिच्याकडे आजचा दिवस राहून मग पुढचा निर्णय घेऊ असे ठरवून त्या तिच्याकडे गेल्या.

खूप दिवसातून भेटल्याने सुशीला आणि मालती ताईंनी बराच वेळ गप्पा मारल्या. मालती ताईनी सुशीलाला सगळे सांगितले. त्यांनीं आपलं मन तिच्याकडे मोकळे केलें. सुशीलानेही मालती ताईंचे सांत्वन केले.तिथे चहा पाणी झाले.

हे सर्व बोलणं सुशीलाच्या मिस्टरांनी आतून ऐकले.
त्यांनीं सुशीलाला आत मध्ये बोलावले.

"काय झाले"-------- सुशीला.

"किती दिवस राहणार आहे? इथे आधीच आपली मुलं शहाणी नाहीत,तिथे हा अजून ताप नको".----मिस्टर.

"अहो काहीतरीच काय बोलता. फक्त आजची रात्र राहणार आहे ती."

मालती ताई चहाचा कप ठेवायला उठल्या आणि हे सगळं त्यांच्या कानावर पडले.
काहीच न बोलता त्या बॅग घेऊन निघून गेल्या.

सुशीलाने बाहेर येऊन बघितले तर मालती कुठे दिसली नाही. तिच्या लक्षात आले की, तिने सगळे बोलणे ऐकले.
तीने रागाने मिस्टरांकडे बघितले.
तेही रागाने......... "बरंच झालं."


कुठे जातील मालती ताई?
मिळेल का त्यांना कुठे आसरा.
वाचू पुढच्या भागात.







0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →