Login

लिफ्ट

पहिल्यांदा पुण्यात गेलेल्या कोल्हापुराच्या गजाभाऊंची पुणेरी पाट्या वाचून झालेली धांदल आणि लिफ्टमध्ये अडकणे याची गंमतीदार कथा

शीर्षक:- लिफ्ट

"ही पुण्याला जाणारी गाडी हाय नव्हं." कोल्हापूरचे गजाननराव पहिल्यांदाच पुण्याला निघाले होते. त्यांना थोडे फार लिहायला वाचायला येत होतं पण तरीही त्यांनी कंडक्टरला विचारले. खात्री करून घेण्यासाठी त्यांनी विचारणे ही तर त्यांची जुनी सवय होती.

त्यांना पुण्याला जाणारी बस माहीत होती तरीही त्यांनी खात्री करून घेण्यासाठी ते विचारून घेतले आणि बसमध्ये बसले बस पुण्याच्या दिशेने निघाली.

गजाननराव नावासारखे भरलेले म्हणजेच तब्येतीने अगदी जाडजूड, रांगडे व्यक्तिमत्त्वाचे होते. सुटलेले पोट, डोक्याचे कुरळे केस, ज्याला थोडीफार चंदेरी छटा आलेली असल्याने ते केस चमकत होते. त्यांच्या बारीक डोळ्यांना गोलाकार जाडजूड काचेचा चष्मा होता. मोठे कान त्यावर केस बाहेर आलेले, फतरे नाक, गुबगुबीत गाल, जाडे ओठ, त्यावर काळी, चंदेरी छटा असलेली झुबकेदार मिशी. उंची कमी आणि नीम गोरा रंग. अंगावर नेहरू शर्ट, खाली पांढरेशुभ्र बारीक काळ्या काठाचे धोतर आणि डोक्यावर गुलाबी रंगाचा फेटा असा त्यांचा अस्सल ग्रामीण वेष. पायात कोल्हापुरी पायताण. त्यांचा आवाज ही अगदी खणखणीत पण घोगरा होता.

पुण्याला जाण्याचे त्यांचे स्वप्न होते. पुण्याबद्दल त्यांनी खूप ऐकले होते. खूपदा मनात असूनही काही ना काही कारणाने त्यांचे जाणे रद्द होत होते. योगायोगाने त्यांच्या मित्राच्या मुलाचे लग्न पुण्यात होते. त्यानिमित्ताने पुणे पाहता येईल म्हणून ते  सकाळी लवकरच ते निघाले होते.

जसं जसं पुणे जवळ येत होते तसं तसे ते बसच्या खिडकीतून कुतूहलाने बाहेर पाहत होते. उंच उंच इमारती पाहून त्यांच्या तोंडाचा आ वासला.

"अबब! केवढ्या भल्या मोठ्या बिल्डिंगा हायती इथं अन् एवढ्या उंचावरती जायचं व कसं? " शेजारी बसलेल्या माणसाला त्यांनी उत्सुकतेने विचारले आणि ते तसेच तोंड उघडे ठेवून बाहेर बघू लागले.

"अहो काका, तोंड बंद करा आधी तुमचे, नाही तर तोंडात माशी जायची!" शेजारचा माणूस पुणेकर होता, तो हसून म्हणाला.

"ऑ! अशी कशी जाईल बरं माझ्या तोंडात माशी? तिला आगुदर माझी परवानगी घ्यावी लागलं की? ते जाऊ द्या वं ते माशीच, म्या अन् ती माशी बघून घेऊ. म्या जे इचारल नव्हं तेवढं सांगा." मिशीवर ताव देत ते रूबाबात म्हणाले.

"काय राव, काका तुम्ही तर लय भारी आहात." तो माणूस म्हणाला.

"कोल्हापूरची माणसं भारीच असत्याती. सांगा तुम्ही, असल्या बिल्डिंगात जायस कसं?" बेरकीपणे गजाभाऊ म्हणाले.

"त्याच काय आहे काका, तुम्ही जेव्हा तिथे जालं ना, तिथं एक पाटी असेल ते वाचा. म्हणजे तुम्हाला सगळं कळेल." असे म्हणत तो माणूस उभा राहिला.

"अरं सांग की बाबा, कशापायी भाव खायलास?" ते नाकावरचा चष्मा वर करत म्हणाले.

"मी भाव खात नाही, भाजी चपाती खातो. मला इथे उतरायचे आहे. सरका जाऊ द्या मला." तो माणूस त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर न देताच त्यांना म्हणाला आणि बस थांबल्यावर निघून गेला.

"काय अवलिया माणूस होता. लयच बेरकी निघाला की त्यो." त्याला जाताना पाहून ते मनात म्हणाले.

दुपारी ते पुण्यात पोहोचले. बसमधून उतरले. इकडे तिकडे पाहू लागले. गजबजलेले पुणे पाहून ते गांगरून गेले. त्यांना खूप तहान लागली होती. तेव्हा पाणी कुठे दिसते का म्हणून ते पाणी शोधू लागले. खूप शोधाशोध केल्यावर त्यांना एक सार्वजनिक नळ दिसला. पाणी पिण्यासाठी ते तिकडे निघाले.

तिथे ते हात धुण्यासाठी नळ चालू करणार तोच एक माणूस त्यांना अडवत म्हणाला,"ओ काका, आधी पाटी वाचा मग हात धुण्याचा विचार करा."

"काय लिवलंय तुमीच वाचून दावा की जरा!" त्यांना पटपट वाचायला येईना तेव्हा ते त्याला म्हणाले.

"हे पिण्याचे पाणी आहे, कृपया हात धुवू नये." त्या माणसाने वाचून दाखवले.

"वाईज पाण्याने धुतलं तर काय होतया?" ते तोंड वाकडे करत म्हणाले.

"मग दंड भरा आणि पाहिजे तेवढे पाणी घेऊन कितीही वेळ हात धुवत बसा." तो माणूस थोडा चढ्या आवाजात म्हणाला.

"च्या मायला! असं कुठं असतं व्हयं?" ते म्हणाले.

"इथं असतं, पुण्यात!" तो माणूस म्हणाला.

त्याचे बोलणे ऐकून त्यांनी तेथील पाणी पिणे रद्द केले आणि पुढे एका दुकानातून पाण्याची बाटली विकत घेऊन पाणी पिले.

त्यांना लग्नाच्या ठिकाणी जायचे होते. त्यांना बऱ्याच रिक्षावाल्यांशी हुज्जत घालून शेवटी ते सिटी बसने तिथे पोहोचले.

तिथे एक हाॅटेल होते. तिथे उसाचा रस विकायले होते. रस पाहून त्यांच्या तोंडाला पाणी सुटले. ते पिण्यासाठी तिथे गेले.

वेटरने विचारले,"बोला काय देऊ?"

"उसाचा रस!" ते म्हणाले.

"अमिताभ की जया?" त्याने विचारले.

"म्हंजी?" त्यांनी कपाळावर आठ्या पाडत विचारले.

"ती पाटी वाचा." वेटर पाटीकडे बोट दाखवत म्हणाला.

त्यांनी त्या दिशेला पाहिले. त्यावर लिहिले होते,"इथे उसाचा रस मिळेल.. अमिताभ १५ रूपये, जया १० रूपये."

बऱ्याच वेळा वाचूनही त्यांना समजले नाही हे त्यांच्या चेहऱ्यावरून वेटरला समजले तेव्हा त्याने सांगितले,"फुल्ल ग्लास १५ आणि हाफ ग्लास १० रूपये."

"आयला, असं हुतं व्हयं. सरळ तसं लिवायच नव्हं. काय बी कसं लिव्हता?" ते हसून म्हणाले.

"मालकाला विचारा, ते माझं काम नाही. किती देऊ ते सांगा." वेटर खांद्यावर गमजा टाकत वैतागत म्हणाला.

"हुं..हाफ गिलास दे बाबा, घसा कोरडाफेक पडलया. जरा ओला करतो." ते सुस्कारा टाकत म्हणाले.

रस पिल्यावर ते लग्नाच्या ठिकाणी विचारत विचारत गेले.

लग्न पाचव्या मजल्यावर होते. तिथे कसे जायचे हे त्यांना कळेना. इकडे तिकडे त्यांनी पाहिले.

"वरती कसे जायचे वं?" जाणाऱ्या एका माणसाला अडवून त्यांनी विचारले.

त्या माणसाने त्यांना वरून खालपर्यंत न्याहाळून पाहिले आणि भुवया आकसून घेत म्हणाले,"धडधाकट दिसता की, एवढ्या लवकर कशाला वरती जायचे आहे तुम्हाला? तरीही तुमची इच्छा असेल तर इथे खूप साऱ्या गाड्या येतात. कोणत्याही गाडीसमोर उभे राहा. दोनच मिनिटांत वरती पोहोचाल."

त्या माणसाचं बोलणं आधी तर त्यांना काही कळलं नाही. जेव्हा कळलं तेव्हा ते दचकून म्हणाले,"ओ, काय बी कसं बोलतासा? म्या तसं वरती जाण्याबद्दल नव्हत इचारल. इथं बिल्डिंगाच्या पाचव्या मजल्यावर कसं जायचं ते इचारत होतो."

"मग तसं विचारायचं ना राव. उगीच फालतूचा टाईमपास झाला. ती पाटी वाचा आणि मगच विचार करून जा." तो माणूस पाटीकडे बोट दाखवत म्हणाला आणि निघून गेला.

"आयला, इथं कोणाला काय इचारायची सोयच न्हाई? काय बी विचारलं की समदी पाटीकडे बोट दावत्याती. जाऊ दे तिकडे, आता न्हाई कुणालाबी इचारत बसत. माझं म्या पाटी वाचतो अन् जातो." ते स्वतःशीच पुटपुटले आणि पाटीच्या दिशेने निघाले.

पाटीवर लिहीले होते -"बाहेरच्या लोकांनी लिफ्ट वापरू नये, अडकल्यास सोसायटी जबाबदार नाही."

"काय बी लिवतात? पावणा काय बाहेरचा असतु व्हयं, म्या आता या लिफ्टनीच जाणार." पाटी वाचून ते मनात म्हणाले.

येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे त्यांनी निरिक्षण केले होते. बटण दाबून आत जातात. तसे बटण दाबून बाहेर यायचे त्यात काय अवघड आहे असा विचार करून ते लिफ्टमध्ये एकटेच शिरले.

आत जाताच त्यांनी पाचव्या मजल्याचे बटण दाबून धरले. ते काय बंद होईना तेव्हा पुन्हा जोरात दाबले. तेव्हा कुठे ती लिफ्ट चालू झाली. ते खुश झाले; पण ती खुशी जास्त वेळ तग धरू शकली नाही. कारण थोड्याच वेळात ती लिफ्ट खडखड आवाज करून मध्येच बंद पडली आणि गजाभाऊ अडकून बसले.

ते पुरते घाबरून गेले. काय करावं हे त्यांना समजेना. थोडा वेळ थांबून त्यांनी सगळी बटणे सारखी सारखी दाबून पाहिले तरीही काहीच झाले नाही.

तेव्हा मात्र त्यांची घाबरगुंडी उडाली आणि अंगाला दरदरून घाम फुटला. ते जोर जोरात ओरडू लागले. "अरं कोणी हाय का? वाचवा! वाचवा!"

त्यांच्या आवाजाने आजू बाजूचे लोक तिथे गोळा झाले. त्यात त्यांचा मित्रही होता. त्यांनी त्यांचा आवाज ओळखला. लगेच इलेक्ट्रिशियनला बोलावून घेतले आणि त्यांना बाहेर काढण्यात आले.

ते पूर्णपणे घाबरून गेले होते. त्यांच्या मित्राला पाहून त्यांना दिलासा मिळाला खरा. पण आहेर त्यांच्या हाती सोपवून ते परस्पर निघून आले.

त्या मित्राने त्यांना वरती चल म्हंटल्यावर ते म्हणाले ,"नग रं, बाबा.. म्या खालीच ठीक हाय. तू वक्तावर आला नसता तर म्या खरंच वरती गेलो असतो. इथल्या पाट्या बी कमाल हायती अन् माणसं बी. गड्या, माझं गावच भलं मला."

ते पुन्हा परतीच्या वाटेवर निघाले. पण पुन्हा कधी पुण्यात गेलो की लिफ्टमध्ये कधीच चढणार नाही असा कानाला खडा लावला.

समाप्त -

©️ जयश्री शिंदे


सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे.


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →